आधीचा भाग वाचण्यासाठी खालील मार्गिकेवर क्लिक करा !
वास्तूशास्त्रानुसार अंतर्गत रचना : आलिंद (व्हरांडा), वाहनतळ, तिजोरी, तळघर आणि चित्रकर्म
आता आपण वास्तूमध्ये पाण्याचा साठा कुठे असावा ? याविषयी जाणून घेऊया.
१. पाण्याच्या साठ्याच्या दृष्टीने दिशा आणि घ्यावयाची काळजी
अ. ईशान्य दिशा ही जलतत्त्वाची दिशा आहे. त्यामुळे साहजिकच पाण्याच्या साठ्याच्या दृष्टीने ही दिशा अनुकूल आहे. या दिशेला विशेष करून पर्जन्य, आप, अपवत्स या पदांमध्ये पाण्याचा साठा, म्हणजेच भूमीखाली पाण्याची टाकी, विहीर, बोरवेल आदींचा विचार आपण करू शकतो. केवळ ईशान्य दिशेला जर पाण्याची टाकी असून त्याच्यासमोरच मुख्य दरवाजा असेल, तर द्वार वेध निर्माण होतो. म्हणून भूमीखालील पाण्याचा साठा आणि मुख्य प्रवेशद्वार एकाच ठिकाणी नसावे.
आ. नैऋत्य दिशा ही अधिकाधिक कोरडी असणे आवश्यक आहे. नैऋत्य दिशेला घरावर आपण पाण्याची मोठी टाकी ठेवू शकतो; कारण नैऋत्य दिशा ही जड असणे आवश्यक आहे; परंतु त्या दिशेला पाणी झिरपणार नाही किंवा सांडणार नाही, याची मात्र काळजी घेणे आवश्यक असते. नाही तर या दिशेला पाणी सांडल्यास त्यातून नवीन वास्तूदोष निर्माण होतो.
इ. आग्नेय दिशा ही अग्नीतत्त्वाची दिशा आहे आणि अग्नी अन् जल यांमध्ये शत्रूत्व आहे. त्यामुळे आग्नेय दिशेस पाणीसाठा आल्यास संततीविषयक अडचणी निर्माण होतात. घरामध्ये सतत वादविवाद, कटकट आणि तामसी स्वभाव निर्माण होतो. घरातील ऊर्जा नष्ट होऊन कठीण जीवन जगावे लागते.
ई. दक्षिण दिशेमध्ये भूमीखाली पाण्याचा साठा कधीही करू नये. यामुळे पोटाचे आजार संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते.
उ. पश्चिम दिशेला जर पाणीसाठा घ्यायचा असेल, तर तो वरुण पदामध्ये घ्यावा.
ऊ. वायव्य दिशेमध्ये पाण्याचा साठा घेतल्यास त्याची योग्य ती स्वच्छता राखणे आवश्यक आहे. अस्वच्छतेमुळे वायुतत्त्व दूषित होऊन घरामध्ये चंचलता, भ्रमिष्टपणा, मानसिक त्रास, तसेच नोकर वर्गाकडून त्रास होण्याची शक्यता असते.
ए. उत्तर दिशेला सोम पदामध्ये भूमीखाली पाण्याचा साठा करू नये. यामुळे संपत्तीचा क्षय होतो.
ऐ. विहीर, कूपनलिका हे सर्प ते महेंद्र या ईशान्य चौकोनात असावी.
२. सांडपाण्याची व्यवस्था
सांडपाण्याची व्यवस्था कधीही दक्षिण आणि नैऋत्य भागात करू नये. नैऋत्य दिशेकडून ईशान्य दिशेकडे वार्याचा सर्वसाधारण प्रभाव असतो. त्यामुळे नैऋत्य दिशेत असेल, तर दुर्गंधी आणि सूक्ष्मजंतू यांचे वहन ईशान्य दिशेकडे होते. संपूर्ण वास्तूमध्ये त्याचे संचलन होते; म्हणून सांडपाणी नैऋत्येत नसावे. ‘सेप्टीक टँक’ वायव्य दिशेत शोष या पदामध्ये करावा.
३. घरातील जिना
जिना म्हणजे घरातील एक जड भाग म्हणून आपण विचार करतो. त्यामुळे तो नैऋत्य दक्षिण-पश्चिम दिशेत असणे अधिक योग्य आहे. ‘जिना हा प्रदक्षिणा मार्गाने वर जाणारा असावा’, असा आग्रह वास्तूग्रंथांमध्ये केला आहे. जिन्याच्या पायर्या सम संख्येत असाव्यात. त्यामध्येही शून्य समसंख्या, म्हणजेच १०,२०,३० अशा नसाव्यात. वास्तूशास्त्रामध्ये गोल वर जाणार्या जिन्याचा निषेध सांगितला आहे. पूर्व, ईशान्य, उत्तर आणि वायव्य या दिशा त्यातल्या त्यात हलक्या अन् मोकळ्या असणे आवश्यक म्हणून या ठिकाणी जिना घेणे टाळणे आवश्यक आहे. ईशान्य दिशेस जीना घेतल्यास प्रगतीला आणि आरोग्याला त्रासदायक ठरतो, तर आग्नेय दिशेचा जिना हा मुलांचे आरोग्य बिघडवतो. जिन्याचा उतार उत्तर किंवा पूर्व दिशेकडे असायला हवा. जिन्याखाली देवघर, शौचालय आणि झोपण्याची जागा इत्यादी करू नये.
(संदर्भ ग्रंथ : विश्वकर्मप्रकाश आणि मानसार)
४. सभागृह, स्नानगृह आणि शौचालय यांचे वास्तूमधील स्थान !
अ. सभागृह
वास्तूमध्ये सभागृह हे मुख्य प्रवेशद्वारालगतच असावे. त्यामुळे घराचे प्रवेशद्वार ज्या दिशेला आहे, त्या दिशेलाच आपल्याला सभागृह घेणे आवश्यक असते. त्यामुळे सर्वप्रथम मुख्य प्रवेशद्वार योग्य दिशेला असेल, तर सभागृहसुद्धा योग्य दिशेला घेणे सोयीचे होते. सभागृह, म्हणजे वास्तूतील मोकळा भाग, त्यामुळे तो उत्तर-पूर्व भागात असल्यास त्याचा चांगला परिणाम वास्तूवर होतो. आग्नेय दिशा मात्र सभागृहासाठी योग्य नाही, त्यामुळे कामकाजामध्ये अडचणी निर्माण होतात. स्त्रियांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. दक्षिण दिशेला सभागृह असल्यास हानी आणि अस्थिरता प्राप्त होते. व्यवसाय आणि नोकरी यांमध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. ही दिशा उघडी आणि अधिक खिडक्या असल्यास त्रास जास्त प्रमाणात दिसून येतो.
नैर्ऋत्य दिशेमध्ये सभागृह नसावे. घरातील व्यक्तींच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अशा सर्वच गोष्टींवर विपरीत परिणाम होतात. एका पाठोपाठ एक संकटे निर्माण होतात. नैर्ऋत्य दिशेला सभागृह असले, तर बर्याच वेळा ईशान्य दिशा बंद असते. त्यामुळे शुभ ऊर्जा घरात येण्यास प्रतिबंध निर्माण होतो आणि अशुभ ऊर्जा घरामध्ये साठते.
पश्चिम दिशेस सभागृह असेल, तर प्रगती मंदावते. उत्साह न्यून रहातो. वादविवाद वाढतात. वायव्येला सभागृह चालू शकते; परंतु उघडा भाग हा उत्तर दिशेकडे असला पाहिजे, तर त्याचा लाभ मिळतो.
आ. स्नानगृह
स्नानगृहासाठी सर्वांत उत्तम दिशा, म्हणजे पूर्व दिशा ! कारण सकाळी स्नान करतेवेळी पूर्वदिशेकडून येणार्या शुभ ऊर्जेचा लाभ होतो. त्यामुळे पूर्व दिशेप्रमाणेच उत्तर दिशेलाही स्नानगृह लाभदायक असते. स्नानगृहाचा उतार उत्तर किंवा पूर्व दिशेकडे असावा. स्नान करतांना पूर्व दिशेकडे तोंड करून स्नान करणे अधिक लाभदायक आहे. सध्या स्नानगृह आणि शौचालय एकत्र केले जाते; परंतु वास्तूशास्त्रानुसार स्नानगृह अन् शौचालय एकत्र नसावेत; कारण ‘स्नानातून शुभ ऊर्जेची प्राप्ती व्हावी’, हा उद्देश असतो, तसेच शौचालयामुळे अशुभ ऊर्जा वाढते.
इ. शौचालय
मूळ वास्तूशास्त्रानुसार स्नानगृह आणि शौचालय हे दोन्ही वास्तूच्या बाहेर एका ठराविक दिशेत असणे अपेक्षित आहे; परंतु सध्याच्या काळात ते शक्य होत नाही. म्हणून शौचालयाच्या स्थानाचा वास्तूमध्ये विचार करतांना शुभ स्थानाची ऊर्जा न्यून होणार नाही आणि वास्तूमध्ये अशुभता वाढणार नाही, हा विचार करून स्थान निश्चित करावे लागते. ईशान्य, आग्नेय आणि नैर्ऋत्य या दिशांच्या कोपर्यांमध्ये शौचालय घेऊ नये.
पश्चिम-वायव्य दिशेमध्ये रोग, पाप, शोष आणि रोग या पदांमध्ये शौचालय करता आले, तर अधिक योग्य ठरेल.
याम्य नैर्ऋत्ययोर्मध्ये पुरिषत्यागमन्दिरम् । – विश्वकर्मप्रकाश
अर्थ : दक्षिण आणि नैर्ऋत्य या दिशांमध्ये शौचालयाचा विचार आपण करू शकतो.
वास्तूमध्ये शुभ ऊर्जा वाढावी, यासाठी स्नानगृह आणि शौचालय याची दिशा योग्य असणे आवश्यक आहे. शुभ दिशा किंवा शुभ पदांमध्ये शौचालय येऊ नये, याची सर्वच वास्तूविशारदांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.
(संदर्भ ग्रंथ : विश्वकर्मप्रकाश, मयमतम् आणि मानसार)
– श्री. श्रेयस पिसोळकर (वास्तूविशारद, ज्योतिष होराभूषण, होरारत्न), फोंडा, गोवा.
पुढील भाग वाचण्यासाठी खालील मार्गिकेवर क्लिक करा !
वास्तूशास्त्रानुसार घरात स्वयंपाकघर आणि शयनकक्ष काेठे असावे ?


वास्तू लाभदायी होण्यासाठी लक्षात घेण्याची सूत्रे !
दिशांचे महत्त्व आणि दिशा-उपदिशा यांचे परस्परावलंबित्व !
अष्टदिशांची वैशिष्ट्ये आणि अष्टदिक्पाल !
भूमीची शुभाशुभता आणि भूमी परीक्षण !
ऊर्जा आणि वास्तूशास्त्र !
भूमी प्लव (उतार) आणि वास्तूशास्त्र !