धर्म आणि संस्कृती

या लेखात आपण ‘संस्कृती’ म्हणजे नेमके काय, तिचे प्रकार, भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये, ‘धर्म आणि संस्कृती एक कसे ?’, पाश्चात्त्य आणि भारतीय संस्कृतीमधील भेद इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे समजून घेऊ.

 

१. ‘संस्कृती’ या शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ

अ. ‘संस्कृती म्हणजे इतिहासातून निष्पन्न झालेला जीवनाचा एक आकृतीबंध. विशिष्ट लोकसमूहातील सदस्य त्यात सहभागी असतात.’ – क्लाईड क्लकहोहन (अमेरिकन वंशशास्त्रज्ञ)

आ. ‘संस्कार आणि संस्कृती हे दोन्ही शब्द सम् + कृ या एकाच धातूपासून बनले आहेत. त्यांचा अर्थही व्याकरणदृष्ट्या एकच आहे; पण संस्कार हा शब्द धार्मिक क्षेत्रापुरताच मर्यादित राहिला. धर्मासह समग्र अंतर्बाह्य जीवनाच्या उन्नत अवस्थेसाठी संस्कृती हा शब्द वापरला जातो. या शब्दाचा अर्थही पुष्कळ व्यापक झाला आहे.

मनुष्य आणि त्याच्या भोवतीचे विश्व मिळून निसर्ग बनतो. या निसर्गामध्ये जीवनोत्कर्षाला अनुकूल असे पालट करून, म्हणजेच निसर्गावर काही संस्कार करून मनुष्य आपली जीवनयात्रा चालवीत असतो. मनुष्य हासुद्धा भोवतालच्या निसर्गाचाच एक अंश आहे. तो केवळ बाह्य विश्वातील पदार्थांवर संस्कार करतो असे नव्हे, तर स्वतःचा देह, मन आणि बुद्धी यांच्यावरही संस्कार करून स्वतःमध्ये पालट घडवून आणतो. संस्कृती या शब्दात हे दोन्ही प्रकारचे पालट किंवा संस्कार अभिप्रेत आहेत. बाह्य विश्व आणि अंतर्विश्व या दोहोंवरही माणसाला यावत्शक्य विजय मिळविता येतो, तेव्हाच त्याचे जगणे ‘जीवन’ या उदात्त अर्थाला पात्र होते.

आपले जीवन सुखी, समृद्ध आणि आकर्षक व्हावे, यासाठी माणूस स्वतःही झगडतो अन् समुदायाशीही झगडत असतो. या दोन्ही क्रिया मानवी जीवनात थोड्याफार प्रमाणामध्ये एकाच वेळी चालू असतात. ओबडधोबड दगडावर छिन्नीचे संस्कार करून त्यातून सुंदर मूर्ती आकाराला आणणे, हा माणसाने निसर्गनिर्मित वस्तूवर केलेला संस्कार होय. हा संस्कार कधी सुटा रहात नाही. त्याच्या अनुषंगाने मूर्ती घडविणार्‍या त्या माणसाच्या मनावरही काही संस्कार घडत असतो. अशा सतत प्रयत्नांनी माणसाला मूर्तीकलेत प्रावीण्य लाभते आणि त्या मूर्तीच्या दर्शनाने अन् पूजनाने त्याच्या मनालाही प्रसन्नता लाभते. दगडावरच्या संस्काराने मनावर घडणारा हा संस्कार म्हणजे संस्कृतीचा आध्यात्मिक भाग होय. माणसाच्या अशा प्रकारच्या प्रयत्नांतूनच भौतिक वस्तूरूप सृष्टी आणि मानसिक सृष्टी निर्माण होते. अशी ही दि्वविध निर्मिती म्हणजेच संस्कृती होय. आधिभौतिक आणि आध्यात्मिक ही दोन विशेषणे वेगवेगळी असली, तरी संस्कृती या नावाची वस्तू एकच असते.

माणसाच्या मानसिक आशाआकांक्षांना आधिभौतिक सुधारणेमुळे मूर्त स्वरूप येते आणि भौतिक सुधारणांची वास्तू अध्यात्माच्या पायावर उभी केली गेली, तरच तिला संस्कृतीचा दर्जा प्राप्त होतो. सुसंस्कृत जीवनात बाह्य समृद्धीसोबत मन, बुद्धी अन् पंचेंद्रिये यांच्यावरही नियंत्रण असावे लागते. या दोन्ही गोष्टी एकसमयावच्छेदाने (एकाच वेळी) साध्य करण्याच्या प्रक्रियेलाच संस्कृती म्हणता येईल.

 

२. संस्कृतीचे प्रकार

२ अ. आधिभौतिक संस्कृती

शेती, पशुपालन, स्थापत्य, धातूकाम, यंत्रनिर्मिती, यंत्राच्या उपयोगाने वस्त्रोत्पादन, अर्थोत्पादन इत्यादी गोष्टींच्या संपन्नतेला ‘आधिभौतिक संस्कृती’, असे म्हटले जाते. बाह्य विश्वाचा अनेक प्रकारे उपभोग घेणे, निसर्गाला आपल्या सेवेत राबवणे आणि तशी महत्त्वाकांक्षा धरून सतत प्रयत्नशील असणे, या गोष्टी आधिभौतिक संस्कृतीच्या निदर्शक आहेत.

२ आ. आध्यात्मिक संस्कृती

धर्म, नीती, दंडक (कायदा), विद्या, ललित कला, वाङ्मय, सभ्यता आणि शिष्टाचार या गोष्टींचा संस्कृतीच्या आध्यात्मिक भागात अंतर्भाव होतो.’

 

३. वैशिष्ट्ये

‘भारताच्या सांस्कृतिक इतिहासाची वाटचाल पाहिल्यास तिच्यात पुढील दोन प्रमुख वैशिष्ट्ये दिसून येतात.

अ. हिंदु धर्मात राजकीय आणि धार्मिक सत्तांच्या केंद्रीकरणाचा अभाव

हिंदु धर्माच्या संदर्भात सर्वंकष केंद्रसत्ता कधीच निर्माण झाली नाही. एखाद्या विशिष्ट प्रेषिताचा आग्रह धरून देशभर त्याने उपदेशिलेल्या धर्मतत्त्वांचा दंडयुक्त प्रचार इथे कोणी केला नाही. ईश्वर एकच आहे, असे इथे संतांनी आणि तत्त्ववेत्त्यांनी सांगितले आणि लोकांनीही ते मानले; पण ‘खिस्त किंवा महंमद हा ईश्वराचा एकमेव प्रेषित आहे’, असे या देशात कोणी सांगितले नाही. ‘खिस्ताला किंवा महंमदाला भजणारे आणि मानणारे तेवढेच काय ते स्वर्गाचे धनी आणि बाकीचे सारे नरकगामी’, अशा प्रकारचा आग्रह कोणत्याही भारतीय धर्मपंथाने धरला नाही. भारतातले अंतिम मूल्य स्वर्ग नसून मोक्ष हे आहे. त्यामुळे इथे स्वर्गाची चाड (कदर) फारशी कोणी केली नाही. त्यामुळे जशा अनेक राजसत्ता, तसे अनेक धर्मसंप्रदाय इथे एकमेकांच्या शेजारी नांदले. परमेश्वर एकच असला, तरी त्याची भिन्न रूपे असायला आक्षेप नाही आणि त्यांची उपासना करायलाही आडकाठी नाही, असे या देशाने मानले. दुसर्‍या दैवताला कोणत्याही प्रकारे न्यूनपणा न आणता प्रत्येक जातीला किंबहुना प्रत्येक कुटुंबाला इथे स्वतःसाठी कोणतेही खास दैवत स्वीकारायला मोकळीक मिळाली. अशा गोष्टींमुळेच येथील सांस्कृतिक जीवनाचे स्वरूप केंद्रीकृत किंवा विशिष्ट ठशाचे असे झाले नाही.

