दक्षिण भारतात हिंदु संस्कृती टिकवून ठेवण्याचे मोलाचे कार्य करणारे विजयनगर साम्राज्य !

वैशाख शुक्ल पक्ष पौर्णिमा शके १२५८ म्हणजे २८ एप्रिल १३३६ या दिवशी ‘विजयनगर’ या राज्याची स्थापना झाली. हिंदु धर्माच्या रक्षणासाठी या राज्याची स्थापना झाली. विद्यारण्यस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली हरिहर आणि बुक्क या बंधूंनी विजयनगरच्या राजसत्तेचा पाया रचला. या बंधूंनी हे ठिकाण अगदी विचारपूर्वक निवडले होते. ही जागा विद्यारण्यस्वामी यांना मान्य झाली आणि त्यांच्या विषयीचा आदर व्यक्त करण्यासाठी हरिहर यांनी या शहराचे नामकरण ‘विद्यानगर’ असे केले. पुढे बुक्क यांनी मुसलमान आक्रमकांवर विजय मिळवला आणि ‘विद्यानगर’चे ‘विजयनगर’ असे नामकरण केले.

 

१. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा संयोग
घडवून विजयनगर साम्राज्य उभारणारे विद्यारण्यस्वामी !

१ अ. विद्यारण्यस्वामी हे शृंगेरी मठाचे शंकराचार्य विद्यातीर्थस्वामी यांचे शिष्य !

हे विद्यारण्यस्वामी कोण होते ? मुसलमान आक्रमणकर्त्यांमुळे हिंदूंचे स्वातंत्र्य, संस्कृती आणि धर्म जवळपास नष्ट झाले होते. अशा वेळी विद्यारण्यस्वामींचा उदय झाला. धर्मस्थापनेकरिताच शंकराचार्यांनी चार दिशांस चार पिठे स्थापन केली होती. ‘धर्माच्या नावावर अन्याय, अत्याचार करणे किंवा परधर्मियांचा छळ करून त्यास आपल्या धर्मात बळजोरीने ओढून आणणे’, हा अनुभव दक्षिण भारतास नवीन होता. यादव, होयसळ, पांड्य आणि काकतीय हिंदु राजे क्षणमात्रात मुसलमान आक्रमकांच्या भक्ष्यस्थानी पडत असतांना, ‘क्षात्रवृत्तीचे साहाय्य असल्याशिवाय धर्मरक्षण होत नाही’, याची जाणीव हिंदु धर्मगुरूंना झाली. त्या वेळी शृंगेरी मठाचे शंकराचार्य होते विद्यातीर्थस्वामी ! विद्यारण्यस्वामी हे त्यांचे शिष्य ! विद्यारण्यस्वामी यांनी ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा संयोग घडवून आणला आणि विजयनगर या राज्याची स्थापना केली.

१ आ. विद्यारण्यस्वामी यांचे कार्य आर्य चाणक्यांपेक्षा अधिक धोक्याचे !

हे त्यांचे कार्य ऐतिहासिक असेच आहे. इतिहासात ‘जर तर’ या प्रश्‍नाला अर्थ नसतो, हे खरे आहे. तरी पण ‘विद्यारण्यस्वामी नसते तर …’,  हा प्रश्‍न मनाला अस्वस्थ करतो. भारताच्या इतिहासात केवळ दोनच धर्मगुरूंनी राज्यस्थापनेत प्रत्यक्ष सहभाग घेतला. पहिले धर्मगुरु आर्य चाणक्य आणि दुसरे विद्यारण्यस्वामी; पण यात विद्यारण्यस्वामी यांचे कार्य आर्य चाणक्यांपेक्षा अधिक धोक्याचे होते. आर्य चाणक्यांनी अत्याचारी नंद घराण्याचा नाश करून चंद्रगुप्त मौर्यला गादीवर बसवले. एक हिंदु राजा जाऊन दुसरा हिंदु राजा गादीवर बसला. विद्यारण्यस्वामी यांनी मात्र नवीन राज्य जन्माला घातले. इस्लामी आक्रमणात संपूर्ण भारत इस्लामच्या कह्यात गेला होता. हिंदु राजे मुसलमान आक्रमणकर्त्यांसमोर गुडघे टेकत होते, मुसलमान सुलतानांचा नंगानाच चालू होता. प्रजेवर अत्याचार होत होते. हिंदूंची मंदिरे फोडली जात होती, ‘हिंदु धर्म आणि संस्कृती जिवंत रहाते कि नाही’, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अशा वेळी विद्यारण्यस्वामी यांचा उदय झाला. आर्य चाणक्यांनी चंद्रगुप्तला गादीवर बसवले; पण ते स्वत: सत्तेत सहभागी झाले नाहीत. विद्यारण्यस्वामी मात्र राज्याचे मंत्री झाले. राज्य चालवण्याचे दायित्व स्वत:वर घेतले आणि ते त्यांनी उत्तमरित्या पार पाडले. आर्य चाणक्यांचा ‘कौटलीय अर्थशास्त्र’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. तसेच विद्यारण्यस्वामी यांचे ‘परशुराम संहितेवरील भाष्य’ आणि ‘जीवनमुक्ती विवेक’ हे ग्रंथपण प्रसिद्ध आहेत. आर्य चाणक्य यांचे कार्य आणि त्यांचे नाव घराघरांत ज्ञात आहे; पण त्यांच्यापेक्षा मोठी कामगिरी करूनही विद्यारण्यस्वामी कुणालाच ज्ञात नाहीत, हे आपले दुर्दैव ! कदाचित् विजयनगरचे साम्राज्य विस्मरणात गेल्यामुळे विद्यारण्यस्वामीपण विस्मरणात गेले असावेत.

 

२. ब्रह्मविद्येत पारंगत असलेले शृंगेरी येथील
गुरुपिठावर विद्याशंकरस्वामी (विद्यातीर्थस्वामी) !

शृंगेरी येथील गुरुपिठावर विद्याशंकर नावाचे महान तपस्वी होते. त्यांचे विद्यारण्य हे शिष्य ! विद्याशंकर यांचे वडील मूळचे बिल्वारण्य येथील रहाणारे ! शृंगेरी मठाचे समाजावरील वजन अल्प होत चालले असता, विद्याशंकर यांनी त्याचे वैभव आणि सामर्थ्य पुनरुज्जीवित केले. त्यांच्या या पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नात माधवाचार्य (विद्यारण्य), हरिहर, बुक्क यांनी साहाय्य केले. विद्याशंकर ७३ वर्षे या पिठावर होते. या काळात त्यांनी आठ शिष्य संन्यासी सिद्ध केले. हे आठ शिष्य सामर्थ्यवान होते आणि त्यांनी देशभर पिठाची स्थापना करून तेथे वास्तव्य केले. विद्याशंकर यांनी अखेरची १५ वर्षे हिमालयात तपश्‍चर्या करण्यात घालवली. विद्याशंकर यांना लंबिका योगाची आवड होती आणि ते ब्रह्मविद्येत पारंगत होते. विद्यारण्य हे त्यांचे लाडके शिष्य होते. विद्यारण्यस्वामी आणि माधवाचार्य ही एकाच व्यक्तीची नावे आहेत.

 

३. अध्यात्मविद्या आणि राजविद्या यांचे पुनरुज्जीवन करून
तत्कालीन हिंदु समाजामध्ये नवचैतन्य निर्माण करणारे विद्यारण्यस्वामी !

विद्यारण्यस्वामी यांचा जन्म वर्ष १२९६ ला झाला. त्यांचे मूळ नाव माधव, आईचे नाव श्रीमती आणि वडिलांचे नाव मायण. भावांची नावे सायण आणि भोगनाथ असून ते भारद्वाज गोत्री, यजु:शास्त्रीय होते. माधवचे विद्यारण्य नामकरण शंंकराचार्यांनी केले आणि त्यांना विरुपाक्ष येथील मठाचे मठाधिपती केले. त्यांनी वर्ष १३३१ मध्ये संन्यासदीक्षा घेतली असावी. त्यांचे निधन वर्ष १३८१ ला झाले. प्रख्यात विचारवंत डॉ. पु.ग. सहस्रबुद्धे यांच्या म्हणण्याप्रमाणे, ‘मुसलमानांच्या आक्रमणामुळे हिंदूंचे स्वातंत्र्यच नव्हे, तर धर्म आणि संस्कृती यांचाही उच्छेद होण्याची वेळ आली होती. अशा वेळी विद्यारण्यस्वामी यांचा उदय झाला. त्यांनी येथील अध्यात्मविद्या आणि राजविद्या यांचे पुनरुज्जीवन केले. शुद्धीबंदीची अत्यंत घातक रूढी त्यांनी नष्ट केली आणि स्वधर्माला इष्टाभिमुख बनवून शृंगेरीच्या पिठाकडून जनतेच्या मनावरील निवृत्तीवादाची, राजकीय उदासीनतेची काजळी पुसून टाकली. हे सर्व त्यांना करता आले, करण्याचे धैर्य झाले, याचे कारण म्हणजे ‘देशकाल परिस्थिती पाहूनच धर्मनिर्णय करणे आवश्यक असते’, या मतावर ते ठाम होते. त्या काळी ‘वेदज्ञा शिरसावंद्य मानून, त्यांच्या युक्तायुक्ततेचा विचार न करता, डोळे झाकून त्याचे आचरण करणे’, या मताचा पगडा हिंदु समाजावर होता. त्यामुळे हिंदु समाज अंध अन् मूढ झाला होता. ‘आपले आचरण योग्य कि अयोग्य हे पारखून घेण्याची त्यांची दृष्टीच नाहीशी झाली होती’, असा हा त्या वेळचा निष्क्रीय, गलितगात्र हिंदु समाज मुसलमान आक्रमणाला सहज बळी पडला. माधवाचार्यांनी आपल्या वेदभाष्यात बुद्धीप्रामाण्याचा पुरस्कार आहे आणि स्वत: विचार करून धर्मनिर्णय करण्याचे महत्त्व सांगितले.

३ अ. विजयनगर साम्राज्याची धुरा सांभाळणारे राजकारणी धुरंधर विद्यारण्यस्वामी !

होयसाळ, बल्लाळ, हरिहर आणि बुक्क यांचे शृंगेरीच्या गुरुपिठाशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्या मठास ते वार्षिक मोठमोठ्या रकमा दान करीत असत. विजयनगरचे राजपुरुष शृंगेरी मठाधिपतींच्या आशीर्वादासाठी येत असत आणि मार्गदर्शनाच्या अपेक्षेने त्यांच्याकडे पहात असत. विद्यारण्यस्वामी हे केवळ धर्मगुरू नव्हते, तर विजयनगर साम्राज्याची धुरा वाहणारे राजकारणी धुरंधरही होते. ते या राज्याचे कुलगुरु आणि हरिहर अन् बुक्क यांचे सल्लागार होते.

 

४. विजयनगर साम्राज्याचे धर्मपीठ बनलेला शृंगेरी मठ !

विजयनगरच्या वैभवाच्या उन्नतीसमवेत शृंगेरीमठाचेही ऐश्‍वर्य वाढत गेले. विजयनगरच्या साम्राज्य महोत्सवाच्या वेळी शृंगेरीमठासही इनाम जमिनीची सनद मिळाली. अशा रीतीने विद्यारण्यस्वामी यांच्या कर्तृत्वाने शृंगेरी हे विजयनगर साम्राज्यातील धर्मपीठच नव्हे, तर लहान साम्राज्य बनले. एका शिलालेखात विद्यारण्यस्वामी यांचा उल्लेख ‘मूर्तीमंत दिव्य तेजोनिधी’, असा आहे. त्यांनी सैन्य किंवा व्यापारी स्वरूपाचे साम्राज्य उभारले नाही, तर हिंदु साम्राज्य उभारले. हरिहर आणि बुक्क या दोन बंधूंनी विजयनगरच्या साम्राज्याचा पाया रचला.

 

५. हरिहर आणि बुक्क यांना परत स्वधर्मात घेऊन
दक्षिण भारत इस्लाममय होण्यापासून वाचवणारे विद्यारण्यस्वामी !

हरिहर आणि बुक्क हे संगमच्या पाच पुत्रांपैकी दोघे ! बाकीच्या तिघांची नावे कंपण्णा, मुद्दाप्पा आणि माराप्पा अशी होती. हा संगम कोण होता ? वारंगळचे काकतीय, होयसळ आणि कांपिलीचे राजे यांच्यापैकी कोणाच्या तरी किंवा पालटत्या परिस्थितीप्रमाणे दोघांच्या किंवा तिघांच्याही सेवेत महत्त्वाच्या पदावर संगमने आणि त्याच्या मुलांनी काम केले. दक्षिणेतील हिंदु राजवटी कोसळत असतांना हरिहर आणि बुक्क यांना दिल्लीच्या सुलतानाने पकडून दिल्लीस नेले होते अन् त्यांना इस्लाम धर्माची दीक्षा देण्यात आली होती. दक्षिणेत ते परत मुसलमानी सैन्यासमवेत आले होते. या दोघांची कोठेतरी विद्यारण्यस्वामी यांच्याशी भेट झाली. ‘भेट कोठे झाली’, ‘राजस्थापनेची योजना काय ठरली ?’, याविषयी इतिहास अज्ञात आहे. धर्मांतर झाले, तरी हरिहर आणि बुक्क यांना इस्लामविषयी मुळीच प्रेम नव्हते. त्यांच्या अंत:करणात हिंदु धर्माविषयी अजूनही भक्ती होती. सुदैवाने त्यांना विद्यारण्यस्वामी भेटले. त्यांनी दोघांना स्वधर्मात घेतले. त्यासाठी त्यांनी त्यांचे गुरु शंकराचार्य विद्यातीर्थ यांची संमतीही मिळवली. त्या काळी विद्यारण्यस्वामींनी असाधारण धैर्य दाखवून त्या बंधूंचे धर्मपरिवर्तन केले म्हणून भारत इस्लाममय होण्यापासून वाचला. त्या वेळची जनता पुराणमतवादी होती आणि लोकांचा या शुद्धीस विरोध होता; पण विद्यारण्यस्वामी यांनी असे जाहीर केले की हरिहर स्वत: राजा न होता साक्षात् भगवान विरुपाक्षच राज्य करणार आहेत. प्रारंभी राजमुद्राही देवांच्या नावाचीच करण्यात आली आणि लोकांचे समाधान करण्यात आले.

 

६. विजयनगर साम्राज्य नसते, तर दक्षिण भारत यवनमय झाले असते !

भारताच्या इतिहासात संपूर्ण भारत दोन वेळा इस्लाममय होण्याची शक्यता होती. इ.स.१३३० मध्ये म्हणजे विजयनगर साम्राज्याच्या उदयाच्या आधी आणि दुसर्‍यांदा १६८९ मध्ये ! विद्यारण्यस्वामी, हरिहर आणि बुक्क यांनी विजयनगरच्या राज्याची स्थापना केली अन् तुंगभद्रा नदी ते कन्याकुमारीपर्यंतचा दक्षिण भारत इस्लाममुक्त केला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज हे छत्रपती बनले आणि मराठ्यांची राजधानी रायगडहून जिंजीला हालवली. त्यांनी औरंगजेबाच्या आलमगीर बनण्याच्या स्वप्नाला मोठा शह दिला. नंतर संताजी, धनाजींनी इतिहास घडवला, तो सगळ्यांना ठाऊकच आहे. विजयनगर, विद्यारण्यस्वामी, हरिहर आणि बुक्क यांचे आपल्यावर फार मोठे ऋण आहे. विजयनगरचे साम्राज्य वर्ष १३३६ पासून १५६५ पर्यंत पूर्ण वैभवाने आणि पुढे १६६६ पर्यंत कृष्णपक्षातील चंद्राप्रमाणे नांदले. या ३३० वर्षांत हिंदु संस्कृतीस जिवंत राखण्याचा मान या साम्राज्याचा चार घराण्यास आहे. या साम्राज्यातील बहुतेक सर्व राजे धर्मनिष्ठ आणि कर्तृत्ववान होते. त्यांनी बांधलेल्या सुंदर मंदिरांच्या आश्रयाने हिंदु तत्त्वज्ञान आणि संस्कृती टिकली अन् तिचा विकास झाला. हरिहर, बुक्क आणि विद्यारण्य या त्रयीने मुसलमानी आक्रमणास बंधारा घातला. हा बंधारा जर घातला नसता, तर अवघा दक्षिण भारत यवनमय झाला असता. विजयनगरच्या साम्राज्याचा मराठेशाहीवर पण पीरणाम झाला. विजयनगरने अखंड तेवत ठेवलेली हिंदुत्वाची ज्योत पुढे त्यांच्या हातून गळून पडणार, तोच शहाजी महाराजांचे आगमन बेंगळुरूला झाले. त्यांनी विजयनगरच्या शेवटचा अधिपती श्रीरंग रायलू यांच्या हातांतून ती आपल्या हातात घेतली आणि नंतर ही ज्योत छत्रपती शिवाजी महाराजांकडे दिली. शहाजी महाराजांची जहागिर तंजावरपर्यंत होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दक्षिण दिग्विजयात जिजींचा परिसर स्वराज्यात आणला.

(संदर्भ : अज्ञात)