कान पकडून उठाबशा काढल्याने होणारे लाभ

अनेकदा आपली एखादी चूक झाली की, आपण म्हणतो, ‘माझे चुकले. कान पकडतो !’ काही जण तर शब्दशः कानाला हात लावतात. याला अनेक धार्मिक, पारंपरिक आणि अन्य कारणे आहेत. सहस्रो वर्षांपूर्वीपासून आपले वेद, ग्रंथ, ज्ञान यांचे जतन, हे मौखिक परंपरेने, म्हणजे ‘गुरूंनी सांगणे आणि शिष्यांनी ते ऐकून पाठ करणे’, अशा प्रकारे केले गेले. मेंदूमध्ये ज्ञान साठवतांना आपण जे पाहिले, स्पर्शिले, गंध घेतला, ते थेट नोंदवले जाते. सहस्रो वर्षे, सहस्रो ज्ञानी माणसांनी याच मार्गाने सर्व अनुभवून त्याचे विश्लेषण त्यांनी रचून ठेवलेल्या ऋचा किंवा श्लोक यामध्ये केले. ते सर्व केवळ ऐकून आपल्या मेंदूमध्ये साठवण्याची क्रिया सहस्रो वर्षे चालू आहे. गद्य लिखाण पाठ करणे, हे तुलनेने जरा कठीण असते; पण पद्य मात्र लवकर पाठ होते. त्यामुळे आपले सर्व ज्ञान हे ऋचाबद्ध, श्लोकबद्ध आहे. साहजिकच त्यासमवेत संगीतही सहज विकसित होत गेले. या पार्श्वभूमीवर या प्रथेची आपण विविध कारणे पाहूया !

१. हिंदु धर्माने दोन्ही कान पकडण्याचे जाणलेले महत्त्व

P_Mukul_Gadgil
पू. डॉ. मुकुल गाडगीळ

१ अ. पूर्वी शाळेत गुरुजी विद्यार्थ्याचे काही चुकले,
तर त्याला शिक्षा म्हणून दोन्ही कान पकडून १० उठाबशा
काढायला लावत असणे आणि ती शिक्षा विद्यार्थ्याला
अंतर्मुख करण्यासाठी आध्यात्मिकदृष्ट्या योग्य असणे

एखादी चूक झाल्यावर क्षमा मागायची असल्यास सनातनमध्ये आपण दोन्ही कान पकडून (डाव्या हाताने उजवा कान आणि उजव्या हाताने डावा कान पकडून) क्षमा मागतो, हे साधकांना ठाऊकच आहे. पूर्वी शाळेत गुरुजी विद्यार्थ्याचे काही चुकले, तर त्याला शिक्षा म्हणून दोन्ही कान पकडून १० उठाबशा काढायला लावत. उठाबशा काढणे म्हणजे गुडघ्यातून खाली वाकून बसणे आणि पुन्हा उभे रहाणे. आजकाल अशी शिक्षा कोणी करत नाही. खरेतर एखाद्याला चुकीची जाणीव व्हावी; म्हणून अंतर्मुख करण्यासाठी ही शिक्षा आध्यात्मिकदृष्ट्या योग्य होती. दोन्ही कान पकडल्याने सुषुम्नानाडी चालू होते, म्हणजे दोन्ही नाकपुड्यांनी श्‍वासोच्छ्वास चालू होतो. सुषुम्नानाडी ही आध्यात्मिक स्तराची नाडी आहे. या नाडीने अंतर्मुखता प्राप्त होत असल्याने एखादी चूक झाल्यास क्षमा मागतांना दोन्ही कान पकडण्याचे महत्त्व आहे.

१ आ. गुरूंना अभिवादन करण्याची
आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याची ही एक पद्धत असणे

उपनयन संस्कारामध्ये बटू गायत्री मंत्राचा उपदेश करणार्‍या आपल्या वडिलांना, म्हणजे पहिल्या गुरूंना अभिवादन (नमन) करतांना येथे सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे दोन्ही कान पकडून नमस्कार करतो. वडीलधार्‍यांना अभिवादन करण्याची आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याची ही एक पद्धत आहे. संगीतामध्येही आपल्या गुरूंचा उल्लेख करतांना कान पकडून आणि त्यांना मनोमन स्मरूनच त्यांचा उल्लेख करतात.

अशा प्रकारे हिंदु धर्माने कान पकडण्याच्या कृतीचे महत्त्व जाणून कृतीत आणले आहे.

 

२. कान धरून उठाबशा काढल्याने होणार्‍या
प्रक्रियेचे पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केलेले विवेचन

कान धरून उठाबशा काढल्याने नेमके काय होते, असे पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांना विचारले असता त्यांनी सांगितले, उठाबशा काढण्यासाठी आपण गुडघ्यांतून खाली बसून पुन्हा उभे रहातो, तेव्हा आपल्या शरिरातील मणके आणि पायांतील सर्व सांधे यांची हालचाल होते. या हालचालीमुळे शरिरातील ऊर्जा कार्यरत होते. कान पकडल्याने कार्यरत झालेल्या सुषुम्नानाडीमुळे जी उच्च स्तराची ऊर्जा निर्माण होते, ती या हालचालीमुळे सर्व सांध्यांपर्यंत अन् शरीरभर पोचते आणि तेथे जर काही त्रासदायक शक्ती असेल, तर ती दूर होते. थोडक्यात कान पकडून उठाबशा काढल्याने शरीर आणि मन यांना ऊर्जा मिळते.

 

३. कान धरून उठाबशा काढल्याने
होणार्‍या लाभांविषयी विज्ञानाने केलेले संशोधन

डाव्या हाताने उजव्या कानाची पाळी आणि उजव्या हाताने डाव्या कानाची पाळी पकडून प्रतिदिन न्यूनतम (कमीतकमी) ७ आणि अधिकाधिक १४ उठाबशा काढणे, याला विदेशात सुपरब्रेन योगासन, म्हणजे बुद्धीची क्षमता वाढवणारे योगासन, असे म्हणतात. हातांनी कान पकडतांना हातांचे अंगठे पुढच्या बाजूला येतील, अशा तर्‍हेने कान पकडावेत. (कानाच्या पाळीचा पुढचा भाग सगुण आणि मागचा भाग निर्गुण असल्याने कानाच्या सगुण बाजूला अंगठ्याचा स्पर्श होऊन निर्गुण तत्त्व मिळते. कानाच्या निर्गुण बाजूला तर्जनीचा, म्हणजे अंगठ्याच्या मानाने थोडे सगुण तत्त्व असलेल्या बोटाचा स्पर्श झाल्याने सगुण तत्त्व मिळते. म्हणजे सगुणाला निर्गुण तत्त्व आणि निर्गुणाला सगुण तत्त्व मिळाल्याने ऊर्जा गतीने कार्यरत होते. – संकलक) या योगासनामुळे व्यक्तीला पुढील लाभ होतात, असे त्यांनी म्हटले आहे.

अ. व्यक्तीचा उजवा आणि डावा मेंदू कार्यरत होतो अन् कोणत्याही वयोगटातील व्यक्तीची बुद्धी विकसित होते.

आ. अमेरिकेतील आधुनिक वैद्यांनीही अल्प बुद्ध्यांक (लो आय.क्यू.) असलेल्या लहान मुलांवर उपचार करण्यासाठी या योगासनाचा उपयोग केला असून त्यांना अशा मुलांमध्ये सुधारणा झाल्याचे लक्षात आले आहे.

इ. मध्यम वयोगटाच्या, तसेच वयस्कर व्यक्तींमध्ये असलेला विसराळूपणा हा दोष दूर करण्यासाठीही ही योगासनाची पद्धत परिणामकारक असल्याचे दिसून आले आहे.

ई. हे योगासन केल्याने मानसिक तणाव न्यून झाल्याचे काही लोकांनी अनुभवले आहे.

उ. यातून केवळ मेंदूला ऊर्जा मिळून तो कार्यरत होतो, असे नाही, तर व्यक्तीच्या सहस्रार, आज्ञा, विशुद्ध आणि अनाहत या कुंडलिनीचक्रांतील शक्तीही सुरळितपणे प्रवाहित होते, असेही आढळून आले आहे.

प्रतिदिन हे योगासन केल्याने व्यक्ती एकंदर चाणाक्ष आणि मानसिकदृष्ट्या संतुलित बनू शकते.

कानाची पाळी दाबल्यानंतर सर्व शरिरावर उपाय होत असल्याचे भारतीय ऋषीमुनींनी सांगितलेच आहे. तसेच बिंदूदाबन उपचार पद्धतीमध्येही हे दिले आहे.

(संदर्भ – http://www.wikihow.com/Do-Superbrain-Yoga)

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, गोवा. (२१.२.२०१६)