प्रवेशद्वार कोणत्या दिशेला आणि कुठे हवे ?

आधीचा भाग वाचण्यासाठी खालील मार्गिकेवर क्लिक करा !

वास्तुशास्त्र : मनुष्याच्या जीवनातील एक महत्त्वाचा घटक

 

१. ‘प्रांगण प्रवेश’ आणि ‘सिंहद्वार’

आता वास्तूमध्ये (भूमीमध्ये) प्रवेश कुठून करायचा, या भागाचा विचार करायचा आहे. यासाठी आपल्याला इतर सर्व खोल्या आणि सुविधा यांचा विचार करायचा असतो. याविषयी मूळ वास्तूशास्त्रामध्ये काही महत्त्वाचे नियम आहेत.

रिकाम्या जागेला संरक्षण भिंत (कंपाऊंड वॉल) करणे महत्त्वाचे असते. अशा बंदिस्त कंपाऊंडमधून जागेत येण्यासाठी जे प्रवेशद्वार असते, त्याला ‘प्रांगण प्रवेश’ असे म्हणतात. तर भूमीमध्ये घर उभे राहिल्यानंतर त्या घरात प्रवेश करण्यासाठी जे द्वार असते त्याला ‘सिंहद्वार’ (मेन एंट्रन्स) असे म्हणतात.

 

२. प्रवेशद्वार कोणत्या दिशेला आणि कुठे हवे, याविषयी उल्लेख शास्त्रात असणे

भूमीला ‘कंपाऊंड’ करून घेतल्यानंतर मुख्य रस्ता ज्या दिशेला आहे, त्यानुसार प्रांगण प्रवेश कोणत्या दिशेला घ्यायचा, ते निश्चित करावे लागते. सध्या समाजामध्ये प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असल्यास ते अशुभ असते, असा एक समज पसरलेला आहे; परंतु वास्तूशास्त्राच्या कोणत्याही ग्रंथामध्ये दक्षिण दिशेला प्रवेशद्वार अयोग्य असे सांगितलेले नाही; पण प्रवेशद्वार कोणत्या दिशेला आणि कुठे असायला हवे, तसेच दक्षिणेला द्वार घेतांना कोणत्या पदात घ्यावे, हे मात्र स्पष्टपणे सांगितलेले आहे. त्यासह पूर्व आणि उत्तर या दिशा शुभ आहेत; म्हणून त्या दिशांना प्रवेशद्वार कोणत्याही ठिकाणी घेऊन चालत नाही. त्याचीही जागा शास्त्राने निश्चित करून दिली आहे.

 

३. वास्तूच्या कोनात (चार कोपर्‍यातील) द्वार वर्ज्य

वास्तूशास्त्राच्या सर्वच ग्रंथांमध्ये वास्तूच्या कोपर्‍यात द्वार असणे वर्ज्य सांगितलेले आहे.

अ. वर्जयेत् कोणेष्वेव विशेषत: । (संदर्भ : विश्वकर्मप्रकाश, अध्याय ७, श्लोक २०) याचा

अर्थ : कोपर्‍यातील द्वार वर्ज्य करावे.

आ. गृहकुक्षौ कृतं द्वारं सर्वरोगभयङ्करम् । (संदर्भ : समराङ्गणसूत्रधार, अध्याय ३५, श्लोक ५९)

अर्थ : घराच्या कुक्षीला (कोपर्‍यात) द्वार केल्यास सर्वरोग निर्माण करणारे ठरते.

सध्या बर्‍याच ठिकाणी सदनिकांचे प्रवेशद्वार हे कोपर्‍यातच घेतले जाते. बांधकाम व्यावसायिकांना एकाच मजल्यावर दोन-चार सदनिकांचे डिझाईन करायचे असल्याने त्यांच्या दृष्टीने कोपर्‍यातील द्वार हे सोयीचे होते; पण ते करत असतांना ‘मूळ वास्तूशास्त्राचा अभ्यास नसल्याने आपण एक वास्तूदोष निर्माण करत आहोत’, याचे भान त्यांना रहात नाही; मात्र ‘आमच्या सदनिका या वास्तूशास्त्रानुसारच आहेत’, असा प्रचार मात्र सरसकट केला जातो.

 

४. घराच्या मधोमध प्रवेशद्वार निषेध !

वास्तूच्या मधोमध, म्हणजेच ब्रह्ममंडलामध्ये प्रवेशद्वार वास्तूशास्त्रानुसार निषिद्ध आहे. अशा प्रकारचे प्रवेशद्वार बर्‍याच घरांमध्ये असण्याची शक्यता असते. अशा वास्तूंमध्ये पायर्‍या चढून वर गेल्यावर मधोमध प्रवेश घेतला जातो. तोसुद्धा एक प्रकारचा वास्तूदोष आहे.

गृहमध्ये कृतं द्वारं द्रव्यधान्यविनाशनम् ।
अवाहतकलहं शोकं नार्यावासं प्रदूषयेत् ।। – विश्वकर्मप्रकाश, अध्याय ७, श्लोक ७८

अर्थ : घराचे मुख्य प्रवेशद्वार ठिक मध्यभागी असल्यास धनधान्याचा नाश होतो. कारणाविना कलह, शोक, तसेच घरातील स्त्रियांचे मने कलुषित होतात.

वरील पद्धतीने प्रवेशद्वार टाळावे; कारण प्रवेशद्वार हा वास्तूच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे बर्‍याच वास्तूग्रंथांमध्ये प्रवेशद्वाराविषयी स्वतंत्र अध्याय दिलेले आहेत. यातून प्रवेशद्वार निर्दाेष असणे, हे वास्तूशास्त्रकारांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते, असे लक्षात येते.

उत्संङ्गो हीनबाहुश्च पूर्ण बाहुस्तथापर: ।
प्रत्यक्षायश्चतुर्थश्च निवेश: परिकीर्तीत: ।। – ‘समराङ्गणसूत्रधार’, अध्याय ३५, श्लोक ११

अर्थ : उत्सङ्ग, हीनबाहू, पूर्णाबाहू आणि प्रत्यक्षाय हे प्रवेशाचे ४ प्रकार सांगितले गेले आहेत. या ४ प्रवेशांचे वर्णन आणि त्यांचे फल यांविषयीसुद्धा ग्रंथामध्ये दिलेले आहे.

१. उत्सङ्ग

प्रवेश प्रकार १ : उत्सङ्ग

उत्सङ्ग एकदिक्भ्यां द्वाराभ्यां वास्तुवेश्मनो: ।
स सौभाग्यप्रजावृद्धि धनधान्यजयप्रद: ।। – ‘समराङ्गणसूत्रधार’, अध्याय ३५, श्लोक १२

अर्थ : ज्या भूमीचे आणि वास्तूचे द्वार एकाच दिशेला असते, त्याला ‘उत्सङ्ग’ असे म्हणतात. असे द्वार सौभाग्य, प्रजा यांची वृद्धी करणारे, धनधान्य आणि जय प्राप्त करून देणारे असते.

२. हीनबाहू

प्रवेश प्रकार २ : हीनबाहू

यत्र प्रवेशतो वास्तु गृहम् भवति वामत: ।
तद्हीनबाहुकं वास्तु निन्दित वास्तुचिन्तकै : ।। – ‘समराङ्गणसूत्रधार’, अध्याय ३५, श्लोक १३

अर्थ : ज्या ठिकाणी जागेमध्ये प्रवेश केल्यावर घराचा प्रवेश डाव्या बाजूला असतो, त्याला ‘हीनबाहू वास्तू’ असे म्हणतात. याची सर्वच वास्तूशास्त्रकारांनी निंदा केली आहे. त्यामुळे या पद्धतीचा वास्तूप्रवेश टाळावा. या प्रवेशाचे खालील श्लोकाच्या माध्यमातून परिणाम सांगितले आहे.

तस्मिन् वसन्नल्पवित्त: स्वल्पमित्रोऽल्पबान्धव: ।
स्त्रीजितश्च भवेन्नित्यं विविधव्याधिपीडित: ।। – ‘समराङ्गणसूत्रधार’, अध्याय ३५, श्लोक १४

अर्थ : या वास्तूत रहाणार्‍याला अल्प पैसा, अल्प मित्र आणि बांधव असतात, तसेच तो स्त्रियांना वश होणारा आणि विविध रोगांमुळे पीडित असतो.

३. पूर्णबाहू

प्रवेश प्रकार ३ : पूर्णबाहू

वास्तुप्रवेशतो यत् तु गृहं दक्षिणतो भवेत् ।
प्रदक्षिणप्रवेशत्वात् तद् विद्यात् पूर्णबाहुकम् ।। – ‘समराङ्गणसूत्रधार’, अध्याय ३५, श्लोक १५

अर्थ : ज्या जागेत प्रवेश केल्यावर घराचा प्रवेश दक्षिण, म्हणजे उजव्या बाजूला येतो, त्याला ‘पूर्णबाहू’ असे म्हणतात. हा वास्तूप्रवेश वास्तूशास्त्रकारांनी उत्तम सांगितला आहे. याचे लाभ पुढील श्लोकात सांगितले आहेत.

तत्र पुत्रांश्च पौत्रांश्च धनधान्यसुखानि च ।
प्राप्नुवन्ति नरा नित्यं वसन्तो वास्तुनि ध्रुवम् ।। – ‘समराङ्गणसूत्रधार’, अध्याय ३५, श्लोक १६

अर्थ : पूर्णबाहू वास्तूमध्ये रहाणार्‍या व्यक्तीला पुत्र-पौत्र, धनधान्य इत्यादी गोष्टी प्राप्त होतात अन् चिरकाल त्या वास्तूत तो निवास करतो.

४. प्रत्यक्षाय

प्रवेश प्रकार ४ : प्रत्यक्षाय

गृहपृष्ठं समाश्रित्य वास्तुद्वारं यदा भवेत् ।
प्रत्यक्षायस्त्वसौ निन्द्यो वामावर्तप्रवेशवत् ।। – ‘समराङ्गणसूत्रधार’, अध्याय ३५, श्लोक १७

अर्थ : ज्या घराच्या पाठच्या बाजूने जागेत प्रवेश करणारे द्वार असेल, तर त्याला ‘प्रत्यक्षाय’ असे म्हणतात. हा प्रवेशसुद्धा वास्तूशास्त्रानुसार निंद्य सांगितला आहे. याचे परिणाम हे ‘हीनबाहू’ प्रवेशाप्रमाणेच वास्तूमालकाला अनुभवायला मिळतात.

साधारण आपल्याला वरील माहितीवरून लक्षात येईल की, जागेमध्ये प्रवेश केल्यावर कधीही डाव्या हाताला घराचा प्रवेश घेऊ नये, तसेच घराच्या पाठीमागून अंगणात प्रवेश करण्याचे द्वार नसावे. त्यामुळे वरील नियमांप्रमाणे सारासार विचार करून प्रवेशद्वार निश्चित करणे आवश्यक आहे.

(संदर्भ ग्रंथ : विश्वकर्मप्रकाश, समराङ्गणसूत्रधार)

 

५. ‘मत्स्यपुराणा’नुसार वेधाचे प्रकार आणि त्याचे परिणाम

‘मत्स्यपुराणा’नुसार वेधाचे पुढील प्रकार आणि त्याचे परिणाम सांगितले आहेत.

तथा वास्तुषु सर्वत्र वेधं द्वारस्य वर्जयेत् ।
द्वारे तु रथ्यया विद्धे भवेत् सर्वकुलक्षय: ।।

तरुणा द्वेष बाहुल्यं शोक: पङ्केन जायते ।
अपस्मारो भवेन्नूनं कूपवेधेन सर्वदा ।।

व्यथा प्रस्रवणेन स्यात् कीलेनाग्निभयं भवेत् ।
विनाशो देवताविद्धे स्तम्भेन स्वीकृतो भवेत् ।।

गृहभर्तुविनाश: स्याद् गृहेण च गृहे कृते ।
अमेध्यावस्करैर्विद्धे गृहिणी बन्धकी भवेत् ।।

तथा शस्त्रभयं विन्द्यादन्त्यजस्य गृहेण तु ।
उच्छ्रायाद् द्विगुणां भूमिं त्यक्त्वा वेधो न जायते ।। – मत्स्यपुराण, अध्याय २५५, श्लोक १० ते १४

अर्थ : सर्व प्रकारच्या वास्तूमध्ये द्वार वेध वर्ज्य करावा. दारासमोर गल्ली, बोळ, रस्ता यांमुळे वेध होत असल्यास कुलक्षय होतो. वृक्षामुळे वेध होत असल्यास द्वेष वाढतो. चिखलामुळे वेध झाल्यास शोक प्राप्त होतो. विहिरीचा वेध झाल्यास घराच्या स्वामीला अपस्मार (फेफरे) नावाचा रोग होतो. कील, खिळा किंवा खुंटी यांमुळे वेध झाल्यास अग्नीभय संभवते. देवतांचा वेध झाल्यास म्हणजेच दारासमोर मंदिर आल्यास विनाश संभवतो. अपवित्र द्रव्यांमुळे वेध झाल्यास स्त्री वंध्या होते. अंत्यजाच्या घराचा वेध झाल्यास शस्त्रभय संभवते.

सरलेन च मार्गेण प्रवेशो यत्र वेश्मनि ।
मार्गवेधं विजानीयान्नाशोकफलप्रदम् ।। – विश्वकर्मप्रकाश, अध्याय ७, श्लोक ७३

अर्थ : एखाद्या घरात सरळ मार्गाने प्रवेश केला जातो (सार्वजनिक रस्ता समोरून आपल्या मुख्य द्वारापर्यंत येत असल्यास), तेव्हा मार्गवेध होतो. हा वेध शोककारी होतो.

तरुवेधं विजानीयाद्यदि द्वारमुखे स्थितम् ।
कुमारमरणं ज्ञेयं नानारोगश्च जायते ।। – विश्वकर्मप्रकाश, अध्याय ७, श्लोक ७४

अर्थ : दरवाजाच्या समोरच वृक्ष असल्यास त्याला ‘तरुवेध’ असे म्हणतात. त्यामुळे कुमारवयाची मुले दगावण्याची शक्यता असते, तसेच घर रोगग्रस्त होते. घरातील लोकांना अपस्मार (फेफरे) हा रोग जडतो.

जलस्रावस्तथा द्वारे मूलेऽनर्थंच यो भवेत् ।
द्वाराग्रे देवसदनं बालानामार्तिदायकम् ।। – विश्वकर्मप्रकाश, अध्याय ७, श्लोक ७६

अर्थ : घराच्या दरवाजासमोरून पाणी वहात असेल, तर त्यामुळे अनर्थकारी घटना घडतात. दरवाजासमोर देवालय असल्यास लहान मुलांना आजारपण येते.

श्मशानाभिमुखे गेहे राक्षसाद् भयमादिशेत् । – विश्वकर्मप्रकाश, अध्याय ७, श्लोक ८१ (अर्थ : घराचे मुख्यद्वार हे स्मशानाभिमुख असल्यास राक्षसांचे भय असते.)

घराच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरापेक्षा अधिक अंतरावर असलेल्या वेधामुळे त्या वेधाचा दोष संभवत नाही.

याप्रमाणे सर्वच वास्तूग्रंथांमध्ये द्वारवेध अवश्य टाळावा, याविषयी उल्लेख आलेला आहे. एकंदर मुख्य प्रवेशद्वारासमोर खांब, खड्डा, चिखल, खुंटी, मोठा पाषाण, वृक्ष, समोरून येणारा मुख्य रस्ता, मंदिर, विहीर इत्यादी गोष्टी नसाव्यात. त्याने द्वाराला वेध निर्माण होऊन त्याचे अशुभ परिणाम वास्तूमालकाला भोगावे लागतात. यासह एका द्वारासमोरच दुसरे द्वार नसावे, म्हणजेच घराची द्वारे ही एका रांगेत नसावीत. त्याला ‘भिन्नदेही वास्तू’ म्हणतात.

त्याचप्रमाणे सेफ्टी डोअर करतांना मुख्य द्वारापेक्षा मोठे किंवा अरुंद करू नये अथवा मुख्य प्रवेशद्वारापेक्षा त्याला अधिक सजवू नये. तसे झाले, तर ते संकटकारक ठरते. यामध्ये वेधाचे परिणाम वास्तूशास्त्राच्या ग्रंथांनुसार वेगळे असले, तरी सर्व शास्त्रकारकांचे द्वारवेध असणे, हे दोषकारक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे वास्तू बांधतांना वरील प्रकारचे वास्तूवेध अवश्य टाळावेत.

(संदर्भ ग्रंथ : ‘विश्वकर्मप्रकाश’, ‘मत्स्यपुराण’, ‘समराङ्गणसूत्रधार’)

१. द्वाराचे स्थान

‘मयमतम्’ या वास्तूशास्त्राच्या ग्रंथानुसार चारही दिशांना द्वार घेऊन चालते; परंतु ते ‘आपण घराच्या मध्यभागी उभे राहिल्यास मध्यरेषेच्या डाव्या बाजूच्या दोन पदांमध्ये घ्यावे’, असे सांगितले आहे. ही स्थाने द्वारासाठी योग्य आहेत. बाहेरून घरात प्रवेश करतांना हाच भाग मध्यरेषेच्या उजव्या बाजूला येतो.

वासगेहानि सर्वेषां प्रविशेद् दक्षिणेन तु ।
द्वाराणि तु प्रवक्ष्यामि प्रशस्तानीह यानि तु ।।

पूर्वेणेन्द्रं जयन्तं च द्वारं सर्वत्र शस्यते ।
याम्यं च वितथं चैव दक्षिणेन विदुर्बुधा: ।।

पश्चिमे पुष्पदन्तं च वारुणं च प्रशस्यते ।
उत्तरेण तु भल्लाटं सौम्यं तु शुभदं भवेत् ।। – मत्स्यपुराण, अध्याय २५५, श्लोक ७ ते ९

अर्थ : सर्वांच्याच घरात बाहेरून उजव्या बाजूने प्रवेश करावा. पूर्वेकडचे ‘महेंद्र’ आणि ‘जयंत’ या पदावर बांधलेले द्वार प्रशस्त मानले आहे. बुद्धीमान लोक दक्षिण दिशेला याम्य आणि वितथ पदावर द्वार नियोजन करतात. पश्चिमेला द्वार पुष्पदंत आणि वरुण पदामध्ये प्रशस्त आहे अन् उत्तर दिशेला भल्लाट, तसेच सोम या पदांमध्ये द्वार शुभदायक आहे.

यानुसार आपल्याला लक्षात येते की, घराला मुख्य प्रवेशद्वार हे चारही दिशांना चालते; परंतु घराच्या मध्यभागातून पाहिल्यास मध्यरेषेच्या डाव्या बाजूला असायला हवे.

२.  दरवाजा चौकटीवर कुठे बसवावा ?

पूर्वी घराच्या भिंती या भरपूर जाड असायच्या. ३ ते ४ फुटांपर्यंत रुंदी असायच्या, तेव्हा नेमके भिंतीच्या रुंदीच्या ठिकाणी द्वाराची चौकट आणि द्वार कुठे असावे, याविषयीही शास्त्रकारांनी सांगितले आहे. एकूण भिंतीच्या रुंदीचे समान १२ भाग करावे. त्यापैकी बाहेरील बाजूस ५ आणि आतील बाजूस ७ असे भाग करणारी जी रेषा असेल, त्यावर चौकटीची मध्य रेषा असावी. उदाहरणार्थ भिंतीची रुंदी ४ फूट आहे, तर त्याचे समान १२ भाग म्हणजे ४/१२ = ०.३३ फूट. त्यापैकी बाहेरील बाजूस ५ भाग सोडायचे, म्हणजे ०.३३ गुणिले (X) ५ = १.६५ फूट. एवढी जागा बाहेरील बाजूस सोडून रेषा मारावी. त्या रेषेवर मध्यभागी द्वाराची चौकट बसवावी. सध्या भिंतीची रुंदी एवढी नसते; परंतु आपण १ ते २ फूट भिंतींमध्येसुद्धा याचा विचार करू शकतो.

३. मुख्य प्रवेशासाठी एक द्वार कि दोन द्वारे ?

मुख्य प्रवेशासाठी एक द्वार घ्यावे कि दोन ? असा प्रश्न बर्‍याच जणांना पडतो. त्याविषयी आपल्या शास्त्रात सांगितले आहे.

कवाटबहलं प्रोक्तं देवद्विजमहीभृताम् ।।
द्विकवाटविशेषेण एक एव प्रकीर्तित: ।
सामन्तप्रमुखादीनां द्वीकवाटं प्रशस्यते ।। – मयमतम्, अध्याय ३०, श्लोक १३,१४

अर्थ : कोणत्याही मजल्यावरील दाराच्या नियोजनासाठी त्या मजल्याच्या उंचीनुसार जे दार असेल, त्यास एकच कवाड ठेवता येईल; परंतु देऊळ, ब्राह्मण आणि क्षत्रिय यांसाठी २ कवाडांचे दार असावे. सामंत (प्रशासकीय अधिकारी) आणि प्रमुख यांच्यासाठी २ कवाडे प्रशस्त समजावीत.

दारासाठी २ कवाडे असतात, तेव्हा त्यापैकी डाव्या बाजूचे मोठे आणि दुसरे लहान असावे. मोठ्या कवाडास मातृ कवाड, तर लहान कवाडास पुत्रिका कवाड, अशी संज्ञा आहे.

४. द्वाराच्या आकारानुसार त्याचे फल

अ. चौकोन : लाभकारक

आ. त्रिकोण : स्त्रियांना पीडा

इ. शकटाकार : स्वामी मृत्यू

ई. सूपाकार : गृह कलह

उ. वर्तुळाकार : कन्या वृद्धी

ऊ. मध्यभागी कमी असणारे : शोकप्राप्ती

५. द्वाराविषयी अन्य नियम

अ. बृहत्संहितेनुसार मुख्य प्रवेशद्वार हे घरातील अन्य द्वारांसमान नसावे. ते इतर द्वारांपेक्षा मोठे असावे.

आ. मुख्य प्रवेशद्वारावर कलश, श्रीफळ, पाने, वेली इत्यादी मंगल चिन्हे असावीत.

इ. आवाज करत बंद होणारा दरवाजा कधीही नसावा. तो भयकारक असून गर्भपात करणारा असतो.

ई. सध्या बर्‍याच सदनिकांमध्ये बैठक कक्षामध्ये ‘ओपन गॅलरी’ (खुली गच्ची) ठेवली जाते, त्याचे द्वारही सदनिकेत प्रवेश करणार्‍या द्वारापेक्षा मोठे असते. त्यामुळे शास्त्रात सांगितलेल्या नियमानुसार ते सिंहद्वार म्हणून गणले जाते. परिणामी त्याचे फल यजमानाला भोगावे लागते. आपण विचार करत असतो की, आपले प्रवेशद्वार पूर्वेला आहे; परंतु ‘ओपन गॅलरी’चे द्वार हे आकाराने सर्वांत मोठे असल्याने त्याच्या दृष्टीने फल विचारात घ्यावे लागते. त्यामुळे घरामध्ये मुख्य प्रवेशद्वारापेक्षा मोठे अन्य द्वार असू नये.

(संदर्भ ग्रंथ : ‘विश्वकर्मप्रकाश’, ‘मयमतम्’, ‘मत्स्यपुराण’, ‘बृहत्संहिता’)

– श्री. श्रेयस पिसोळकर (वास्तूविशारद, ज्योतिष होराभूषण, होरारत्न), फोंडा, गोवा.

पुढील भाग वाचण्यासाठी खालील मार्गिकेवर क्लिक करा !

वास्तूशास्त्रानुसार अंतर्गत रचना : आलिंद (व्हरांडा), वाहनतळ, तिजोरी, तळघर आणि चित्रकर्म