वास्तुशास्त्र : मनुष्याच्या जीवनातील एक महत्त्वाचा घटक

वास्तूविषयी मनात अनेक प्रश्न, शंका आणि अपसमज असतात. ‘लोकांचे शंका-समाधान व्हावे’, या उद्देशाने हे लेख प्रसारित केले आहेत. वास्तूविषयी जाणून घेऊन आपण ज्या वास्तूत रहातो, तिच्याप्रती कृतज्ञताभाव मनात ठेवून सदा धर्माचरण केल्यास आणि साधनारत राहिल्यास वास्तुदेवता आपले निश्चितच मंगल करणार आहे.

‘याविषयी अधिक माहिती किंवा वैयक्तिक प्रश्न असल्यास आपल्या भागातील वास्तू तज्ञांचा सल्ला घ्यावा’ ही विनंती !

 

भगवान विश्‍वकर्मा यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये प्रथम गृह म्हणजे घराविषयी सांगितले आहे.

आब्रह्मभुवनाल्लोका गृहस्थाश्रममाश्रिताः।
यतस्तस्मात् गृहारम्भप्रवेशसमयं ह्यहम्॥ – विश्‍वकर्मप्रकाश, अध्याय १, श्‍लोक २

अर्थ : या ब्रह्मलोकात जेवढे जीव आहेत, ते सगळे गृहस्थाश्रमाच्या आधारे आपले जीवन जगतात. त्यामुळे त्या गृहात रहाणार्‍यांसाठी गृहनिर्माणाविषयी आणि त्याच्या प्रवेशाविषयी मी सांगतो.

 

१. वास्तूची शुभाशुभता मनुष्याच्या जीवनावर दूरगामी परिणाम करत असणे

या विश्‍वामध्ये प्रत्येक जीव गृहाचा आश्रय घेऊन रहात असतो. अगदी पशू-पक्ष्यांपासून मानवापर्यंत सर्वच घराचा आश्रय घेऊन जीवन व्यतीत करतात; म्हणून आपल्या जीवनामध्ये गृहाचा, म्हणजेच वास्तूचा मोठा सहभाग असतो. त्याची शुभाशुभता ही मनुष्याच्या जीवनावर दूरगामी परिणाम करत असते; म्हणून आपल्या शास्त्रामध्ये याचा सखोल अभ्यास केलेला आहे.

 

२. वास्तू म्हणजे काय ? आणि तिची व्याप्ती

अ. वसन्ति प्राणिनो यत्र तद् वास्तु ।

अर्थ : ज्या ठिकाणी प्राणी निवास करतात, त्याला वास्तू म्हणतात.

आ. अमर्त्याश्‍चैव मर्त्याश्‍च यत्र यत्र वसन्ति हि । – मयमतम्, अध्याय २, श्‍लोक १

अर्थ : मर्त्य आणि अमर असे लोक ज्या ठिकाणी वास करतात, त्याला ‘वास्तू’ असे म्हणतात. मयाने सर्व मर्त्य प्राण्यांसमवेत अमर्त्य अशा देवादिकांचाही यामध्ये विचार केलेला आहे.

इ. . भूरेव मुख्यं वास्तु तत्र जातानि यानिहि ।
प्रासादादीनि वस्तूनि वस्तुत्वात् वास्तुसंश्रयात् ॥ – समराङणसूत्रधार

अर्थ : भूमी (पृथ्वी) हीच खरी वास्तू आहे, पृथ्वीवर उत्पन्न होणार्‍या जिवांच्या आश्रयासाठी जे प्रासाद वगैरे निर्माण केले जातात, त्यांनासुद्धा ‘वास्तू’ असेच म्हणतात.

वरील व्याख्यांचा अभ्यास केल्यावर आपल्याला लक्षात येते की, भूमीवर आश्रयासाठी उभारलेल्या प्रासादादी रचनेसह निवासासाठी निवडलेल्या आणि चारही बाजूंनी बंदिस्त केलेल्या मोकळ्या भूमीलासुद्धा ‘वास्तू’ म्हणतात. यासाठीच भूमीच्या शुभाशुभतेचा अभ्यास आणि भूमी परीक्षण यांवर वास्तूशास्त्रकारांनी अधिक भर दिलेला दिसतो. रहाण्यासाठी निवडलेली भूमी जिला चारही बाजूंनी बंदिस्त केले आहे, तीसुद्धा वास्तूच आहे. यालाच आपल्या शास्त्रामध्ये ‘दिग्बंधन’ असे म्हटले आहे. प्रासाद, भवन, धाम, गृह, सदन, विमान, अगार, वेश्म, स्थान, पद, हर्म्य, निलय, आस्पद, वास, आलय, दम, क्षेत्र, उद्वासित, गेह, सौध, आयतन, मंदिर, पुरी, कुटी असे अनेक शब्द ‘वास्तू’ या शब्दाचे प्रतिनिधित्व करतात.

 

३. वास्तूशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांचा समतोल !

वास्तूशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. त्यामुळे वास्तूशास्त्राचे मूळ नियम वापरतांना सामाजिक परिस्थिती, परंपरा आदींचा विचार करावा लागतो. स्वतःचे जीवन सुखी व्हावे, यासाठी आपण प्रयत्नरत असतो; पण बर्‍याच वेळा प्रारब्ध, संचित यांमुळे लाभामध्ये आपल्याला न्यूनता दिसून येते. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याला त्याची कल्पना आल्यास वास्तूशास्त्रानुसार त्यामध्ये काही प्रमाणात सुधारणा करता येते.

 

४. वास्तूशास्त्राची उपयुक्तता !

अ. वास्तूशास्त्राचे नियम पूर्वी ऋषिमुनींनी त्यांचे सामर्थ्य, अभ्यास आणि दीर्घ अनुभव यांतून सिद्ध केले आहेत. त्यामुळे त्या नियमांना वास्तूनिर्मितीच्या वेळी लागू करून आपण त्यांचा लाभ घेऊ शकतो.

आ. वास्तूशास्त्राचे नियम हे पंचमहाभूते, दिशा, वैश्‍विक ऊर्जा, चुंबकीय ऊर्जा, भूगर्भीय ऊर्जा, विद्युत ऊर्जा यांचा अभ्यास करून सिद्ध केले आहेत; कारण या सर्व ऊर्जांचा परिणाम वास्तूमध्ये रहाणार्‍या व्यक्तींच्या आरोग्यावर होत असतो.

इ. वास्तूशास्त्राचे नियम संपूर्ण विश्‍वामध्ये एकाच पद्धतीने लागू होतात; म्हणून त्यांचा लाभसुद्धा वैश्‍विक स्तरावर मिळत असतो. जे नियम भारतामध्ये लागू होतात, तेच नियम पृथ्वीवरील कोणत्याही भागात लागू आहेत; कारण पंचमहाभूते आणि ऊर्जा संपूर्ण विश्‍वात एकाच पद्धतीने काम करतात.

ई. ज्याप्रमाणे पृथ्वीभोवतीच्या ओझोनच्या आवरणामुळे सूर्याचे त्रासदायक किरण अडवले जाऊन लाभदायक किरणांचा जीवसृष्टीच्या विकासासाठी लाभ होतो, त्याप्रमाणे वास्तूशास्त्रानुसार सर्व ऊर्जांचे योग्य संतुलन करून निर्माण केलेली वास्तू ही त्या वास्तूत रहाणार्‍यांचे रक्षण करते आणि त्यांच्या प्रगतीला लाभदायक ठरते.

उ. वराहमिहीर यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये सांगितले आहे,

वास्तुशास्त्रम् प्रवक्ष्यामि लोकांना हितकाम्यया ।
आरोग्यं पुत्रलाभं च धनं धान्यं लभेन्नर: ॥ – बृहत्संहिता

अर्थ : वास्तूशास्त्र हे मी लोकांच्या हितासाठी सांगतो. याद्वारे आरोग्य, संतती, धन-धान्य इत्यादींचा मनुष्याला लाभ होईल.

याप्रमाणे अभ्यास करून वास्तूनिर्मिती केल्यावर मनुष्याची सर्वांगीण प्रगती साध्य होते. आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यास वास्तूतील असंतुलित ऊर्जेचा नकारात्मक परिणाम मनुष्याच्या शरिरावर होतो. त्यामुळे त्याचे योग्य संतुलन करण्याविषयी अभ्यास वास्तूशास्त्रामध्ये आलेला आहे.

ऊ. वास्तूशास्त्रानुसार केलेले उपाय हे अल्प काळात लाभदायी असतात. त्यांचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.

ए. वास्तूशास्त्रामध्ये श्रीमंत आणि गरीब असा भेद नाही. जो नियम १००० चौरस मीटर जागेसाठी लागू होतो, तोच नियम १०० चौरस मीटरसाठीही लागू होतो. त्यामुळे जागा मोठी असो किंवा छोटी, त्यामध्येसुद्धा आपण शास्त्राचे नियम लागू करून निर्मिती करू शकतो. वास्तूशास्त्रामध्ये प्रत्येकाकडे उपलब्ध असलेला वेळ, पैसा आणि श्रम यांनुसार आपण वास्तूचे उपाय करू शकतो.

ऐ. वास्तूशास्त्राच्या ज्ञानाचा उगम हा जरी हिंदु धर्मामध्ये असला, तरी ते शास्त्र सर्व जाती-धर्माच्या लोकांना लाभदायक आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ (संपूर्ण पृथ्वी कुटुंब आहे.) या उक्तीची प्रचीती आपल्याला वास्तूशास्त्राच्या माध्यमातून घेता येते.

ओ. वास्तूशास्त्राप्रमाणे आपण घरामध्ये पालट केल्यास घरातील मानसिक संघर्ष, वादविवाद, भांडणे इत्यादी न्यून होऊन घरातील सर्वांचे मानसिक आरोग्य सुधारण्यास साहाय्य होते; कारण बर्‍याच वेळा मानसिक विकार किंवा संघर्षाचे कारण हे दूषित वास्तू असते.

औ. कारखाने, दुकाने, कार्यालये इत्यादी व्यावसायिक वास्तूंमध्ये आपण ऊर्जेप्रमाणे योग्य ते पालट करून अधिक लाभ मिळवू शकतो. रुग्णालय आदींची रचना योग्य करून आपण रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्याचा लाभ घेऊ शकतो.

अं. वास्तूशास्त्रामध्ये घराच्या परिसरात कोणत्या दिशेला कोणते वृक्ष लावावेत, याविषयी माहिती असल्याने त्याद्वारे आपण पर्यावरणाचा समतोल राखू शकतो.

क. ज्याप्रमाणे आपण वास्तूशास्त्राचे नियम वापरून वास्तूची निर्मिती करतो, तेच नियम व्यापक स्वरूपातही लागू असल्याने आपण एखाद्या नगराची किंवा राज्याची रचना करतांना वास्तूशास्त्राप्रमाणे विचार केल्यास त्या नगरात किंवा राज्यात रहाणार्‍या व्यक्तींना व्यापक स्तरावर लाभ होऊ शकतो.

ख. आध्यात्मिक स्तरावर विचार केल्यास आणि वास्तूतील ऊर्जेचे योग्य संतुलन केल्यास आणि वास्तूच्या कोणत्या पदामध्ये बसून उपासना करावी; कोणत्या पदामध्ये सत्संग, नियोजन, बैठका आदी घ्याव्यात इत्यादी सूत्रांचा अभ्यास करून रचना केल्यास त्या त्या पदांच्या ऊर्जेचा आपल्याला लाभ मिळून आपण जलद गतीने प्रगती साध्य करू शकतो आणि असंतुलित वास्तूमुळे संघर्षात व्यय होणारी आपल्या साधनेची ऊर्जा वाचवू शकतो.

 

५. वास्तूशास्त्रांचे १८ मार्गदर्शक !

भृगुरत्रिर्वसिष्ठश्च विश्वकर्मा मयस्तथा ।
नारदो नग्नजिच्चैव विशालाक्ष: पुरंदर: ।।

ब्रह्मा कुमारो नन्दीश: शौनको गर्ग एव च ।
वासुदेवोऽनिरुद्धश्च तथा शुक्र बृहस्पति: ।।

अष्टादशैते विख्याता वास्तुशास्त्रोपदेशका: ।
संक्षेपेण उपदिष्टं यन्मनवे मत्स्यरूपिणा ।। – मत्स्यपुराण, अध्याय २५२, श्लोक २ ते ४

अर्थ : भृगू, अत्रि, वसिष्ठ, विश्वकर्मा, मय, नारद, नग्नजित्, विशालाक्ष, इंद्र, ब्रह्मा, कार्तिकेय, नंदीश्वर, शौनक, गर्ग, वासुदेव, अनिरुद्ध, शुक्राचार्य, बृहस्पति हे वास्तूशास्त्रांचे १८ मार्गदर्शक प्रसिद्ध आहेत. त्यातील वैवस्वत मनु यांना प्रलयकालात संक्षेपाने मत्स्यरूपात भगवंताने वास्तूशास्त्राचा उपदेश दिला होता.

 

६. कश्यप ऋषींच्या ‘शिल्प संहिता’ ग्रंथामधील लिखाण !

कश्यप ऋषींनी लिहिलेल्या ‘शिल्प संहिता’ या ग्रंथामध्ये ‘संपूर्ण निसर्गसृष्टी, म्हणजे वास्तू आणि त्यातील साधनांचा उपयोग करून सिद्ध केलेली प्रत्येक वस्तू म्हणजे वास्तू’, असा उल्लेख आलेला आहे. त्यामुळे त्यामध्ये केवळ मनुष्याच्या निवासस्थानाविषयी उल्लेख नसून मोठे दुर्ग, मोठी देवमंदिरे, विजयस्तंभ, नाट्यमंडप, स्पर्धा केंद्र, जनावरांची रहायची जागा, शस्त्रास्त्रनिर्मिती केंद्र, मूर्ती निर्मिती केंद्र, विहिरी या निर्माण होणार्‍या विविध रचना, म्हणजेच वास्तूंविषयीचे वर्णन करण्यात आले आहे. ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ यांसारख्या ग्रंथांमध्येही वास्तूनिर्मितीविषयी उल्लेख आढळतात. कौटिल्यांचे ‘अर्थशास्त्र’, भरताचे ‘नाट्यशास्त्र’ यांमध्येही वास्तूनिर्मितीविषयी माहिती आढळते.

 

७. विविध प्राचीन ग्रंथांमध्ये आलेला वास्तूशास्त्राचा उल्लेख !

७ अ. ऋग्वेद

विश्वातील प्राचीन ग्रंथ असलेल्या ऋग्वेदामध्ये गृहाला ‘वेश्म’ म्हटले गेले आहे.

भोजस्येदं पुष्करिणीव वेश्म परिष्कृतं देवमानेव चित्रम् । – ऋग्वेद, मण्डल १०, सूक्त १०७, ऋचा १०

अर्थ : उदार गृहस्थाचे कमळांनी भरलेल्या सरोवराप्रमाणे सुशोभित गृह हे देवतांना साजेसे असे आहे. या वाक्यामध्ये वास्तूच्या सुशोभिकरणाविषयी उल्लेख आहे.

वास्तोष्पते प्रति जानीह्यस्मान् त्स्वावेशो अनमीवो भवा न: ।
यत्त्वेमहे प्रति तन्नो जुषस्व शं नो भव द्विपदे चतुष्पदे ।। – ऋग्वेद, मण्डल ७, सूक्त ५४, ऋचा १

अर्थ : हे वास्तूचे स्वामी, तुम्ही आम्हाला परिपूर्ण जाणता. या वास्तूमध्ये येऊन सदैव आपला वास असू द्या. आम्हाला आशीर्वाद देऊन सुख-समृद्धी प्रदान करा. आम्ही रोगमुक्त होवो, तसेच द्विपद (मनुष्य) आणि चतुष्पदांना (गायी, गुरे, पाळीव प्राणी) शांती प्रदान करा.

वरील ऋचेमध्ये वास्तोष्पतीला स्वास्थ्यप्रद आणि उन्नतीशील गृहासाठी प्रार्थना केली आहे, तसेच ऋग्वेदाच्या चौथ्या मंडलामध्ये ‘क्षेत्रपती’ या देवतेला घराला धनधान्याने युक्त करण्याविषयी प्रार्थना केलेली आहे.

क्षेत्रस्य पतिना वयं हितेनेव जयामसि ।
गामश्वं पोषयित्न्वा स नो मृळातीदृशे ।। – ऋग्वेद, मण्डल ४, सूक्त ५७, ऋचा १

अर्थ : आम्ही क्षेत्रपतीच्या कृपेने कल्याणकारी मार्गाने विजय मिळवतो. ते क्षेत्र (भूमी) आमच्या गायी-घोड्यांना (संपत्तीला) पोषण देत राहो.

७ आ. अथर्ववेद

यात वास्तूमध्ये वास करणार्‍या अग्नि आणि विष्णु यांना घराला रत्न अन् धनाने युक्त करण्याविषयी प्रार्थना केलेली आहे.

अग्नाविष्णु महि तद्वां महित्वं पाथो घृतस्य गुह्यस्य नाम ।
दमेदमे सप्त रत्ना दधानौ प्रति वां जिव्हा घृतमा चरण्यात् ।। – अथर्ववेद, काण्ड ७, सूक्त २९, ऋचा १

अर्थ : हे अग्नि आणि विष्णु आपल्या दोघांचे मोठे महत्त्व आहे. आपण गुह्य अशा घृताचे पान करून घराघरांमध्ये सप्त रत्न प्रदान करा. त्यायोगे प्रत्येक यज्ञामध्ये आपली जिव्हा त्या ‘घृत’ (तूप) रसाची प्राप्ती करते.

या मंत्रामध्ये गृहाला ‘दम’ हा शब्द वापरण्यात आला आहे. मंत्रातील ‘दमे-दमे’, म्हणजे घराघरांत असा होतो. इंग्रजीच्या ‘Domestic’ या शब्दाचा मूळ संस्कृत शब्द ‘दम’ हा आहे.

७ इ. रामायण

राजा दशरथाच्या वेळी आपल्या राष्ट्र्रात वास्तूशास्त्र हे उंच शिखरावर होते. अयोध्यानगरीची रचना संपूर्ण वास्तूशास्त्रानुसार करण्यात आली होती. त्याचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे.

आयता दश द्वे च योजनानि महापुरी ।
श्रीमती त्रीणि विस्तीर्णा सुविभक्त महापथा ।।

राजमार्गेण महता सुविभक्तेन शोभिता ।
मुक्तपुष्पावकीर्णेण जलसिक्तेन नित्यश: ।।

तां तु राजा दशरथो महाराष्ट्र्र विवर्धन: ।
पुरीमावासयामास दिवि देवपतिर्यथा ।।

कपाटतोरणवतीं सुविभक्तान्तरापणाम् ।
सर्वयन्त्रायुधवतीमुषितां सर्वशिल्पिभि: ।। – रामायण, बालकाण्ड, अध्याय ५, श्लोक ७ ते १०

अर्थ : ही महापुरी (अयोध्या) १२ योजन (६४ मैल, म्हणजे जवळपास ९६ कि.मी.) लांब आणि ३ योजन (१६ मैल, म्हणजे जवळपास २४ कि.मी.) रुंद होती. ज्यामध्ये योग्य पद्धतीने विभक्त केलेले महापथ असणारे राजमार्ग होते. त्यावर प्रतिदिन पाण्याचे प्रोक्षण आणि पुष्पवृष्टी व्हायची. त्या पुरीमध्ये राजा दशरथ इंद्राप्रमाणे रहायचे. त्या पुरीत कपाट, तोरण, सुविभक्त बाजार (वेगवेगळ्या वस्तूंनुसार विभाजन केलेला उदा. कपडे, मसाले, धान्य यांचा वर्गीकृत बाजार) होते, तसेच तेथे सर्व प्रकारचे यंत्र आणि आयुध होते.

राजा दशरथाकडून केल्या जाणार्‍या यज्ञांमध्ये यज्ञीय वास्तूशास्त्र (शुल्बशास्त्र) अनुसार यज्ञशाळा निर्माण केल्याची चर्चा दिसून येते. त्यात २१ खांब, विटा आणि २१ रत्नांचा वापर करण्यात आला होता. यज्ञमंडपाची शोभा वाढवण्यासाठी सुवर्णाने अलंकृत केले होते.

कारिता सर्व एवैते शास्त्रज्ञैर्यज्ञकोविदै: ।
शोभार्थं तस्य यज्ञस्य कांचनालङ्कृता भवन् ।।

एकविंशति यूपास्त एकविंशत्यरत्नय: ।
वासोभिरेकविंशद्भिरेकैकं समलङकृता: ।। – रामायण, बालकाण्ड, अध्याय १४, श्लोक २४, २५

अर्थ : राजा दशरथाने जे यज्ञमंडप उभारले, ते सर्व यज्ञशास्त्र जाणणार्‍या पंडितांनी (शास्त्रज्ञांनी) नियमानुसार बांधले. त्या यज्ञाच्या शोभेसाठी सर्व भवन (मंदिरे, मंडप इत्यादी) सोन्याच्या अलंकारांनी सजवली गेली. तेथे २१ यूप (यज्ञस्तंभ) उभारले गेले होते, जे २१ प्रकारच्या मौल्यवान रत्नांनी अलंकृत होते, आणि सुंदर वस्त्रांनी ते सुशोभित करण्यात आले होते.

७ ई. महाभारत

महाभारतामध्ये बर्‍याच ठिकाणी वास्तूशास्त्राचा वापर करत असल्याचा उल्लेख मिळतो. आपल्या शिष्यांना शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन करण्यासाठी द्रोणाचार्यांनी रंगमंडप सिद्ध करून घेतला होता. तो सिद्ध करतांना त्यांनी वास्तूशास्त्राचा संपूर्ण वापर केला होता.

भारद्वाजो महाप्राज्ञो मापयामास मेदिनीम् ।
समामवृक्षां निर्गुल्मामुदक्प्रस्रवणान्वितम् ।।

तस्यां भूमौ बलिं चक्रे तिथौ नक्षत्रपूजिते ।
अवघृष्टे समाजे च तदर्थं वदतां वर: ।।

रङ्गभूमौ सुविपुलं शास्त्रदृष्टं यथाविधी ।
प्रेक्षागारं सुविहीतं चक्रुस्ते तस्य शिल्पिन: ।। – महाभारत, आदिपर्व, अध्याय १३३, श्लोक ८ ते ११

अर्थ : भारद्वाज ऋषींनी भूमी परीक्षा करून त्याचे मापन केले. त्या भूमीमध्ये वृक्ष, झाडे-झुडपे नव्हती. त्याचा उतार उत्तर दिशेकडे होता. द्रोणाचार्यांनी वास्तूपूजन पहाण्यासाठी दवंडी पिटवून अनेक विरांना आमंत्रित केले आणि उत्तम नक्षत्र असलेल्या तिथीला वास्तूपूजन केले. त्यानंतर त्यांच्या शिल्पकारांनी त्या रंगभूमीमध्ये (ज्या ठिकाणी प्रात्यक्षिके सादर केली जातात) वास्तूशास्त्रानुसार एका विशाल प्रेक्षकगृहाचा पाया रचला.

महाभारत काळामध्ये वास्तूशास्त्र भरपूर समृद्ध होते. लाक्षागृह प्रकरणावरून आपल्याला हे लक्षात येते. दुर्याेधनाने पुरोचनला चतु:शाला भवन निर्माण करण्याची आज्ञा दिली होती. त्यामध्ये तूप, तेल, तसेच लाख यांचा प्रयोग करण्यासाठी सांगितले गेले होते.

तत्र गत्वा चतु:शालं गृहं परमसंवृतम् ।
नगरोपान्तमाश्रित्य कारयेथा महाधनम् ।।

शणसर्जरसादीनि यानि द्रव्याणि कानिचित् ।
आग्नेयान्युत सन्तीह तानि तत्र प्रदापय ।।

सर्पिस्तैलवसाभिश्च लाक्षया चाप्यनल्पया ।
मृत्तिकां मिश्रयित्वा त्वं लेपं कुड्येषु दापय ।। – महाभारत, आदिपर्व, अध्याय १३२, श्लोक ८ ते १०

अर्थ : तेथे नगराच्या सीमेवर एक भव्य असे चतु:शाला भवन (४ दिशांनी असलेले मोठे भवन) भरपूर धनाचा उपयोग करून सिद्ध कर. तिथे साल, धूप इत्यादी जे ज्वलनशील द्रव्य आहेत ती तिथे आणून वापर. तूप, तेल आणि लाख यांचा भरपूर वापर करून माती मिसळून लेप सिद्ध कर आणि तो भिंतींवर लाव.

७ उ. अनेक पुराणे आणि स्मृतीग्रंथ

अनेक पुराणे आणि स्मृतीग्रंथ यांच्यात वास्तूशास्त्राचा उल्लेख आहे. हिंदु धर्माच्या अन्य पंथांमध्येही वास्तूशास्त्राचा उल्लेख आहे. जैन संप्रदायामध्ये मंदिराच्या निर्माण कार्यासाठी प्राकृत भाषांमध्ये वास्तू ग्रंथांची निर्मिती करण्यात आली. प्राकृत भाषेत वास्तूतज्ञाला ‘थवई’ असे म्हटले गेले.

इजिप्तच्या पिरॅमिड्समध्ये काही ठिकाणी वैष्णव तिलक लावलेले कारागिरांचे चित्र आढळून आले आहे, म्हणजे ‘त्या पिरॅमिड्सची रचना करणारे भारतीय होते’, असे यातून लक्षात येते. त्याचप्रमाणे इटलीच्या व्हॅटिकन सिटीमध्ये उभे असलेली मोठमोठी शिवलिंगे आजही आपण पाहू शकतो. अमेरिकेच्या पुरातत्व उत्खननामध्ये श्री गणेशाची मूर्ती सापडलेली आहे.

वास्तूशास्त्राविषयीची अनेक ग्रंथसंपदा, संस्कृत, तसेच प्राकृत भाषेतील ग्रंथ मुसलमान आक्रमकांनी जाळून नष्ट केल्याने संपूर्ण विश्वाला उपयोगी असणारे ज्ञान नष्ट झाले, तसेच अनेक मंदिरांची तोडफोड केल्याने वास्तूकलेचे उत्तम उदाहरण असणारी अनेक मंदिरे नष्ट झाली.

 

८. वास्तूशास्त्राच्या शाखा

वास्तूशास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्राचा एक भाग आहे; परंतु तो विशाल विषय आहे. त्यामुळे त्याच्याही अनेक शाखा आहेत. यज्ञीय वास्तूशास्त्र (शुल्बशास्त्र), गृहवास्तूशास्त्र, नगर (ग्राम) वास्तूशास्त्र, प्रासाद (देवालय) वास्तूशास्त्र, उद्यान वास्तूशास्त्र, जलाशय वास्तूशास्त्र, तसेच या व्यतिरिक्त विमानशास्त्र, यंत्र वास्तूशास्त्र या दोन्ही वास्तूशास्त्राच्याच शाखा आहेत.

 

९. असा झाला ‘वास्तूशांती यज्ञा’स प्रारंभ !

९ अ. करालमुख पुरुषाची भूक शमत नसल्याने त्याने तपस्या करून भगवंताकडे वर मागणे

अंधकासुर नावाचा राक्षस होता. त्या राक्षसाशी घनघोर युद्ध करून भगवान शिवाने त्याचा वध केला. या युद्धामध्ये झालेल्या श्रमामुळे शिवाच्या कपाळावरून एक घर्मबिंदू (घामाचा थेंब) पृथ्वीवर पडला. त्या घर्मबिंदूपासून करालमुख अशा एका अद्भुत पुरुषाचा जन्म झाला. जन्मत: तो अतिशय क्षुधाक्रांत (भुकेने व्याकूळ) असल्याने त्याने मृत अंधकासुराला खाल्ले, तरी त्याची भूक शमेना. शेवटी त्याने शिवशंकराला प्रार्थना केली. कठोर तपस्या करून तो भगवंताकडे वर मागू लागला, ‘क्षुधा शमन करण्यासाठी सप्तलोक, सप्तपाताळ, तसेच संपूर्ण ब्रह्मांडाला भक्षण करून माझी भूक शमवावी.’

९ आ. देव-दानव यांनी दाबून धरल्याने वास्तूपुरुषाने देवादिकांना प्रार्थना करणे आणि त्यानंतर ब्रह्मादी देवतांनी त्याला मार्गदर्शन करणे

महादेव त्याच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन ‘तथास्तु’ म्हणाले आणि सर्व विश्वात हाहा:कार उडाला. देव-दानव यांना त्यांच्या पुढील भविष्याचा अंदाज आला. सर्व जण भयभीत झाले. सर्वांनी एकत्र येऊन निश्चय केला आणि महादेवाचा वर प्राप्त झालेल्या पुरुषाला सर्व शक्तीनिशी पालथे पाडले. त्याचे डोके ईशान्येला आणि पाय नैऋत्येला असे त्यास दाबून धरले. काही देव-दानव त्याच्या विविध अवयवांवर बसले. देवदानवादिकांनी जेथे वास्तूपुरुषाला दाबून धरले होते, त्या ठिकाणीच ते वास्तव्य करू लागले आणि तो ‘वास्तूपुरुष’ म्हणून ओळखला जाऊ लागला. त्या स्थितीमध्ये त्याने देवादिकांना प्रार्थना केली,

अवष्टब्धेन तेनापि विज्ञप्ता: सर्वदेवता: ।
प्रसीदध्वं सुरा: सर्वे युष्माभिर्निश्चलीकृत: ।।

स्थास्यामहं किमाकारो ह्यवष्टब्धो ह्यधोमुख: ।
ततो ब्रह्मादिभि: प्रोक्तं वास्तुमध्ये तु यो बलि: ।।

आहारो वैश्वदेवान्ते नूनमस्य भविष्यति ।
वास्तूपशमनो यज्ञस्तवाहारो भविष्यति ।।

यज्ञोत्सवादौ च बलिस्तवाहारो भविष्यति ।
वास्तुपूजामकुर्वाणस्तवाहारो भविष्यति ।।

अज्ञानात् तु कृतो यज्ञस्तवाहारो भविष्यति एवमुक्तस्ततो ह्यष्ट: स वास्तुरभवत् तदा ।
वास्तुयज्ञ: स्मृतस्तस्मात् तत: प्रभृति शान्तये ।। – मत्स्यपुराण, अध्याय २५२, श्लोक १५ ते १९

अर्थ : ‘हे देवतांनो, प्रसन्न व्हा ! तुम्ही मला दाबून धरल्यामुळे मी निश्चल झालो आहे. पालथ्या स्थितीमध्ये मी किती काळ राहू शकेन ? कृपा करावी.’ त्याच्या या निवेदनानंतर ब्रह्मादी देवतांनी त्याला सांगितले, ‘वास्तूच्या प्रसंगी, तसेच वैश्वदेवाच्या अंती जो बळी दिला जातो, तो निश्चितच तुझा आहार होईल. वास्तूशांतीसाठी जो यज्ञ होईल, तोही तुला आहार रूपामध्ये प्राप्त होईल. यज्ञोत्सवामध्ये जो बळी दिला जातो, तोही तुला प्राप्त होईल. जे वास्तूपूजा करत नाहीत, तेही तुला आहाररूपात प्राप्त होतील. अज्ञानाने केलेला यज्ञही तुला प्राप्त होईल.’

हे ऐकल्यावर वास्तूपुरुष प्रसन्न झाला, तेव्हापासून ‘वास्तूशांती यज्ञा’स प्रारंभ झाला.

(संदर्भ ग्रंथ : विश्वकर्मप्रकाश, मयमतम्, समराङगणसूत्रधार, अपराजितपृच्छा, मानसार, वाल्मीकि रामायण, महाभारत)

– श्री. श्रेयस पिसोळकर, वास्तूविशारद, ज्योतिष होराभूषण, होरारत्न, फोंडा, गोवा. (१५.१०.२०२५)

पुढील भाग वाचण्यासाठी खालील मार्गिकेवर क्लिक करा !

प्रवेशद्वार कोणत्या दिशेला आणि कुठे हवे ?