पू. (सौ.) अंजली गाडगीळ : एक अद्वितीय व्यक्तीमत्त्व ! – (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ

pu_anjali_gadgilपू. (सौ.) अंजली गाडगीळ यांचा मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी वाढदिवस असतो. पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयी त्यांचे पती पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी लिहीलेली सूत्रे आज आपण पहाणार आहोत.

‘हे ईश्‍वरा, पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या अद्वितीयत्वाविषयी काही लिहायची माझी पात्रता नाही. तूच माझ्याकडून तुला अपेक्षित असे लिखाण करवून घे.

व्यावहारिक नात्यात पत्नीला एकेरी संबोधतात; पण इथे आध्यात्मिक नाते असल्याने आणि अध्यात्मात पू. (सौ.) अंजली माझ्याहून पुढे असल्याने, तसेच त्या संत असल्याने मी त्यांना आदरार्थी संबोधत आहे.

 

१. भारतभर भ्रमण करुन सनातन संस्थेची पताका आसेतूहिमालय फडकवणे आणि प्रेमभावाने अनेकांची मने जिंकून त्यांना संस्थेशी जोडणे

१ अ. भारताचा सांस्कृतिक ठेवा जतन करण्यासाठी भारतभर भ्रमण करणे आणि ठिकठिकाणच्या अधिकारी व्यक्ती अन् संत यांच्याशी जवळीक निर्माण करून त्यांना सनातन संस्थेशी घट्ट जोडणे

गेली ४ वर्षे पू. (सौ.) अंजली भारतभर भ्रमण करून भारताचा सांस्कृतिक ठेवा जतन करण्यासाठी तीर्थक्षेत्रे, मंदिरे, मठ, ऐतिहासिक ठिकाणे इत्यादी स्थानी चित्रीकरण करत आहेत, तसेच तेथील माहिती, मौलिक वस्तू गोळा करत आहेत आणि त्या त्यांना सहजतेने मिळतही आहेत. याचे कारण म्हणजे पू. (सौ.) अंजली यांचे गुण आणि कौशल्य. जणुकाही देवच प्रसन्न होऊन त्यांना हे सर्व द्यायला अधीर झाला आहे ! मुख्य म्हणजे त्या तेथील अधिकारी व्यक्ती, संत इत्यादींशी संपर्क करून त्यांच्याशी जवळीक निर्माण करत आहेत आणि त्यांना सनातनशी जोडत आहेत. तसेच तेथे अध्यात्मप्रसारही करत आहेत. पू. (सौ.) अंजली यांच्यामुळे त्या अधिकारी व्यक्ती आणि संत यांच्याशी सनातन संस्थेचे इतके जवळचे संबंध प्रस्थापित होतात की, ते सनातनशी अगदी घट्ट जोडले जातात आणि कोणत्याही प्रसंगी सनातनला साहाय्य करतात. पू. (सौ.) अंजली यांचा त्यांच्यावर एवढा प्रभाव पडतो की, ते म्हणतात, तुम्ही आश्रमात उपस्थित असल्याशिवाय आम्ही तेथे येणार नाही. अर्थात हे त्यांचे बोल पू. (सौ.) अंजली यांच्यावरील मायेपोटी आणि आध्यात्मिक संबंध निर्माण झाल्यामुळेच असतात.

१ आ. पू. (सौ.) अंजली यांनी भारतभर अध्यात्मप्रसार करणे आणि सनातनला नावलौकीक मिळवून देणे, हे त्यांना त्यांच्यातील दैवी गुणांच्या समुच्चयामुळे साध्य होणे

पू. (सौ.) अंजली यांनी आतापर्यंत भारतभर चारचाकीने दोन ते अडीच लाख किलोमीटर भ्रमण केले आहे. खरेतर एका बाईने दायित्व घेऊन भारतभर प्रवास करणे, आधी कोणताही संपर्क नसतांना नवीन ठिकाणी जाऊन लोकांशी संपर्क करणे, त्यांच्यातील साहाय्य करू शकतील अशा आणि योग्यता असणार्‍या व्यक्तींची पारख करणे, त्यांना आपलेसे करणे, तेथे अध्यात्मप्रसार करणे आणि सनातनचे नाव भारतभर करणे ही अवघड गोष्ट आहे. त्याला मोठे धाडस आणि धैर्य लागते. हे सर्व पू. (सौ.) अंजली यांनी अल्प कालावधीत सहज साध्य केले. याचे कारण म्हणजे त्यांच्यातील प्रेमभाव, गुरुकार्य सर्वदूर पोहचले पाहिजे, ही तळमळ, गुरु करवून घेणारच आहेत, ही पूर्ण श्रद्धा, आध्यात्मिक योग्यता, सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता आणि समष्टी कार्य करण्याची योग्यता या दैवी गुणांचा समुच्चय ! एका व्यक्तीत एवढे सर्व गुण असणे ही तिच्या अद्वितीयत्वाचीच लक्षणे आहेत !!

 

२. मोठमोठ्या शास्त्रज्ञांशीही जवळीक साधून त्यांना 
सनातन संस्थेच्या कार्याचे व्यापकत्व आणि ती विज्ञानाद्वारे 
करत असलेले आध्यात्मिक संशोधन यांचा परिचय करून देणे

पू. (सौ.) अंजली यांनी केवळ अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींशी जवळीक साधली असे नव्हे, तर त्यांनी मोठमोठ्या शास्त्रज्ञांशीही जवळीक साधली. यामध्ये डॉ. रघुनाथ शुक्ल, डॉ. विजय भटकर, डॉ. माशेलकर, एम्.आय.टी.चे डॉ. विश्‍वनाथ कराड, डॉ. टी.एन्. मोरे, डॉ. टिळक, सिक्स सिग्माचे डॉ. प्रदीप देशपांडे असे अनेक जण आहेत. पू. (सौ.) अंजली यांनी त्यांनाही सनातन संस्थेचे कार्य केवढे व्यापक आहे, हे दाखवून दिले आणि त्याही कसे विज्ञानाद्वारे आध्यात्मिक संशोधन करत आहेत, हे सांगितले. याद्वारे त्यांनी सनातनला वैज्ञानिकांच्याही साहाय्याचे दालन उघडून दिले.

 

३. आश्रमातील लहान-थोर प्रत्येक साधकाशी
जवळीक असल्याने त्या प्रत्येकाला हव्याहव्याशा वाटणे;
कारण त्या आपल्याकडील ज्ञान सर्वांना वाटत असणे

त्यांची आश्रमातील लहान-थोर प्रत्येकाशी जवळीक असल्याने त्या प्रत्येकाला हव्या असतात. त्या अध्यात्मप्रसाराच्या दौर्‍यावर गेल्यावर त्या केव्हा येणार ?, याची अनेक साधक विचारपूस करतात. त्या आश्रमात आल्या की, प्रत्येक साधकाला आनंद होतो. आपल्या जवळचे कोणीतरी आले, असे त्यांना वाटते. त्यांनी दौर्‍याहून कोणकोणत्या अध्यात्मदृष्ट्या मौलिक वस्तू आणल्या आहेत, याची ते चौकशी करतात; कारण पू. (सौ.) अंजली आश्रमातील साधकांसाठी त्या वस्तूंविषयी बारिकसारिक नोंदी देऊन त्यांचे भाव जागृत करणारे आणि आनंद देणारे प्रदर्शन मांडतात. अशा प्रकारे त्या आपल्याकडील ज्ञान सर्वांना वाटत असतात.

 

४. पू. (सौ.) अंजली या प्रत्येक गोष्ट जीव ओतून करत असणे

पू. (सौ.) अंजली प्रत्येक गोष्ट सुंदर, भावपूर्ण, परिपूर्ण आणि जीव ओतून करत असल्याने सर्व प्रकृतीही त्यांच्यावर जीव ओतून प्रेम करते.

 

५. प्रत्येक क्षेत्रात कौशल्य असून त्यात
उत्कृष्ट कार्य करणे, हे अद्वितीयत्वाचे लक्षणच !

पू. (सौ.) अंजली यांना एखादी गोष्ट येत नाही, असे नाही. त्यांनी लहानपणी रांगोळी, चित्रकला, खेळ, वक्तृत्व, पाठांतर, संगीत, हस्ताक्षर अशा अनेक क्षेत्रांत बक्षिसे मिळवली आहेत. आता मोठेपणी त्यांनी उत्कृष्ठ आणि भावपूर्ण मुलाखती घेणे, मुलाखतीमध्ये अभंगांसारखी पदे रचून सर्वांना भावविभोर करणे, कार्यक्रमाचे परिपूर्ण नियोजन करून ते सत्यम् शिवम् सुंदरम् असे पार पाडणे, ग्रंथांचे लिखाण करणे, सूक्ष्म-जगताचे विश्‍लेषण करणे अन् त्याची चित्रे काढणे, संगीतविशारद असल्याने नामजप, रामाचा पाळणा, वंदे मातरम्… इत्यादी योग्य तर्‍हेने आणि भावपूर्ण ध्वनीमुद्रित करणे, आध्यात्मिक संशोधन करणे अशा प्रत्येक क्षेत्रात मोठे कार्य केले आहे. हे सर्व गुण त्यांनी आत्मसात केले आहेत असे नव्हे, तर ते त्यांच्या अंगीभूतच आहेत. यावरूनही त्यांचे अद्वितीयत्व लक्षात येते.

 

६. ईश्‍वराने पू. (सौ.) अंजली यांना आता
आणखी पुढच्या स्तराला नेणे आणि महर्षी जीवनाडीपट्टीमध्ये
सांगतील त्याप्रमाणे भ्रमण अन् कार्य करण्यास सांगणे

कोणत्याही क्षेत्रात कार्य करू शकण्याची योग्यता असल्याने, तसेच मनोलय आणि बुद्धीलय झाल्यानेच भगवंताने त्यांना आता स्वतः काही न करता भगवंत सांगेल तशी सेवा करण्याची संधी दिली आहे, असे वाटते. पूर्वी त्या स्वतः भारतभर दौर्‍यांचे नियोजन करून ठिकठिकाणी जात आणि धर्मकार्य करत; पण आता त्यांना पू. डॉ. ॐ उलगनाथन् सप्तर्षी जीवनाडीमध्ये दिल्याप्रमाणे भ्रमण आणि कार्य करण्यास सांगतात. अशा प्रकारे त्या आता आणखी पुढच्या स्तराला गेल्या आहेत. तसेच त्या आता महर्षींच्या झाल्या आहेत. महर्षीही जीवनाडीपट्टीत मधून मधून त्यांचे कौतुक करत असतात आणि ईश्‍वराने त्यांना नेमून दिलेल्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयीच्या मोठ्या कार्याविषयी सांगत असतात.

 

७. पू. (सौ.) अंजली यांनी अनुभवांविषयी काहीही टाचणे
केलेली नसूनही त्या गेल्या ६ – ७ मासांतील सर्व प्रसंग
जसेच्या तसे शब्दबद्ध करू शकणे आणि आवश्यक ते सर्व
देवच आठवण करून देऊन भरभर लिहून घेत असल्याचे त्यांनी सांगणे

गेले २०-२५ दिवस पू. (सौ.) अंजली सप्तर्षी जीवनाडीचे वाचन करणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या संदर्भात आणि त्यांच्या माध्यमातून महर्षींनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण वक्तव्यांच्या संदर्भात गेले ६-७ मास जे अनुभवले, ते लिहून देत आहेत. पू. (सौ.) अंजली यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी या प्रसंगांविषयी कोणतीही टाचणे किंवा नोंदी केलेल्या नसतांनाही केवळ आपल्या आठवणींवरून आतापर्यंत ए ४ आकाराची ५५ ते ६० पाने भरतील एवढे लिखाण लिहून दिले आहे. याविषयी मी त्यांना म्हटले, एवढे शब्दन् शब्द कसे काय आठवते ? तेव्हा त्या म्हणाल्या, हो, हे आश्‍चर्यच आहे. टंकलेखन करायला बसले की, आधी काही लिहून ठेवलेले नसतांनाही एखाद्या विषयाच्या संदर्भात सर्व देवच भरभर आठवण करून देतो आणि ते लिहून घेतो. त्यामुळे घडलेला प्रत्येक प्रसंग जसाच्या तसा लिहिता येतो. मी म्हटले, तुमचा मेंदू म्हणजे महासंगणकच आहे. नुसती कळ दाबायचा, म्हणजे प्रार्थना करून टंकलेखनाला आरंभ करायचा अवकाश, सर्व मजकूर येतो. काही मासांपूर्वीचे जसेच्या तसे लिहून काढणे, म्हणजे सोपी गोष्ट नाही. यावरून पू. (सौ.) अंजली यांचे सर्व गुण दैवी आहेत, हे लक्षात येते. त्यांच्याकडून सर्व देवच करवून घेतो.

७ अ. लिखाणातील त्यांची भाषा उत्तम लेखकाची असते, तशी ओघवती, सुंदर आणि सूत्रबद्ध असते, तसेच लिखाणात आवश्यक त्या ठिकाणी आध्यात्मिक विश्‍लेषण असल्याने लिखाण समजायला सोपे असते.

 

८. पू. (सौ.) अंजली यांच्या मुखातून
गुरुतत्त्वच बोलत असल्याची आलेली प्रचीत

पूर्वज पुष्कळ वेळा नागाच्या रूपातच का दिसतात ?, असा प्रश्‍न एका जिज्ञासूने विचारला होता. त्याविषयी कुठच्याही ग्रंथात काही माहिती नाही. अध्यात्माविषयी एखाद्या गोष्टीचे शास्त्र हवे असल्यास प.पू. डॉक्टर यांच्या नंतर पू. (सौ.) अंजली यांचेच नाव डोळ्यासमोर येते. त्यामुळे मी त्यांना तो प्रश्‍न विचारला. त्यांनी त्याविषयी लगेच उत्तर दिले. नंतर त्या म्हणाल्या, याचे उत्तर प.पू. डॉक्टरांनाही विचारा आणि ते काय उत्तर देतात, ते मला सांगा. मी तो प्रश्‍न प.पू. डॉक्टरांना विचारला आणि काय आश्‍चर्य, पू. (सौ.) अंजली यांनी ज्या शब्दांत उत्तर दिले, अगदी तंतोतंत त्याच शब्दांत प.पू. डॉक्टरांनीही उत्तर दिले. यामुळे माझी भावजागृती झाली आणि पू. (सौ.) अंजली यांच्या माध्यमातून गुरुतत्त्वच उत्तर देते, याची प्रचीती मला आली.

८ अ. पू. (सौ.) अंजली यांचे मन आणि बुद्धी शुद्ध अन् रिकामे असल्याने (म्हणजे त्यांचा मनोलय आणि बुद्धीलय झाल्याने) त्यांना गुरुतत्त्व किंवा ईश्‍वर याच्याकडून अध्यात्माविषयी अचूक उत्तरे मिळणे

प.पू. डॉक्टरांनी तंतोतंत तेच उत्तर दिल्याविषयी मी पू. (सौ.) अंजली यांना सांगितल्यावर त्या म्हणाल्या, गुरुदेवांचीच ही कृपा आहे. त्यांच्यामुळे मी उत्तर देऊ शकले. आपले मन आणि बुद्धी शुद्ध अन् रिकामे असल्यास (म्हणजे मनोलय आणि बुद्धीलय झाल्यास) गुरुतत्त्वाला किंवा ईश्‍वराला त्याचे विचार, म्हणजे ज्ञान द्यायला सोपे जाते. माझे तसे झाले असल्यामुळे मला अचूक उत्तरे मिळतात. हे खरंच आहे. पू. (सौ.) अंजली यांच्या मनात कोणाविषयी काही अनावश्यक विचार, राग, लोभ, पूर्वग्रह किंवा मत्सर कधीच नसतो. त्यांचे मन नेहमी आनंदी असते आणि दुसर्‍यालाही ते आनंदी करते.

 

९. साधनेविषयी अचूक मार्गदर्शन करणे

साधना करतांना काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे, याचे मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळते. त्यामुळे अनेक साधक त्यांचे मार्गदर्शन घ्यायला येतात आणि प्रत्येकाला त्याच्या प्रकृतीनुरूप मार्गदर्शन मिळाल्याने ते प्राप्त करून आनंदाने जातात. मी विचारल्यावर मलाही त्यांचे मार्गदर्शन मिळते. आता सातत्याने समष्टीचा विचार व्हायला हवा. समष्टी साधनेसाठी अधिकाधिक वेळ द्यायला हवा. समष्टीला लाभदायक असे दृष्टीकोन हवेत. त्यामध्ये मी कुठे न्यून पडतो ? इत्यादी मार्गदर्शन त्या मला करतात. त्याप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न करत आहे.

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१२.२०१५)