आत्महत्या करणे हे महापाप असून साधना करणे हाच सर्व समस्यांवरील एकमेव उपाय !

Article also available in :

६.५.२०१५ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये गोव्यातील दोन शाळकरी विद्यार्थ्यांनी शिक्षणात अपयश आले; म्हणून आत्महत्या केल्याचे वृत्त वाचले. ‘शिक्षणात अपयश आल्याने वैफल्यग्रस्त बनलेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रकार वाढत आहेत’, असेही त्यात लिहिले होते. हे सर्व वाचतांना मला दुःख झाले. ‘आपल्या विद्यार्थी मित्रांना काहीतरी सांगूया’, असे मला वाटले. पुढील सूत्रांप्रमाणे विद्यार्थ्यांनी प्रयत्न केल्यास ते निश्‍चितच आत्महत्येपासून परावृत्त होऊ शकतील.

कु. सोनम फणसेकर

 

१. सतत देवाशी अनुसंधान असल्याने छत्रपती शिवराय
यशस्वी झाले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले !

‘मित्रांनो, मनुष्यजन्म ही ईश्‍वराने आपल्याला दिलेली अमूल्य देणगी आहे. तुमच्याच वयाचे असतांना छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. त्यांनी लहान वयातच युद्धाला आरंभ केला. त्यांच्यावरही अपयशाचे कठीण प्रसंग आले; परंतु ते कधीच खचले नाहीत. अफझलखानाचा वध करणे, शाहिस्तेखानाची बोटे छाटणे, पेटार्‍यातून पळून जाणे यांसारख्या कठीण आणि अशक्यप्राय वाटणार्‍या प्रसंगांमध्येही ते यशस्वी झाले. का ? कारण एकच आणि ते म्हणजे प्रत्येक प्रसंगात छत्रपती शिवरायांचे देवाशी अनुसंधान होते. त्यांचा नामजप सतत चालू असायचा; म्हणून ते अफाट अशा मोगल सैन्याशी लढून हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले, हा आपला आदर्श आहे.

 

२. जिथे प्रयत्न असतात, तिथे यश-अपयश अशा दोन्ही गोष्टी येतातच !

मित्रांनो, तुम्ही देशाची भावी पिढी आहात. त्यामुळे तुम्ही भक्कमच असले पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींनी आपण खचायचे नाही. ‘माझे शिक्षण, माझा अभ्यास, माझे भवितव्य’ एवढेच आपले जीवन नसून ‘आपल्याला राष्ट्र आणि धर्म यांप्रती काहीतरी कर्तव्य आहे’, याची जाणीव मनाला करून द्या. आपल्याला सतत प्रयत्नच करायचे आहेत. जिथे प्रयत्न असतात, तिथे यश-अपयश आहेच.

२ अ. प्रयत्नात अपयश आले, तर पुढील गोष्टी लक्षात घ्या !

२ अ १. जीवन संपवणे म्हणजे पळपुटेपणा : अभ्यासात अपयश जरी आले, तरी ते आपले प्रारब्ध समजून त्याचा मनापासून स्वीकार करा. अपयश आले; म्हणून जीवन संपवणे हा पळपुटेपणा झाला.

२ अ २. स्वतःची तुलना स्वतःशीच करा : आपल्या कुठल्याही मित्रांशी अथवा त्यांना मिळालेल्या गुणांशी स्वतःशी तुलना करू नका. स्वतःची तुलना स्वतःशीच करून ‘आपण कुठे उणे पडतो’, याचा अभ्यास करा आणि त्यावर प्रयत्न करा, म्हणजे मन निराश होणार नाही.

२ अ ३. मन सकारात्मक ठेवा : ‘आतापर्यंत मला अपयश आले; पण आतापासून मी जोमाने प्रयत्न करणार’, असे मनाला ठणकावून सांगा.

२ अ ४. देवाला सखा करा : प्रत्येक प्रसंगात देवाचे साहाय्य घेण्याची मनाला सवय लावा. ‘देव आपला सखा आहे’, अशा भावाने त्याला मनातल्या सर्व गोष्टी सांगा आणि अभ्यासात येणारे अडथळे सांगा.

२ अ ५. भगवंताला मनापासून प्रार्थना करा ! : परीक्षा देऊन झाल्यावर भगवंताला मनापासून ‘हे भगवंता, आता तू जो काही निकाल देशील, तो मला मनापासून आणि आनंदाने स्वीकारता येऊ दे. त्यासाठी तू मला शक्ती दे. मला सकारात्मक ठेव’, अशी प्रार्थना करा.

 

३. मनात आत्महत्येचे विचार येत आहेत, असे लक्षात येताच लगेच पुढील प्रयत्न करा !

३ अ. नामजप गतीने करा ! : विचार पुष्कळ वाढल्यास शक्य असल्यास मोठ्याने आणि शक्य नसल्यास मनातल्या मनातच पाढे पाठ करतो, त्या गतीने देवाचे नाम घेण्यास आरंभ करा, उदा. श्रीकृष्णाचे नाम घ्यायचे असेल, तर ‘कृष्ण, कृष्ण, कृष्ण’ आणि श्रीरामाचे घ्यायचे असेल, तर ‘राम, राम, राम’. मनातील विचार पूर्ण नष्ट होईपर्यंत करा.

३ आ. एका ठिकाणी बसून देवाला प्रार्थना करा ! : त्यानंतर १० मिनिटे एका ठिकाणी बसा. ईश्‍वराला सलग १५ वेळा पुढीलप्रमाणे प्रार्थना करा, ‘हे ईश्‍वरा, माझ्या मनातील हे विचार तू समूळ नष्ट कर. मला या नकारात्मक स्थितीतून बाहेर काढ. माझे रक्षण कर.’

३ इ. दिवसातून ५० वेळा मनाला बजावून सांगा, ‘मला भरपूर जगायचे आहे. मी आतापासून जोमाने प्रयत्न करीन. देव मला साहाय्य करीन. देवाने साहाय्य केल्यावर कुठलीच गोष्ट अशक्य नाही. त्यामुळे मी यशस्वी होणार.’

३ ई. मनावर ताण असल्यास पालकांशी अथवा जवळच्या मित्राशी त्याविषयी मनमोकळेपणाने बोला. त्यावर लगेचच उपाययोजना काढून त्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करा.

– कु. सोनम फणसेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

Leave a Comment