नेतृत्व, तत्त्वनिष्ठा आणि प्रीती अशा विविध गुणांचा संगम असणार्‍या पू. (कु.) रेखा काणकोणकर यांच्याप्रती सौ. शालिनी मराठे यांनी अर्पण केलेली भावपुष्पांजली !

भोळ्या भावाचे मूर्तीमंत रूप पू. (कु.) रेखा काणकोणकर !
भोळ्या भावाचे मूर्तीमंत रूप पू. (कु.) रेखा काणकोणकर !
सौ. शालिनी मराठे
सौ. शालिनी मराठे

रामनाथी आश्रमातील अन्नपूर्णा कक्षाची फलनिष्पत्ती सर्वाधिक आहे. (तेथे रामराज्य आहे.) या कक्षाचे दायित्व सौ. सुप्रिया माथूर आणि पू. (कु.) रेखा काणकोणकर या पहातात. रामनवमीला (१५.४.२०१६) पू. रेखाताईचे संतत्व घोषित झाले आणि मन आनंदित होऊन डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या, त्या थांबेचनात. पाळेसारख्या आमच्या छोट्या खेडेगावातील कु. रेखाताई तळमळीने साधना करून संतपदाला पोहोचली, तेव्हा श्रीगुरुकृपेने तिच्यासमवेत आमचा अन् गावाचाही उद्धार झाला आहे, असे मला वाटले. देवाने दिलेली ही शब्दफुले पू. रेखाताईच्या चरणी कृतज्ञतेने वहात आहे.

कु. रेखा काणकोणकर यांच्यात अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे त्या संतपदाला पोचल्या आहेत. हे जरी खरे असले, तरी रेखाची वैशिष्ट्ये कोणती ?, हे कोणाच्याच लक्षात आले नाही. सौ. शालिनी मराठे यांनी हे कोडे अतिशय सुंदर शब्दांत उलगडून दाखवले आहे. त्यामुळे मला आनंद झाला.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. साधनाप्रवासास आरंभ

दैनिक सनातन प्रभातची गोवा-सिंधुदुर्ग आवृत्ती चालू झाली, तेव्हा पाळे केंद्रातून १० साधक पूर्णवेळ होण्याच्या इच्छेने गोव्यातील दोनापावला येथे सेवेसाठी येऊ लागले. पू. रेखा काणकोणकर ही त्यांच्यापैकीच एक आहे.

२. रानफुलाचा परिमल म्हणजेच पू. (कु.) रेखाताईची गुणवैशिष्ट्ये !

२ अ. नम्र आणि हळू आवाजात बोलणे

पू. रेखाताई नम्रतेने आणि हळू आवाजात बोलते. तिच्यावर जन्मापासूनच हा संस्कार आहे. हे काणकोणकर कुटुंबियांचे, म्हणजे तिच्या घराण्याचे वैैशिष्ट्यच आहे आणि त्याला कारणही आहे. अनेक लहान खोल्या असलेल्या एका मोठ्या घरात पू. रेखाताईचे वडील, काका अन् चुलत भावंडे रहातात. त्यांच्या परिवारात ७० ते ८० माणसे (१५ ते २० बिर्‍हाडे) आहेत. इतरांना आपला त्रास होऊ नये आणि वैयक्तिक गोष्टींतील गोपनीयतेची आवश्यकता, यांसाठी हळू आवाजात अन् वडिलधार्‍या माणसांचा मान राखण्यासाठी नम्रपणे बोलणे, हे आवश्यकच ठरते.

२ आ. उत्तरादाखल हसणे

अवघड किंवा विवादास्पद प्रश्‍न विचारल्यास ती केवळ हसते, उदा. व्यक्तीगत जीवनाविषयी, जेव्हा नातेवाईक किंवा आप्तेष्ट विचारतात, तेव्हा ती केवळ हसते. तिच्या हसण्यात कुणाला होकार, कुणाला नकार, तर कुणाला तटस्थ वृत्ती जाणवते. प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या भावाप्रमाणे उत्तर मिळते; पण कुणीच दुखावले जात नाही. ती हसते, तेव्हा स्वतःही आनंद अनुभवते आणि अमर्याद आनंद प्रक्षेपित करते. शब्दांना मर्यादा आहे; परंतु तिचे हास्य मोनालिसाच्या हास्याप्रमाणे प्रभावी आहे. ते हास्य सर्व प्रश्‍नांचे शंकानिरसन करते.

२ इ. अत्यल्प बोलणे

ती हाताने कृती करायची; पण तिचे तोंड सतत बंद असायचे. काही विचारले, तर केवळ हसायचे; नाहीतर हो किंवा नाही म्हणायचे. यापलीकडे ती बोलायचीच नाही. (तिच्या तिन्ही बहिणी मात्र पू. ताईच्या तुलनेत फार बोलक्या आहेत.)

२ ई. परेच्छेने वागणे

लहानपणापासून पू. रेखाताई अंतर्मुख, अबोल, प्रसिद्धीपराङ्गमुख आणि परेच्छेने वागणारी आहे. स्वतःच्या मनाने काही करावे, असा तिचा स्वभाव नव्हता. सांगितलेली सेवा झोकून देऊन करायची, एवढेच तिला ठाऊक !

२ उ. निवृत्तीमार्गी असणे

लहानपणी (आणि आताही ती थोड्या फार भेदाने तशीच आहे) प्राथमिक शाळेत असतांनाही तिने कधी नटणे, मेंदी काढणेे, उंची कपडे घालणे, नृत्य करणे, रांगोळी काढणे, वाद-विवाद करून पांडित्य दाखवणे, अशा गोष्टी केल्या नाहीत. पुढे साधनेत आल्यावरही अनुभूती सांगितली, सत्संग घेतला, लेख लिहिला, असे केले नाही; या सर्व गोष्टी तिला येतात; पण ती निवृत्तीमार्गी असल्यामुळे आपली ऊर्जा अनावश्यक गोष्टींत व्यय करत नाही, हे आता मला कळते. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख&.। या गीतातील राजहंसाप्रमाणे तिचे जीवन आगळे-वेगळे आहे.

२ ऊ. सेवेतील एकाग्रता आणि आज्ञापालन

पू. रेखाताईने संतसेवा, लेखा आणि स्वयंपाकघर येथील सेवा अशा विविध सेवा केल्या आहेत. कोणतीही सेवा उत्तरदायी साधकाला विचारून आणि ईश्‍वराला आवडेल, अशीच ती करायची. सेवा करतांना तिला बुद्धीचा अडथळा कधी आला नाही कि ताणही आला नाही. दायित्व असलेल्या साधकाला विचारले, नीट ऐकून घेतले आणि श्रद्धेने केले, असेच प्रत्येक वेळी घडले. वेळेचा अपव्यय करणे, सवलत घेणे, असे तिने केले नाही.

२ ए. नेतृत्व, तत्त्वनिष्ठा आणि प्रीती

पूर्वी स्वयंपाकघराचे दायित्व सौ. सुप्रिया माथूर यांच्याकडे होते. आता त्या प्रक्रियेत असलेल्या संस्थास्तरावरील साधकांचे अहं आणि स्वभावदोष निर्मूलन यांचे व्यष्टी आढावे घेण्याची सेवा करतात. सध्या अन्नपूर्णाकक्षाचे दायित्व पू. रेखाताई सांभाळते. रेखा आणि सुप्रिया यांची आध्यात्मिक मैत्री, म्हणजे मणिकांचन (सोने आणि रत्न) यांचा योग होय. तत्त्वनिष्ठा आणि प्रीती हे गुण दोघींतही आहेत. पू. रेखाताई सुप्रियाताईकडून नेतृत्व हा गुण आणि व्यष्टी आढावा घ्यायला शिकली. रंगात रंगला रंग अन् पाण्यात मिळाले पाणी, अशी या दोघींची मैत्री एकमेकींना पूरक आणि गुणांचे संवर्धन करणारी ठरली.

पू. रेखाताईच्या तत्त्वनिष्ठेला प्रीतीचे अधिष्ठान आहे. साधक कार्यपद्धतीसाठी नाहीत, कार्यपद्धत साधकांसाठी आहे आणि आपण श्रीगुरूंचे सेवक आहोेत, याचे तिला सतत स्मरण असते. त्यामुळे एखादा साधक रुग्णाईत आहे आणि त्याने पथ्याची नोंद केली नाही, तर ती कार्यपद्धत सांगतेच; पण नियमाबाहेर जाऊन पथ्याची खिचडी करूनही देते.

२ ऐ. मायेची आसक्ती नसणे

पू. रेखाताईचे मन निःस्पृह आहे. त्यामुळे आई-वडील, भावंडे, नातेवाईक, घरदार, पैसा-अडका या मायेतील कोणत्याच गोष्टींत ते अडकलेले नाही. सारे जग तिच्या लेखी तृणवत्, म्हणजे क्षुल्लक आणि नश्‍वर आहे. त्यामुळे देवासाठी झिजणे, ही एकच गोष्ट शिल्लक रहाते. घर जवळ आहे आणि घरून येऊन जा असे निरोप येतात, तरीही ती क्वचितच घरी जाते; मात्र गणेशोत्सवाच्या काळात ती ५ दिवस घरी जाते.

२ ओ. अत्यल्प अहं

१. पू. रेखाताई वाणिज्य शाखेची पदवीधर आहे. इंग्रजी माध्यमातून (ख्रिस्तींच्या कॉन्व्हेंटमध्ये) ती शिकली आहे; पण तिच्या बोलण्या- चालण्यावरून आपल्याला कुठेच असे जाणवत नाही की, ती एवढी शिकली आहे.

२. इतरांना आणि देवाला श्रेय देणे : आज गव्हाची खीर छान झाली होती, असे म्हटले, तर ती म्हणते, मला काही येत नाही. सुप्रियाताईने मला शिकवले. आमटी फार आवडली, असे म्हटल्यास कुंभारकाकू छान आमटी करतात, असे ती सांगते. नारळीभात अप्रतिम होता, असे म्हणू जाता आमची सुप्रियाताई सुगरण आहे किंवा देवानेच केला, असे ती म्हणते.

२ औ. गुरूंप्रती दृढ श्रद्धा आणि भाव

१. घरच्यांचा भार देवावर सोपवणे

घरी कोणी रुग्णाईत आहे, बहिणीचे लग्न आहे इत्यादी कारणांनी ती आठ दिवस घरी गेली आहे, असे कधी होत नाही; कारण मी गेले नाही, तरी देव त्यांना कुणाच्याही माध्यमातून साहाय्य करणारच आहे, अशी तिची श्रद्धा आहे.

२. गुरुदेवांवरील दृढ श्रद्धेमुळे अडचणीतही तणावमुक्त असणे

अन्नपूर्णाकक्षाचे नूतनीकरण करतांना स्थलांतर करावे लागणे, पोळ्या बनवणारे यंत्र अनेक वेळा बिघडणे, साधकसंख्या अल्प आणि सेवा विपुल, उदा. संत, साधक, पाहुणेे, विदेशी यांच्यासाठी अन् रुग्णाइतांसाठी पथ्याचे, सणांसाठी, तसेच लग्न, मुंज या विधींसाठी वेगवेगळ्या प्रकारचा स्वयंपाक, म्हणजे प्रसाद आणि महाप्रसाद अन् तोही ठरलेल्या वेळेत करावा लागणे आणि प्रतिदिन साधकसंख्या पालटत असणे, काही वेळा खाण्यात काही पदार्थ वर्ज्य करावे लागणे, असे नाना पालट सततच होत रहातात; परंतु पालट झाला नाही, तो पू. रेखाताईच्या गुरूंप्रती असलेल्या दृढ भावात ! तिची दृढ श्रद्धा आहे की, प.पू. गुरुदेव सेवा देतात, तर तेच सेवा करूनही घेतात. त्यामुळे कोणतीही अडचण असली, तरी पू. रेखाताई ताणमुक्त असते आणि एखादी चूक झाली, तर ती लगेच कान पकडून चूक मान्य करते.

