चेन्नईत विश्‍व वारकरी संस्थान द्वारा आयोजित संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या ७५० व्या जयंती सोहळ्याचे उद्घाटन सनातन संस्थेच्या श्रीचित्‌‌शक्ति सौ. अंजली गाडगीळ यांच्या हस्ते !

‘ज्ञानोत्तर भक्ती’ ग्रंथाचे प्रकाशन करतांना डावीकडून श्रीचित्‌‌शक्ति सौ. अंजली गाडगीळ, डॉ. श्री रघुनाथदास महाराज, मा. राज्यपाल आर्.एन्. रवि, गणपति तुकाराम महाराज आणि डॉ. रंगन महाराज

चेन्नई (तमिळनाडू), १६ ऑगस्ट (वार्ता.) – येथे विश्‍व वारकरी संस्थानाने एका भावपूर्ण सोहळ्याद्वारे संत ज्ञानेश्‍वर महाराजांची ७५० वी जयंती साजरी केली. सोहळ्याला सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डाॅ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. तसेच तमिळनाडूचे राज्यपाल आर्.एन्. रवि कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यात ७५० वारकर्‍यांनी माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त ज्ञानेश्‍वरीचे पठण केले. सोहळा शहरातील आड्यार भागात असलेल्या श्री आनंद पद्मनाभ स्वामी मंदिरात पार पडला

सोहळ्याचे दीपप्रज्वलनाद्वारे उद्घाटन करतांना श्रीचित्‌‌शक्ति सौ. अंजली गाडगीळ

सोहळ्याचा शुभारंभ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, तसेच डॉ. श्री रघुनाथदास महाराज यांच्या मातोश्री गुरुमाता मीनालोचनी, डॉ. श्री रघुनाथदास महाराज आणि त्यांच्या पत्नी सौ. शुभलक्ष्मी यांच्या मंगलहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. या वेळी ‘विश्‍व वारकरी संस्थाना’चे उत्तराधिकारी डॉ. श्री रघुनाथदास महाराज लिखित ‘राजविद्या’ (ज्ञानेश्‍वरीतील ९ व्या अध्यायावर भाष्य), तसेच ‘ज्ञानोत्तर भक्ती’ (संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या शिकवणीचे गुह्य) या ग्रंथांचे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि आर्.एन्. रवि यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. डॉ. श्री रघुनाथदास महाराजांनी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना संत ज्ञानेश्‍वर महाराजांची मूर्ती भेट देऊन त्यांचा सन्मान केला.

श्रीचित्‌‌शक्ति सौ. अंजली गाडगीळ यांना संत ज्ञानेश्‍वर महाराजांची मूर्ती भेट देऊन त्यांचा सन्मान करतांना डॉ. श्री रघुनाथदास महाराज

‘विश्‍व वारकरी संस्थाना’चे कार्य !

विश्‍व वारकरी संस्थान गेली ३० वर्षे महाराष्ट्रातील भक्ती परंपरेचा जगभर प्रचार-प्रसार करत आहे. यांतर्गत संस्थानाने आतापर्यंत तमिळनाडू राज्यातील १५ सहस्र लोकांना अभंग, तसेच ज्ञानेश्‍वरीचे पठण यांचे प्रशिक्षण दिले आहे. जगभरातील ५ लाख तमिळ भक्त हे संस्थानाच्या विविध कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतात.

Leave a Comment