वास्तूशास्त्रानुसार अंतर्गत रचना : आलिंद (व्हरांडा), वाहनतळ, तिजोरी, तळघर आणि चित्रकर्म

आधीचा भाग वाचण्यासाठी खालील मार्गिकेवर क्लिक करा !

प्रवेशद्वार कोणत्या दिशेला आणि कुठे हवे ?

१. आलिंद (व्हरांडा)

पूर्वीच्या काळी मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर किंवा मागच्या बाजूला मोकळी जागा ठेवली जायची, त्याला ‘आलिंद’ किंवा ‘व्हरांडा’ असेही म्हणतात. काही जुन्या घरांच्या बांधकामांमध्ये आपल्याला तो भाग बघायला मिळतो. त्याची रचना कशी असावी, याविषयीही नियम वास्तूशास्त्रामध्ये सांगितले आहेत.

समोरच्या बाजूस आणि घराच्या उजव्या बाजूस आलिंद घेण्यास वास्तूशास्त्रामध्ये सांगितले आहे. ते सुख वाढवणारे आणि धनवृद्धी करणारे असते. घराच्या मागे आणि पुढे प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस आलिंद असल्यास त्या घराच्या मालकास उत्तम धनधान्य अन् सौभाग्य यांची प्राप्ती होते.

घराच्या पुढच्या बाजूला आणि उजवीकडे आलिंद घेतल्यास मालकावर राजकृपा होऊन समृद्धी प्राप्त होते; परंतु प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला आलिंद घेतल्यास अर्थ नाश, स्त्रियांना त्रास आणि राजदंड इत्यादी फल सांगितले आहे, तसेच घराच्या मागच्या बाजूला द्वाराच्या डाव्या बाजूस आलिंद ठेवू नये. तो दुर्भाग्यपूर्ण आणि आपत्ती ओढवणारा असतो, असे फल ‘समराङ्गण सूत्रधार’ या वास्तूग्रंथामध्ये सांगितले आहे.

 

२. वाहनतळ

भवनातील कोणत्याही गोष्टीचे स्थान निश्चित करतांना तिचे कार्य, भवनातील त्याचा उपयोग आणि दिशांचे तत्त्व यांचा विचार आपल्याला करावा लागतो. वाहनतळ वायव्य दिशेत असल्यास ती दिशा वायुतत्त्वाची आहे, म्हणजेच चंचल आणि अस्थिर असल्याने वाहने सतत कार्यरत रहातात. त्यानंतर आग्नेय दिशेसही आपण वाहनतळ करू शकतो. आग्नेय दिशा ही अग्नीची दिशा आहे. त्यामुळे वाहने ऊर्जावान राहू शकतात. नैर्ऋत्य दिशा ही पृथ्वी तत्त्वाची दिशा असल्याने या दिशेत वाहनतळ असल्यास त्यांचा उपयोग घरासाठी अधिक न होता वाहने एकाच जागी उभी रहातात.

 

३. तिजोरी

वास्तूच्या उत्तर दिशेमध्ये सोमपदामध्ये लक्ष्मीचे स्थान आहे. त्या ठिकाणी तिजोरी ही पूर्व दिशेत उघडणारी असल्यास त्याचा लाभ होतो. पृथ्वीधरपदामध्ये पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे उघडणारी तिजोरी असल्यास धनवृद्धी होते. ‘समराङ्गण सूत्रधार’ या ग्रंथानुसार तिजोरी वरच्या बाजूला उघडणारी नसावी. पश्चिमेकडे उघडणारी असल्यास कटकटी वाढतात. दक्षिणेकडे उघडणारी असल्यास धनक्षय होतो. ज्या गोष्टी स्थिर ठेवायच्या आहेत किंवा जपून ठेवायच्या आहेत, अशा मौल्यवान गोष्टींची तिजोरी ही नैर्ऋत्य दिशेस पूर्वेकडे आणि उत्तरेकडे उघडणारी अशी ठेवावी.

 

४. तळघर

वास्तूशास्त्रानुसार निवासी वास्तूमध्ये तळघर घेण्यास निषेध आहे; परंतु काही मोठ्या इमारतींमध्ये सध्या तळघर घेतले जाते. त्यामध्ये वास्तूच्या नियमांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. दक्षिण, नैर्ऋत्य आणि पश्चिम या भागात खड्डा अन् उतार असू नये. म्हणून तळघर या दिशांमध्ये घेतल्यास त्याचे अनिष्ट परिणाम वास्तूमालकाला भोगावे लागतात. तेच उत्तर ईशान्य आणि पूर्वेस घेतल्यास त्या दिशेत उतार निर्माण होतो. शास्त्रानुसार या दिशांना उतार चालतो. म्हणून त्याचे तुलनेने अल्प परिणाम वास्तूमालकावर होतो. म्हणून तळघर याच दिशांना घ्यावे.

 

५. ब्रह्मस्थान

वास्तूशास्त्रानुसार वास्तूच्या मध्यभागातील एक नवमांश भाग हा ब्रह्मस्थानाचा असतो. एकूण क्षेत्रफळाच्या ११.२ टक्के भाग एवढा भाग ब्रह्मस्थान असते. ज्याप्रमाणे शरिरामध्ये नाभीचे महत्त्व आहे, तसेच वास्तूमध्ये ब्रह्मस्थानाचे महत्त्व आहे.

ब्रह्मस्थानाचा भाग हा पूर्णपणे मोकळा ठेवण्याचा प्रयत्न करावा. तेथे कोणत्याही प्रकारचे वजन, म्हणजेच भिंत, कॉलम, पोटमाळा, पायर्‍या इत्यादी जड बांधकाम असू नये. हे स्थान जड झाल्यास या ठिकाणच्या आकाशतत्त्वाकडून अन्य तत्त्वांना मिळणार्‍या ऊर्जेत अडथळा निर्माण होतो. यामुळे वास्तूतील कार्यक्षमता विस्कळीत होते.

यासह ब्रह्मपदामध्ये झोपायची खोली, देवघर, पाण्याची साठवण, स्वयंपाकघर, स्नानगृह, शौचालय आणि खड्डा असू नये. यामुळे ब्रह्ममंडलाला वेध निर्माण होतो. यामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक असे सर्व प्रकारचे अडथळे निर्माण व्हायला लागतात. घरामध्ये अशांतता, वादविवाद, आजारपण आणि कष्ट इत्यादी परिणाम भोगावे लागतात. म्हणून सर्व प्रयत्न करून ब्रह्मस्थान मोकळे ठेवावे, असे वास्तूशास्त्रकार म्हणतात.

(संदर्भ ग्रंथ : समराङ्गण सूत्रधार, विश्वकर्मप्रकाश, मयमतम् )

 

६. चित्रे लावण्याविषयीचे नियम

देवानां च द्विजानां चावासे योग्यं सनातनम् ।
बहिरन्तश्च सर्वेषां चित्रं युन्जीत बुद्धिमान् ।।
सुमङ्गलकथोपेतं श्रद्धानृत्तक्रियान्वितम् ।
विप्रादीनां च वर्णानां निवासं सम्पदां पदम् ।।
संग्रामं मरणं दुःखं देवासुरकथान्वितम् ।
नग्नं तपस्विलीलां चामयाव्यादि न योजयेत् ।।

– मयमतम्, अध्याय १८, श्लोक १०९ ते १११

अर्थ : देवालये, तसेच ब्राह्मणादिकांच्या (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र) निवासस्थानाच्या आतमध्ये अन् बाहेर लावायची चित्रे ही त्यांच्या दृष्टीने योग्य अशीच लावावीत. मंगल कथांचे प्रतिपादन करणारी आणि श्रद्धेने नृत्यादी क्रियांची चित्रे असावीत. अशी चित्रे लावलेली घरे सुख-समृद्धी प्रदान करतात. युद्धाची चित्रे, मृत्यू, दुःख दर्शवणारी घरात लावू नयेत. नग्न चित्रे, देवासुरांच्या कथा असलेली चित्रे, तपस्वींच्या दिव्य लीलांची चित्रे घरात लावू नयेत.

अ. ज्यातून स्फूर्ती घेता येईल, अशी चित्रे घरात लावू शकतो; परंतु मनामध्ये राग, द्वेष आणि वासना जागृत करणारी चित्रे लावू नयेत.

आ. घरामध्ये चित्रे लावतांना वास्तूशास्त्राच्या मूळ नियमांना लक्षात घेऊन लावायला हवीत. जसे उत्तर आणि पूर्व दिशा या अधिक प्रसारित आणि मोकळ्या असणे आवश्यक असते. त्या दिशांना डोंगर आणि मोठे खडक अशी चित्रे नसावीत, तसेच पश्चिम आणि दक्षिण दिशा या बंद असणे आवश्यक आहे. त्यामुळे त्या दिशांना दूरवर जाणारे रस्ते, जंगल, जलाशय, समुद्र आणि हिरवळ अशी चित्रे लावू नयेत.

इ. वायव्य दिशेमध्ये हलणारी दृश्य असणारी चित्रे लावू शकतो. देव, संत आदींची शुभ स्वरूपातील चित्रे घरात कुठेही लावू शकतो.

ई. उत्तर दिशेमध्ये धबधबा, पूर्वेकडे वहाणारे पाणी, फुलझाडे आणि पुष्पगुच्छ अशी चित्रे लावू शकतो.

उ. दैत्य, ग्रह, तारे, यक्ष, गंधर्व, पिशाच्च, पितर, प्रेत, नाग, भुतांचा समूह, अप्सरा गण यांची चित्रे घरात लावणे वर्ज्य आहेत, तसेच मोकळा झोपाळा आणि राजांच्या लढाया इत्यादी चित्रे घरात लावू नयेत.

 

७. वृक्षांची वर्ज्य असणारी चित्रे

फळे आणि फुले नसलेली झाडे, एकाकी पक्षी असलेली झाडे, एक किंवा दोनच फांद्या असलेले, रुक्ष, सुकलेले, फांद्या मोडलेले यांची चित्रे लावू नयेत. कदंब, शाल्मली (देवकापूस), शेलू, तार, लुक, राळ इत्यादी झाडांवर अनिष्ट शक्तींचा वास असल्याने या वृक्षांची चित्रे घरात लावू नयेत. कडू आणि काटेरी झाडे यांची चित्रेही घरात असू नयेत.

 

८. पक्ष्यांची वर्ज्य असणारी चित्रे

गिधाडे, घुबड, कबूतर, ससाणा, कावळा, करकोचा इत्यादी पक्ष्यांची चित्रे घरात लावू नयेत. ती अशुभ असल्याने वर्ज्य आहेत, असे शास्त्रात सांगितले आहे.

 

९. वन्य प्राण्यांची वर्ज्य असणारी चित्रे

वनातील एकाकी हत्ती, घोडा, उंट, म्हैस, गाढव, माकड, सिंह, वाघ, तरस, डुक्कर, कोल्हा इत्यादींची चित्रे घरात लावू नयेत. अशा चित्रांमुळे आर्थिक हानी सोसावी लागते, तसेच आरोग्याच्या समस्या निर्माण होऊन कष्ट भोगावे लागतात. हत्तींचा कळप, घोड्यांचा कळप आणि सजवलेले उंट यांची चित्रे चालतील.

 

१०. कोणती चित्रे असावीत ?

अ. आपल्या उपास्यदेवता, गुरु आणि कुलदेवता यांची चित्रे आपण घरात योग्य ठिकाणी कुठेही लावू शकतो.

आ. मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन द्वारपालांची चित्रे घ्यावीत. हातात वेताची काठी, म्यानासहित तलवार, देखणे, बहुरंगी पोषाख आणि अलंकार परिधान केलेले असे द्वारपालांच्या चित्रांची योजना करावी.

इ. तसेच ‘मुख्य प्रवेशद्वारावर कमळावर बसलेली, भरलेला कुंभ असलेली, रत्न, वस्त्र आदींनी भूषित, पुष्प, छत्र, चामर असलेली अशा मंगलागौरीचे चित्र घराच्या द्वारावर करावे’, असे ‘समराङ्गण सूत्रधार’ या ग्रंथात सांगितले आहे.

(संदर्भ ग्रंथ : मयमतम् आणि समराङ्गण सूत्रधार)

– श्री. श्रेयस पिसोळकर (वास्तूविशारद, ज्योतिष होराभूषण, होरारत्न), फोंडा, गोवा. (६.५.२०२६)

पुढील भाग वाचण्यासाठी खालील मार्गिकेवर क्लिक करा !

वास्तूशास्त्रानुसार पाणी, सांडपाणी आणि जिना यांची जागा तसेच सभागृह, स्नानगृह आणि शौचालय यांचे वास्तूमधील स्थान !