३. कृतज्ञता

हे अन्नपूर्णामाते, तू सततच परिपूर्ण आणि ईश्‍वराला (शंकराला) प्राणप्रिय आहेस. हे पार्वतीमाते, ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांच्या प्राप्तीसाठी, म्हणजेच साधना करून ईश्‍वरप्राप्ती करून घेण्यासाठी तूच जन्मोजन्मी ईश्‍वराच्या (गुरुदेवांच्या) महाप्रसादाची भिक्षा आम्हाला घालतेस आणि चैतन्य प्रदान करतेस. अशा तुला शरणागतभावाने सर्व साधक जिवांचा साष्टांग नमस्कार आणि अनंत कोटी कृतज्ञता.

हे गुरुदेवा, तुमच्या कृपेनेच अन्नपूर्णामाता रामनाथी आश्रमावर प्रसन्न आहे. तुम्हीच आमचा योगक्षेम चालवता. यापुढेही सतत तुमची कृपादृष्टी आमच्यावर राहू दे आणि तुम्हाला अपेक्षित अशी साधना या सर्व जिवांकडून होऊ दे, अशी तुमच्या चरणी
शरणागतभावाने प्रार्थना !
– गुरुदेवांच्या चरणी शरणागत,
सौ. शालिनी प्रकाश मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

पू. (कु.) रेखाताई आहे एक साधे रानफूल !

ते आहे एक साधे रानफूल (टीप १) ।
परि, परिमल त्याचा अवघ्या जगास पाडी भूल ॥ १ ॥
सुखसागरमार्गे (टीप २) ते रामनाथीला आले ।
प्रभु श्रीरामाच्या चरणी लीन झाले ॥ २ ॥
एकच त्याची इच्छा होती । व्हावी मजला ईश्‍वरप्राप्ती ॥ ३ ॥
ते झटत असे रात्रंदिन । करण्यास गुरूंचे आज्ञापालन ॥ ४ ॥
म्हणे देेवा, सोडिला असे मी संसार ।
तुझ्यावर टाकूनी माझा संपूर्ण भार ॥ ५ ॥
गुरुदेवा, माझे काय करायचे ते कर ।
कारण तूच आहेस माझा ईश्‍वर ॥ ६ ॥
सेवेचे शिवधनुष्य त्याने (रानफुलाने) श्रद्धेने पेलले ।
अन्नपूर्णाकक्षाचे दायित्व त्याने घेतले ॥ ७ ॥
व्यष्टी करतांना समष्टीशी समरस झाले ।
सर्वांना त्याने संतृप्त केले ॥ ८ ॥
प्रभु श्रीराम झाले प्रसन्न । म्हणाले, आज माझा जन्मदिन ॥ ९ ॥
हे फूल आहे सनातनचे ६० वे संतरत्न ।
याचे करावे तुम्ही मनोभावे पूजन ॥ १० ॥
ते रानफूल पूजनीय झाले ।
अवघे साधक, संत आणि जन आनंदले ॥ ११ ॥
श्रीकृष्णाने त्याला मोरपीस मानले ।
आपल्या रत्नजडित मुकुटात खोवले ॥ १२ ॥
धन्य धन्य झाले, जन, वन, ग्राम ।
धन्य धन्य, माता-पित्यांचे जीवन ॥ १३ ॥
रानफूल हसले, हसले । त्या आनंदे जग भुलले ॥ १४ ॥
टीप १ : भोळा भाव, साधेपणा, लोकेषणा नसणे हे गुण दाखवण्यासाठी पू. रेखाताईसाठी रानफूल हे रूपक वापरले आहे. तसे पाहू जाता फूल, फळ आणि कणीस ही अन्नदेवता, म्हणजे अन्नपूर्णादेवीची वेगवेगळी रूपेच आहेत.
टीप २ : आधीचे फोंडा येथील सनातनचे सेवाकेंद्र
– गुरुदेवांच्या चरणी शरणागत,
सौ. शालिनी प्रकाश मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात