रामनवमीच्या दिवशी जयपूर येथील श्री लक्ष्मीनारायणाचे चित्र आणि साधिकेने लिहिलेले भावपूर्ण पत्र

‘चैत्र शुद्ध प्रतिपदा, म्हणजे नववर्षाच्या पहिल्या दिवशी मी मथुरेतील श्रीकृष्णाच्या जन्मस्थानाचे दर्शन घेतले, तर रामनवमीच्या दिवशी जयपूर येथे श्री लक्ष्मीनारायणाचे दर्शन घेतले. सुंदर वस्त्रालंकार आणि आभूषणे यांमुळे भगवान श्री लक्ष्मी मातेसह अतिशय तेजस्वी दिसत होते. मी हे चित्र प.पू. डॉक्टरांच्या चरणी समर्पित करते. (२६.४.२०१३)

१. चित्राची पार्श्वभूमी

balak_bhav_2_C19_b

अ. सहलीला गेल्यावर अंतर्मुखता, शरणागतभाव
आणि प्रार्थना वाढून भगवंताचे चैतन्य ग्रहण करण्याची संधी मिळणे

माझ्या यजमानांनी आमचे मथुरा, वृंदावन आणि जयपूर येथे सहलीला जाण्याचे नियोजन केले होते. ‘पुष्कळ सेवा प्रलंबित असतांना सहलीला जाणे योग्य आहे का ?’, असे मला वाटत होते; मात्र नंतर ‘भगवंतच मला सहलीला घेऊन जात आहे’, असे मला जाणवले. मी करत असलेल्या समष्टी सेवांमुळे माझ्या नकळत माझा अहं वाढला होता. माझ्यातील कर्तेपणामुळे ‘चेन्नईमध्ये सेवा करण्यासाठी माझी पुष्कळ आवश्यकता आहे’, असे मला वाटत होते; परंतु माझ्या अनुपस्थितीत विविध प्रकारच्या सेवा अधिक चांगल्या प्रकारे होत असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यामुळे धर्मप्रसार करण्यासाठी कोणाचीही आवश्यकता नसून तो केवळ भगवंताच्या संकल्पशक्तीमुळेच होत असल्याचे त्यानेच या सहलीच्या माध्यमातून माझ्या लक्षात आणून दिले. समष्टी सेवा करत असतांना माझी व्यष्टी साधना चांगल्या प्रकारे होत नव्हती, तसेच साधनेपेक्षा माझे लक्ष कार्याकडे अधिक होते. यासाठी कृपाळू आणि वात्सल्यमूर्ती प.पू. डॉक्टरांनी मला शिक्षा करण्याऐवजी सहलीला पाठवून माझी अंतर्मुखता वाढवण्यास साहाय्य केले. माझा शरणागतभाव आणि प्रार्थना वाढून भगवंताचे चैतन्य ग्रहण करण्याची त्यांनी मला संधी दिली.

मथुरेत असतांना माझा नामजप सातत्याने होत होता. भगवंताच्या दर्शनानंतर माझी भावजागृती आणि प्रार्थना अधिकाधिक होत होत्या. मला माझ्या अहंची जाणीव करून देऊन भगवंताच्या कमलचरणी संपूर्णपणे शरण जाण्यासाठी आणि धर्मसंस्थापनेच्या कार्यामध्ये मला अत्यल्प संधी दिल्यासाठी मी कृतज्ञ आहे.

आ. कलियुगामध्ये भगवान श्रीकृष्णाने सर्व गोपींसह
त्याचे वास्तव्य ‘रामनाथी’ येथे हलवले असल्याची जाणीव होऊन भाव दाटून येणे

मी वृंदावन आणि मथुरा येथे असतांना समष्टी राधा बिंदाताई (सनातनच्या संत पू. सौ. बिंदा सिंगबाळ) आणि सनातनच्या गोपी यांचा विचार करत होते. ‘कलियुगामध्ये भगवान श्रीकृष्णाने त्याचे वास्तव्य सनातनच्या ‘रामनाथी’ आश्रमात हलवले असून त्याने त्याच्या समवेत सर्व गोपींनाही नेले आहे’, याची जाणीव झाल्यावर माझा भाव दाटून आला.’

– सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई. (२१.४.२०१३)

२. सौ. उमा रविचंद्रन् यांनी श्रीकृष्णाला (प.पू. डॉक्टरांना) लिहिलेले पत्र

‘हे भगवंता, प्रिय प्रभु,

अ. भगवंताचा जन्म होतांना आणि झाल्यानंतर
विविध प्रसंगांत त्याच्यासह स्वतःचे अस्तित्व अनुभवण्यास मिळणे

तू मला मथुरा, वृंदावन अन् जयपूर येथे दर्शन दिलेस, देवकी माता आणि नंदबाबा यांच्यासह शंख, चक्र, गदाधारी रूपातील तुझा जन्म अनुभवण्यास दिलास. माता-पित्यांच्या इच्छेनुसार तू तेजस्वी निळ्या रंगाच्या बाळाचे रूप धारण करतांना गुलाबाच्या पाकळ्यांसारखा तुझा मृदू देह मी अनुभवू शकले. रात्रीच्या वेळी नंदबाबा तुला गोकुळाला घेऊन जात असतांना त्यांच्यासह तू मला वेगाने वहाणार्‍या यमुनेमध्ये चालायला लावलेस. जेव्हा ‘आदिशेषा’ने छत्रीप्रमाणे तुझे रक्षण केले होते, ती वादळाची काळी रात्र मी अनुभवू शकले.

आ. गोवर्धन पर्वताच्या लीलेतूनही अवर्णनीय आनंद अनुभवणे आणि कालियामर्दन पाहून थक्क होणे

इंद्राचा प्रकोप झाला तेव्हा मी घाबरले होते आणि हे प्रभो, जेव्हा तू तुझ्या करंगळीवर ‘गोवर्धन पर्वत’ सहजपणे उचलून त्याचे छत्र केलेस, तेव्हा मला अवर्णनीय आनंद झाला होता. तू कालियावर विजय मिळवून त्याच्या फण्यावर नाचलास, त्या वेळी मी आश्चर्याने थक्क झाले होते.

इ. वृंदावनात, तसेच तेथील बाकेबिहारी मंदिरात
आणि ‘इस्कॉन’च्या श्रीकृष्णमंदिरात आलेले भावपूर्ण अनुभव

वृंदावनातील गोपींच्या भक्तीमध्ये तू मला चिंब भिजवून टाकलेस, तसेच बाकेबिहारी मंदिरात तू मला ‘माई मीरे’ची मधुराभक्ती अनुभवण्यास दिलीस. ‘इस्कॉन’च्या श्रीकृष्णमंदिरामध्ये लावलेल्या भावपूर्ण भजनांवर माझे देहभान विसरून मी तुझ्यासह सूक्ष्मातून रासलीला खेळले.

ई. भगवंताने (प.पू. डॉक्टरांनी) आंबे पाठवून भक्तीरसाचा वर्षाव केल्याचे जाणवणे

हे प्रभो, आता माझ्यासाठी आंबे (टीप) पाठवून माझ्यावर मधुर-मधुर भक्तीरसाचा वर्षाव केलास. हे भगवंता, या अमाप कृपेच्या वर्षावाला पात्र व्हावे, असे मी काय केले आहे ? हे प्रभो, मला तुझ्या कमलचरणांखालील धुळीत विलीन होता येऊ दे.’

माझ्या भगवंताच्या कमलचरणांखालील धुळीचा एक कण,
उमा (सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई) (२८.४.२०१३)

टीप : एप्रिल २०१३ मध्ये प.पू. डॉक्टरांनी सौ. उमाक्कांसाठी आश्रमातून आंबे पाठवले होते. (मूळस्थानी)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘‘बालकभावा’तील चित्रे (भाग २) (धर्मसंदेश देणारी श्रीकृष्णाची चित्रे अनुभूतींसह)’

Leave a Comment