आ. संस्कृतीसंघर्ष टाळून संस्कृतीसंगम करण्याची प्रवृत्ती

सहस्रो वर्षांपासून सहस्रो लोक गटागटाने भारतात प्रवेश करून इथे वसले आहेत. या प्रत्येक गटाच्या भिन्न भिन्न संस्कृतीचा इथे दीर्घकालीन संपर्क होत राहिला. असे असूनही या संपर्कातून एका संस्कृतीला पूर्णपणे दडपून टाकून किंवा तिला नष्ट करून दुसरीने जिवंत रहावे, असा तीव्र संस्कृतीसंघर्ष कधीच निर्माण झाला नाही. एकीकडे जुने एतद्देशीय आणि दुसरीकडे नवे परकीय यांच्यामध्ये नेहमी सांस्कृतिक तडजोडच होत राहिली.’

इ. हिंदु संस्कृतीच्या अभ्यासास वाङ्मयाच्या अभ्यासापासून प्रारंभ करता येतो. तशी इतर संस्कृतींची गोष्ट नाही.

ई. हिंदु संस्कृतीचे संवर्धन ‘संस्कृत’ या एकाच भाषेत झाले.

उ. हिंदु समाज हा निरनिराळ्या जातींचा समुच्चय आहे. मतमूलकभिन्नता किंवा उपास्यमूलकभिन्नता यामुळे हिंदूंपासून भिन्नत्व स्थापन करणार्‍या रेषा हिंदूंनी कधीच ओढल्या नाहीत. हिंदु समाजाच्या अंतर्गत असणारे जातीभेद विचारमूलक न रहाता आचारमूलक राहिले आहेत. या परिसि्थतीमुळे ‘हिंदु’ या नावावर अधिकार स्थापित करणे, हे सर्वस्वी जातीच्या किंवा संप्रदायाच्या इच्छेवरच अवलंबून आहे.

ऊ. हिंदु समाजास एकत्र बांधणारे सर्वव्यापी असे बंधन कोणतेच नाही.

ए. मुसलमानी आणि खिस्ती लोकांची संप्रदायरूपी राष्ट्रे हिंदु संस्कृतीच्या उच्छेदार्थ प्रयत्न करेपर्यंत हिंदु संस्कृतीच्या सार्वभौमत्वाखाली असलेल्या लोकांना एकत्र होऊन स्वसंरक्षणाचे कार्य करण्याची आवश्यकता पडली नव्हती !

ऐ. संस्कृती या शब्दाची व्याप्ती मोठी असून त्यात धर्म, दर्शने, दैवते यांसारखे अनेक विषय येतात. ऋणकल्पना, आश्रमकल्पना, पुरुषार्थकल्पना आणि चातुर्वर्ण्य ही भारतीय संस्कृतीची काही वैशिष्ट्ये होत.

 

४. धर्म हाच खर्‍या संस्कृतीचा पाया

धर्मातील बहुतेक सर्व कल्पना संस्कृतीत कशा येतात, हे लेखमालिकेत इतरत्र दिलेल्या ज्ञानावरून लक्षात येईल. त्यावरून असे म्हणता येईल की, धर्म हाच खर्‍या संस्कृतीचा पाया असतो.

 

५. धर्म आणि संस्कृती एकच

‘धर्म आणि संस्कृती असे दोन शब्द नेहमी उच्चारले जातात; पण धर्म आणि संस्कृती यांत वास्तविक अंतर नाही. ते एकच आहेत. धर्मशास्त्राने सांगितलेला आचारसमूह म्हणजे संस्कृती. यासंबंधी माननीय प्राचार्य अनंतराव आठवले (स्वामी वरदानंद भारती) यांनी व्यक्त केलेला विचार पुढे देत आहे –

‘संस्कृती हा शब्दच मुळी आपण नवीन निर्माण केला आहे. सिव्हिलायझेशन (नागरीकरण) आणि मुख्यतः कल्चर (रीतीभाती) यांसाठी तो आपण वापरतो. आपल्या जुन्या वाङ्मयामध्ये या अर्थाचा संस्कृती हा शब्द नाही. पाश्चात्त्यांच्या संपर्कापूर्वी ‘धर्म’ या शब्दानेच आपले सगळे काम पूर्णपणे भागत असे. आपल्या धर्मकल्पनेत तत्त्वज्ञान, विचार, नीती आणि आचार या सर्वांचाच समावेश होतो; म्हणून खरेतर संस्कृती अन् धर्म एकच आहेत. धर्मापेक्षा संस्कृती वेगळी मानायची, तर संस्कृती शब्दामागील कल्पना मर्यादित केली पाहिजे. अनेक लोक तसे करतातही. त्यामुळे संस्कृती शब्दाचा आशय वेगवेगळे रूप धारण करतो. काही लोक नृत्य, गीत, वाङ्मय आणि शिल्प यांच्या आविष्कारालाच संस्कृती म्हणतात. तत्त्वज्ञान वगळून आचारविचारालाच काही लोक संस्कृती समजतात. सभ्यता आणि संस्कृती यांत अंतर नाही, असे म्हणणारेही काही आहेत.

५ अ. संस्कृती आणि सभ्यता

संस्कृती आणि सभ्यता हे दोन शब्द काही अंशी वेगवेगळ्या कल्पनांचे द्योतक मानले की, संस्कृती हा नीतीविचार आणि सभ्यता हा ते विचार आदर्श मानणार्‍या समाजाचा बाह्याचार असे म्हणता येईल; पण त्यामुळे एकाची सभ्यता ही दुसर्‍याची असभ्यता, अशिष्टताही ठरण्याची शक्यता आहे. पाश्चात्त्य आणि भारतीय यांच्या संदर्भात चुंबनाचा विचार केला, तर हे स्पष्ट होईल; म्हणूनच नीतीसंकल्पना सोडून केवळ सभ्यतेचे अनुकरण करणे, हे गबाळेपणाचे लक्षण मानले पाहिजे.

 

६. संस्कृतीची सर्वसमावेशकता

हिंदु संस्कृतीचे स्पष्टीकरण करतांना तिचे अधिष्ठान लक्षात घेतले पाहिजे. आपल्या ध्येयकल्पनेप्रमाणे आपली संस्कृती ही मंदिराभोवती आणि यज्ञकल्पनेभोवती साकारलेली आहे. व्यक्तीविषयक सुखदुःखाच्या कल्पनेतून तिने आकार धारण केलेला नाही. धर्मशास्त्राने सांगितले नाही; पण जे चांगले आहे त्याचा समावेश संस्कृतीत केला आहे, उदा. आई-वडिलांना प्रतिदिनी नमस्कार करणे, संध्याकाळी देवापुढे दिवा लावून ‘शुभं करोति’ आणि ‘श्रीरामरक्षा’ यांसारखी स्तोत्रे म्हणणे.’

 

७. पाश्चात्त्य आणि भारतीय संस्कृती

अ. ‘आपली देहयात्रा विषयभोगासाठी नसून विषयभोग हे देहयात्रेसाठी आहेत, असे भारतीय संस्कृती मानते, तर पाश्चात्त्य संस्कृती याच्या उलट मानते.

आ. भारतीय संस्कृती अध्यात्माच्या पायावर उभी असल्याने तिच्या अंतर्गत येणार्‍या मनुष्याच्या जीवनाविषयीच्या धारणांनाही पाश्चात्त्य संस्कृतींपेक्षा निराळे परिमाण आहे. परदेशात निर्धन (गरीब) माणसाला सामान्य मनुष्य म्हटले जाते, तर आपली सामान्य माणसाची व्याख्या वेगळी आहे. आपण तमप्रधान वृत्तीच्या माणसालाच सामान्य मनुष्य म्हणतो, मग तो श्रीमंत असला तरी ! आणि सत्त्वप्रधान वृत्तीच्या माणसाला मोठा मनुष्य म्हणतो, मग तो निर्धन असला तरी !’

– प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘धर्म’

Leave a Comment