गणेशोत्सव : आत्मावलोकनाची आवश्यकता !

१. राष्ट्रीय प्रवृत्तीची जोपासना करून समाजाला संघटित
करण्यासाठी गणेशोत्सव हा लोकमान्य टिळकांचा उद्देश असणे

सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ पुण्यात ख्रिस्ताब्द १८९३ मध्ये लोकमान्य टिळकांनी केला. या वेळी कीर्तने, प्रवचने, संगीत मेळे इत्यादी विविध कार्यक्रम ठेवून समाजात जागृती करता येईल, असा लोकमान्यांचा उद्देश होता. विस्कळीत झालेला समाज या निमित्ताने संघटित होऊन त्याने राजकीय स्वातंत्र्याच्या चळवळीत महत्त्वाची कामगिरी करावी, असा त्यांचा मानस होता. लोकमान्यांच्या प्रोत्साहनामुळे या उत्सवाचा सर्वत्र प्रसार झाला आणि राष्ट्रीय प्रवृत्तीची जोपासना होऊ लागली. स्वातंत्र्यप्राप्तीच्या कार्यात या उत्सवाचे मोठे साहाय्य झाले, यात शंका नाही.

 

२. सार्वजनिक गणेशोत्सवाला पुन्हा त्याची पूर्वीची प्रतिष्ठा
प्राप्त करून देणे, हे आपल्या सर्वांचे पवित्र कर्तव्य असायला हवे !

आजही आपण गणेशोत्सव साजरा करतो; पण आज त्याचे मूळ प्रबोधनाचे कार्य म्हणजे धर्मातून सामाजिक प्रबोधन घडवून आणण्याचे कार्य प्रत्यक्षात पार पडत आहे का ? आजही राष्ट्रप्रेमी देखावे, भजने इत्यादी गोष्टी या गणेशोत्सवात अल्प प्रमाणात दिसून येतात; नाहीत असे नाही, त्याच जोडीला दुर्मिळपणे काही उद्बोधक व्याख्यानमालाही असतात; पण लोकमान्यांच्या काळात उद्बोधन हाच मुख्य उद्देश होता. आज ती जागा करमणुकीने घेतली आहे. वारेमाप पैसा व्यय करणे आणि त्या अनुषंगाने शिष्टाचाराचा पुरता बट्याबोळ करणे, तसेच सिनेमा-संगीत, सवंग मनोरंजन याविना आजच्या गणेशोत्सवात दुसरे काही महत्त्वाचे राहिलेले नाही. ज्यांची त्या सकलकलानिधी गणरायावर श्रद्धा आहे, त्या सर्वांनी याविषयी आत्मावलोकन केले पाहिजे, असे आम्हाला वाटते. आमच्या मते सार्वजनिक गणेशोत्सवाला पुन्हा त्याची पूर्वीची प्रतिष्ठा प्राप्त करून देणे, हे आपल्या सर्वांचे पवित्र कर्तव्य आहे आणि तसे करणे शक्यही आहे.

 

३. गणेशोत्सवाला पूर्वप्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी करायच्या उपाययोजना

अ. देशातील ज्वलंत समस्यांच्या संदर्भात जागृती करणे

हा उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यामागे लोकमान्य टिळकांचा जनजागृतीचा जो उद्देश होता, तो लक्षात घेऊनच तो साजरा केला पाहिजे, उदा. या उत्सवाच्या वेेेळी लोकसंख्यावाढ, भ्रष्टाचार, दहशतवाद, निरक्षरता, व्यसनाधीनता, हुंडाप्रथा इत्यादी देशातील ज्वलंत समस्यांच्या संदर्भात लोकांना जागृत केले पाहिजे आणि त्या निपटून काढण्यासाठी त्यांचे सहकार्य मागितले पाहिजे. देखावे, व्याख्याने, भजने, संगीत इत्यादी लोकांना प्रेरणा देणार्‍या अनेक प्रकारांतून हे कार्य केले जाऊ शकते. त्यातून मनोरंजनही होईल आणि उद्बोधनही.

आ. एक गाव एक गणपती ही योजना राबवून अनेक समस्यांवर पर्याय काढणे शक्य

हे सर्व साध्य करण्यासाठी आवश्यक धन आणि योग्य व्यवस्थापन दोन्हींचीही आवश्यकता पडेल. एक गाव एक गणपती किंवा एक वॉर्ड एक गणपती अशी संकल्पना राबवली गेली, तर हे सहज शक्य होऊ शकेल. यामुळे आणखी एक लाभ होईल. गणेशविसर्जनप्रसंगी असंख्य गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. ही सारी मिरवणूक २५-३० घंटे चालते. सगळे रस्ते गर्दीमुळे बंद होतात. ही समस्याही आटोक्यात आणता येईल.

गणेशमूर्तींची उंचीही अल्प करणे आवश्यक आहे. मूर्ती मोठी असेल, तर विसर्जन करण्यासाठी रस्त्यावरून घेऊन जातांना अनेक अडचणी निर्माण होतात, तसेच प्रदूषणाचा धोकाही पुष्कळ वाढतो.

इ. उत्सवाची काही रक्कम धार्मिक संस्थांना देणगी देणे

उत्सवाचा व्यय वजा जाता जी रक्कम उरते (शिल्लक रहाते) ती देणगी म्हणून काही धार्मिक संस्थांना देऊन तिचाही धर्मकार्यात उपयोग केला पाहिजे.

अशा प्रकारे गणेशोत्सव साजरा केला, तर या उत्सवाची प्रतिष्ठाही वाढेल आणि लोकमान्य टिळकांचे स्वप्नही खर्‍या अर्थाने साकार होईल.

(संदर्भ : संपादकीय गीता मंदिर पत्रिका, सप्टेंबर २०००)

(वर्ष २००० मध्ये प्रसिद्ध झालेल्या या लेखातील सूत्रे आजही लागू पडतात, हे हिंदूंना लांछनास्पद आहे. – संपादक)