सद् गुरुपदी विराजमान झालेल्या पू. (कु.) स्वाती खाडये !

 उत्कृष्ट नियोजनकौशल्य, अविश्रांत परिश्रम आणि गुरूंवरील
अपार श्रद्धा यांमुळे नाशिक येथील सिंहस्थपर्वाची सेवा उत्तमरित्या
पार पाडून सद् गुरुपदी विराजमान झालेल्या पू. (कु.) स्वाती खाडये !

जुलै आणि ऑगस्ट २०१५ मध्ये नाशिक येथे सिंहस्थपर्वाचे आयोजन होते. तेथे सनातन संस्थेच्या वतीने धर्मप्रसाराच्या सेवेचे दायित्व प्रसारसेविका पू. (कु.) स्वातीताई खाडये यांनी पुष्कळ सक्षमतेने सांभाळले. पू. (कु.) स्वातीताई आणि अन्य साधक यांनी सिंहस्थपर्वाच्या आयोजनाचा उत्तम प्रकारे लाभ करून घेतला. त्यामुळे पू. ताईंची आध्यात्मिक पातळी केवळ २ मासांत (महिन्यांत) ३ टक्क्यांनी वाढून त्या सद्गुरुपदी विराजमान झाल्या. ९ साधकांनी ६० टक्के आणि त्यापेक्षा अधिक आध्यात्मिक पातळी गाठली, तसेच जगभर धर्माचा प्रचार-प्रसारही झाला. हे सर्व पू. ताईंच्या समर्थ नेतृत्वाखाली कसे साध्य झाले, याचे त्यांनीच त्यांच्या मार्गदर्शनातून उलगडलेले रहस्य आपण या लेखात पहाणार आहोत.

p_swatitai

१. मनात सेवा कशी जमणार, असा विचार
आल्यावर एका संतांशी बोलणे, त्यांनी मागच्या
सिंहस्थपर्वाप्रमाणे चुका न करण्याविषयी सांगणे
आणि देव करवून घेणारच आहे, असे सांगून आश्‍वस्त करणे

P_Rajandada_2015_clr
पू. राजेंद्र शिंदे

पू. (कु.) स्वातीताईंना पूर्वी झालेल्या सिंहस्थपर्वातील सेवेचा काहीच अनुभव नव्हता; कारण तेव्हा त्या नुकत्याच साधनेत आल्या होत्या. सिंहस्थपर्वातील प्रसाराचे नियोजन करण्यासाठी पू. ताई नाशिक येथे मार्च २०१५ मध्ये गेल्या. आरंभी सर्वसाधारण नियोजन करणे चालू झाले. तेव्हा हे नियोजन पुष्कळच मोठे आहे. ते आपल्याला कसे जमणार ?, असे त्यांना वाटले. त्यांनी एका संतांशी याविषयी बोलून घेतले. तेव्हा ते त्यांना म्हणाले, आपल्याला सिंहस्थपर्वातील प्रसाराची संधी घालवायची नाही आणि मागच्या सिंहस्थपर्वाप्रमाणे चुकाही करायच्या नाहीत. (वर्ष २००३ मध्ये नाशिक येथे झालेल्या सिंहस्थपर्वात प्रसाराचे दायित्व असणार्‍या साधकांकडून अत्यंत गंभीर चुका झाल्या होत्या.) मग कसे करायचे ते तुम्ही ठरवा. देव करवून घेणारच आहे.

 

२. संतांशी बोलणे झाल्यावर पू. ताईंच्या
विचारांमध्ये झालेले पालट आणि सेवेचे केलेले नियोजन

२ अ. चुकांविरहित सेवा करून देवाला
आणि साधकांना आनंदच देण्याचा ठाम निश्‍चय करणे

एका संतांशी बोलणे झाल्यावर पू. स्वातीताईंनी ते दायित्व स्वीकारले आणि सिंहस्थपर्व १२ वर्षांतून एकदाच येत असल्याने त्याचा अधिकाधिक लाभ करून घ्यायचा, असे निश्‍चित केले. त्यांनी ठरवले, यंदाच्या सिंहस्थपर्वात चुका होऊ द्यायच्या नाहीत. त्याचा त्रास देवाला होऊ नये. चुका झाल्याच तर आपल्या साधनेची हानी होऊन देवाला त्रास होईल. त्यामुळे सर्वांना आनंदच द्यायचा आहे.

२ आ. दायित्व घेतल्यावर प्रतिदिन केलेली प्रार्थना

देवा, जे काही होईल, ते तुम्हीच करवून घ्या. हे मन, ही दृष्टी, हा देह, सर्वकाही तुमचेच आहे. ही प्रार्थना केल्यावर त्यांना सेवेविषयी पुढील विचार सुचत जायचे.

२ इ. आयोजनाच्या सेवेत असलेल्या साधकांकडून
अपेक्षित साहाय्य न मिळाल्याने युवा साधिकांना सेवेसाठी बोलावणे

आयोजनाच्या सेवेत असलेल्या साधकांकडून चुका होत होत्या. त्यांच्याकडून योग्य प्रकारे आढावाही मिळत नव्हता. त्यांना आयोजनात साहाय्य होण्यासाठी त्यांनी लहान वयात आध्यात्मिक उन्नती केलेल्या युवा साधिका कु. वैभवी भोवर (वय १८ वर्षे), कु. वैदेही पिंगळे (वय २० वर्षे), कु. दीपाली मतकर (वय २५ वर्षे) आणि कु. तृप्ती गावडे (वय २५ वर्षे) यांना नाशिकला बोलावून घेतले. या साधिकांना जरी नियोजनातील बारकावे ठाऊक नसले, तरी त्या अत्यंत प्रामाणिक असून योग्य तो वस्तूनिष्ठ आढावा त्यांच्याकडून दिला जाईल, याची त्यांना निश्‍चिती होती.

२ ई. सिंहस्थपर्वात ध्येय ठेवून सेवा करण्याचे निश्‍चित करणे

पू. ताईंनी त्या चौघींना एकत्रित घेऊन सांगितले, देवाला त्रास होईल, अशा कोणत्याही प्रकारच्या चुका आपण होऊ द्यायच्या नाहीत. आपल्याला जमले नाही, तर करायचे थांबूया; पण देवाला त्रास व्हायला नको. सिंहस्थपर्वाच्या सेवेचा लाभ करून घेण्यासाठी तुम्ही संतपदाकडे वाटचाल करण्याचे ध्येय ठेवा आणि मीसुद्धा सद्गुरुपदाचे ध्येय ठेवते. पू. ताईंच्या या बोलण्यामुळे त्यांना प्रेरणा मिळाली.

 

३. ध्येयनिश्‍चितीनंतर चालू झालेली सेवेची वाटचाल

अ. पू. ताईंनी सद्गुरुपद गाठूनच नाशिकमधून बाहेर पडायचे, असे ध्येय ठेवल्याने या ध्येयाने त्या जणू वेड्या झाल्या होत्या. नाशिक सिंहस्थपर्वात आपण जे प्रयोग करणार, ते यशस्वी झाले, तर वर्ष २०१६ मधील उज्जैन येथील सिंहस्थपर्वात त्याचा उपयोग होऊ शकतो, असा त्यांचा विचार झाला.

आ. एका संतांना प्रत्येक २ दिवसांनी काय काय झाले ?, ते सांगून त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचे, असे त्यांनी ठरवले.

इ. पू. ताईंना सद्गुरुपद प्राप्त करण्याचे ध्येय घेतल्यामुळे त्यांना सतत उत्साही असायच्या. संत सांगतील, त्याप्रमाणे करण्यासाठी झोकून देऊन सेवा करण्याची सिद्धता त्यांनी दर्शवली आणि संत सांगतील, त्याप्रमाणे होतही गेले. पदोपदी त्यांना देवाने विविध अनुभूतीसुद्धा दिल्या.

 

४. सिंहस्थपर्वाच्या सेवेसाठी आलेल्या साधकांची
साधना चांगल्या प्रकारे होण्यासाठी पू. ताईंनी केलेले प्रयत्न

४ अ. सेवेसाठी आलेल्या प्रत्येक साधकाला
६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्याचे ध्येय ठेवण्यास सांगणे

सिंहस्थपर्वाच्या प्रसारासाठी आलेल्या साधकांकडून केवळ कार्य झाले, असे न होता त्यांची साधना व्हावी, यासाठी पू. स्वातीताईंनी पुष्कळ प्रयत्न केले. एवढ्या व्यस्ततेतही त्या साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी एकत्र बोलवायच्या. सेवेसाठी आलेल्या प्रत्येक साधकाने ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्याचे ध्येय गाठावे, असे त्यांनी सांगितले.

४ आ. साधकांची व्यष्टी साधना चांगली
होण्यासाठी केलेले कौशल्यपूर्ण नियोजन

साधक प्रसारात पुष्कळ व्यस्त असत. प्रदर्शनावर असणारे साधक सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत आणि साधूग्राममध्ये प्रसाराला जाणारे साधक सकाळी ९ ला निघून रात्री ९.३० ते १० वाजता परत येत. अशा स्थितीतही प्रत्येकाकडून साधना होण्यासाठी पू. ताईंनी पुढीलप्रमाणे अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केले.

१. पू. ताई कु. वैभवी भोवर, कु. वैदेही पिंगळे, कु. दीपाली मतकर, कु. तृप्ती गावडे आणि सौ. उल्का जठार या सर्व साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेत. या ५ साधिका साधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा पू. ताईंना द्यायच्या.

२. प्रदर्शनावर सतत गर्दी असे. साधकांना बसायलाही वेळ मिळत नसे. त्यामुळे प्रदर्शनातील साधकांचा प्रदर्शन चालू असतांनाच आलटून-पालटून सकाळी, दुपारी, सायंकाळी किंवा रात्री आढावा घ्यायच्या.

३. साधकांकडून प्रतिदिन झालेल्या चुका लिहिण्यासाठी फलक ठेवले होते. साधकांना गंभीर चुका लिहून देण्यासाठी चुकांची पेटी ठेवली होती. त्या पेटीतील गंभीर विषयीचा सत्संग पू. ताई घेत.

४. पू. ताईही प्रदर्शनात फिरतांना प्रत्येकाला ध्येयाची जाणीव आहे ना ? ६० प्रतिशत स्तर गाठायचा आहे, हे लक्षात आहे ना ?, अशा प्रकारे विचारून जागृत ठेवत.

५. पू. ताई स्वतः प्रत्येक आठवड्याला एक-आड-एक भावजागृती सत्संग आणि स्वभावदोष-निर्मूलनासाठी चुकांचा सत्संग घेत.

६. साधक पुष्कळ थकलेले असल्याने ते जेव्हा रात्री प्रसाराला जात, तेव्हा रात्री २ – २.३० वाजता पू. ताई स्वतः त्यांना भेटायला जात. त्यांना चहा आणि खाऊ देत. त्यामुळे साधकांनाही सेवा करण्यास प्रोत्साहन मिळत असे. एकदा साधकांना बाहेरून जेवण मिळाले नाही, त्या दिवशी साधकांसाठी पू. ताईंनी स्वतः खिचडी आणि तिवळ (आमसुलाचे फोडणी घातलेले पाणी) बनवले होते.

 

५. प्रसारकार्याचे नाविन्यपूर्ण आणि
कौशल्यपूर्ण रितीने केलेले नियोजन

५ अ. फलक लावण्याचे केलेले नियोजन

५ अ १. फलक लावण्यासाठी स्वतः जागा शोधणे आणि त्यांचा अभ्यास करणे : आरंभी फलक लावणे आणि भिंती रंगवणे, यांसाठी ५०० जागा निवडायचे ठरवले होते, जेणेकरून जगभर प्रसार होईल. त्या ध्येयाने प्रेरित होऊन पू. ताई सकाळी ९ वाजता जागांच्या शोधात बाहेर पडत आणि रात्री ९ वाजेपर्यंत जागा शोधणे, त्यांचा अभ्यास करणे, जागेशी संबंधित व्यक्तींना भेटणे, त्यांना संस्थेचे कार्य समजून सांगणे, अशा सेवेत स्वतः सहभागी होत.

जागा शोधण्याच्या प्रक्रियेत आरंभी पू. ताईंसोबत प्रथम श्री. सुनील घनवट आणि नंतर श्री. अभय वर्तक सहभागी होते. जागा निवडल्यानंतर किती अंतरावरील (उदा. २०० फूट, ५०० फूट) लोकांना फलक दिसला पाहिजे, त्याप्रमाणे लिखाण निवडणे आणि अक्षरांचा आकार निश्‍चित करणे, असा अभ्यास केला. पुष्कळ लांबून एखादा फलक दिसणार असेल, तर तेथे अधिक लिखाण न लिहिता केवळ सनातन संस्था आणि संपर्क क्रमांक किंवा सनातन प्रभात नियतकालिके (दैनिक, साप्ताहिक, मासिक सनातन प्रभात) आणि संपर्क क्रमांक लिहिणे, असा अभ्यास केला गेला. एकूण २५० जागा निवडल्या. त्यातील १२० ते १३० ठिकाणी फलक लावण्याचे आणि उरलेल्या ठिकाणी भिंती रंगवण्याचे ठरले.

५ अ २. फलक लावणे आणि भिंती रंगवणे, यांविषयी संतांचे मार्गदर्शन घेणे : एखादी जागा प्रसारासाठी, फलक लावण्यासाठी योग्य वाटली, तर पू. ताई व्हॉट्स अ‍ॅपवर छायाचित्र काढून पाठवत. छायाचित्रांद्वारे त्या येथे फलक लावावेसे वाटते; हा राजमार्ग आहे, १ ते १.५ कोटी लोक या मार्गावरून जातील, येथे सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, हिंदु विधीज्ञ परिषद किंवा एस्.एस्.आर्.एफ्.चा प्रसार करू शकतो, याविषयी संतांना विचारून घेत. तेव्हा कोणत्या ठिकाणी सनातन संस्थेचे आणि समितीचे फलक लावायचे, याविषयी संत त्यांना मार्गदर्शन करत. अशा प्रकारे प्रत्येक गोष्ट पू. ताई विचारून करत.

५ अ ३. लोखंडी चौकटीत फलक लावण्याच्या नियोजनात संतांचे केलेले आज्ञापालन आणि एकही पैसा व्यय न करता लोखंडी चौकटी बनवण्याचे केलेले नियोजन : नाशिकला वारा आणि पाऊस अधिक असल्याने नुसते फ्लेक्स लावू शकत नसल्याने लोखंडी चौकटीत फलक लावावे, असे ठरले. यासाठी किती लोखंड लागेल, याचा अंदाज काढल्यावर साधारण १९ टन लोखंड लागणार असून त्यासाठी १ लक्ष ५० सहस्र रुपये व्यय येणार असल्याचे लक्षात आले. पू. ताईंनी त्याविषयी संतांना विचारले. तेव्हा त्यांनी फलक न लावण्यास सांगितले. त्या वेळी काही साधकांना वाटले, आता जगभर प्रसार कसा होणार ? ते पू. ताईंना म्हणाले, आपल्याला प्रसार करण्यात अडचण येईल, एवढी मोठी संधी जाईल, असे तुम्ही संतांना कळवा.

तेव्हा ताई म्हणाल्या, संतांनी व्यय करायचा नाही, असे म्हटल्यावर आपण त्यांचे १०० टक्के ऐकायला हवे. त्यांनी नाही सांगितल्यावर आपण त्यांना काही समजून सांगणे म्हणजे आपल्याला त्यांच्यापेक्षा अधिक कळते, असे होईल. ते योग्य नाही.

५ अ ३ अ. भंगारवाल्यांकडे जाऊन लोखंडाचे तुकडे जमा करणे आणि वेल्डींग करून त्यांपासून चौकटी बनवणे : त्यानंतर त्यांनी देवाला प्रार्थना केली. तेव्हा देवाने सुचवल्याप्रमाणे त्यांनी साधकांना सांगितले, आपण नाशिकमधील सर्व भंगारवाल्यांकडे जाऊया. त्यांच्याकडून अर्पणात लोखंडाचे तुकडे मागूया. त्याप्रमाणे साधकांनी भंगारवाल्यांकडे जाऊन लोखंडाचे तुकडे मागण्यास प्रारंभ केला. अनेक भंगारवाल्यांकडे गेल्यावर बर्‍यापैकी लोखंडाचे तुकडे जमा झाले.

नंतर नवी मुंबईतील साधक श्री. केणी यांनी ते सर्व छोटे-मोठे तुकडे वेल्डींग करून आपल्याला आवश्यक तशा धातूच्या चौकटी बनवल्या. एका भंगारवाल्यानेही धातूच्या ५ चौकटी दिल्या.

५ अ ३ आ. बांधकाम व्यावसायिकांना भेटून त्यांच्याकडून मिळालेल्या मोठ्या आकारातील धातूच्या चौकटी घासून स्वच्छ करणे आणि त्या कापून छोट्या आकारातील चौकटी बनवणे : आणखी चौकटींची आवश्यकता लागल्यावर पू. ताईंच्या मनात आले, आपण बांधकाम व्यावसायिकांना भेटूया. त्यांच्याकडून चौकटी मागवूया. त्याप्रमाणे बांधकाम व्यावसायिकांना भेटल्यावर त्यांच्याकडील ५० फूट, १०० फूट अशा मोठ्या आकाराच्या धातूच्या चौकटी मिळाल्या. तेव्हा त्यांनी व्यावसायिकांना सांगितले, आम्हाला छोट्या आकाराच्या चौकटी लागणार आहेत. तुमच्या चौकटी कापून त्या छोट्या करून लावल्या तर चालतील का ? तुम्हाला देतांना ते परत जोडून देऊ. यासाठी व्यावसायिकांनी मान्यता दर्शवली.

बांधकाम व्यावसायिकांकडून घेतलेले मोठेमोठे सांगाडे साधकांनी घासून स्वच्छ केले. ज्यांच्याकडून धातूच्या चौकटी घेतल्या होत्या, त्यावर तैलरंगाने (ऑइलपेंटने) त्यांची नावे लिहिली, जेणेकरून ३ मास (महिने) ते नाव जाणार नाही. अशा प्रकारे एकही पैसा व्यय न करता धातूच्या सर्व चौकटी बनवून झाल्या आणि संतांचे १०० टक्के आज्ञापालनही करता आले.

भिंती रंगवण्यासाठी लागणारा रंग व्यापार्‍यांकडून अर्पण म्हणून घेण्यात आला. साधकांनी स्वतः साधना म्हणून त्या भिंती रंगवल्या. त्यामुळे प्रसारही मोठ्या प्रमाणात झाला.

५ अ ३ इ. प्रसार झाल्यावर बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्या चौकटी परत करणे आणि तुमच्या गुरुदेवांनी तुम्हाला चांगले घडवले आहे, असे सांगतांना त्यांच्या डोळ्यांतून पाणी येणे : सर्व प्रसार झाल्यानंतर त्या व्यावसायिकांना त्यांच्या होत्या तशा चौकटी परत बनवून दिल्या. ते म्हणाले, आमचे लोखंड गंजले होते. ते तुम्ही चांगले केले. आम्ही घाणेरडे दिले; पण तुम्ही आम्हाला चांगले दिले. शून्यातून चांगले उभे केले. तुमच्या गुरुदेवांनी तुम्हाला चांगले घडवले आहे. हे सर्व पाहून काही व्यावसायिकांच्या डोळ्यांत पाणी आले.

– (पू.) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.११.२०१५)

 

नाशिकला असतांना पू. स्वातीताईंनी केलेली व्यष्टी आणि समष्टी साधना

सेवेतील व्यस्ततेमुळे त्यांना दिवसभर बसायलाही मिळत नसे. दुपारचे जेवणही दुपारी २ – ३ वाजता व्हायचे. त्यांच्या उत्तरदायित्वात येत असलेल्या जिल्हासेवकांकडून संपर्क यायचे. तेव्हा त्या त्या जिल्ह्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रतिदिन काही वेळ त्यांना द्यावा लागे. असे करत झोपायला रात्री २ – २.३० वाजायचे.

पू. ताई जेव्हा साधकांसमवेत प्रवास करत, तेव्हा एकमेकांना प्रार्थनेची आठवण करून देणे, अत्तर आणि कापूर यांचे उपाय करणे, गाडीतून प्रवास करतांना प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावणे, असे प्रयत्न करत.

अ. सेवेतील व्यस्ततेमुळे उपाय करायला वेळ
न मिळाल्याने नामजप करवून घेण्यासाठी कृष्णाला प्रार्थना करणे

सेवेतील व्यस्ततेमुळे त्यांना आध्यात्मिक उपाय म्हणून नामजप करण्यासाठी वेगळा वेळही मिळत नसे. तेव्हा त्या श्रीकृष्णाला प्रार्थना करायच्या, तूच या देहाकडून नामजप करवून घे. त्यामुळे त्यांना आतून नामजप चालू आहे, अशी अनुभूती येऊ लागली. नामाचा विसर पडला, तर श्रीकृष्ण जाणीव करून देत आहे, असेही त्यांना जाणवायचे.

आ. अहं-निर्मूलनासाठी केलेले प्रयत्न

सर्वच जण कौतुक करत होते, तर अहंचा विचार कधी मनात यायचा का ?, याविषयी पू. स्वातीताईंना विचारले असता त्या म्हणाल्या, अहंचा विचार मनात यायचा नाही; परंतु कधी आलाच, तर मी लगेच श्रीकृष्णाला प्रार्थना करायचे, मी दगड आहे. दगडाकडून तुम्हीच काय ते करवून घ्या. जे काही झाले, ते सर्व तुझेच आहे. त्यामुळे मी केले, या विचाराचा स्पर्शच झाला नाही. उलट मी सगळीकडे लक्ष देऊ शकले नाही. श्रीकृष्णाला अपेक्षित असे करू शकत नाही. मी उणे पडते, हाच विचार सतत असे. श्रीकृष्ण करवून घेत आहे, हाच भाव ठेवला. जे काही केले, ते सर्व मी संतांना सांगायचे. काहीच लपवून ठेवायचे नाही.

ध्येयाने प्रेरित असलेल्या पू. स्वातीताईंना
झालेला शारिरीक त्रास आणि त्याविषयीचा त्यांचा भाव

आपल्याला जगभर प्रसार करायचा आहे, या ध्येयाने पू. स्वातीताई एवढ्या प्रेरित झाल्या होत्या की, त्यांचे देहाकडे लक्षच नसेे. त्या अखंड सेवारत असत. त्यांच्याकडून आर्ततेने होणार्‍या प्रार्थनेमुळे आणि तीव्र तळमळीमुळे देवाने त्यांची देहबुद्धी अल्प करून त्यांच्या देहाची काळजी घेतली.

अ. पू. स्वातीताईंना कंबरदुखी, अंगदुखी आणि डोकेदुखी यांसारखे त्रास व्हायचे. कधी कधी हात-पाय एवढे दुखायचे की, त्यांना चालताही येत नसे. शारीरिक त्रासांमुळे त्यांना त्या कालावधीत केवळ ताक पिऊन रहावे लागत होते. बाहेर संपर्काला जातांनाही त्या बाटलीतून ताक घेऊन जात. त्यांची दिवसभर पुष्कळ धावपळ होत असे.

आ. रात्री झोपतांना जेव्हा अंग पुष्कळ दुखायचे, तेव्हा त्या संतांनी दिलेले वेदनाशामक मलम लावायच्या आणि वेदनाशामक फवार्‍याचा वापर करायच्या.

इ. सकाळी उठल्यावरही स्थिती तशीच असे. तेव्हा त्या भगवंताला प्रार्थना करायच्या, हा देह तुझ्या चरणी अर्पण केला आहे. या देहाचे बरे-वाईट करणे तुझ्याच हातात आहे. तूच ठरव, या देहाकडून काय करून घ्यायचे ते ! तुला अपेक्षित अशी सेवा तूच माझ्याकडून करवून घे.

ई. एक संत त्यांना म्हणायचे, तू सेवा करत रहा. बाकी देव पाहील. ते त्यांना पुष्कळ प्रोत्साहन देत. ते त्यांना अधून-मधून चैतन्यमय प्रसाद पाठवत. त्यामुळे त्यांना अशा स्थितीतही झोकून देऊन सेवा करणे जमत राहिले.

उ. सकाळी स्नान करतांनाही त्या जलदेवतेला प्रार्थना करत, तुझ्या तीर्थाने स्नान करत आहे. माझ्या व्याधी बर्‍या होऊ दे. माझ्या शरिरातील सर्व रज-तमात्मक त्रासदायक शक्ती नष्ट होऊ दे आणि सेवेत शरिराचा कोणताही अडथळा येऊ देऊ नकोस.

 

पू. ताईंनी भावजागृतीसाठी केलेले प्रयत्न

अ. श्रीकृष्ण सतत आपल्यासमवेत आहे आणि तोच आपल्याकडून सेवा करवून घेत आहे, असा भाव सततच ठेवला.

आ. या कालावधीत त्यांनी प्रार्थनेवर अधिक भर दिला. त्या श्रीकृष्णाला सेवेच्या माध्यमातून साधना होऊ दे. तुम्हीच नामजप करवून घ्या, अशी प्रार्थना करत.

इ. थोड्या थोड्या वेळाने श्रीकृष्णाच्या खोलीत जाणे, प्रार्थना करणे, त्याच्या चरणांवर डोके ठेवणे, असे प्रयत्न त्या करायच्या. तो आपल्या मस्तकावर हात ठेवून आपल्याला आशीर्वाद देत आहे, आपल्याला प्रसाद देत आहे, असा त्यांनी भाव ठेवला.

ई. जेव्हा निर्णय घेण्याविषयी द्विधा मनस्थिती होत असे, तेव्हा त्या श्रीकृष्णाला आर्ततेने प्रार्थना करत. त्या वेळी तो जसे सुचवतील, तसे करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.