तत्त्वनिष्ठता आणि प्रेमभाव यांचा सुरेख संगम असलेल्या पू. (कु.) रेखा काणकोणकर !

तत्त्वनिष्ठता आणि प्रेमभाव यांचा
सुरेख संगम असलेल्या अन् ईश्‍वरावरील दृढ श्रद्धेपोटी
रामनाथी आश्रमातील स्वयंपाक विभागाचे मोठे दायित्वही
सहजतेने निभावत संतपद प्राप्त करणार्‍या पू. (कु.) रेखा काणकोणकर !

पू. (कु.) रेखा काणकोणकर

फेब्रुवारी २००८ पासून मला रामनाथी आश्रमात रहाण्याची संधी मिळाली. तेव्हापासून पू. रेखाताईंचा या ना त्या निमित्ताने अनेकदा संपर्क आला. जून २०१५ पासून भगवंताच्या कृपेने ताईंच्या खोलीत त्यांच्या सहवासात रहाण्याचीही संधी मिळाली. या काळात त्यांच्याकडून अनेक सूत्रे शिकायला मिळाली.

१. तत्त्वनिष्ठता आणि प्रेमभाव यांचा सुरेख संगम !

स्वयंपाकघरातील एखादी वस्तू अथवा पदार्थ हवा असला आणि त्याविषयी ताईंना विचारले, तर त्या कधीच नाही म्हणत नाहीत. नेहमीच साहाय्य करतात. त्यांच्या खोलीत रहाणार्‍या आणि त्यांच्याच विभागात सेवा करणार्‍या; परंतु वयाने लहान असणार्‍या साधिकांना त्या रात्री झोपण्यापूर्वी चुकांचे लिखाण झाले का ? सत्रे पूर्ण केली का ?, असे विचारतात, तसेच व्यष्टी साधना पूर्ण करण्याची आठवण करून देतात. साधिकांकडून एखादी चूक झाल्यास तत्त्वनिष्ठ राहून त्या संबंधित साधकाला चुकीची जाणीव करून देतात; मात्र दुसर्‍याच क्षणी पुन्हा प्रेमाने आणि इतक्या सहजतेने बोलतात की, थोड्या वेळापूर्वी बोलणार्‍या ताई याच का ? असा प्रश्‍न पडावा. ताईंच्या सहवासातून हा भाग शिकायला मिळाला. त्यामुळे माझ्याकडूनही साधकांना प्रेम देण्याचे आणि त्यांच्याशी सहजतेने वागण्याचे प्रयत्न होऊ लागले आहेत.

२. स्वतःच्या व्यष्टी साधनेत सातत्य
ठेवतांना इतरांच्या साधनेचीही काळजी घेणे

पू. ताई इतरांना व्यष्टी साधना पूर्ण करण्याची आठवण करून देतात, तसेच त्या स्वतःही प्रतिदिन नियमितपणे लिखाण; स्वयंसूचना सत्रे; दैनिक वाचन, नामस्मरण, आत्मनिवेदन इत्यादी पूर्ण करणे; समष्टीसाठी करावयाचा नामजप आणि प्रार्थना करणे यांसाठी वेळ देतात. कितीही उशीर झाला, कितीही थकवा असला, तरी हे सर्व पूर्ण केल्याविना त्या झोपत नाहीत. पू. ताईंच्या या कृतीतून आणि त्यांच्यासोबत राहून व्यष्टी साधनेतील सातत्य टिकून रहाण्यास मला साहाय्य होत आहे.

३. स्वयंपाकघरातील सेवांचा पुष्कळ मोठा व्याप
सांभाळतांना वेळेचे तंतोतंत पालन करून वेळा कशा
पाळायच्या, याचा आदर्श वस्तूपाठ घालून देणार्‍या पू. रेखाताई !

खरेतर रामनाथी आश्रमाच्या स्वयंपाकघराचा व्याप पुष्कळच मोठा आहे. जवळजवळ साडेचारशे साधकांच्या चारीठाव स्वयंपाकाचे आणि त्यांच्या पथ्य-पाण्याचे नियोजन करणे, आजारी साधक, विशेष अतिथी, पाहुणे, संत, तसेच अध्यात्माचा अभ्यास करायला येणारे विदेशी साधक, तसेच कार्यशाळा, शिबिरे, अधिवेशने इत्यादींसाठी येणारे साधक या सगळ्यांच्या वेगवेगळ्या स्वयंपाकाचे नियोजन, याशिवाय साधकांचे वाढदिवस, लग्नकार्य, सणवार यांच्या स्वयंपाकाचे नियोजन एवढा मोठा व्याप असतो. व्यष्टी साधनेची घडी विस्कटू न देता हा सगळा व्याप सांभाळतांना पू. ताईंना विभागात जाण्यास कधी उशीर होणे तर सोडाच; पण महाप्रसादाच्या (जेवणाच्या) वेळा कधी अर्ध्या मिनिटानेही चुकल्याचे किंवा मागेपुढे झाल्याचे एकदाही घडले नाही. यातून सर्व काही सांभाळून वेळा कशा पाळायच्या, याचा आदर्श वस्तूपाठच पू. रेखाताईंनी घालून दिला आहे.

४. प्रत्येक क्षणी स्वीकारण्याच्या स्थितीत रहाणे

४ अ. ईश्‍वरावरील दृढ श्रद्धेमुळे
अडचणींच्या प्रसंगांतही शांत आणि स्थिर रहाणे :

सर्व व्याप सांभाळतांना कधीकधी आयत्या वेळी अनेक गोष्टी कराव्या लागतात किंवा काही अडचणीही उद्भवतात; परंतु अशा प्रसंगी न डगमगता, शांत आणि स्थिर राहून त्या सर्व स्वीकारतात किंवा त्यांवर मात करत पू. ताईंची सेवा चालू असते. ईश्‍वराला त्याच्या साधकांची काळजी असून त्याचे कार्य तो करून घेणारच आहे, अशी त्यांची दृढ श्रद्धा असते आणि आहे. त्यामुळे पू. ताईंना अशा प्रसंगांचा कधी ताण आल्याचे पाहिले नाही. देवावर दृढ श्रद्धा असणे किती महत्त्वाचे आहे, याचे उदाहरणच भगवंताने पू. रेखाताईंच्या माध्यमातून समोर ठेवले आहे.

४ आ. सतत स्वीकारण्याच्या स्थितीत आणि उत्साही असणे :

विभागसेवा पूर्ण करून दुपारच्या वेळी खोलीत आल्यानंतर त्या कितीही दमलेल्या असल्या आणि कधी खोलीत केर काढायला हवा, असे वाटले, तर ताई कधी चालढकल करत नाहीत. तत्परतेने केरसुणी घेऊन त्या खोली स्वच्छ करतात आणि नंतरच विश्रांती घेतात. या संदर्भात त्यांची कधी चिडचिड झाली किंवा त्यांना प्रतिक्रिया आली, असे कधी घडत नाही. त्या नेहमी स्वीकारण्याच्या स्थितीत आणि उत्साही असतात. हे मी अनेकदा अनुभवले आहे. त्यांच्याप्रमाणे स्वीकारण्याची स्थिती आणि उत्साह माझ्यातही निर्माण होवो, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना आहे.

५. वर्तमानात राहून प्रत्येक क्षणाला
अन् स्थितीला आनंदाने सामोरे जाणे

एखाद्या दिवशी काही कारणांमुळे स्वयंपाकघरात साधकसंख्या पुरेशी नसल्यास कसे होईल ? अशा विचारांमध्ये ताई कधी अडकून रहात नाहीत. आदल्या दिवशी शक्य तेवढे नियोजन करतात आणि त्या त्या क्षणाला अन् स्थितीला आनंदाने सामोरे जात त्या वर्तमानात रहातात. त्यामुळे नकळतच देवाचा धावा वाढण्यास साहाय्य होते, हे शिकायला मिळाले.

६. नीटनेटकेपणा

त्यांच्यातील नीटनेटकेपणा आणि स्वच्छता खोलीत, तसेच संपूर्ण स्वयंपाक विभागातही दिसून येतो.
पू. ताईंकडून शिकायला मिळालेली ही सूत्रे त्यांच्याप्रमाणे कृतीत आणण्याचा प्रयत्न करतांनाच अंतःकरणात ती रुजून अंगवळणी पडू देत, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे. अशा संतरत्नासमवेत रहाण्याची संधी दिल्याबद्दल परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी पुष्कळ पुष्कळ कृतज्ञता !
– श्रीमती वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.४.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात