उतारवयातही नवीन गोष्टी शिकण्याची तळमळ असलेले आणि प्रत्येक गोष्टीचे श्रेय गुरुदेवांना देणारे पू. भगवंतकुमार मेनराय !

P_Menrai_aajoba

पू. भगवंतकुमार मेनराय यांचा श्रावण शुक्ल पक्ष पंचमी (नागपंचमी ७.८.२०१६) या दिवशी तिथीनुसार वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

१. शिकण्याची वृत्ती

रामनाथी आश्रमात काही साधकांना अरोमाथेरेपी शिकवत आहेत. पू. मेनरायकाका त्याविषयी जिज्ञासेने प्रश्‍न विचारतात आणि मला ही थेरेपी शिकायची आहे, असे म्हणतात. ते हिंदी भाषिक असल्यामुळे त्यांना मराठी बोलता येत नाही. बहुतांश साधक मराठी भाषिक असल्याने त्यांच्याशी बोलण्यासाठी ते मराठी शिकत आहेत.

२. पंचकर्म उपचारपद्धती अधिक परिणामकारक होण्याच्या दृष्टीने स्वतः प्रयोग करून नंतर इतरांनाही करायला सांगणे

पंचकर्मातील मसाज चांगला आणि परिणामकारक होण्याच्या दृष्टीने पू. काका सूत्र सांगून त्याप्रमाणे करून दाखवतात. दरवाजाच्या बिजागर्‍यांमध्ये तेल घातल्यानंतर तो आपण हलवून बघतो. त्याप्रमाणे पू. काका पंचकर्म केल्यानंतर व्यायाम करून बघतात आणि आम्हालाही अन्य साधकांचे पंचकर्म झाल्यावर त्यांच्याकडून असा व्यायाम करून घ्या, असे सांगतात. पू. काका याप्रमाणे व्यायाम केल्याने त्याचे काय लाभ होतात ?, ते समजावून सांगतात.

३. गुरुदेवांप्रती भाव

पू. काकांना तीव्र शारीरिक आजार असूनही त्यांना त्याचे काही वाटत नाही. गुरुदेव माझी काळजी घेतात आणि गुरुदेवांच्या कृपेनेच सर्व घडत आहे, असा त्यांचा भाव आहे.

४. अनुभूती

४ अ. पू. काकांवर पंचकर्म उपचार केल्यानंतर डोकेदुखी दूर होणे : २.८.२०१६ या दिवशी पू. काकांवर पंचकर्म उपचार चालू करण्यापूर्वी माझे डोके पुष्कळ दुखत होते; पण पू. काकांवर पंचकर्म उपचार केल्यानंतर माझ्यावर उपाय होऊन डोकेदुखी दूर झाली. त्यांना हे सांगितल्यावर ते हसून म्हणाले, हे सर्व गुरुदेवच करतात. – सौ. गौरी चौधरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.८.२०१६)

शारीरिक त्रास असतांनाही सहजावस्थेत असणारे पू. भगवंत मेनराय !

१. भगवान शिवाला प्रिय अशा मासात जन्म होणे

हिंदु धर्मात श्रावण मासाला विशेष महत्त्व आहे. हा मास भगवान शिवाला प्रिय आहे. याच मासात नागपंचमीच्या शुभतिथीला शिवभक्त पू. भगवंत मेनरायकाकांचा जन्म झाला. या मासात सर्वाधिक सण (उदा. नागपंचमी, रक्षाबंधन, शीतला सप्तमी आणि उत्तर भारतात मनसापूजा (बंगाल), कज्जाली तीज, रांधण छट इत्यादी) असतात.

याच मासात श्रीकृष्णावतार झाला. तो दिवस गोकुळाष्टमी या नावाने प्रसिद्ध आहे. अधिकतर संतांचा जन्मही याच मासात झाला आहे. (उदा. गोस्वामी तुलसीदास, संत नरहरि सोनार, महर्षी अरविंद, प.पू. टेंबेस्वामी, धर्मसम्राट करपात्रस्वामी, गुरुदेव काटेस्वामीजी, इस्कॉनचे संस्थापक श्री स्वामी शैल प्रभुपाद)

२. पू. मेनरायकाका यांची महादेवावर दृढ श्रद्धा असल्याने शिवानेही त्यांच्यावर कृपा करून त्यांना त्याच्या १२ रूपांचे दर्शन सपरिवार घडवले.

३. पू. काकांंना शारीरिक त्रास असतांनाही ते नेहमी प्रसन्न आणि सहजावस्थेत असतात.

४. त्यांनी पूर्वी वायूसेनेत चाकरी करून देशसेवा केली आणि त्यानंतर अध्यात्मप्रसार, तसेच सत्सेवा यांसाठी तन, मन अन् धन अर्पण केले.

५. पू. मेनरायकाका हे होमिओपॅथी उपचारांमधील जाणकार आहेत. ते साधकांची प्रेमाने विचारपूस करून त्यांना कधीही आवश्यकता असल्यास औषध देतात.

– सौ. निलीमा सप्तर्षि, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.८.२०१६)

साधकांना होत असलेला त्रास न्यून व्हावा, यासाठी सतत नामजप आणि प्रार्थना करणारे पू. भगवंत मेनराय !

१. पू. मेनरायकाका सकाळी लवकर उठून समष्टीसाठी नामजप करतात. एकदा एका साधिकेला पुष्कळ त्रास होत होता. पू. काकांनी उपाययोजना म्हणून तिला पुष्कळ नामजप आणि प्रार्थना करण्यास सांगितले. त्यांनी त्या साधिकेचे नाव लक्षात रहावे, यासाठी स्वतःच्या हातावर तिचे नाव लिहिले आणि तिच्यासाठी सतत प्रार्थना केली.

२. पू. काका आवश्यक तेवढेच बोलतात. त्यांच्या आवश्यकताही (गरजा) अल्प आहेत. जे काही उपलब्ध असते, त्यात ते समाधानी असतात. त्यांची प्रार्थना आणि नामजप अखंड चालू असतो.

– कु. माधवी पोतदार आणि कु. सोनाली खटावकर, सनातन आश्रम गोवा. (२.८.२०१६)

shrin_chayana_nov2015_c
श्रीमती शिरीन चाइना

पू. मेनरायकाका नामजप करत असलेली उपायांची खोली मोठ्या ॐ च्या आकाराची झाली आहे अणि त्या खोलीतील प्रत्येक साधक त्या ॐ वर असलेल्या रूपेरी ज्योतीप्रमाणे चमकत आहे, असे दिसणे

एकदा मी पू. भगवंत मेनरायकाका नामजप करत असलेल्या उपायांच्या खोलीत नामजपाला बसलेे होते. तेव्हा मला त्यांच्या जागी बिंदूएवढा ॐ दिसला. त्यानंतर मला संपूर्ण खोलीच ॐ च्या आकाराची झाली आहे आणि त्या खोलीत ये-जा करणारा प्रत्येक साधक त्या ॐ वर असलेल्या रूपेरी ज्योतीप्रमाणे चमकत आहे, असे दिसले.

– श्रीमती शिरीन चाइना, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.८.२०१६)


क्षात्रवृत्ती, शिस्त आणि प्रेम या गुणांचा सुंदर
संगम असलेले सनातनचे ४६ वे संतरत्न पू. भगवंतकुमार मेनराय !

१. पू. मेनरायकाकांमध्ये असलेले राष्ट्रप्रेम आणि अभ्यासू वृत्ती

पू. मेनरायकाकांमध्ये क्षात्रवृत्ती, शिस्त आणि प्रेम या गुणांचा सुंदर संगम आहे. मध्यंतरी मी पू. मेनरायकाका आणि पू. काकू यांना दैनिक सनातन प्रभातमधील लिखाण वाचून दाखवायची सेवा करत होते. दैनिकातील भ्रष्टाचार किंवा राष्ट्रासंदर्भातील हानीकारक वृत्ते ऐकल्यावर पू. काकांना चीड येते. त्यांना राष्ट्राविषयी पुष्कळ प्रेम आहे. त्यांच्याकडे बर्‍याच विषयांचे भरपूर ज्ञान आहे. त्यामुळे अनेक वृत्तांशी संबंधित अशी पुष्कळ माहिती त्यांना असते. – श्रीमती गीता प्रभू

 

२. पू. मेनरायकाका साधकांसाठी नामजप करतांना जाणवलेली सूत्रे

२ अ. पू. काकांमुळे नामजप एकाग्रतेने आणि भावपूर्ण होणे

ते सर्व साधकांना प्रेमाने समजून घेतात. मी आजारी असतांना त्यांची माझ्यावर मोठी कृपा झाली. माझा नामजप एकाग्रतेने आणि भावपूर्ण होऊ लागला.

२ आ. नामजप करतांना साधकांचे मन
विचलित होऊ नये, यासाठी पू. काकांनी सांगितलेला उपाय !

पू. काका साधकांसाठी नामजप करतांना काही साधकांना ढेकर येणे आणि जांभई येणे यांसारखे त्रास होत. त्यामुळे अन्य साधकांचे लक्ष विचलित होत असे. पू. काकांनी साधकांना सांगितले, तुम्ही मानसरित्या नामजप लिहा आणि तो जलद गतीने म्हणा. यामुळे नामजप होईल आणि त्रासही होणार नाही, तसेच अन्य साधकांचेही मन विचलित होणार नाही.

३. पू. काकांचा परात्पर गुरूंप्रती अपार शरणागत भाव आहे. त्यांच्या बोलण्यातून हे वेळोवेळी जाणवते.

– श्री. अनिल सामंत

 

४. पू. मेनरायकाकांच्या समवेत बसून नामजप करतांना आलेल्या अनुभूती

४ अ. कृतज्ञता, कृतज्ञता असा नामजप चालू
होऊन परात्पर गुरुदेवांप्रती कृतज्ञताभाव जागृत होणे

मी अनेक मासांनंतर पू. काकांच्या नामजपादी उपायांच्या वेळी अन्य साधकांसह नामजप करत होते. पू. काकांमध्ये परात्पर गुरुदेवांप्रती असीम कृतज्ञताभाव आहे. त्यामुळे माझा मनात कृतज्ञता, कृतज्ञता असा नामजप चालू झाला. जोपर्यंत ते नामजप करत होते, तोपर्यंत पूर्णवेळ माझा हाच नामजप होत होता. त्या वेळी माझ्या मनात परात्पर गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञताभाव जागृत झाला.

४ आ. एकदा सर्व साधकांच्या त्रासाचे प्रमाण वाढले असतांना पू. काकांच्या
ठिकाणी अंबादेवीचे दर्शन होऊन देवीकडून मारक शक्ती प्रक्षेपित होत आहे, असे जाणवणे

एकदा पू. काकांसमवेत नामजप करतांना सर्व साधकांना अधिकच त्रास होत होता. पू. काकांना झोप येत होती. खोलीतील पंख्यातून येणारा नादही बंद झाला होता. नाद बंद झाल्याचे पू. काकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी साधकांना याविषयी विचारले आणि म्हणाले, असे का घडले ?, हे आपण सूक्ष्मातून प.पू. गुरुदेवांना विचारूया. नंतर त्यांनी डोळे बंद करून परात्पर गुरुदेवांना प्रार्थना केली आणि नामजप चालू केला. त्या वेळी मला त्यांच्या ठिकाणी अंबादेवीचे दर्शन होऊन देवीकडून अत्यंत मारक शक्ती प्रक्षेपित होत आहे, असे जाणवले. (पू. बाबांची कुलदेवता अंबामाता आहे. – कु. संगीता मेनराय) काही वेळाने सर्व साधक पूर्वस्थितीला आले आणि पंख्याचा नादही ऐकू येऊ लागला.

या प्रसंगातून पू. काकांमधील तत्परता, सतर्कता आणि परात्पर गुरुदेवांना विचारून प्रत्येक कृती करणे, या गुणांचे दर्शन झाले. – कु. नंदिता वर्मा

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात