‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः’ या नामजपामुळे निर्गुण स्थितीत जाण्यास साहाय्य होणार असणे

Article also available in :

अनुक्रमणिका

(परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. ‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः’ या नामजपाचे महत्त्व

‘मन जोपर्यंत कार्यरत आहे, तोपर्यंत मनोलय होत नाही. मन निर्विचार करण्यासाठी स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन, भावजागृती इत्यादी कितीही प्रयत्न केले, तरी मन कार्यरत असते. तसेच एखाद्या देवतेचा नामजप अखंड केला, तरी मन कार्यरत असते आणि मनात देवाच्या आठवणी, भाव इत्यादी येतात. याउलट ‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः’ हा नामजप अखंड केला, तर मनाला दुसरे काहीच आठवत नाही. याचे कारण म्हणजे अध्यात्मातील ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या नियमानुसार या नामजपामुळे मन त्या शब्दाशी एकरूप होऊन निर्विचार होते, म्हणजे प्रथम मनोलय, नंतर बुद्धिलय, त्यानंतर चित्तलय आणि शेवटी अहंलय होतो. त्यामुळे निर्गुण स्थितीत लवकर जाण्यास साहाय्य होते.

१ अ. पुढील प्रयोग करा !

१. कोणत्याही वस्तूकडे पाहून ‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः’ हा नामजप करतांना काय जाणवते, हे पहा. आपल्याला हे लक्षात येते की, आनंददायी वस्तूकडे पाहून आनंद होत नाही, तसेच दुःखदायक वस्तूकडे पाहून दुःखही होत नाही.

२. साधकांनी ‘निर्विचार’ हा नामजप किंवा तो नामजप करणे कठीण जात असल्यास ‘श्री निर्विचाराय नमः’ हा नामजप काही मास (महिने) प्रतिदिन अधिकाधिक वेळ करावा आणि ‘काय जाणवते ?’, ते [email protected] या ई-मेल पत्त्यावर टंकलेखन करून पाठवावे किंवा लिखित स्वरूपात ‘सौ. भाग्यश्री सावंत, सनातन आश्रम, २४/बी रामनाथी, बांदोडा, फोंडा, गोवा. पिनकोड ४०३४०१’ या पत्त्यावर पाठवावे. कालांतराने हा नामजप करणे जमू लागल्यास, हाच नामजप पुढे सतत चालू ठेवावा. ‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः’ हा नामजप ‘गुरुकृपायोगानुसार साधनामार्गा’तील शेवटचा नामजप आहे !

 

२. वाईट शक्तींचा त्रास असलेले

वाईट शक्तींचा तीव्र, मध्यम आणि मंद त्रास असलेल्या साधकांनी त्यांना आध्यात्मिक उपायांसाठी सांगितलेलेच नामजप करावेत. याचे कारण म्हणजे त्या साधकांसाठी वाईट शक्तींचा त्रास दूर होणेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांनी उपायांचा कालावधी पूर्ण झाल्यावरही उपायांमध्ये आलेल्या नामजपांपैकी एखादा नामजप उर्वरित वेळी येता-जाता करावा.

 

३. भक्तीयोगी आणि ज्ञानयोगी

देवांच्या नामजपात भक्ती असू शकते, तर ज्ञानयोगात मनाची निर्विचार स्थिती असल्यामुळे निर्विचार स्थितीचा लाभ होतो; कारण अध्यात्मात शेवटी निर्गुण, निर्विचार स्थितीला जायचे असते. भक्तीयोगींनाही शेवटी सगुण भक्तीतून निर्गुण भक्तीत जायचे असते. त्यामुळे भक्तीयोगी असो, ज्ञानयोगी असो किंवा अन्य कोणत्या योगमार्गाने साधना करणारा असो, सर्वांनाच ‘निर्विचार’ या नामजपाचा लाभ होणार आहे.

 

४. ‘निर्विचार’ हा नामजप करतांना भाव ठेवणे आवश्यक नसणे

नामजप भावपूर्ण केल्याने भावातून मिळणार्‍या ईश्‍वराच्या आशीर्वादामुळे प्रगती लवकर होते. बुद्धीने भावपूर्ण नामजप करणे ज्ञानयोग्यांना कठीण जाते; म्हणून त्यांच्यासाठी ‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः’ हा नामजप करणे सुलभ जाते. थोडक्यात ‘निर्विचार’ हा नामजप करणे सर्वांनाच सहज शक्य आहे.

 

५. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेतील नामजपाला ‘निर्विचार’ या नामजपाची जोड देणे

आतापर्यंत साधक स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेद्वारे मनातील अयोग्य विचारांवर मात करण्यासाठी प्रयत्न करत होते; परंतु त्यासाठी अनेक वर्षे लागतात. दोष अधिक असल्यास ते दूर करायला अनेक जन्मही लागू शकतात. या पद्धतीने एका एका दोषावर प्रयत्न करण्यासह त्याला ‘निर्विचार’ या नामजपाची जोड दिल्यास एकाच वेळी अनेक स्वभावदोष न्यून होतील. त्यामुळे प्रगती लवकर होईल. आता साधनेसाठी कलियुगातील पुढचा काळ फार अल्प आहे. त्यामुळे साधकांची जलद आध्यात्मिक प्रगती होण्यास ‘निर्विचार’ हा नामजप साहाय्यभूत ठरेल. यावरून ‘एक साधै सब सधै, सब साधै सब जाय ।’ या हिंदी वचनाची आठवण होते.

 

६. मुद्रा

या नामजपाबरोबर वेगळी मुद्रा करण्याची आवश्यकता नाही; परंतु एखाद्याला मुद्रा करणे आवश्यक असल्यास सोयीस्कर वाटेल ती मुद्रा करावी.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

Audio – निर्विचार

 

Audio – श्री निर्विचाराय नमः

 

Audio – ॐ निर्विचार

 

७. ‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः’ हा
नामजप करतांना साधकांनी पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. आतापर्यंत साधकांना सकाळी किंवा रात्री ९.३० ते १० या वेळेत बसून ध्यान किंवा नामजप करण्यास सांगितले होते. यापुढे साधकांनी आता या वेळेत बसून ध्यान किंवा नामजप करण्याची आवश्यकता नाही.

२. ‘कोरोना विषाणूंविरुद्ध आपल्यात प्रतिकारक्षमता वाढण्याकरता आध्यात्मिक बळ मिळावे’, यासाठी सांगितलेला नामजप (‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ (३ वेळा) – ‘श्री गुरुदेव दत्त ।’ – ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ (३ वेळा) – ‘ॐ नमः शिवाय ।’) प्रतिदिन १०८ वेळा एका जागी बसून करावा. तसेच कोरोनाची लक्षणे असल्यास उत्तरदायी साधकांना विचारून आवश्यकतेनुसार हा जप अधिक संख्येत करावा.

३. एखादा साधक कुलदेवतेचा नामजप करत असल्यास तो साधक त्याच्या इच्छेनुसार तोच जप चालू ठेवू शकतो; मात्र त्याला पुढच्या टप्प्याचा ‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः’ हा नामजप करावासा वाटल्यास, तो हा नामजप करू शकतो.

४. समष्टीसाठी नामजप करणारे संत आणि साधक : काही संत समष्टीसाठी काही घंटे नामजप करतात, तसेच ६० टक्क्यांहून अधिक पातळी असलेले काही साधक हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्मप्रसाराचे उपक्रम राबवतांना त्यांतील वाईट शक्तींचे अडथळे दूर होण्यासाठी नामजप करतात. त्यांनीही आवश्यक ती प्रार्थना करून ‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः’ हाच नामजप करावा.’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.५.२०२१)

 

८. ‘निर्विचार’ नामजप सर्व टप्प्याच्या साधकांसाठी का आहे ?

गुरुकृपायोगामध्ये ‘साधनेच्या प्रारंभी कुलदेवता आणि  दत्त यांचा नामजप करावा’, असे सांगितले आहे. तसेच गुरुकृपायोगाचे एक तत्त्व आहे की ‘पातळीनुसार साधना’. असे असतांना ‘निर्विचार’ हा ‘गुरुकृपायोगातील सर्वांत शेवटचा नामजप’ ‘प्रारंभीच्या साधकापासून संतांपर्यंत कुणीही करू शकतो’, असे का दिले आहे ?’, असा प्रश्‍न  काही जणांच्या मनात येऊ शकतो. याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे.

