श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र

‘ब्राह्मणाने जेवलेले अन्न पितरांना कसे पोहोचते ?’, ‘श्राद्धात दिलेले अन्न पितरांना किती काळ पुरते ?’ अशांसारख्या अभ्यासपूर्ण प्रश्नांची उत्तरे आणि यांमागील धर्मशास्र काय आहे, हे जाणून घेऊ.  

 

१. ब्राह्मणभोजन

१ अ. ब्राह्मणाने जेवलेले अन्न पितरांना कसे पोहोचते ?

 

१. ‘श्राद्धादी कर्मात उच्चारलेल्या मंत्राच्या नादाच्या परिणामाने ब्राह्मणाच्या देहातील ब्राह्मतेज जागृत होते. तसेच पितरांना आवाहन करून विश्वेदेवांच्या अधिष्ठानाने त्या त्या अन्नोदकावर मंत्राने भारित पाणी शिंपडल्याने हविर्भाग म्हणून अर्पण केलेल्या अन्नातून प्रक्षेपित होणारा सूक्ष्म-वायू पितरलहरींना मिळण्यास साहाय्य होते. 

२. पितरांच्या नावाने ब्राह्मतेज जागृत झालेला ब्राह्मण जेवायला घालण्याचे पुण्यही श्राद्धकर्त्याला, तसेच पितरांना मिळते. यातून ब्राह्मणाचेही आशीर्वाद पितरांच्या गतीला वेग मिळण्यास कारणीभूत होतात. 

३. बाह्यतः पितरांच्या नावे ब्राह्मण जेऊ घालणे, या ‘कर्तव्यपूर्तीसाठी कृती’ अशा दृष्टीकोनापेक्षा ‘ब्राह्मणांच्या माध्यमातून प्रत्यक्ष पितरच जेवत आहेत’, असा भाव ठेवणे जास्त महत्त्वाचे असल्याने संतुष्टयुक्त ब्राह्मणाच्या देहातून प्रक्षेपित होणार्‍या आशीर्वादात्मक सात्त्विक लहरींचे बळ पितरांना प्राप्त होते. या अर्थी ‘ब्राह्मणांनी जेवलेले अन्न पितरांना मिळते’, असे म्हटले आहे. 

 

ब्राह्मणभोजन चलच्चित्रपट – भाग ३ (Bhahmanbhojan Video – Part 3)

ब्राह्मणभोजन चलच्चित्रपट – भाग ४ (Bhahmanbhojan Video – Part 4)

 

 

२. श्राद्धकर्म करतांना पितरांचे नाव आणि गोत्र
यांच्या केवळ उच्चारानेच त्यांना श्राद्धातील हव्य कसे मिळते ?

 

‘अध्यात्मातील मूळ निर्गुणाचा नियम आहे, ‘जिथे शब्द आहे, तिथे शक्ती, स्पर्श, रूप, रस आणि गंधही आहे’. साकारता ही पंचतत्त्वांच्या आधारे लहरींचे घनीकरण करून आपल्यासमोर सगुण रूपात, म्हणजेच मूर्त स्वरूपात उभी रहाते. प्रत्येक गोष्ट ही शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या वैशिष्ट्यांसहित पंचतत्त्वांच्या साहाय्याने बनलेली आहे. श्राद्धकर्मात केवळ पितरांच्या नावांच्या उच्चारणाने प्रक्षेपित झालेली वायूमंडलातील शब्दकंपने मंत्रांच्या साहाय्याने प्रवाही बनून, त्या त्या स्तरावर वायूमंडलात भटकणार्‍या लिंगदेहाला साध्य बनवून, त्याच्या वासनामय कोषाला भेदून त्याला श्राद्धाच्या ठिकाणी आकर्षित करतात. यामुळे त्या त्या गोत्राचे पितर त्या त्या ठिकाणी मंत्रशक्तीने ओढले जाऊन श्राद्धातील हव्य ग्रहण करून तृप्त होतात. मंत्रशक्तीमुळे त्या त्या पितरांच्या नावांच्या शब्दांतून प्रक्षेपित होणार्‍या ध्वनीकंपनांना गती प्राप्त झाल्याने, ती आपला सूक्ष्म परिणाम वायूमंडलावर सोडतात आणि सूक्ष्म स्तरावर वायूरूपे किंवा स्पर्शरूपे पितरांना हव्य ग्रहण करण्यास भाग पाडतात.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १२.८.२००५, सायं. ५.४६) 

 

३. श्राद्धात दिलेले अन्न पितरांना किती काळ पुरते ?

‘श्राद्धाच्या अन्नातून मंत्रोच्चाराच्या स्पर्शाने प्रक्षेपित होणार्‍या तेजोस्वरूपी सूक्ष्म-वायूच्या स्पर्शाने लिंगदेहातील वासनामयकोषातील रज-तम कणांचे उच्चाटन होण्यास साहाय्य होते. लिंगदेहाचे जडत्व काही प्रमाणात अल्प झाल्याने त्याला हलकेपणा जाणवून तो पुढची गती धारण करतो. हा महत्त्वाचा उद्देश अन्नातून साध्य झाल्याने ‘श्राद्धात दिलेले अन्न पितरांना किती काळ पुरते’, या प्रश्नाला अर्थ उरत नाही, तर ती एक क्षणिक काळाची लिंगदेहातील अन्नाशी संबंधित संस्कारात्मक रज-तम कणांचे श्राद्धातील तेजोमय लहरींच्या साहाय्याने विघटन करण्याची सूक्ष्म-प्रक्रिया असल्याचे लक्षात येते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १३.८.२००६, दुपारी १२.२१)

 

४. श्राद्धाचे भोजन करणार्‍याने
स्वाध्याय, कलह इत्यादी कृत्ये का करू नयेत ?

‘श्राद्धाचे भोजन हा अशुभ कर्मविधी मानला आहे. श्राद्धकर्मातील भोजन हे पितरांच्या नावे केलेल्या आवाहनात्मक मंत्रांच्या उच्चारणाने भारित झालेले असल्याने, ते वासनात्मक म्हणजेच रज-तमात्मक असते. याव्यतिरिक्त लिंगदेहांच्या आगमनाने वातावरणही दूषित झालेले असते. यामुळे श्राद्धाचे जेवण ग्रहण करणार्‍या जिवाला त्रास होण्याची शक्यता जास्त असते; म्हणून असे रज-तमात्मक जेवण ग्रहण करायला जाण्यापूर्वी कर्मकांडाने काही बंधने घातली आहेत. ती बंधने पाळून आपल्या देहावर वरील रज-तमात्मक विधीतून निर्माण होणारा परिणाम न्यूनतम होऊ देणे आणि त्याचा आपल्याला त्रास होऊ न देणे, हा यामागे दडलेला हिंदु धर्माचा उद्देश आहे. 

४ अ. स्वाध्याय (मायेतील विचार)

स्वाध्याय म्हणजे आपण केलेल्या कृतीचे चिंतन करणे. चिंतन हे विचारांपेक्षा (मननापेक्षा) सूक्ष्म स्तरावर असल्याने ते जिवाच्या देहात त्या त्या वृत्तीचा सखोल संस्कार करते. सर्वसामान्य जीव रजतमात्मक मायेतील आसक्तीदर्शक कृत्यांचेच जास्त प्रमाणात सखोल चिंतन करत असल्याने, त्याच्या भोवती रज-तमात्मक लहरींचे वायूमंडल बनते. या संस्कारांनिशी आपण भोजन ग्रहण करण्यास गेल्याने, तेथील रज-तमाचा आपल्या देहावर आणखी परिणाम होऊन त्रास होण्याची शक्यता वाढते. 

एखाद्या जिवाने सात्त्विक लहरींच्या स्तरावर साधनेचा चिंतनात्मक स्वाध्याय साधला असेल, तरीही श्राद्धातील रज-तमात्मक जेवण ग्रहण करून त्याच्या शरिरातील सत्त्वगुण अल्प होऊ शकतो; म्हणून दोन्हीही दृष्टीने स्वाध्याय करून जेवणे हे अल्प लाभदायक ठरते. 

४ आ. कलह

कलहाने मनोमयकोषातील रज-तमाचे प्रमाण वाढते. 

४ इ. दिवसा झोप

झोप तमप्रधान असल्याने ही आपल्यात तमाचे, म्हणजेच चिडचिडेपणाचे संवर्धन करते. 

४ ई. त्याच दिवशी दुसर्‍यांदा जेवणे

दुसर्‍यांदा जेवण केल्याने श्राद्धातील रजतमात्मक जेवणातून उत्पन्न झालेला सूक्ष्म-वायू हा आपल्या देहात संचारित अवस्थेत असल्याने, या सूक्ष्म-वायूच्याच साहाय्याने दुसर्‍या जेवणातील अन्नाचे पचन झाल्याने ते अन्न आपल्याला बाधक ठरू शकते. म्हणून वरील सर्व कृती टाळून मगच श्राद्धाचे जेवण घ्यावे, असे धर्माने सांगितले आहे.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ४.८.२००५, दुपारी ३.५४) 

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्राद्धातील कृतींमागील शास्र’

4 thoughts on “श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र”

 1. माझ्या कामाचे ठिकाणी मालकांचे वडिलांचे वर्ष श्राद्ध आहे मला प्रसादाचे जेवायला बोलावले आहे तरी जावे की न जावे, आम्ही दोघे सम गोत्री आहोत

  Reply
  • नमस्कार,

   श्राद्ध असताना आप्तेष्टांना बोलावून जेवण वाढण्याची पद्धत आहे, आपण जर त्यांचे कुटुंबीय असाल तर अवश्य प्रसाद म्हणून भोजन घेऊ शकता मात्र तसे नसतांना श्राद्ध अंतर्गत भोजन ग्रहण करणे निषिद्ध आहे.

   Reply
 2. माझा चुलत सासऱ्यांचे वर्ष श्रद्धाचे जेवणाचे आमंत्रण आहे मला वडील नाहीत आई आहे एक मुलगा आहे तरी मी जावं का कृपया मार्गदर्शन करावें

  Reply

Leave a Comment