सनातनच्या रामनाथी आश्रमावर ३ कळसांची स्थापना करण्यापूर्वी विधीयुक्त पूजनाचा त्यांच्यावर झालेला परिणाम दर्शवणारी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

महर्षींच्या मार्गदर्शनानुसार रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमावर स्थापना करण्यासाठी आणलेले कळस

   महर्षींनी नाडीपट्टीच्या माध्यमातून केलेल्या मार्गदर्शनानुसार ९.५.२०१६ या दिवशी अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमावर ३ दैवी कळसांची स्थापना करण्यात आली. कळसांची स्थापना करण्यापूर्वी त्यांचे विधीयुक्त पूजन करण्यात आले. कळसांंचे पूजन करण्यापूर्वी आणि केल्यानंतर त्यांतून प्रक्षेपित होणार्‍या ऊर्जेचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्यात आला. त्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

१. वैज्ञानिक चाचणी करण्याचा उद्देश

   एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत, तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक संतांनी सांगितलेले शब्द प्रमाण मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र शब्दप्रमाण नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध करून दाखवली असेल, तरच ती खरी वाटते. 

२. चाचणीचे स्वरूप

    आश्रमाच्या छतावर ३ कळसांची स्थापना करण्यापूर्वी त्यांचे विधीयुक्त पूजन करण्यात आले. कळसांचे पूजन करण्यापूर्वी आणि केल्यानंतर यू.टी.एस्. उपकरणाद्वारे परीक्षण करण्यात आले. या दोन्ही परीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

३. वैज्ञानिक चाचणीतील घटकांविषयी माहिती

३ अ. सनातन आश्रमावर स्थापना केलेले ३ कळस ! :

    महर्षींनी केलेल्या मार्गदर्शनानुसार सनातनच्या आश्रमावर स्थापना करण्यासाठी तांब्यावर सोन्याचा मुलामा असलेला एक कळस आणि केवळ तांब्याचे २ कळस आणले.

३ आ. कळसांची स्थापना होण्यापूर्वी
करण्यात आलेले त्यांचे विधीयुक्त पूजन ! :

  अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर (९.५.२०१६ या दिवशी) कळसांची सनातन आश्रमावर स्थापना करण्यापूर्वी, म्हणजे ८.५.२०१६ या दिवशी सनातन वेदपाठशाळेतील पुरोहितांनी विविध धार्मिक विधी केले. संकल्प, वरूणपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध, आचार्यवरण या धार्मिक विधीनंतर कळसांच्या ठिकाणी विविध देवीतत्त्वांचे आवाहन केले. पहिल्या कळसावर श्री योगेश्‍वरीदेवी, दुसर्‍या कळसावर श्री वज्रेश्‍वरीदेवी, तर तिसर्‍यावर श्री राजराजेश्‍वरी ललिता महात्रिपुरसुंदरी देवी यांचे आवाहन करण्यात आले. देवीतत्त्वाच्या आवाहनानंतर उटणे, तूप, मसुरीचे पीठ, जवाचे पीठ, हळद, पल्लवोदक (आंब्याची पाने ठेवलेले पाणी), अक्षतोदक (अक्षता घातलेले पाणी) यांचा अभिषेक करण्यात आला, तसेच पंचामृत स्नान घालून षोडषोपचारे पूजा करण्यात आली. त्यानंतर कळसांना शय्याधिवास म्हणजे झोपवण्याचा विधी करण्यात आला. त्यानंतर हवन करण्यात येऊन समिधा, तीळ, मध, तूप, चरू (भात) यांची आहुती देण्यात आली.

४. यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner)
उपकरणाद्वारे प्रभावळ मोजणे

४ अ. यू.टी.एस् उपकरणाची ओळख :

यू.टी.एस्. उपकरण

    या उपकरणाला ऑरा स्कॅनर असेही म्हणतात. या उपकरणाद्वारे घटकाची (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांची) ऊर्जा आणि त्याची प्रभावळ मोजता येते. हे उपकरण भाग्यनगर, तेलंगणा येथील भूतपूर्व परमाणू वैज्ञानिक डॉ. मन्नम मूर्ती यांनी वर्ष २००३ मध्ये विकसित केले. वास्तू, वैद्यकशास्त्र, पशूवैद्यक शास्त्र, तसेच वैदिक शास्त्र यांमध्ये येणार्‍या अडचणींचे निदान करण्यासाठी या उपकरणाचा वापर करता येतोे, असे ते सांगतात.

४ आ. उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण

४ आ १. नकारात्मक ऊर्जा :

ही ऊर्जा हानीकारक असते. याअंतर्गत पुढील २ प्रकार येतात.

अ. अवरक्त ऊर्जा (इन्फ्रारेड) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी इन्फ्रारेड ऊर्जा मोजतात.

आ. जंबुपार ऊर्जा (अल्ट्राव्हायोलेट) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा मोजतात.

४ आ २. सकारात्मक ऊर्जा :

ही ऊर्जा लाभदायी असून ती मोजण्यासाठी स्कॅनरमध्ये सकारात्मक ऊर्जा दर्शवणारा +Ve हा नमुना ठेवतात.

४ इ. यू.टी.एस् उपकरणाद्वारे घटकाची प्रभावळ मोजणे :

    प्रभावळ मोजण्यासाठी त्या घटकाची सर्वाधिक स्पंदने असणारा नमुना वापरतात, उदा. व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ किंवा तिचे छायाचित्र, कळसाच्या संदर्भात त्याचे छायाचित्र, वनस्पतीच्या संदर्भात तिचे पान, प्राण्याच्या संदर्भात त्याचे केस, वास्तूच्या संदर्भात तेथील माती किंवा धूळ आणि देवतेच्या मूर्तीच्या संदर्भात मूर्तीला लावलेले चंदन, गंध, शेंदूर आदी.

५. चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता

अ. उपकरण हाताळणारी व्यक्ती आध्यात्मिक त्रास (नकारात्मक स्पंदने) नसलेली होती.

आ. उपकरण हाताळणार्‍या व्यक्तीने परिधान केलेल्या वस्त्रांच्या रंगाचा परिणाम चाचणीवर होऊ नये, यासाठी त्या व्यक्तीने पांढरी वस्त्रे परिधान केली होती.

६. निरीक्षणे आणि त्यांचे विवेचन

६ अ. यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner)
उपकरणाद्वारे केलेली निरीक्षणे

टीप : स्कॅनर १८० अंशाच्या कोनात उघडल्यासच त्या घटकाची प्रभावळ मोजता येते. त्यापेक्षा अल्प अंशाच्या कोनात स्कॅनर उघडला, तर त्याचा अर्थ त्या घटकाभोवती प्रभावळ नाही, असा होतो.

६ आ. निरीक्षणांचे विवेचन आणि निष्कर्ष

६ आ १. नकारात्मक ऊर्जा न आढळणे :

पूजनापूर्वी आणि नंतरही कळसांच्या ठिकाणी थोडीही नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

६ आ २. सकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात असणे आणि पूजनानंतर ती वाढणे :

  तीनही कळसांंमध्ये पूजनापूर्वीही पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळली. हे कळस पू. (डॉ.) ॐ उलगनाथन् यांनी विधी करून पाठवले होते. तसेच हे कळस १२.२.२०१६ या दिवसापासून, म्हणजे सवातीन मास अत्यंत सात्त्विक अशा सनातन आश्रमातील ध्यानमंदिरात ठेवले होते. त्याचा हा परिणाम आहे.

  पूजनानंतर कळसांमधील सकारात्मक ऊर्जा आणखी वाढली. पूजनानंतरच्या प्रभावळीतून पूजनापूर्वीची प्रभावळ वजा केल्यास सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत झालेली वाढ लक्षात येते. ही वाढ पहिल्या (सोन्याचा मुलामा असलेला) कळसामध्ये सर्वाधिक म्हणजे १.०९ मीटर, दुसर्‍या (तांब्याच्या) कळसामध्ये ०.६४ मीटर, तर तिसर्‍या (तांब्याच्या) कळसामध्ये ०.२९ मीटर आहे. सात्त्विक पुरोहितांनी शास्त्रानुसार आणि भावपूर्ण केलेल्या पूजनाचा हा परिणाम आहे.

६ आ ३. कळसांतील विशिष्ट स्पंदने पूजनानंतर अधिक दूरपर्यंत प्रक्षेपित होणे :

   सामान्य व्यक्तीची प्रभावळ साधारण १ मीटर असते, तर या तीनही कळसांची पूजनापूर्वीची प्रभावळ अनुक्रमे २.४२ मीटर, २.०९ मीटर आणि २.२६ मीटर, म्हणजे पुष्कळ अधिक आहे. पूजनानंतर ही प्रभावळ वाढून अनुक्रमे ३.१५ मीटर, २.६४ मीटर आणि २.३३ मीटर झाली. याचा अर्थ तीनही कळसांतून प्रक्षेपित होणारी विशिष्ट स्पंदने पूजनानंतर अधिक दूरपर्यंत वाढली.

  तीनही कळसांतील विशिष्ट स्पंदने आणि सकारात्मक ऊर्जा यांमध्ये झालेली वाढ, हा सनातन आश्रमासारख्या सात्त्विक ठिकाणी सात्त्विक पुरोहितांनी शास्त्रानुसार, तसेच भावपूर्ण केलेल्या पूजनाचा परिणाम आहे, हे या चाचणीतून लक्षात येते.

– श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१३.५.२०१६)
ई-मेल : [email protected]

भाव तेथे देव या उक्तीनुसार या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात