प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय भाग – ३

प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय भाग – १ वाचण्यासाठी ‘क्लिक’ करा !

प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय भाग – २ वाचण्यासाठी ‘क्लिक’ करा !

३. प्राणशक्तीच्या प्रवाहातील अडथळ्यांवर उपाय करणे

३ अ. न्यास कसा करावा ?

प्रयोगाद्वारे प्राणशक्तीच्या प्रवाहातील अडथळ्याचे स्थान, तसेच मुद्रा आणि नामजप शोधल्यानंतर अडथळ्याच्या स्थानी नामजप करत उपाय करावे लागतात. यासाठी न्यास कसा करावा, हे समजून घेणे आवश्यक आहे. मुद्रांचा पुढील प्रकारे न्यास करावा.

मुद्रा न्यास
१. अंगठ्याचे टोक बोटाच्या
टोकाला लावणे
मुद्रेच्या वेळी जोडल्या जाणार्‍या बोटाच्या टोकाने न्यास करावा.
२. अंगठ्याचे टोक बोटाच्या
मुळाशी लावणे
संबंधित बोटाच्या टोकाने न्यास करावा.
३. बोटाचे टोक तळहाताला लावणे तळहाताने न्यास करावा.
४. तर्जनीचे टोक अंगठ्याच्या मुळाशी लावणे अंगठ्याच्या टोकाने न्यास करावा.

 

३ आ. उपाय करण्याच्या पद्धती

३ आ १. न्यासस्थानी बोटे फिरवून उपाय करणे

३ आ १ अ. तत्त्व : न्यासस्थानी बोटे खालून वर किंवा वरून खाली नेऊन उपायांची दिशा ठरवावी आणि त्यानुसार उपाय करावेत.

३ आ १ आ. कृती

सूचना : अंगठा सोडून हाताची उर्वरित बोटे अडथळ्याच्या स्थानी शरिरापासून १ – २ सें.मी. अंतरावरून वरून खाली वा खालून वर अशी नेल्यानंतर ज्या क्रियेच्या वेळी श्‍वास अडकल्यासारखा होतो, त्यावरून आपल्याला उपाय करण्याची दिशा कळते. पुढे दिलेल्या लिखाणामध्ये जेथे उपायांची दिशा ठरवण्याच्या दृष्टीने बोटे वर-खाली करा, असा उल्लेख असेल, तेथे अंगठा सोडून हाताची उर्वरित बोटे हलवायची आहेत, असे समजावे. जेथे उपाय करण्याच्या दृष्टीने बोटे वर-खाली करा, असा उल्लेख असेल, तेथे न्यास करण्यासाठी उपयोगात आणले जाणारे बोटाचे टोक, दोन बोटांचे मिळून झालेले टोक वा तळहात अडथळ्याच्या स्थानी शरिरापासून १ – २ सें.मी. अंतरावरून वर-खाली हलवून उपाय करायचे आहेत, असे समजावे. न्यास करण्यासाठी उपयोगात आणायच्या बोटांविषयी माहिती सूत्र ३ अ यात दिली आहे.
IMG_0783

१. न्यासस्थानी बोटे खालून वर नेतांना श्‍वास अडकल्यासारखे झाल्यास त्या ठिकाणी बोटे ४ – ५ सें.मी. भागात खालून वर हलवावीत.

२. बोटे वरून खाली नेतांना श्‍वास अडकल्यासारखे झाल्यास त्या ठिकाणी बोटे ४ – ५ सें.मी. भागात वरून खाली हलवावीत.

३. काही वेळा एखाद्या न्यास करण्याच्या ठिकाणावर हात वरून खाली आणि खालून वर नेतांना दोन्ही वेळा श्‍वास थांबतो. अशा वेळी –

अ. हाताची हालचाल वरून खाली आणि खालून वर अशी करावी.

आ. न्यास करण्याच्या ठिकाणापासून दोन्ही दिशांना हाताची बोटे २ – ३ सें.मी. दूर नेऊन उपाय करावेत.

४. सहस्रारचक्रापासून पाठच्या बाजूने सरळ रेषेत जेथे केसांचा भाग संपतो, तेथपर्यंत बोटे फिरवावीत, तसेच उलटेही करून पहावे. दोन्हींपैकी जे करतांना जास्त त्रास जाणवेल, ती उपायांची दिशा समजावी आणि त्यानुसार उपाय करावेत.

३ आ २. त्रास असलेल्या इंद्रियाच्या स्थानी बोटे फिरवून उपाय करणे

३ आ २ अ. तत्त्व : विकारानुसार इंद्रियाच्या स्थानी बोटे फिरवण्याची दिशा ठरवावी आणि त्यानुसार उपाय करावेत.

३ आ २ आ. कृती : काही वेळा कुंडलिनीचक्रावरील किंवा शरिराच्या इतर भागातील न्यासस्थानी उपाय केल्यास त्रास दूर व्हायला वेळ लागतो, उदा. लघवी तुंबणे, शौच न होणे, पायाला सूज येणे. अशा वेळी त्रास असलेल्या इंद्रियाच्या स्थानी शरिरापासून १ – २ सें.मी. अंतरावरून बोटे फिरवून उपाय केल्यास त्रास लवकर दूर होण्यास साहाय्य होते. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

१. पायाला सूज असल्यास पायावर बोटे खालून वर मंद गतीने न्यावीत.

२. लघवी होत नसल्यास बोटे नाभीस्थानाच्या एक इंच खालून स्वाधिष्ठानचक्रापर्यंत पुनःपुन्हा न्यावीत.

gas_constipation

३. शौचाला होत नसल्यास पोटातील मोठ्या आतड्याच्या दिशेने, म्हणजे पोटाच्या उजव्या बाजूला खालून आरंभ करून बोटे सरळ बरगड्यांपर्यंत वर आणावीत. नंतर ती सरळ डाव्या बाजूला न्यावीत. तेथून ती सरळ खाली घेऊन गुदद्वाराच्या दिशेने पुनःपुन्हा न्यावीत. (सोबतचे चित्र पहा.)

३ आ ३. त्रासाशी संबंधित कुंडलिनीचक्रांच्या किंवा इंद्रियांच्या स्थानी न्यास करणे

कुंडलिनीचक्रांच्या ठिकाणी वरून खाली किंवा खालून वर बोटे नेऊन न्यासाचे स्थान शोधणे जमले नाही वा तसे करणे शक्य नसेल, तर त्रासाशी संबंधित कुंडलिनीचक्रांच्या स्थानी, तसेच त्या स्थानांच्या ३ – ४ सें.मी. वर-खाली शरिरापासून १ – २ सें.मी. अंतरावरून न्यास करावा.

आवश्यकता वाटल्यास त्रास असलेल्या इंद्रियांच्या स्थानीही शरिरापासून १ – २ सें.मी. अंतरावरून न्यास करावा.

३ आ ४. सहस्रारचक्राच्या ठिकाणी हाताची पाचही बोटे जुळवून किंवा तळवा ठेवून न्यास करणे

३ आ ४ अ. त्रास असलेले : अशांनी सहस्रारचक्राच्या ठिकाणी शरिरापासून १ – २ सें.मी. अंतरावर हाताची पाचही बोटे जुळवून किंवा तळवा ठेवून न्यास केल्यास उपाय होतात.

३ आ ४ आ. त्रास नसलेले : यांनी सहस्रारचक्राच्या ठिकाणी शरिरापासून १ – २ सें.मी. अंतरावर पाचही बोटे जुळवून ठेवल्यास त्यांची भावजागृती होते. सहस्रारचक्राच्या ठिकाणी हाताचा तळवा ठेवल्यास बोटांपेक्षा अधिक भावजागृती होते.

४. उपायांच्या संदर्भातील सूचना

४ अ. उपाय करणार्‍याने हे लक्षात घ्यावे !

४ अ १. सर्वांनीच, विशेषतः वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्यांनी नामजप करत उपाय करणे आवश्यक

अ. वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्यांच्या बोटांतून त्रासदायक शक्ती प्रक्षेपित होत असते. अशा बोटांद्वारे उपाय केल्यास शरिरातही त्रासदायक शक्ती प्रक्षेपित होते. त्यामुळे नामजपाशिवाय उपाय केल्यास त्रासात वाढ होते. एखाद्याला त्रासामुळे नामजप करणे अशक्य असल्यास त्याने स्वतःवर उपाय करू नयेत. त्याने आयुर्वेदीय उपचार, रिकाम्या खोक्यांचे उपाय अशा अन्य उपायपद्धतींचा अवलंब करावा. जरासा किंवा मध्यम त्रास असलेल्यांना नामजप करणे शक्य असते. त्यामुळे ते स्वतःवर उपाय करू शकतात.

आ. सध्याच्या कलियुगात वाईट शक्तींचा प्रकोप एवढा झाला आहे की, सर्वसाधारणतः प्रत्येक व्यक्तीलाच अल्प-अधिक प्रमाणात वाईट शक्तींचा त्रास हा असतोच. त्यामुळे प्रत्येकानेच नामजप करत उपाय करणे आवश्यक आहे.

४ आ. प्रत्यक्ष उपाय करतांना लक्षात घ्यावयाच्या सूचना

४ आ १. उपाय करण्यासाठी शक्यतो उजव्या हाताचा उपयोग करावा !

प्राणशक्तीच्या वहनातील अडथळा दूर करण्यासाठी सूर्यनाडीशी संबंधित उजव्या हाताने उपाय करणे अधिक योग्य आहे. बहुधा उपाय काही घंटे करावे लागत असल्याने हात दुखतो. तेव्हा एक हात दुखला की, दुसर्‍या हाताने उपाय करावेत.

४ आ २. अडथळ्याची दोन निरनिराळी स्थाने मिळाली, तर एका हाताने एका अडथळ्याच्या स्थानी आणि दुसर्‍या हाताने दुसर्‍या अडथळ्याच्या स्थानी उपाय करावेत आणि एकच स्थान मिळाले, तर एका हाताने अडथळ्याच्या स्थानी उपाय करावेत आणि दुसर्‍या हाताने मुद्रा करावी !

४ आ ३. कुंडलिनीचक्रस्थान आणि शरिराचे विविध भाग अशा ठिकाणी अडथळे असल्यास अधिकाधिक अडथळा असणार्‍या दोन ठिकाणी उपाय करावेत.

४ आ ४. उपाय करतांना मध्ये मध्ये अडथळ्याचे नवीन स्थान कुठे आहे ?, हे शोधावे आणि त्यानुसार उपाय करावेत !

प्रयोग करून न्यासाचे स्थान शोधल्यानंतर उपाय करतांना प्रत्येक २० ते ४० मिनिटांनी अडथळ्याचे नवीन स्थान कुठे आहे ?, हे शोधावे आणि त्यानुसार उपाय करावेत; कारण अडथळ्याचे स्थान उपायांमुळे पालटते. काही वेळा वाईट शक्तीही अडथळ्याचे स्थान पालटतात.

४ आ ५. प्रयोगाद्वारे नेमकी मुद्रा वा नामजप कोणता करावा, हे ठरवता न आल्यास लक्षात ठेवायचा नियम

प्रयोगाद्वारे मुद्रा शोधतांना काही वेळा दोन मुद्रांच्या वेळी एकसारखेच जाणवते. अशा वेळी त्या दोन मुद्रा पुन्हा करून पहाव्यात, तरीही नेमकी कोणती मुद्रा करावी, हे लक्षात न आल्यास जेवढा वेळ आपण उपाय करणार त्याच्या अर्धा वेळ एक मुद्रा आणि अर्धा वेळ दुसरी मुद्रा करावी. असे करतांना ज्या मुद्रेने अधिक उपाय होतात असे जाणवेल, ती मुद्रा पुढे चालू ठेवावी. सूत्र २ आ. उच्च देवतांचे आणि निर्गुणाशी संबंधित नामजप अन् मुद्रा यामध्ये दिल्याप्रमाणे नामजपाच्या संदर्भातील प्रयोग करतांनाही वरील नियम लक्षात ठेवावा.

४ आ ६. अडथळ्याच्या स्थानी शरिरापासून १ – २ सें.मी. अंतरावरून उपाय करावेत !

अडथळ्याच्या स्थानी बोटे फिरवून उपाय करतांना शरिरापासून १ – २ सें.मी. अंतरावरून बोटे फिरवावीत, तसेच अडथळ्याच्या स्थानी न्यास करतांनाही शरिरापासून १ – २ सें.मी. अंतरावरून न्यास करावा. वयोवृद्ध वा आजारी व्यक्ती यांना न्यास करतांना आधाराची आवश्यकता वाटल्यास त्यांनी शरिराला स्पर्श करून न्यास करावा.

४ इ. देवतेच्या नामजपाला ॐ किंवा महा लावणे

४ इ १. उपायांच्या वेळी नामजपाला ॐ लावण्यासंबंधीचे नियम

४ इ १ अ. सर्वसाधारण व्यक्तीसाठी

१. प्राणशक्तीवहन संस्थेत निर्माण झालेला अडथळा अल्प प्रमाणात असेल, तर श्री लावलेला प्रचलित नामजप करावा. (प्रचलित नामजपाच्या आरंभी श्री नसेल, उदा. ॐ नमो भगवते वासुदेवाय ।, तर तो नामजप आहे तसा करावा.)

२. प्राणशक्तीवहन संस्थेत निर्माण झालेला अडथळा मध्यम प्रमाणात असेल, तर प्रचलित नामजपाला आरंभी एक ॐ आणि शेवटी एक ॐ लावावा.

३. प्राणशक्तीवहन संस्थेत निर्माण झालेला अडथळा तीव्र प्रमाणात असेल, तर नामजपाला आरंभी दोन ॐ आणि शेवटी दोन ॐ लावावेत.

४ इ १ आ. साधना करणार्‍या व्यक्तीसाठी : सध्या आपत्काळाची तीव्रता वाढली असल्याने साधना न करणार्‍या व्यक्तीच्या तुलनेत साधना करणार्‍या व्यक्तीवर वाईट शक्तींची आक्रमणे होण्याचे प्रमाण अधिक असते. यासाठी कोणत्याही साधनामार्गाने साधना करणार्‍यांनी आणि कोणत्याही संप्रदायाच्या साधकांनी नामजपाची परिणामकारकता वाढवण्याच्या दृष्टीने नामजपाला आरंभी दोन ॐ आणि शेवटी दोन ॐ लावून उपाय करावेत.

४ इ २. देवतेच्या नामजपाला महा लावणे

ॐ प्रमाणेच काही प्रचलित नामजपांच्या (उदा. गणपति, लक्ष्मी, विष्णु, रुद्र) आरंभी महा हा शब्द लावणे उपयुक्त ठरते. यामुळे निर्गुण तत्त्वाचा अधिक लाभ होऊन त्रास लवकर अल्प होण्यास साहाय्य होते.

४ ई. अन्य सूचना

१. उपाय करणार्‍याने त्रास दूर होईपर्यंत प्रतिदिन न्यूनतम (कमीतकमी) २ घंटे (तास) उपाय करावेत ! : काही वेळा २ घंटे पूर्ण होण्यापूर्वीच एखाद्याचा त्रास दूर होऊ शकतो. असे झाल्यास उपाय करणे थांबवावे.

२. शोधलेल्या उपायांमुळे १ घंट्याने थोडा लाभ झाल्यास तेच उपाय चालू ठेवावेत.

३. शोधलेल्या उपायांमुळे १ घंट्याने काहीच लाभ न झाल्यास पुन्हा उपाय शोधावेत आणि करावेत.

४ उ. उपाय पूर्ण झाल्यावर उपास्यदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करावी.

४ ऊ. उपायांच्या जोडीला अन्य औषधोपचारही चालू ठेवण्यास आडकाठी नाही !

उपायांच्या जोडीलाच रिकाम्या खोक्यांचे उपाय, औषधे, चुंबक-चिकित्सा यांसारखे उपायही चालू ठेवायला आडकाठी नाही.

५. उपाय कोणी शोधू नयेत ?

वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्यांनी उपाय स्वतः शोधू नयेत; कारण वाईट शक्ती चुकीचे उत्तर मिळेल, असे करतात.

वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्यांनी स्वतःमध्ये भाव असल्यास स्वतः उपाय शोधण्याचा प्रयत्न करावा आणि त्याची दुसर्‍याकडून निश्‍चिती करून घ्यावी किंवा उपायांचा स्वतःवर सकारात्मक परिणाम होत आहे ना, याचा अभ्यास करावा. उपायांचा सकारात्मक परिणाम होत असल्यास उपाय योग्य आहेत, असे समजावे आणि ते चालू ठेवावेत.

टीप : आतापर्यंतच्या भागांत दिल्याप्रमाणे न्यासस्थान, मुद्रा आणि नामजप स्वतःला शोधता न आल्यास कोणते उपाय करावेत, हेही ग्रंथात दिले आहे.

संदर्भ : सनातन – निर्मित ग्रंथ ‘प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय’