धर्मग्लानी आणि अवतार

धर्मग्लानीचे शास्रीय कारण तसेच ईश्वराने अवतार घेण्याचे कारण इत्यादींविषयीची माहिती या लेखात पाहू.

 

१. धर्मग्लानीचे कारण

‘सनातन धर्म चातुर्वर्ण्ययुक्त आहे. सत्ययुगातील धर्म हा

१. ज्ञान (ब्राह्मण वर्णाची साधना),
२. तप (क्षत्रिय वर्णाची साधना),
३. दान (वैश्य वर्णाची साधना) आणि
४. सत्य (शूद्र वर्णाची साधना),

या चार पादांनी (चरणांनी) युक्त होता.

हे धर्माचे चार पाद जेव्हा सुसुरक्षित असतात, म्हणजे त्यांचे समाजाकडून पालन होत असते, त्या वेळी समाजात सत्ययुग पूर्ण महिम्याने (पूर्णत्वाने) नांदत असते. चार पादांनी युक्त असलेला असा धर्म चार पाय असलेल्या पटलाप्रमाणे (टेबलाप्रमाणे) स्थिर असतो. धर्माचा एक पाद क्षीण झाला की, तीन पाय असलेल्या पटलाप्रमाणे त्याची स्थिरता घटते. दोनच पाद उरले की, तो डगमगत चालतो. धर्माचा एकच पाद उरला की, तो अस्थिर होतो. याचा प्रत्यय सध्याच्या कलियुगात येतो.

शांकरभाष्यात जगद्गुरु श्री शंकराचार्यांनी असे सांगितले आहे की, ब्राह्मणांवर क्षत्रियांचा, क्षत्रियांवर वैश्यांचा आणि वैश्यांवर शूद्रांचा धर्म अवलंबून आहे. ब्राह्मणांनी आपला धर्म सोडला नाही, तर क्षत्रियांची धर्मनीती चांगली रहाते. ती चांगली राहिली की, त्यावर वैश्यांची स्थिती अवलंबून असल्याने ती चांगली रहाते आणि त्यायोगे शूद्रांचीही नीती चांगलीच रहाते.

जगात ब्राह्म आणि क्षात्र ही दोन तेजे आहेत. या तेजांचे जीवन परस्परपूरक आहे. ही दोन्ही एकवटून रहातात, तेव्हाच विश्वात शांती नांदते. चातुर्वर्ण्याची घडी विस्कटली की, धर्माला ग्लानी येते. तेव्हा प्रवृत्ती आणि निवृत्तीमार्गियांतील दुवा निखळतो, म्हणजे निवृत्तीमार्गियांच्या (साधकांच्या) योगक्षेमाची जे दायित्व ईश्वराने प्रवृत्तीमार्गियांवर (सांसारिकांवर) टाकले आहे, ते दायित्व जर प्रवृत्तीमार्गीय डावलत राहिले, तर साधूंच्या तपक्रियेत बाधा येते आणि ते भक्त असल्यामुळे ईश्वर त्यांच्या रक्षणासाठी अवतार घेतो. नीट विचार केला असता धर्मसंस्थापना हेच ईश्वराचे मुख्य अवतारकार्य आहे. साधूंचे रक्षण हे त्याचे आनुषंगिक फल दिसते. आता ही गोष्ट शेवटच्या थराला गेली की, प्रवृत्तीमार्गीय दुष्ट होऊन त्यांच्याकडून निवृत्तीमार्गियांचा छळ होऊ लागतो. मग त्यांच्या रक्षणासाठी दुष्टांचा संहार, हे त्या ईश्वराचे कार्य असते.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

 

२. ईश्वराने अवतार घेण्याचे कारण

अवतार कोणाचा, केव्हा आणि कशासाठी होतो, हे भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेतील चौथ्या अध्यायात पुढील दोन श्लोकांत सांगितले आहे.

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।। ७ ।।
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ।। ८ ।।
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४

अर्थ : जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते (म्हणजे लोक धर्माचरण करत नाहीत) आणि अधर्म बळावू लागतो, तेव्हा मी स्वतः जन्मास येतो ।। ७ ।।

सज्जनांच्या रक्षणासाठी, दुर्जनांच्या नाशासाठी आणि धर्मसंस्थापनेसाठी मी प्रत्येक युगात पुनःपुन्हा अवतार घेतो ।। ८।।

भावार्थ : ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येते, तेव्हा सनातन धर्म अपौरुषेय म्हणजे ईश्वरप्रणीत असल्यामुळे ती बिघडलेली घडी व्यवस्थित बसवण्याचे काम ईश्वरच करत असतो. ती घडी व्यवस्थित बसवण्यासाठी तो सगुण रूपाने अवतरत असतो. परत प्रत्येक युगाच्या शेवटी धर्मग्लानी येते.

 

३. धर्मसुधारणेचा खरा अर्थ म्हणजे धर्मसंस्थापना

‘स्वतःला विचारवंत म्हणवून घेणारे काही विद्वान ‘आपला धर्म जसा गुणी आहे, तसेच त्यात काही दोषही आहेत आणि त्या दोषांचे निवारण केल्याविना आपण खरेखुरे सुधारक होऊन सुखी होऊ शकणार नाही’, असे म्हणू लागले आहेत. त्यांचे हे म्हणणे मंदबुद्धीचे आहे. ‘मनुष्याची ऐहिक आणि पारलौकिक उन्नती करत त्यातून त्याची आत्मलाभासाठी, म्हणजे श्रेयसप्राप्तीसाठी योग्य अशी मनाची सात्त्विक वृत्ती निर्माण करतो तो ‘धर्म’, अशी धर्माची व्याख्या असतांना त्या धर्मात दोष कसे असणार ?

ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येते, म्हणजे बुद्धीमांद्यामुळे धर्माचे यथार्थ रहस्य न समजल्यामुळे दोष निर्माण होतात आणि त्यामुळे धर्मनिष्ठांना त्रास होऊ लागतो, तेव्हा त्यांच्या रक्षणासाठी आणि धर्माची विस्कटलेली घडी पूर्ववत बसविण्यासाठी भगवंत अवतार घेतो. अर्थात धर्माची विस्कटलेली घडी तशीच पुन्हा पूर्ववत बसविण्यालाच धर्मसुधारणा म्हणता येईल.’

– प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘धर्म’

Leave a Comment