आपत्काळात आधार ठरणारी छतवाटिका (Terrace Gardening) भाग-२

Article also available in :

भाग १ वाचण्यासाठी भेट द्या…आपत्काळात आधार ठरणारी छतवाटिका (Terrace Gardening) भाग-१

 

प्रतिकात्मक छायाचित्र

 

उ. खत

अशा कुंड्यांतील रोपांना महिन्यातून किमान एकदा तरी खत द्यावे. गांडूळखत, शेणखत, जीवामृत किंवा घरच्या घरी स्वयंपाकघरातील कचर्‍यापासून (भाज्यांची देठे, फळांच्या साली, कांदा, तसेच लसूण यांची टरफले इत्यादींच्या कचर्‍यापासून) तयार केले जाणारे कंपोस्ट आपण खत म्हणून देऊ शकतो. त्याशिवाय आठवड्यातून एकदा १०-२० मिली. गोमूत्र पाण्यामध्ये मिसळून ते पाणी झाडांवर फवारू शकतो. आपल्याकडे गायी असतील, तर जीवामृत (एक प्रकारचे नैसर्गिक द्रव खत. पाण्यामध्ये शेणखत, गोमूत्र, गूळ किंवा तूरडाळ, चणाडाळ, मूग, चवळी इत्यादी द्विदल धान्याचे पीठ आदी पदार्थ घालून ते सिद्ध केले जाते, ज्यामुळे रोपांची वाढ आणि विकास चांगला होतो, तसेच मातीची गुणवत्ता सुधारते.) हेही एक उत्तम प्रकारचे खत घरच्या घरी बनवून देता येऊ शकते.

१. जीवामृत बनवण्याची पद्धत

गोमूत्र, शेण, गूळ आणि कडधान्याचे पीठ यांपासून जीवामृत बनवले जाते. साधारण २०० लिटर पाण्यात १० लिटर गोमूत्र, १० किलो शेण, १ किलो गूळ (पिवळा किंवा काळा) आणि १ किलो धान्याचे पीठ (तूरडाळ, चणाडाळ, मूग, चवळी इत्यादी द्विदल धान्याचे पीठ) घालून त्याचे मिश्रण करावे आणि ८ दिवस तसेच ठेवावे. हे मिश्रण प्रतिदिन सकाळ सायंकाळ काठीने थोडेसे ढवळावे. आपल्याला कमी प्रमाणात जीवामृत लागणार असेल, तर वर दिलेल्या प्रमाणानुसार ते ते घटक कमी घेऊन बनवू शकतो. ८ दिवसांमध्ये या मिश्रणामध्ये झाडांना पोषक असलेले जिवाणू पुष्कळ प्रमाणात आढळून येतात. जीवामृत या खतामुळे झाडाला चांगल्या प्रमाणात पोषकद्रव्ये मिळतात.

झाडांवर कीड किंवा रोग आला, तर त्यावर कडुलिंबाचा किंवा तंबाखू, लसूण-मिरची अर्क कीटकनाशक म्हणून फवारू शकतो. प्रत्येक वेळी एकाच प्रकारचा अर्क न वापरता हे अर्क आलटून-पालटून वापरावेत.

 

ऊ. मातीविरहित कुंडी

कुंड्यांमध्ये भाजीपाला लावण्यासाठी योग्य प्रमाणात आर्द्रता, खेळती हवा, योग्य प्रमाणात पाण्याचा निचरा आणि मुळांची सहजतेने वाढ होणे आवश्यक असते. जेव्हा भूमीवर रोपे लावली जातात, तेव्हा रोपांना घातलेले अतिरिक्त पाणी भूमीत खोलवर मुरते; पण गच्चीवर बागकाम करतांना आपण कुंडीत माती घातली, तर कुंडीला कितीही भोके असली, तरी माती पाणी धरून ठेवते. त्यामुळे हवा खेळती रहाण्यास अडथळा निर्माण होऊन त्याचा परिणाम रोपाच्या वाढीवर होतो. हे टाळण्यासाठी गच्चीवर बागकाम करतांना शक्यतो मातीचा अल्प वापर करून ओल्या आणि सुक्या कचर्‍याचे माध्यम वापरले जाते. गेल्या काही वर्षांपासून मातीविरहित (किंवा अगदी अल्प प्रमाणात मातीचा उपयोग) बागकाम ही संकल्पना लोकप्रिय होत आहे.

१. मातीविरहित बागकाम करतांना कुंडी भरण्यासाठी आवश्यक घटक

सुका कचरा, (उदा. हाताने चांगल्या प्रकारे विसविशीत करून घेतलेल्या नारळाच्या शेंड्या, भाताचे तुस , रसवंतीगृहात मिळणारा उसाचा टाकाऊ चोथा (चोयटा), सुकलेला पालापाचोळा, वाळू, विटांचे बारीक तुकडे), ओला कचरा (छान कुजलेले कंपोस्ट खत/गांडूळ खत, निम पेंड, बायो-कल्चर, स्वयंपाकघरातील कचरा), ‘कल्चर’ (खत बनवण्याची प्रक्रिया गतीमान करणारा घटक, जसे दही बनवण्यासाठी विरजण घालतो, त्याप्रमाणे खत बनवण्यासाठी ‘कल्चर’ घातले की, खत लवकर तयार होते.)

प्रतिकात्मक छायाचित्र

२. कुंडी भरण्याची पद्धत

कंपोस्ट करण्यासाठी ओला कचरा ३० टक्के आणि सुका कचरा ७० टक्के अशा प्रमाणात घ्यावा. ओल्या कचर्‍यामध्ये (पालेभाज्यांची देठे, खराब झालेली पाने, फळांच्या साली, बिया, चहाचा चोथा, बुरशी किंवा कीड लागलेले धान्य इत्यादी) भाजीची देठे, शिळे अन्न, फळांचा खराब भाग असे घेऊ शकतो. तेलकट, तूपकट किंवा मसालेदार शिळे पदार्थ ओल्या कचर्‍यामध्ये घेऊ नयेत. ते घ्यायचे असतील, तर ते पदार्थ चाळणीमध्ये घ्यावेत. ते पाण्याने व्यवस्थित धुऊन घ्यावेत; जेणेकरून त्यातील तेल, मीठ-मसाला आदी निघून जाईल. मग ते पदार्थ आपण ओल्या कचर्‍यात घेऊ शकतो. सुक्या कचर्‍यामध्ये झाडाचा पालापाचोळा, काड्या, सुकलेली पाने असे घेऊ शकतो. कुंडीमध्ये सगळ्यात खाली पालापाचोळा घालावा. पालापाचोळ्याच्या ऐवजी नारळाच्या शेंड्या छान पिंजून त्याचाही थर देऊ शकतो. त्यावर थोडे ‘कल्चर’ घालावे. दुधाचे दही बनवण्यासाठी जसे विरजण घालावे लागते, तसे कचर्‍याचे खत बनवण्यासाठी ‘कल्चर’ घालावे लागते. देशी गायीचे ताजे शेण हे एक उत्तम ‘कल्चर’ आहे. ‘कल्चर’ पाण्यात मिसळून वापरावे. बाजारात विविध प्रकारची कल्चर उपलब्ध असली, तरी देशी गायीचे शेण किंवा आंबट ताक, दही, गूळपाणी हे नैसर्गिक पदार्थ ‘कल्चर’ म्हणून वापरू शकतो. ‘कल्चर’ टाकून झाल्यावर त्यावर ओला कचरा घालावा. ओला कचरा टाकतांना तो बारीक करून घालावा. त्यामुळे कचरा कुजण्याची प्रक्रिया वेगाने होते. त्यावर सुका कचरा घालावा. नंतर परत ‘कल्चर’ घालावे. अशा प्रकारे सुका कचरा, ‘कल्चर’, ओला कचरा हे एक-आड-एक पद्धतीने कुंडी भरेपर्यंत घालावे. कुंडीच्या वरच्या भागापासून २ इंच सोडून द्यावे. त्यानंतर ती कुंडी सुती कापडाने झाकून ठेवावी. प्रत्येक ३ दिवसांनी कचरा थोडा वर-खाली करावा. आठवड्यातून एक-दोन वेळा त्यामध्ये ‘कल्चर’ आणि अळ्या होऊ नयेत, म्हणून कडुलिंबाचा पाला घालावा. तो उपलब्ध नसेल, तर ‘नीम पेंड’ घालावी. कंपोस्ट बनवतांना अळ्या झाल्या; तर त्यामध्ये थोडा सुका पालापाचोळा घालावा. कुंडीमध्ये माती घालायचीच असेल, तर नारळाच्या शेंड्यांचा सर्वांत खाली थर दिल्यानंतर मातीचा थर द्यावा; त्यानंतर पण नंतर माती वापरू नये. कचर्‍यापासून खत करतांना कचरा कुजवायचा आहे, सडवायचा नाही, हे लक्षात घ्यावे. (कुजणे ही नैसर्गिक क्रिया आहे, तर सडणे हे अनैसर्गिक क्रिया आहे. कुजणे हे चांगल्या सूक्ष्मजीवांचे, तर सडणे हे वाईट सूक्ष्मजीवांचे कार्य आहे. ऑक्सिजन उपलब्ध असला, तरच कुजण्याची प्रक्रिया घडते आणि ऑक्सिजन उपलब्ध नसेल, तर सडण्याची प्रक्रिया घडते. कुजण्याचा तितका वास घाण येत नाही; पण सडण्याचा येतो.) या प्रक्रियेत आपण ‘नॅशनल सेंटर फॉर ऑर्गनिक फार्मिंग’चे ‘वेस्ट डिकंपोझर’ही वापरू शकतो. त्यामुळे कुजण्याच्या प्रक्रियेला गती येते. कंपोस्टिंगचा वास येते असेल, तर अर्धा चमचा हळद किंवा अर्धा चमचा हिंग पाण्यात मिसळून ते पाणी थोडे घालू शकतो.

अशा प्रकारे साधारण २ ते ३ महिन्यांत चांगल्या प्रकारचे कंपोस्ट खत तयार होते. ते २-३ घंटे उन्हात सुकवून चाळून घ्यावे. कंपोस्ट तयार झाल्यावर त्याला ओल्या मातीप्रमाणे चांगला वास येतो. यामध्ये आपण रोपे लावू शकतो किंवा बिया रुजवू शकतो. या कंपोस्टचा खत म्हणूनही उपयोग होतो. त्यामुळे वेगळे खत देण्याची आवश्यकता रहात नाही. या पद्धतीत कुंडीत घातलेल्या ओल्या कचर्‍याला कसलीच दुर्गंधी येत नसल्याने, ओल्या कचर्‍यामुळे प्रदूषणात होणारी भर टाळता येते आणि पर्यावरणास हातभार लागतो. कुंडीत टाकलेला ओला कचरा पाणी झाडात शोषून ठेवत असल्यामुळे पाणी कमी लागते.

 

ए. बियांपासून रोपनिर्मिती

कुंडी तयार झाल्यानंतर त्यामध्ये रोपे लावावीत किंवा बिया रुजवाव्यात. बिया एकदम बारीक असतील, तर २ चिमूटभर बिया घेऊन त्या समान अंतरावर पडतील, अशा पद्धतीने टाकाव्यात. त्यानंतर त्यावर मातीचा थर द्यावा. बियांच्या जाडीच्या तिप्पट जाडीचा मातीचा थर टाकावा. त्यानंतर मगाने हातावर पाणी घेऊन ते शिंपडावे. आपण थेट कुंडीत बिया रोवू शकतो किंवा ‘ट्रे’ मध्ये रोवून नंतर त्याचे कुंडीत पुनर्रोपण करू शकतो. बी ‘ट्रे’मध्ये रोवली, तर तिला ५-६ पाने आली की, त्याचे कुंडीमध्ये पुनर्रोपण करावे. पुनर्रोपण करतांना शक्यतो ते सावलीत करावे. उन्हाचा थेट संपर्क टाळावा; कारण उन्हामुळे मुळे शुष्क होऊन मरू शकतात. पुनर्रोपण करतांना रोपटे मातीसह उपटून दुसर्‍या कुंडीत लावावे. ज्यांची थेट रोपे लावता येणे शक्य आहे, अशी रोपांची ‘कटिंग्ज’ही (नवीन रोप उगवण्यासाठी झाडाच्या फांदीला विशिष्ट प्रकारे छेद देऊन दिलेले रोप. गुलाबाचे, जास्वंदीचे झाड किंवा मसाल्याचे झाड बीपासून उगवता येऊ शकत नाही. त्यासाठी झाडाच्या फांद्या विशिष्ट प्रकारे छेद देऊन कापल्या जातात. त्या भूमीत रोवल्यानंतर नवीन रोप तयार होते.) आपण लावू शकतो.

१. पारंपरिक बियांणाचे महत्त्व

सध्या बाजारात अनेक प्रकारची बियाणे उपलब्ध आहेत; पण त्याऐवजी पारंपरिक बियाणे लावण्यावर भर द्यावा. जनुकीय तंत्रज्ञानाचा उपयोग करून बनवलेली संकरित बियाणांमुळे अधिक उत्पन्न मिळते, असे वाटत असले, तरी ही संकरित बियाणे निसर्गानुकूल नाहीत, हे लक्षात घ्यावे. संकरित बियाणे ही पारंपारिक भारतीय शेती परावलंबी करण्याचे एक षड्यंत्र आहे. पारंपरिक बियाणांमध्ये स्थानिक वातावरणात टिकण्यासाठी उपजतच निसर्गदत्त जनुके असतात. पारंपरिक बियाणे अधिक सकस आणि पोषक असतात. ही पारंपरिक बियाणी आपल्या भागातील स्थानिक शेतकर्‍यांकडे उपलब्ध होऊ शकतात. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ या म्हणीप्रमाणे बी शुद्ध असेल, तर रोपे रोगमुक्त आणि टवटवीत होतात, हा अनुभव आहे.

 

ऐ. सूर्यप्रकाश

प्रतिकात्मक छायाचित्र

भाजी लावतांना हवामानात थोडी उष्णता हवी. सूर्यप्रकाश मिळाला, तर झाडे चांगली वाढतात. असे असली, तरी सूर्यप्रकाश पुरेसा नसेल, तर झाडे वाढणारच नाहीत, असे नाही. विशेषतः शहरांमध्ये गच्चीत किंवा खिडकीत बागकाम करायचे म्हटले, तर सूर्यप्रकाशाच्या उपलब्धतेची अडचण असू शकते. अशा वेळी भाजीपाला उगवू शकतो; पण तो पुरेशा सूर्यप्रकाशात उगवणार्‍या भाजीपाल्यापेक्षा थोडा कमी सकस असेल. सूर्यप्रकाश नसेल, तर झाडाच्या पानाचा आकार वाढतो, हा निसर्गाचा नियम आहे. कमी सूर्यप्रकाश असेल, तरी अळू, मिरी, नागवेल, अबोली यांसारखी रोपे वाढू शकतात.

 

ओ. पाणी

प्रतिकात्मक छायाचित्र

अतीपाणी दिल्यानेही रोपे मरतात. बर्‍याच जणांना घरात कुंडीतील रोपांना पाणी घालतांना ते मग घेऊन अती ओतण्याची सवय असते; पण एवढे पाणी ओतण्याची आवश्यकता नसते. हाताच्या ओंजळीत पाणी घेऊन ते आपण शिंपडू शकतो. पाणी घातल्यानंतर दुसर्‍या दिवशी पानाचा शेंडा थोडा कोमेजलेला दिसला, तर आपण घातलेले पाणी योग्य आहे, हे ओळखावे. एका कुंडीला साधारण अर्धा पेला पाणी पुरेसे असते. तरीही आपण निरीक्षण करून हे प्रमाण थोडे कमी-अधिक करू शकतो. पाणी किती घालायचे, ते हवामानावरही अवलंबून असतो. कडक उन्हाळा असेल, तर पाणी थोडे अधिक लागते. रोप छोटे असेल, तर आपण लहान बाळाला देतो, तसे थोडेसे पाणी पुरते; पण झाड मोठे असेल, तर अधिक पाणी लागते. आपण जेवढे झाडांशी बोलू, त्यांचे निरीक्षण करू तेवढा हा अंदाज योग्य पद्धतीने येईल. कुंडीत झाडाला घातलेले पाणी अधिक होत असेल, तर कुंडीमध्ये थोड्या नारळाच्या शेंड्या, सुका पालापाचोळा भरावा. झाडांना सकाळी पाणी द्यावे. सायंकाळी उशिरा झाडांना पाणी देणे टाळावे. झाडांच्या पानांवर पाणी ओतण्याचे टाळावे. झाडांच्या पानांवर पाणी मारायचे असेल, तर पानांवरचे पाणी सायंकाळपर्यंत वाळून जाईल, अशा पद्धतीने फवारावे. उन्हाळ्यामध्ये दिवसातून दोनदा थंड पाणी झाडांना द्यावे. पाऊस पडत असतांना किंवा पाऊस पडून गेल्यानंतर दुसर्‍या दिवशी झाडांना पाणी देऊ नये.

 

औ. समतोल आहार

पाण्याच्या जोडीला झाडांना आहारही समतोल आवश्यक असतो. भरपूर खत घातले; म्हणजे झाडे भरपूर वाढतील, असे नाही. झाडांना त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे समतोल प्रमाणात खत घालावे. साधारणपणे जीवामृत किंवा सेंद्रिय खत या माध्यमातून झाडांना आवश्यक घटक आवश्यक त्या प्रमाणात मिळतात. खत किती द्यावे किंवा कधी घ्यावे, ते अभ्यासाने ठरवू शकतो किंवा याविषयी तज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकतो.

 

अं. लाभ

अशा प्रकारे घरच्या घरी शेती किंवा बागकाम करण्यातून घरगुती वापरासाठी आवश्यक असणारा किमान ५० टक्के भाजीपाला तरी पिकवला जाऊ शकतो. जागेच्या उपलब्धतेनुसार कुटुंबाच्या भाजीपाल्याची संपूर्ण आवश्यकताही पूर्ण केली जाऊ शकते. अशा पद्धतीने तयार केला जाणारा भाजीपाला हा पूर्णतः विषमुक्त आणि सकस असतो. आपल्या हाताने लावलेली भाजी बनवून खाण्यामध्ये एक प्रकारचा आनंद आणि आपलेपणाही असतो. याशिवाय आपल्या कचर्‍याची घरच्या घरी विल्हेवाट लावली जात असल्याने पर्यावरणाचेही रक्षण होते.

 

क. अन्य महत्त्वपूर्ण सूत्रे

कुंड्यांखाली ठेवायची बशी

घरगुती शेती करतांना शक्यतो हंगामानुसार भाजीपाला लावावा. आपण लावलेली सर्व झाडे जगतीलच, असे नाही. त्यातील काही झाडांना कीड लागू शकते; पण हे नैसर्गिक आहे. जशी कीड लागते, तसे कीड खाणारे जीवाणू किंवा पक्षीही येतात आणि निसर्गचक्र चालू रहाते. ज्या रोपांची मुळे उथळ (ज्यांची मुळे छोटी आहेत) आहेत, अशी रोपे शक्यतो गच्चीतील बागकामासाठी निवडावीत. सर्वप्रथम कशाची लागवड करायची, ते ठरवावे. जर इमारतीची किंवा घराची गच्ची मोठ्या झाडांचे वजन पेलवू शकत असेल, तर मोठी (शेवगा, तूर, आंबा, आवळा इत्यादी) झाडेही लावता येतात. जर टेरेसवर माती घालून मग रोपे लावायची असतील, तर गळती रोखण्याच्या दृष्टीने टेरेस ‘वॉटरप्रूफ’ करावे. आपल्याला ‘वॉटरप्रूफ’ करायला जमले नाही, तर त्याऐवजी ताडपत्री वापरू शकतो किंवा कुंड्यांखाली ठेवायच्या बशा बाजारात मिळतात, त्याही वापरू शकतो. गच्चीमध्ये कुंड्या ठेवून त्यातून बागकाम करता येऊ शकते. छतवाटिकेच्या कामाला आरंभ करायचा असेल, तर शक्यतो पावसाच्या आधी आणि कडक उन्हाळा संपल्यानंतर करावा. टेरेसवर ऊन पुष्कळ येत असेल, तर ‘गार्डन नेट’ किंवा अगदी मच्छरदाणी वापरूनही झाडांना सावली देता येऊ शकते. पाणी देण्यासाठी गच्चीत पाण्याची सोय असणे महत्त्वाचे आहे. आपण आरंभी प्रतिदिन १ घंटा बागकामासाठी दिला, तर आपण घरच्या घरी चांगल्या प्रकारे भाजीपाला पिकवू शकतो.

– संकलन : सौ. गौरी नीलेश कुलकर्णी, सनातन आश्रम, गोवा.
छतवाटिका कशी करावी या विषयी अधिक तपशीलवार माहिती मिळवण्यासाठी यूट्यूबवरील व्हिडिओ पहा.

https://www.youtube.com/watch?v=RSkpz4rElKQ

https://www.youtube.com/watch?v=edPRuQaNp7U

https://www.youtube.com/watch?v=sxBvqvJFwrI

साधकांना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !

या लेखात सांगितल्याप्रमाणे काहीजण छतवाटिका करत असल्यास सर्वांना उपयुक्त होतील, अशी अनुभवातून शिकायला मिळालेली सूत्रे कळवा. तसेच येथे दिलेली छतवाटिकेची माहिती सहजरित्या करता येईल, अशा प्रकारातील आहे; पण अगदी कमी जागेत अधिक उत्पन्न घेता येणार्‍या ‘हायड्रोपोनिक्स’सारख्या काही पद्धतीही वापरल्या जातात. अशा अन्य काही पद्धती वापरून बागेचे प्रयोग केले असल्यास त्या पद्धतीची माहिती आणि अनुभव खालील पत्त्यावर कळवल्यास ते दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करता येतील.

सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा पिन – ४०३४०१
भ्रमणभाष क्र. ७०५८८८५६१०
संगणकीय पत्ता : [email protected]

Leave a Comment