पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांच्या संदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती

पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांच्या
देहत्यागाचा आज अकरावा दिवस आहे, त्यानिमित्ताने…

पू. (सौ.) सखदेवआजींच्या अस्थिकलशाचे
विसर्जन करतांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

paji_kutumb
डावीकडून आसंदीवर बसलेले श्री. शशिकांत सखदेव, पू. (सौ.) आशालता शशिकांत सखदेव, मागील रांगेत पू. आजींच्या कन्या कु. राजश्री सखदेव, पुत्र श्री. गुरुदत्त सखदेव आणि स्नुषा सौ. हेमलता सखदेव

१. कन्यागत पर्वाच्या निमित्ताने गंगा नदी कृष्णा नदीकडे आल्याने अस्थिविसर्जनासाठी गंगातिरी जाण्याची आवश्यकता न पडणे

२१.८.२०१६ या दिवशी पू. (सौ) सखदेवआजींच्या अस्थिसंचयन विधीनंतर त्यांच्या अस्थि आणि रक्षा यांचे विसर्जन करायचे होते. सध्या कन्यागत पर्व सुरू असल्याने पू. आजींच्या अस्थि आणि रक्षा नृसिंहवाडी येथे कृष्णेच्या पात्रात विसर्जित करण्यास आम्हाला सांगितले. खरेतर अस्थिविसर्जनासाठी लोक गंगातिरी जातात; पण प्रत्यक्ष गंगा कृष्णेला भेटण्यासाठी येते, त्याच कालावधीत प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे पू. आजींनी देहत्याग केल्याने नृसिंहवाडी येथे अस्थिविसर्जन करणे सोपे झाले. यावरून गुरु प्रत्येक क्षणाला कशी काळजी घेतात, हे लक्षात आले.

२. अस्थिविसर्जन करण्यास जाण्यासाठी आगगाडीचे ११५ जणांनंतर आरक्षण मिळणार असणे; परंतु अस्थिसंचयन विधीनंतर आगगाडीचे आरक्षण मिळाल्याचा संदेश भ्रमणभाषमध्ये आलेला दिसणे

नृसिंहवाडी येथे अस्थिविसर्जन करण्यास सांगितल्यानंतर २०.८.२०१६ या दिवशी मी मिरजेला जाण्यासाठी संगणकावर आगगाडीचे आरक्षण करू लागलो. त्या वेळी गाडीला गर्दी असल्याने मला ११५ जणांनंतर आरक्षण (११५ वेटींग) मिळू शकणार होते. २१.८.२०१६ या दिवशी अस्थिसंचयन विधी झाल्यानंतर मी आश्रमात आलो, तर माझ्या भ्रमणभाषमध्ये मला आरक्षण मिळाल्याचा संदेश आलेला दिसला. यावरून लक्षात आले की, गुरूंनी आगगाडीचे आरक्षण मिळण्याचीही काळजी घेतली. आपण केवळ हो म्हणावे, बाकी गुरूंनी सर्व केलेलेच असते, हे पुन्हा एकदा शिकायला मिळाले.

३. पू. आजींच्या अस्थिकलशाने प्रथम निर्गुण
गंगेकडे धाव घेऊन नंतर पंचगंगेच्या पात्रात प्रवाहित होऊन विलीन होणे

२२.८.२०१६ या दिवशी सकाळी ८ वाजता पू. आजींच्या अस्थि घेऊन मी आणि माझे मामा श्री. अरविंद मराठे नृसिंहवाडी येथे गेलो. तेथील संगमावर मी पू. आजींच्या अस्थिकलशाचे विसर्जन केले. संगमावर मी उभा असतांना माझ्या डावीकडे कृष्णा नदीचे पात्र होते. आता कन्यागत पर्व असल्याने तेथेच कृष्णा नदीला गंगा नदी येऊन मिळते. माझ्या उजवीकडे नदीचा वहाता प्रवाह होता. तेथून कृष्णेला पंचगंगा नदी मिळून ती प्रवाहित होते. नदीत अस्थिकलश सोडल्यानंतर माझ्या उजवीकडे पाण्याचा प्रवाह असतांनाही कलश प्रथम साधारण १५० फूट माझ्या डावीकडे जेथे गंगा आणि कृष्णा नद्या आहेत, तेथे गेला; म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध गेला. १५० फुटांवर तेथे असलेल्या एका पाईपला गोल वळसा घालून नंतर तो पंचगंगेच्या पात्राच्या दिशेने म्हणजे माझ्या उजवीकडे गेला; म्हणजे पू. आजींनी प्रथम निर्गुण गंगेकडे धाव घेतली आणि नंतर त्या पंचगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्या. पू. आजींचा एकूण प्रवास निर्गुणाच्या दिशेनेच होता. देहत्यागानंतरही त्यांच्या अस्थींनी निर्गुण गंगेकडेच धाव घेतली आणि नंतर त्या पंचगंगेच्या प्रवाहात जाऊन विलीन झाल्या.

४. पू. आजींच्या अस्थिकलशाचे विसर्जन करतांना
माझे मन अतिशय शांत होते. मनात एकही विचार नव्हता.

– श्री. गुरुदत्त सखदेव (पू. आजींचा पुत्र), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.८.२०१६)

पू. (सौ.) सखदेवआजींनी स्वतःच्या देहत्यागाची सर्व सिद्धता स्वतःच करणे

१. देहत्यागापूर्वी २ घंटे पू. आजींचे अंग पुसून कपडे पालटणे आणि देहत्याग करून गुरूंच्या चरणी संपूर्ण विलीन होतांना पू. आजी शरिरानेही शुद्ध होऊन गेल्या, असे वाटणे

१०.८.२०१६ पासून पू. (सौ.) सखदेवआजींना बरेच बरे नसल्याने त्यांचे सर्व पलंगावर आवरावे लागत होते. मधेच काही दिवस त्यांना सर्दी, खोकला आणि ताप आल्याने त्यांना पुष्कळ थकवा आला होता. त्यामुळे त्यांच्या शारीरिक स्थितीनुसार त्यांचे अंग गरम पाण्याने पुसावे लागत होते. १७.८.२०१६ या दिवशी दुपारी ३ वाजता त्यांचे अंग पुसून कपडे पालटले, तसेच त्यांच्या पलंगावरील चादरही पालटली. त्यानंतर त्या एका कुशीवर झोपल्या. त्यानंतर दोन घंट्यांत त्यांनी देहत्याग केला. म्हणजे देहत्याग करून गुरूंच्या चरणी संपूर्ण विलीन होतांना त्या शरिरानेही शुद्ध होऊन गेल्या, असे वाटले.

२. पू. आजींनी १५ दिवसांपूर्वी दोन नवीन साड्या घेऊन ठेवणे आणि देहत्यागानंतर ओटी भरण्यासाठी त्या साड्या उपयोगी पडणे

देहत्यागानंतर पू. आजींची ओटी भरायची होती. पू. आजींच्या घरची, त्यांच्या माहेरची आणि त्या आश्रमाच्या असल्याने आश्रमातील साधिका ओटी भरणार होत्या. घरचे गडबडीत आल्याने त्यांनी येतांना नवीन साडी आणली नव्हती. १५ दिवसांपूर्वी पू. आजींनी मला दोन साड्या विकत घेण्यास सांगितले होते. त्यानुसार मी त्यांना आवडतील अशा दोन साड्या आणल्या होत्या. त्या साड्या शेवटी त्यांची ओटी भरण्यास उपयोगी पडल्या; म्हणजे पू. आजींनी स्वतःच साड्यांची सिद्धता करून ठेवली होती.

– कु. राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.८.२०१६)