अवयव – दानाविषयी आध्यात्मिक दृष्टीकोन !

काही जण मृत्यूनंतर शरीराचा एखादा अवयव किंवा संपूर्ण शरीर एखाद्या रुग्णालयाला दान करण्याच्या संदर्भात मृत्यूपत्रात लिहितात. काही वेळा मृताचे नातेवाईक, मित्र किंवा रुग्णालयातील कर्मचारी, तसे करण्याविषयी मृताच्या कुटुंबियांना सुचवतात. त्या वेळच्या दुःखद स्थितीत काय करावे, हे कुटुंबियांना कळत नाही. त्यामुळे कधी दडपणामुळे ते हो म्हणू शकतात. यासंदर्भात आध्यात्मिक दृष्टीकोन जाणून घेतला पाहिजे. देहदान करणे, अध्यात्मशास्त्रदृष्ट्या चुकीचे आहे. आपल्या एखाद्या नातेवाईकाला त्या अवयवाची आवश्यकता असेल, तर तसे करणे कर्तव्यकर्म म्हणून योग्य ठरेल; पण भावनेपोटी एखाद्या रुग्णालयाला देहदान केले, तर ते पुढील कारणांसाठी अयोग्य ठरते.

१. व्यक्ती मृत झाल्यानंतर तिच्या लिंगदेहाला आपल्या देहाची आणि आवडत्या वस्तूंची आसक्ती लवकर सुटत नाही अन् तो वर्षभर त्या ठिकाणी घुटमळत राहू शकतो. त्याची आसक्ती जावी आणि त्याला लवकरात लवकर सद्गती मिळावी, म्हणूनच हिंदु धर्मात अग्नीसंस्कार अन् श्राद्धविधी करण्याची पद्धत आहे. देहदान केल्यास व्यक्तीचा लिंगदेह त्या त्या अवयवाभोवती घुटमळत राहू शकतो.

२. एखाद्याला कल्पना न देता त्याच्या मरणानंतर त्याच्या देहाचे दान केल्यास आणि त्याला ते न आवडल्यास त्या अवयवाभोवती त्याचा लिंगदेह घुटमळत राहू शकतो, त्याशिवाय त्याचा लिंगदेह अवयव काढण्यास परवानगी देणार्‍या, काढणार्‍या अन् वापरणार्‍या व्यक्तींनाही त्रास होऊ शकतो.

३. एखाद्याच्या मरणानंतर त्याच्या एखाद्या अवयवाचे रुग्णालयाने वाईट व्यक्तीमध्ये रोपण केले, तर त्या व्यक्तीच्या वाईट कृत्यांमुळे लिंगदेहालाही त्रास भोगावा लागू शकतो. धर्मशास्त्रात पात्रे दानम्, म्हणजे लायक व्यक्तीला दान द्या किंवा अर्पण करा, असे सांगितले आहे; म्हणूनच अध्यात्मिकदृष्ट्या उन्नतांत एखाद्या अवयवाचे रोपण केले, तर लाभ होऊ शकतो. अपात्रे दान करणे, हे पाप आहे. पाप-पुण्याच्या पलीकडे गेलेल्या दधिची ऋषींनी स्वत:ची हाडे वज्र बनवण्यासाठी दिली. ते वज्र सत्कार्यासाठीच उपयोगात आणले जाणार होते.

४. अध्यात्मिकदृष्ट्या उन्नतांनी एखाद्या व्यक्तीला एखादा अवयव दिला, तर त्या व्यक्तीला लाभ होऊ शकतो.

५. अयोग्य दानाने देवाण-घेवाण हिशोब निर्माण होऊ शकतो आणि दान करणार्‍या जिवाला आध्यात्मिक लाभ तर होत नाहीच, उलट तो जन्म-मृत्यूच्या फेर्‍यात अडकू शकतो.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात