‘रविवार, ७.९.२०२५ (भाद्रपद पौर्णिमा) या दिवशी असणारे खग्रास चंद्रग्रहण हे भारतात सर्वत्र दिसणार आहे. खग्रास चंद्रग्रहणाला इंग्रजीत ‘Total lunar eclipse’ म्हणतात. खग्रास चंद्रग्रहण, म्हणजे जेव्हा पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एका सरळ रेषेत येतात अन् पृथ्वीची सावली चंद्रावर पूर्णपणे पडते. त्यामुळे चंद्र पूर्णपणे झाकोळलेला दिसतो. चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेला होते.
१. ग्रहण दिसणारे प्रदेश
‘हे चंद्रग्रहण भारतासह संपूर्ण आशिया खंड, आफ्रिका खंड, संपूर्ण युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, नॉर्वे आणि अंटार्क्टिका या प्रदेशांत दिसेल. हे ग्रहण भारतात सर्वत्र दिसणार आहे.
२. ग्रहणाचे वेध लागणे
२ अ. अर्थ : चंद्रग्रहणापूर्वी चंद्र पृथ्वीच्या छायेत येऊ लागतो. त्यामुळे त्याचा प्रकाश हळूहळू न्यून होण्यास आरंभ होतो. यालाच ‘ग्रहणाचे वेध लागले’, असे म्हणतात.
२ आ. ग्रहण वेधारंभ : हे ग्रहण रात्रीच्या दुसर्या प्रहरात चालू होत असल्याने ३ प्रहर आधी, म्हणजे दुपारी १२.३७ पासून ग्रहण मोक्षापर्यंत ग्रहणाचे वेध पाळावेत. वेधकाळात स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जप-जाप्य, श्राद्ध इत्यादी कर्मे करता येतील. वेधकाळात भोजन निषेध आहे; म्हणून अन्नपदार्थ खाऊ नयेत; मात्र वेधकाळात इतर आवश्यक असलेली कर्मे, उदा. पाणी पिणे, मल-मूत्रोत्सर्ग, झोप घेणे इत्यादी करता येतात. बाल, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्ती आणि गर्भवती यांनी ७.९.२०२५ या दिवशी सायंकाळी ५.१५ वाजल्यापासून ग्रहणाचे वेध पाळावेत. ग्रहण पर्वकाळात, म्हणजे रात्री ९.५७ पासून १.२७ या काळात ‘पाणी पिणे, झोपणे, मल-मूत्रोत्सर्ग’, ही कर्मे करू नयेत.
३. चंद्रग्रहणाच्या वेळा (भारतीय प्रमाण वेळेनुसार)
३ अ. स्पर्श (आरंभ) : रात्री ९.५७
३ आ. संमीलन (conjunction): रात्री ११
३ इ. मध्य : रात्री ११.४२
३ ई. उन्मीलन (opposition) : रात्री १२.२३
३ उ. मोक्ष (शेवट) : रात्री १.२७ (७.९.२०२५ उत्तररात्री १.२७)
३ ऊ. ग्रहणपर्व (टीप १) (ग्रहणाच्या आरंभापासून शेवटपर्यंतचा एकूण कालावधी) : ३ घंटे ३० मिनिटे
टीप १ : पर्व म्हणजे पर्वणी किंवा पुण्यकाल होय. ग्रहण स्पर्शापासून ग्रहण मोक्षापर्यंतचा काल पुण्यकाल आहे. ‘या काळात ईश्वरी अनुसंधानात राहिल्यास आध्यात्मिक लाभ होतो’, असे शास्त्रात सांगितले आहे.
(वरील सर्व वेळा संपूर्ण भारतासाठी आहेत.)
४. ग्रहणकाळात कोणती कर्मे करावीत ?
अ. ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे.
आ. पर्वकाळामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम आणि दान करावे.
इ. पूर्वी काही कारणाने खंडित झालेल्या मंत्राच्या पुरश्चरणाचा आरंभ या कालावधीत केल्यास त्याचे फळ अनंत पटींनी मिळते.
ई. ग्रहण मोक्षानंतर (ग्रहण संपल्यानंतर) स्नान करावे.
उ. ग्रहणकाळामध्ये (पर्वकाळामध्ये) झोप, मल-मूत्रोत्सर्ग, अभ्यंग, भोजन आणि कामविषयसेवन ही कर्मे करू नयेत.
ऊ. एखाद्या व्यक्तीला अशौच असल्यास ग्रहणकाळात ग्रहणासंबंधी स्नान आणि दान करण्यापुरती तिला शुद्धी असते.
५. ग्रहणाचे राशीपरत्वे फल
५ अ. शुभ फल : मेष, वृषभ, कन्या आणि धनु
५ आ. अशुभ फल : कर्क, वृश्चिक, कुंभ आणि मीन
५ इ. मिश्र फल : मिथुन, सिंह, तुला आणि मकर
ज्या राशींना अशुभ फल आहे, त्या व्यक्तींनी आणि गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाहू नये.’
(साभार : दाते पंचांग)
६. ग्रहणकाळात काय वर्ज्य करावे ?
अ. ग्रहणकाळात भोजन निषेध आहे; म्हणून अन्नपदार्थ खाऊ नयेत. ग्रहण लागण्यापूर्वी शिजवलेले अन्न नंतर वापरू नये; कारण त्या अन्नाद्वारे घातक उत्सर्जित किरण शोषले जाऊ शकतात.
आ. ग्रहणकाळ हा साधनेसाठी उत्तम असल्याने झोपून तमोगुण वाढवण्यापेक्षा साधना करून या काळाचा लाभ करून घ्यावा.
इ. ग्रहणकाळात करमणूक आणि ऐष आरामात वेळ वाया घालवू नये; कारण साधकांसाठी ही अमूल्य संधी आहे. या काळात केलेल्या साधनेचे (जप, ध्यान आणि प्रार्थना यांचे) फळ अनंत पटींनी मिळते. यासाठी या काळात उपास्यदेवतेचे किंवा आपल्या गुरुचरणांचे मनोभावे स्मरण करून एकाग्रतेने नामजप करावा.’
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग (९.८.२०२५)
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जयपूर (राजस्थान) येथील प्रसिद्ध ‘खोले हनुमाना’ला...
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक...
सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
