‘श्री कैलास दिव्य दर्शन प्रदर्शना’चे सनातन संस्थेच्या पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या हस्ते उद्घाटन !

कैलास पर्वतावरील अद्भुत आणि देवतांच्या दिव्य प्रतिमांनी उपस्थितांना कैलास पर्वतावर असल्याची आली अनुभूती !

श्री कैलास दर्शन ही प्रतिमा पू. (सौ.) मनीषा पाठक यांना देतांना श्री. रमेश कुंदूर

पुणे, ६ जुलै (वार्ता.) – येथील बालगंधर्व कलादालनामध्ये श्री कैलास पर्वतावरील निसर्गनिर्मित अलौकिक आणि दुर्मिळ अशा प्रतिमांचे प्रदर्शन लावले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन ५ जुलैला दिवशी सनातन संस्थेच्या पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या आरंभी प्रवेशद्वाराजवळ प्रमुख पाहुण्या सनातन संस्थेच्या पू. (सौ.) मनीषा पाठक यांचे, तसेच संयोजक श्री. रमेश कुंदूर यांचे ५ सुवासिनींनी औक्षण केले. संयोजकांनी आलेल्या सर्वांचे स्वागत केले. यानंतर कलादालनाचे मुख्य प्रवेशद्वाराजवळ मान्यवरांनी धर्मशास्त्रानुसार श्रीफळ वाढवून प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

श्री गणेशाचे श्लोक म्हणून आणि शंखनाद करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर संयोजक श्री. रमेश कुंदूर यांनी स्वत:च्या प्रास्ताविकातून उद्देश आणि अलौकिक प्रदर्शनाविषयी त्यांचे अनुभवकथन केले. या वेळी श्री. कुंदूर यांच्या धर्मपत्नी सौ. शोभा कुंदूर याही उपस्थित होत्या.

मला मिळालेली दिव्य ऊर्जा तुम्हाला मिळावी, हाच या प्रदर्शनामागचा हेतू ! – रमेश कुंदूर

श्री. रमेश कुंदूर प्रदर्शनाची माहिती देतांना आणि मध्यभागी पू. (सौ.) मनीषा पाठक, त्यांच्या समवेत सर्व जिज्ञासू प्रदर्शन पहातांना

छायाचित्र काढतांना या ठिकाणी काहीतरी दैवी वास असावा, असे मला संकेत मिळत होते. त्यानुसार या ठिकाणी महादेव, माता पार्वती, श्री गणेश, कार्तिकेय, तुळजाभवानी, पद्मनाभ मंदिरातील निद्रा घेत असलेला विष्णु, मारुति, नरसिंह आदींच्या प्रतिमा मला दिसून आल्या. या प्रतिमा पहाण्यासाठी नुसते विज्ञानवादी असून चालत नाही, त्यासाठी आपण त्या मनाच्या अंत:र्चक्षुने पहाव्या लागतात. या छायाचित्रांची पुस्तिका आणि डीव्हीडी सिद्ध केली. ती करवीरपिठाच्या शंकराचार्यांना दाखवली. ती पुस्तिका पाहून तेही अचंबित झाले होते. मला कैलास पर्वतावरून जी ऊर्जा मिळाली आहे, ती तुम्हा सर्वांना मिळावी, हाच माझा या प्रदर्शनामागचा शुद्ध हेतू आहे. याचसाठी मी ‘कैलासाचे दिव्यदर्शन’ या यूट्यूब चॅनलवरसुद्धा हे सर्व ठेवले आहे.

या वेळी श्री. रमेश कुंदूर यांनी सनातनच्या पू. (सौ.) मनीषा पाठक यांचा कैलासाची दिव्य दर्शन प्रतिमा, भेटवस्तू आणि श्रीफळ देऊन सन्मान केला. त्याचप्रमाणे अन्य उपस्थित मान्यवरांचाही सन्मान भेटवस्तू आणि श्रीफळ देऊन करण्यात आला. पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी श्री. रमेश कुंदूर यांना सनातन-निर्मित भगवान शिवाची सात्त्विक प्रतिमा देऊन सन्मान केला. या प्रसंगी ‘सरस्वती बुक कंपनी’च्या व्यवस्थापनातील अधिकारी, तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता आभारप्रदर्शन आणि श्लोक यांनी करण्यात आली.

उदघाटन कार्यक्रमासाठी उपस्थित नागरिक

हे प्रदर्शन पहाणार्‍याला ईश्वरी साक्षात्काराशी जोडण्याचे सामर्थ्य ! – पू. (सौ.) मनीषा पाठक

भक्ताच्या भावाप्रमाणे त्याला भगवंताच्या अस्तित्वाची प्रचिती येतेच येते. ‘भाव तेथे देव’, असे आपल्याकडे म्हटले आहे. आजकाल अनेक जण देवाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करतात; पण हे प्रदर्शन म्हणजे या प्रश्नांचे उत्तर आहे. हे प्रदर्शन पहाणार्‍याला ईश्वरी साक्षात्काराशी जोडण्याचे सामर्थ्य आहे. आपल्या संस्कृतीत १४ विद्या आणि ६४ कला यांतून ईश्वरप्राप्ती कशी करायची ? हे शिकवले जात होते. सनातन संस्थाही ईश्वरप्राप्तीसाठी कला शिकवते. श्री. कुंदूर यांनी केलेली ‘फोटोग्राफी’ (छायाचित्रण) हे ईश्वराचे सगुण रूप समाजासमोर आणून त्यांची भावभक्ती वाढवणारी आहे. ते कलासाधना ईश्वरसेवा म्हणून करत आहेत, असे लक्षात येते. त्यामुळे त्यांची ही सेवा महादेवाच्या चरणी रुजू झाली, असे हे प्रदर्शन पहातांना वाटले. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे विनम्रता आणि ईश्वराप्रतीची निष्ठा. आताच्या काळात अशी श्रद्धा पहायला मिळणे दुर्मिळ आहे.  सर्वांनी हे प्रदर्शन अधिकाधिक पहावे आणि आध्यात्मिक स्तरावर त्याचा लाभ घ्यावा.

श्री. रमेश यल्लाप्पा कुंदूर यांचा परिचय

‘सरस्वती बुक कंपनी’ आणि ‘आदर्श विद्यार्थी प्रकाशन, पुणे’ यांचे मालक श्री. रमेश यल्लाप्पा कुंदूर हे व्यावसायिक असूनही ते मुळातच धार्मिक असल्याने आतापर्यंत त्यांनी १२ वेळा अमरनाथ यात्रा, १४ वेळा वैष्णौदेवी यात्रा, चारधाम यात्रा, गिरनार परिक्रमा, नर्मदा परिक्रमा, कर्दळीवन परिक्रमा करत वर्ष २०१३ मध्ये कैलास मानसरोवर परिक्रमा केली. परिक्रमा करत असतांना कैलास पर्वतावरील अनेक ठिकाणांची छायाचित्रे घेतली. त्यातून त्यांना ज्या देवतांच्या प्रतिमांचा साक्षात्कार झाला, त्याचा त्यांनी सूक्ष्मातून अभ्यास करून अशी सर्व छायाचित्रे एकत्रित करून याचा सर्व समाजाला लाभ व्हावा, या मूळ उद्देशाने अशा दैवी प्रदर्शनाचे आयोजन ठिकठिकाणी करतात. या पूर्वी अनेक ठिकाणी लावण्यात आलेल्या प्रदर्शनांचा लाभ समाजाला मोठ्या प्रमाणात झाला आहे.

वैशिष्ट्यपूर्ण

१. हे प्रदर्शन पहातांना ‘प्रत्यक्षात आपणही कैलास पर्वतावर आहोत कि काय ? असे आपल्याला वाटते’, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.

२. ‘श्री. रमेश कुंदूर यांचा भगवान शिवाप्रती असणारा उत्कट भाव, त्यांची माहिती सांगण्याची तळमळ यांमुळे हे प्रदर्शन नसून शिवतत्त्व असल्याची अनुभूती आली’, असे या ठिकाणी उपस्थित असलेल्या अनेकांनी सांगितले.

३. कैलासाचे दिव्य दर्शन याविषयी श्री. कुंदूर माहिती सांगत होते, त्या वेळी वातावरणातही पुष्कळ पालट जाणवत होता, तसेच या वेळी पाऊसही पडला.

Leave a Comment