गंगेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भगीरथ व्हा !

गंगेची महती, आध्यात्मिक रहस्य, धार्मिक अधिष्ठान आणि गंगादशहरा व्रताचे फळ यासंदर्भातील विवेचन येथे देत आहोत.

 

१. गंगा म्हणजे तीर्थदेवता !

गंगा ही केवळ नदी नसून ती श्रेष्ठतम तीर्थदेवता आहे. त्यामुळे भारतियांसाठी गंगा प्राणांहूनही प्रिय ठरते. भाविकांची पापे धुण्याचे आध्यात्मिक कार्य ईश्‍वरानेच तिला वाटून दिलेले आहे. गंगा स्नानाने शुद्ध करते, तर नर्मदा नुसत्या दर्शनानेच मानवाला शुद्ध करते.

 

२. गंगादशहराच्या पर्वकाळात काय करावे ?

गंगादशहराच्या १० दिवसांच्या पर्वकाळात हे व्रत संपूर्ण भारतात पावित्र्यपूर्ण, भावभक्तीने, श्रद्धायुक्त अंतःकरणाने भाविकांकडून केले जाते. या १० दिवसांत तीन प्रकारची कायिक, तीन प्रकारची वाचिक आणि ४ प्रकारची मानसिक पापे अशी १० पापे नष्ट होतात; म्हणून या दिवसाला दशहरा असे म्हणतात.

अ. प्रतिदिन गंगेत सकाळी स्नान करावे. गंगेची प्रार्थना करावी.

आ. गंगेच्या काठावर बसून गंगास्तोत्राचा पाठ करावा.

इ. गंगा नदी जवळ नसल्यास कुठल्याही नदीवर जाऊन स्नान करावे. त्या वेळी गंगा..गंगा असा जप करावा. घरी स्नान करतांना गंगेचे स्मरण करावे. १० दिवस स्नान करता न आल्यास शेवटच्या दिवशी तरी स्नान करावे.

. गंगेची सुवर्णप्रतिमा कलशावर स्थापन करून १० प्रकारच्या फुलांनी, दिव्यांनी (१० पणत्या लावून) दशांगधूप दाखवून पूजन करावे.

. प्रसादासाठी १० प्रकारची फळे असावीत.

. श्री गंगामातायै नमः । असे नाम घ्यावे. प्रतिदिन गंगाआरती करावी.

. गंगेच्या पवित्र जलातून गायीच्या तुपाचे लावलेले दीप सोडावेत.

 

३. गंगादशहराच्या पर्वकाळात होणारे लाभ

अ. गंगा ही शुद्ध प्रेमाचे मूर्त स्वरूप असल्याने तिची कृपादृष्टी या १० दिवसांत साधकाला प्राप्त करून घेता येते. वंश सतत प्रवाहित रहाण्यासाठी नद्यांचे पूजन केले जाते; म्हणून गंगापूजनाचे विशेष महत्त्व ठरते. गंगेत तुपाचे दिवे अर्पण केल्यास आपला वंश विस्तारतो.

आ. गंगादशहरा पूजनात ब्राह्मणाला १० आंबे अर्पण केल्यास वांझपणा नष्ट होतो.

इ. गंगाजलाने पितरांसाठी तर्पण केल्यास त्यांचा अक्षय आशीर्वाद मिळतो. तर्पण करणार्‍या पुत्रालाही लाभ होतो, असे महर्षि व्यासांनी म्हटले आहे.

 

४. गंगेचे आध्यात्मिक महत्त्व

४ अ. गंगेमुळे पिंडशुद्धी होते ! : गंगेतील देवत्वजन्य घटकांच्या अस्तित्वाने पिंडशुद्धी होऊन जीव ब्रह्मांड धारणेशी जोडला जातो. जिवाला देवत्व प्राप्त करून देण्याची क्षमता गंगेत असल्याने प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी गंगेत स्नान करावे !

४ आ. गंगा जल प्राशनाने ७ पिढ्यांचा उद्धार होतो. गंगा नदीची सात्त्विकता ८ टक्के एवढी आहे.

४ इ. मोक्षमार्गाची वाट ! : गंगेचा काठ सिद्धक्षेत्र आहे. गंगादर्शन, पूजन, स्थान, जलप्राशन आणि गंगाजलाने पितृतर्पण ही पंचसूत्री मोक्षमार्गाची वाट आहे. गंगास्पर्शाने देहातील विकारांचा नाश होतो. गंगाजलाच्या आचमनाने वाणीची शुद्धी होते. त्यामुळे मंत्र जागृत होतात.

४ ई. इच्छापूर्ती होणे : गंगाजलाभिषेकामुळे देवाची मूर्तीसुद्धा जागृत होते. गंगामाता भक्ताची कोणतीही इच्छा पूर्ण करते.

४ उ. मन शुद्ध करण्याचे सामर्थ्य केवळ गंगाजलातच आहे.

४ ऊ. शारीरिक सामर्थ्य वाढणे : गंगाजल प्राशनाने शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अजीर्ण, जीर्णज्वर संग्रहणी, आव, दमारोग नष्ट होतात. जखम भरून काढण्याचे सामर्थ्य केवळ गंगेत आहे.

 

५. गंगाजल ७० टक्के कचर्‍यातील प्रदूषण अवघ्या
अर्धा ते १ घंट्यात दूर करते; म्हणून गंगा कधीच अशुद्ध
होत नाही. गंगेसारखे तीर्थ नाही, असे साक्षात ब्रह्मदेवानेच सांगितले आहे.

 

६. गंगेचे प्रदूषण रोखा !

भारताला पावित्र्य, आध्यात्मिक सामर्थ्य, तेजसामर्थ्य, पापनाशन करण्याचे सामर्थ्य देणारी गंगा आम्ही सर्वांनी पावित्र्य राखून जोपासली पाहिजे. गंगेत कारखान्यांचे दूषित पाणी सोडू नका. अर्धवट जाळलेली प्रेते टाकू नका. केरकचरा नदीत टाकू नका. गंगानदीत कपडे धुवू नका. असे केल्यासच गंगादेवतेची आपल्यावर कृपा राहील. हाच गंगादशहराच्या निमित्ताने संदेश आहे. शासनाने गंगा शुद्धीकरणाकडे अधिक लक्ष द्यायला हवे. गंगेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भगीरथ व्हा !

– श्री. श्रीकांत भट, अकोला

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात