राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील त्रिनेत्र श्री गणेश मंदिराची वैशिष्ट्ये

राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील त्रिनेत्र
श्री गणेश मंदिराची वैशिष्ट्ये आणि श्री गणेशाला
संकटनिरसनासाठी प्रार्थना करण्यास जातांना झालेला त्रास अन् आलेल्या अनुभूती

१. रणथंभोर येथील त्रिनेत्र गणेश मंदिराची वैशिष्ट्ये

Trinetra-ganesh-shrungaar-ke-baad_Clr
त्रिनेत्र गणेशाचे चित्र

१ अ. रणथंभोरच्या जंगलातील डोंगराच्या कड्यातून स्वयंभू गणेश प्रकट होणे

समुद्र सपाटीपासून २ सहस्र फूट उंचावर असलेल्या रणथंभोरच्या जंगलातील एका डोंगराच्या कड्यातून हा स्वयंभू गणपति प्रकट झाला आहे. श्री गणेशाची मूर्ती पूर्ण नसून डोंगरातून बाहेर आलेल्या भागात श्री गणेशाच्या केवळ मुखाचा आणि सोंडेचा भाग आपल्याला दिसतो. श्री गणेशाच्या दोन्ही बाजूंना त्याचे पुत्र शुभ-लाभ आणि त्यांच्या शेजारी पत्नी रिद्धी-सिद्धी आहेत. अशा प्रकारे गणेश पंचायतन आहे. त्रिनेत्री गणेशाचा तिसरा नेत्र म्हणजे बुद्धी असल्याचे तेथील पुरोहितांनी सांगितले. श्री गणेशाच्या समोर श्रीविष्णूची मूर्ती आहे. त्या मूर्तीमध्ये जिवंतपणा आणि तारक-मारक भाव जाणवतो.

१ आ. पंचक्रोशीतील भक्तांनी कोणत्याही कार्याचे पहिले निमंत्रण श्री गणेशाला देणे

द्वापरयुगात भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला होता. तेव्हा त्रिनेत्र गणेश प्रथम प्रकट झाल्याचे तेथील पुरोहित सांगतात. त्रिनेत्र गणपतीचे हे पहिले मंदिर आहे. पंचक्रोशीतील भक्त कोणत्याही कार्याचे पहिले निमंत्रण श्री गणेशाला देतात.

 

२. आख्यायिका

२ अ. अल्लाउद्दीन खिलजीने मंदिर तोडण्यासाठी
हत्तीला पाठवणे आणि हत्तीने मंदिरासमोर बसून रहाणे
अन् मंदिरात महान शक्तीचा वास असल्याची त्याला जाणीव होणे

अल्लाउद्दीन खिलजीने हे मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने हत्ती मागवले. पहिला हत्ती आला, तो खाली बसला. दुसरा आणि तिसराही खाली बसला. तेव्हा त्याला लक्षात आले, येथे एक महान शक्तीचा वास आहे. तो गणेशाला शरण गेला आणि त्याने या मंदिराचे गर्भगृह सुशोभित केले. त्याने याला गणेश-पीर असे संबोधले होते. तेव्हापासून या देवालयात मुसलमान लोक श्रीगणेशाच्या दर्शनाला येेतात. ते त्यांच्या परिवारातील विवाह आदींचे प्रथम निमंत्रण देवाला देतात. तेथे मुसलमानांच्या परंपरेनुसार काचेच्या आरास केलेल्या भिंती आणि छते आजही पहायला मिळतात. रणथंभोरच्या या किल्ल्यावर गुप्त गंगेचेही स्थान आहे. – श्री. प्रणव मणेरीकर

 

३. त्रिनेत्र गणेशाच्या दर्शनाला जातांना आलेल्या अनुभूती

३ अ. प्रवासात झालेले त्रास

३ अ १. मंदिरात पोचण्यापूर्वी शारीरिक त्रास होणे, अकस्मात गाडीसमोर गाय येणे, चालकाने गाडी नियंत्रणात आणणे आणि आलेले अरिष्ट गायीने स्वतःवर घेतल्याचे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगणे

रणथंबोर येथे पोचण्याआधी ४० कि.मी. अंतर शिल्लक असतांना मला दाब जाणवणे, मरगळ येणे आणि मळमळणे, असे त्रास झाले. मी रक्षणार्थ प्रार्थना केल्यावर काही मिनिटांत गाडीसमोर अकस्मात् एक गाय आली. चालकाने वेळीच ब्रेक दाबून गाडी नियंत्रणात आणली. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळताईंना याविषयी सांगितले असता त्या म्हणाल्या, गायीने आपल्यावर आलेले अरिष्ट स्वतःवर घेतले आणि प्रवास सुखकर केला.

– पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे

३ अ २. प्रवासात व्यक्तीला रस्ता विचारल्यावर त्याने खराब रस्ता सांगणे आणि नंतर त्या व्यक्तीला वाईट शक्तींचा त्रास असल्याचे जाणवणे

प्रवासात रणथंभोर येथे पोचण्यासाठी १५ कि.मी. अंतर असतांना आम्ही एके ठिकाणी एका व्यक्तीला रस्त्याविषयी विचारले. ती व्यक्ती अन्य धर्मीय होती. तिने खड्डे असलेल्या रस्त्यातून न जाता दुसरा रस्ता सांगितला. पुढे ३ कि.मी. गेल्यावर एका व्यक्तीला रस्त्याविषयी विचारल्यावर तिने गावातील खराब रस्ता सांगितला. त्या व्यक्तीला वाईट शक्तींचा त्रास असल्याचे जाणवले होते. त्याने सांगितलेल्या मार्गावरून जातांना अनेक ठिकाणी रस्ता खराब होता. अनेक ठिकाणी पाणी साचले होते आणि रस्ता अरुंद होता.

– श्री. प्रणव मणेरीकर

३ आ. चांगल्या अनुभूती

३ आ १. अत्यल्प झोप होऊनही थकवा न जाणवता आनंद आणि उत्साह जाणवणे

१५.८.२०१६ या दिवशी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा त्रिनेत्र गणेशाला जाऊन संकल्प सोडण्याविषयी दूरभाष आला. सकाळी ७ वाजता पूजाविधी करण्याचे ठरले. जयपूरवरून त्रिनेत्र गणेशाचे मंदिर १६५ कि.मी. अंतरावर आहे. आम्ही ७ वाजता पोचण्यासाठी पहाटे ३ वाजता प्रवासाला निघायचे ठरवले. रात्री १.३० वाजेपर्यंत काही सेवा चालू होत्या. २ वाजता उठून स्नान करून निघायचे होते. अत्यल्प झोप होऊनही कोणत्याही प्रकारचा थकवा किंवा ग्लानी आली नाही. गणेशदर्शनाला निघतांना उत्साह होता. गाडीत जातांना नामजप चालू होता आणि आनंद जाणवत होता.

३ आ २. अल्प कालावधीत पू. पिंगळेकाकांनी २०० पेक्षा अधिक पायर्‍या चढणे आणि त्या वेळी त्यांना शारीरिक त्रास न होणे

मंदिर डोंगरावर किल्ल्यात होते. तिथे चढायला १०० पायर्‍या आहेत, असे सांगितले होते. प्रत्यक्षात २०० पेक्षा अधिक पायर्‍या होत्या. ७ वाजण्यास २० मिनिटे होती. इतक्या अल्प कालावधीत पोचणे शक्य नसल्याने पू. पिंगळेकाकांनी मला पुढे जाण्यास सांगितले. अगदी धावत गेल्याने मी ७ च्या आत मंदिरात पोचलो. पाठोपाठ पू. पिंगळेकाका ७.०५ मिनिटांनी पोचले. प्रत्यक्षात पू. काकांना अधिक चालल्याने आणि पायर्‍या चढल्याने थकवा येतो, स्नायू आखडतात आणि श्‍वासही लागतो; परंतु त्या वेळी तसे काही न होता ते लवकर चढू शकले.

३ आ ३. महर्षींच्या आज्ञेप्रमाणे पू. पिंगळेकाकांनी श्री गणेशाच्या चरणी संकल्प सोडणे

सकाळी ७ ते ९ या कालावधीत पुरोहितांनी त्रिनेत्र गणपतीला अभिषेक घालून विधीवत् पूजा केली. त्यानंतर पू. पिंगळेकाकांनी संकल्प केला. संस्थेवरील सर्व विघ्ने दूर होण्यासाठी, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा मृत्यूयोग टळण्यासाठी, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे अन् साधकांचे रक्षण होण्यासाठी श्री गणेशाच्या चरणी संकल्प सोडला.

३ आ ४. मंदिराच्या परिसरात भ्रमणभाषचे नेटवर्क उपलब्ध नसतांना ते उपलब्ध होऊन पू. पिंगळेकाकांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याशी बोलता येणे

श्री त्रिनेत्र गणेश मंदिर हे जंगलात एका किल्ल्यात उंचावर आहे. तेथे भ्रमणभाषवर बोलण्यासाठी कोणत्याही आस्थापनाचे नेटवर्क उपलब्ध नव्हते. विधी करून किल्ल्यातून खाली उतरतांना पू. पिंगळेकाकांनी सहज भ्रमणभाष पाहिल्यावर नेटवर्क उपलब्ध होते. त्यामुळे ते सद्गुरु अंजलीताईंशी बोलू शकले. हे संभाषण चालू असतांना किल्ला चढणार्‍या एका व्यक्तीने विचारले, तुमचे कोणत्या आस्थापनाचे नेटवर्क आहे ? मी एअरटेल असल्याचे सांगितल्यावर ती म्हणाली, माझाही एअरटेल आहे; पण माझ्या भ्रमणभाषवर नेटवर्क येत नाही. त्या वेळी देवाने ही अनुभूती दिल्याचे लक्षात आले.

३ आ ५. पू. पिंगळेकाकांनी हरिणांच्या प्रकारांविषयी बोलणे आणि त्या वेळी काळवीट दिसणे

दर्शन घेऊन परत येत असतांना पू. पिंगळेकाका हरिणांचे चितळ, सांबर, कस्तुरी, काळवीट असे प्रकार असतात, असे सांगत होते. त्याच वेळी आम्हाला ३ काळवीट झाडाखाली बसलेले दिसले. प्रवासात आणि मंदिराच्या आवारात मोर, माकड, चितळ, साप, गाय, कोल्हा असे अनेक प्राणी आणि पक्षी होते.

 

४. पूजेच्या वेळी लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

अ. पू. पिंगळेकाका सद्गुरु (सौ.) अंजलीताईंनी सांगितलेली प्रार्थना श्री गणेशाला करत असतांना त्यांच्या पायाला पांढरा उंदीर स्पर्श करून गेला. हे शुभसूचक आहे.

आ. पूजा करत असतांना तेथे पांढर्‍या मूषकाचे दर्शन झाले. त्याने पूजेसाठी आणलेल्या दूर्वा खाल्ल्या. तो थोडा वेळ तेथे थांबला होता. छायाचित्र काढून झाल्यावर तो पूजा साहित्यावरून निघून गेला.

इ. पूजाविधी करत असतांना एक धागा श्री गणेशाला बांधला होता. त्याचे दुसरे टोक पू. पिंगळेकाका आणि माझ्या हातात दिले होते. संपूर्ण पूजाविधी चालू असतांना ते हातात धरले होते. त्यामुळे आम्हाला चैतन्य मिळत असल्याचे जाणवले.

ई. पूजा झाल्यावर आशीर्वादरूपी पुड्या पू. पिंगळेकाका आणि मला दिल्या. त्या लाल कापडात बांधून खोलीत टांगायला सांगितल्या.

उ. यापुढे परात्पर गुरु जयंत आठवले, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यासाठी प्रतिदिन १ फुलांचा हार त्रिनेत्र गणेशाला घालण्याचा संकल्प सोडला आहे.

– श्री. प्रणव मणेरीकर

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात