वास्तू लाभदायी होण्यासाठी लक्षात घेण्याची सूत्रे !

आधीचा भाग वाचण्यासाठी खालील मार्गिकेवर क्लिक करा !

दिशांचे महत्त्व आणि दिशा-उपदिशा यांचे परस्परावलंबित्व !

 

१. वास्तू लाभदायी होण्यासाठी लक्षात घेण्याची सूत्रे !

कुंडली म्हणजे आपल्या जन्माच्या वेळी आकाशातील ग्रहस्थितीचा नकाशा होय. त्यामध्ये आपल्याला पालट करता येत नाहीत. ती आयुष्याच्या शेवटपर्यंत तशीच रहाते; पण वास्तूमध्ये आपण अनुकूल पालट करून ती लाभदायी करून घेऊ शकतो. याचा अर्थ असा नाही की, एखादी वास्तू शुभ करून घेतली, तर त्यामध्ये रहाणार्‍या सर्वांनाच १०० टक्के चांगले परिणाम मिळतील; पण त्याचा लाभ आपल्याला पुढील पद्धतीने होऊ शकतो.

अ. कुंडलीमधील काळ आणि वास्तूही अनुकूल असेल, तर त्यांचा एकत्रित परिणाम निश्चितच शुभ फलदायी असतो.

आ. जर कुंडलीचा चालू काळ खराब असेल आणि वास्तूही दोषपूर्ण असेल, तर मिळणार्‍या वाईट परिणामांची तीव्रता अधिक वाढलेली दिसून येते.

इ. जर कुंडलीतील काळ चांगला आहे; पण वास्तू सदोष आहे, तर कुंडलीमुळे मिळणारे चांगले परिणाम आपण वास्तूमध्ये असेपर्यंत आपल्याला अपेक्षित असे मिळणार नाहीत.

ई. याउलट जर काळ खराब आहे; पण वास्तू निर्दाेष आहे, तर आपल्याला निदान त्या काळातील अडचणींना सामोरे जाण्यासाठी बळ प्राप्त होते. संघर्ष करण्यास बळ मिळते. यामुळे वास्तू निर्दाेष करणे आणि काही दोष असतील, तर त्यांचे निवारण करणे, हे नक्कीच स्वतःच्या हातात असते.

 

२. वास्तूसह परिसराचाही अभ्यास करायला हवा !

ज्याप्रमाणे आपण राष्ट्राचा भौगोलिक दृष्टीने विचार केला, तसाच तो गावाच्या किंवा इमारतीच्या दृष्टीनेही करावा लागतो; कारण इमारतीच्या रचनेचा परिणामही आपल्यावर होतो. रस्ता आपल्या घरापर्यंत येत असतो किंवा मुख्य पाण्याच्या टाकीतून आपल्या वास्तूपर्यंत पाणी येत असते. त्यामुळे एखाद्या वास्तूचा अभ्यास करतांना त्याच्या परिसराचा अभ्यास करणेही आवश्यक असते.

 

३. वास्तूचा सखोल विचार करून अभ्यास करावा !

वास्तूचा अभ्यास करतांना देवघर, स्वयंपाकघर किंवा शयनकक्ष कुठे असावा ? अशा वर वर गोष्टींचा अभ्यास करून त्यानुसार वास्तूशास्त्राचा विचार करणे योग्य ठरणार नाही; कारण भूमीचा आकार-उतार, यजमानाच्या कुंडलीनुसार भूमीची त्याच्या दृष्टीने असलेली शुभाशुभता, विथीशुला दोष (घराच्या दिशांमुळे निर्माण होणारा दोष), भूगर्भीय ऊर्जा, विद्युत् ऊर्जा, प्रवेशद्वार, वृक्ष, चित्रकर्म इत्यादी अनेक गोष्टींचा सखोल विचार करून वास्तूचा अभ्यास करायला हवा. अन्यथा वास्तू उपाय करतांना आपण दुसरा दोष निर्माण करत नाही ना ? याचा विचार करणे आवश्यक आहे.

 

४. वास्तूशास्त्राप्रमाणे वास्तू बांधून संबंधित परिणामांना सामोरे जाण्याची प्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक !

ज्याप्रमाणे एखाद्या गावात रोगाची साथ पसरली, तर गावातील सर्वांचाच रोगामुळे मृत्यू होतो, असे नाही, तर ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता चांगली असते, त्यांच्यावर न्यून परिणाम होतो किंवा काहींवर परिणाम होतही नाही. त्याचप्रमाणे जरी भौगोलिक परिस्थिती अनुकूल नसली, तरी आपण स्वतःची वास्तू वास्तूशास्त्राप्रमाणे बांधून संबंधित परिणामांना सामोरे जाण्याची प्रतिकारशक्ती वाढवू शकतो; कारण भौगोलिक परिस्थिती स्वतःच्या हातात नसते.

भारतामध्ये भौगोलिक परिस्थिती जरी काही प्रमाणात प्रतिकूल असली, तरी ऋषिमुनींनी देशाला दिलेले वास्तूशास्त्राचे ज्ञान, उभारलेली जागृत मंदिरे, शक्तीपिठे इत्यादींमुळे एकप्रकारे या भौगोलिक प्रतिकूलतेला सामोरे जाण्यासाठी शक्तीच दिलेली आहे. याउलट इतर राष्ट्रांमध्ये भौगोलिक परिस्थिती अनुकूल असली, तरी त्यांनी अंतर्गत रचना स्वतःच्या  सोयीनुसार केली आहे. ती वास्तूशास्त्रानुसार योग्य असेलच, असे नाही. त्यामुळे इतर राष्ट्रांमध्ये कुटुंबव्यवस्था लयास जातांना दिसत आहे. त्यासह भौगोलिक परिस्थितीचा लाभ त्यांना मिळत नाही.

 

५. वास्तूच्या रचनेत पंचमहाभूतांचे योग्य संतुलन साधणे आवश्यक !

मानवी शरिरातील ‘अस्थी’ या पृथ्वीतत्त्वापासून, रक्त आदी द्रव गोष्टी जल (आप) तत्त्वापासून, पचनाचे कार्य अग्नि (तेज) तत्त्वाच्या साहाय्याने, शरिरातील रक्ताभिसरण, उत्सर्जन आदी सर्व कर्मे वायूतत्त्वाच्या साहाय्याने होतात, तर शरिराच्या सर्व पोकळींमध्ये आकाशतत्त्व असते. या पंचमहाभूतांचे योग्य संतुलन आपल्या शरिरामध्ये असते. ते संतुलन बिघडल्यावर रोग किंवा आजार निर्माण होतात. त्यासाठी चिकित्सा करण्याची आवश्यकता असते.

मानवी शरिराप्रमाणे वास्तू हीसुद्धा सृष्टीची रचना आहे. त्यामुळे वास्तूही पंचमहाभूतांपासूनच निर्माण झाली आहे. वास्तूची रचना पंचमहाभूतांच्या दृष्टीने अनुकूल असणे आवश्यक आहे. त्यांचे वास्तूमध्ये योग्य संतुलन निर्माण होणे आवश्यक आहे. वास्तूच्या अयोग्य रचनेमुळे हे संतुलन बिघडले, म्हणजे अग्नितत्त्वाच्या दिशेमध्ये पाणी आले किंवा वायूतत्त्वाच्या दिशेत जड वस्तू आल्या, तर त्याचा थेट परिणाम वास्तूमध्ये रहाणार्‍या व्यक्तींचे शरीर आणि आयुष्य यांवर होतो; म्हणून वास्तूची रचना करतांना पंचमहाभूतांचे योग्य संतुलन होणे आवश्यक आहे.

 

६. पंचमहाभूतांची वास्तूतील दिशा, कार्य आणि वैशिष्ट्य !

६ अ. आकाशतत्त्व

६ अ १. या तत्त्वाचे स्थान वास्तूच्या मधोमध ब्रह्ममंडलामध्ये असते. आकाशतत्त्व म्हणजे पोकळी ! त्यामुळे वास्तूची मधली जागा मोकळी असणे आवश्यक आहे.

६ अ २. आकाशतत्त्वापासूनच इतर तत्त्वे निर्माण झाली आहेत. आकाशतत्त्वाकडून इतर तत्त्वांनाही ऊर्जा पुरवली जाते. या ऊर्जेचा प्रवाह ‘विदिक्षु’, म्हणजेच उपदिशांकडे होत असतो. हा प्रवाह विनाअडथळा झाल्यास सर्व तत्त्वे ऊर्जावान होऊन व्यवस्थित कार्य करू शकतात; म्हणूनच ब्रह्ममंडलामध्ये कोणताही अडथळा किंवा जड बांधकाम नसावे.

६ अ ३. ब्रह्ममंडल निर्दाेष का हवे ? : आकाशतत्त्व हे शरिराच्या पोकळींवर कार्य करते; म्हणून यात अडथळा निर्माण झाल्यास आतडे आणि पोट यांवर परिणाम होऊन पोटाचे विकार होऊ शकतात. आकाशतत्त्वाचे स्थान, म्हणजेच ब्रह्ममंडल जर निर्दाेष असेल, तर इतर सर्व तत्त्वे ऊर्जावान राहून घरातील वातावरण शांत रहाते. घराला परिपूर्णता प्राप्त होते; म्हणून वास्तूमध्ये ब्रह्ममंडलाचा विचार गांभीर्याने करणे आवश्यक आहे.

६ आ. अग्नितत्त्व

६ आ १. हे तत्त्व आग्नेय दिशेत कार्य करते. वास्तूमध्ये रहाणार्‍या लोकांना ऊर्जा प्रदान करण्याचे कार्य हे तत्त्व करते.

६ आ २. तत्त्व नियंत्रित असायला हवे ! : अग्नी नियंत्रित किंवा संयमित असला की, त्याचा उपयोग बर्‍याच ठिकाणी करता येतो; पण तो अनियंत्रित झाल्यास हानी करतो. तत्त्वसुद्धा नियंत्रित आणि निर्दाेष असेल, तर ते साहाय्यभूत ठरते, अन्यथा हानी होते. हे तत्त्व घरातील पुढील पिढीसमवेतचे संबंध, लहान मुले आणि स्त्रियांचे आरोग्य यांवर परिणाम करते.

६ इ. पृथ्वीतत्त्व

६ इ १. जडपणा हे या तत्त्वाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. स्थिरता दर्शवणारे हे तत्त्व नैर्ऋत्य दिशेत कार्य करते. घरातील लोकांना या तत्त्वाच्या ऊर्जेमुळे स्थिरता प्राप्त होते. त्यामुळे ‘कुटुंबप्रमुखाने या दिशेत निवास करावा’, असे सांगितले आहे.

६ इ २. या दिशेमध्ये निर्माण होणारे दोष हे अस्थैर्य, कलह, वैवाहिक समस्या, उदासीनता आणि अपयश इत्यादी गोष्टी निर्माण करतात.

६ ई. वायुतत्त्व

६ ई १. निर्दाेष वायुतत्त्व घरातील नकारात्मकता संपवत असणे : वायुतत्त्व म्हणजे गतीमानता ! चंचलता हे त्याचे वैशिष्ट्य आहे. हे तत्त्व वायव्य दिशेला कार्य करते. वायू हा नकारात्मकता संपवणारा आहे. ज्याप्रमाणे शरिरामधील अशुद्ध रक्त शुद्ध करण्यात प्राणवायू साहाय्य करतो, त्याप्रमाणे वायुतत्त्व निर्दाेष असल्यास घरातील नकारात्मकता संपवण्याचे कार्य करते. या ठिकाणचे दोष अस्थिरता, वादविवाद आणि सातत्याचा अभाव हे असून ते परिणाम करतात. वायुतत्त्वाचा मनावरही मोठा परिणाम होतो. ज्या गोष्टी घरातून निघून जायला हव्यात, अशा गोष्टी वायव्य दिशेला असाव्यात.

६ उ. जलतत्त्व

६ उ १. जलतत्त्वामुळे मेंदूचा विकास होणे : पृथ्वीवर आणि मानवाच्या शरिरात हे तत्त्व सर्वाधिक प्रमाणात आहे. ते मनुष्याच्या विकासाला साहाय्यभूत ठरते. पाण्याविना मनुष्य जगू शकत नाही. हे तत्त्व ईशान्य दिशेला कार्य करते. या तत्त्वामुळे मेंदूचा चांगल्या प्रकारे विकास होतो.

६ उ २. भूमीखालील पाण्याचा साठा ईशान्य दिशेला असावा. या दिशेमध्ये दोष निर्माण झाल्यास शारीरिक आजार, मेंदूंचे आजार, कर्जबाजारीपणा, नातेवाइकांशी संबंध बिघडणे इत्यादी परिणाम होतात.

७. वास्तूशास्त्रानुसार वास्तूमध्ये ४ मुख्य दिशांनुसार या ४ पुरुषार्थांचे स्थान

हिंदु धर्मशास्त्रामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे ४ पुरुषार्थ सांगितले आहेत. वास्तूशास्त्रानुसार वास्तूमध्ये ४ मुख्य दिशांनुसार या ४ पुरुषार्थांचे स्थान निश्चित केले आहे. अर्थात् पुरुषार्थाशी संबंधित दिशा निर्दाेष असेल, तर वास्तूच्या मालकाला पुरुषार्थ साधण्यात कोणतेही अडथळे निर्माण होत नाहीत, म्हणजेच पुरुषार्थ सहज साध्य होतो.

७ अ. धर्म : वास्तूमध्ये ‘पूर्व’ दिशा ही ‘धर्म’ या पुरुषार्थाची असते. ‘स्व’धर्माचे पालन करणे, कर्तव्यांचे वहन करणे आणि शास्त्राने घालून दिलेल्या विधी-नियमांचे पालन करणे इत्यादी गोष्टी पुरुषार्थामध्ये येतात. या संसारसागराला पार करण्यासाठी धर्म, म्हणजे नौका आहे. त्याचे पालन करतच आपण मुक्त होऊ शकतो. अर्थ आणि काम हे दोन्ही पुरुषार्थ धर्मावर आधारलेले आहेत. पूर्व दिशेकडे हा पुरुषार्थ असल्याने त्या दिशेच्या शुभाशुभतेवर पुरुषार्थाची फले अवलंबून असतात. या दिशेमध्ये शौचालय, जिना किंवा अशुभ गोष्टी वास्तूत असल्यास ‘धर्म’ हा पुरुषार्थ व्यवस्थित साधला जात नाही.

७ आ. अर्थ : धर्माच्या आधारे धन मिळवून त्याचा योग्य विनियोग केल्याने ‘अर्थ’ पुरुषार्थ साधला जातो. उत्तर ही ‘अर्थ’ पुरुषार्थाची दिशा आहे. ही दिशा शुभ असता हा पुरुषार्थ चांगल्या प्रकारे साधला जातो. उत्तर दिशा बंद असेल किंवा त्या दिशेला जिना, शौचालय इत्यादी गोष्टी आल्या असतील, तर ‘अर्थ’ पुरुषार्थ साधण्यात अडचणी निर्माण होतात. त्यातून आर्थिक अडचणीही येतात.

७ इ. काम : पश्चिम दिशा ही ‘काम’ या पुरुषार्थाची आहे. धर्मानुसार आचरण करून धन मिळवणे आणि त्याचा उपयोग करून आपल्या कामनांची पूर्ती करणे, यालाच ‘काम पुरुषार्थ’ म्हणतात. ‘धर्मसंमत कामना’, असा इथे अर्थ अभिप्रेत असल्याने ही दिशा बिघडल्यास नैतिकतेवर परिणाम होतो. या दिशेला खड्डा किंवा उतार असणे अथवा पश्चिम दिशा उघडी असणे यांमुळे नैतिकदृष्ट्या पुरुषार्थ साधण्यात अडचणी निर्माण होतात.

७ ई. मोक्ष : मोक्ष हा अंतिम पुरुषार्थ आहे. या संसारातून बंधमुक्त होऊन भगवंताशी एकरूप होणे, म्हणजे मोक्ष होय. दक्षिण ही दिशा या पुरुषार्थाची आहे. हा पुरुषार्थ एकाच जन्मात साध्य होईल, असे नाही; पण प्रत्येक जन्मामध्ये साधना करून पुढच्या टप्प्याला जायचे, त्यादृष्टीने साधनेचे प्रयत्न अखंड करत रहावे लागतात. दक्षिण दिशेला उतार असणे, उत्तर दिशा बंद आणि दक्षिण दिशा उघडी असे दोष असतील, तर साधनेच्या प्रयत्नांमध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे ही दिशा निर्दाेष असणे आवश्यक आहे.

वरील ४ पुरुषार्थांपैकी धर्म, अर्थ आणि काम हे ३ पुरुषार्थ साध्य करण्यासाठी आपल्याला निर्दाेष वास्तूची आवश्यकता असते; परंतु ‘मोक्ष’ हा पुरुषार्थ साध्य करण्यासाठी त्याचा मार्ग दाखवणार्‍या केवळ श्रीगुरूंची कृपाच आवश्यक असते.

(संदर्भ ग्रंथ : तैत्तिरीय उपनिषद, चरक संहिता, मयमतम्, विश्वकर्मप्रकाश, मत्स्यपुराण)