परात्‍पर गुरु) डॉ. जयंत आठवले, सनातन संस्‍था

अध्यात्मात प्रगती करण्यासाठी साधनेतील विविध टप्पे पूर्ण करावे लागतात. उदा. स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन, नामजप, सत्संग, सत्सेवा, भावजागृती, त्याग आणि प्रीती. ‘नामजप’ हा टप्पा पूर्ण करून ‘अखंड नामजप चालू रहाणे’ या स्थितीला येण्यास साधकाला १० ते १५ वर्षे लागू शकतात. यामध्ये ४ – ५ वर्षांत केवळ ४-५ टक्के प्रगती होऊ शकते. त्यानंतर तो साधनेच्या ‘सत्संग’ या टप्प्याला येतो. या गतीने साधनेत पुढे जायचे झाल्यास एका जन्मात साधना पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. यासाठी जर का साधनेत ज्या टप्प्याला साधक असेल, त्याच्या पुढच्या टप्प्याचे थोडे थोडे प्रयत्न करत राहिल्यास साधकाचे प्रगती होण्याचे प्रमाण वाढते, उदा. नामजप करतांनाच ‘सत्संग’ या टप्प्याचेही प्रयत्न केले, तर आध्यात्मिक प्रगतीची गती वाढते. याच तत्त्वाच्या आधारे गुरुकृपायोगामध्ये प्राथमिक टप्प्याच्या साधकाला स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन, नाम, सत्संग, सत्सेवा, भावजागृती, त्याग आणि प्रीती या आठ टप्प्यांचे एकत्रित प्रयत्न करायला सांगितले जातात. त्यामुळे या योगात अन्य साधनामार्गांपेक्षा प्रगती जलद होते.

हाच भाग ‘निर्विचार’ या नामजपाच्या संदर्भात लागू होतो. हा जप होण्यासाठी साधकाची आध्यात्मिक पातळी कमीतकमी ६० टक्के असणे, म्हणजे त्याच्या मनोलयाचा आरंभ होणे आवश्यक आहे. त्यानंतर तो साधक निर्विचार स्थितीला जाऊ शकतो; परंतु त्याने प्रारंभीपासूनच ‘निर्विचार’ हा नामजप चालू केला, तर त्याच्या मनावर या नामजपाचा थोडाफार संस्कार लवकर होऊन आठ टप्प्यांची साधना करून पुढे मनोलयाच्या टप्प्याला जाण्यासाठी लागणार्‍या कालावधीच्या तुलनेत अल्प वेळेत तो या टप्प्याला पोचू शकतो.

८ अ. ६० टक्क्यांपेक्षा कमी आध्यात्मिक पातळीच्या साधकाने कोणता नामजप करावा ?

‘निर्विचार’ हा नामजप ‘निर्गुण’ स्थितीला नेणारा आहे. त्यामुळे कुलदेवतेचा नामजप करणार्‍या साधकांना किंवा ६० टक्क्यांपेक्षा कमी आध्यात्मिक पातळीच्या साधकांना हा नामजप करणे कठीण होऊ शकते. यासाठी त्यांनी त्यांच्या नेहमीच्या जपाच्या बरोबर हा नामजप करण्याचा प्रयत्न करावा. हा नामजप करणे जमू लागल्यास तो निरंतर करावा. कारण शेवटी साधनेच्या पुढच्या टप्प्यात जाऊन पूर्णवेळ हाच नामजप करावयाचा असतो.

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले

८ आ. केवळ ‘निर्विचार’ जप करणे जमत नसल्यास ‘ॐ निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप करावा !

‘काही साधकांना केवळ ‘निर्विचार’ हा जप करणे कठीण जाऊ शकते. अशा वेळी त्यांनी ‘ॐ निर्विचार’ हा नामजप करून बघावा.

‘ॐ’ मध्ये सामर्थ्य आणि शक्ती आहे. त्यामुळे ‘निर्विचार’ या नामजपाच्या प्रारंभी ‘ॐ’ जोडल्यास त्याच्या उच्चाराने ‘निर्विचार’ या नामजपाचा परिणाम जलद होण्यास साहाय्य होते.

ज्यांचा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप सुलभतेने होत असेल त्यांनी तोच नामजप चालू ठेवावा. ’

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले

८ इ. ‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ आणि ‘श्री निर्विचाराय नमः ।’
हे नामजप आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांनी का करू नयेत ?

‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ आणि ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हे नामजप निर्गुणाकडे घेऊन जाणारे आहेत. आध्यात्मिक त्रास असणारा साधक हे नामजप करू लागल्यास त्याला वाईट शक्तींकडून विरोध होऊ शकतो. हा विरोध तीव्र स्वरूपाचा झाला, तर त्रास असणार्‍या साधकाच्या त्रासाची तीव्रता वाढू शकते आणि त्यासाठी संतांना नामजप करण्यासाठी वेळ द्यावा लागू शकतो. यासाठी त्रास असणार्‍या साधकाने त्याचा त्रास न्यून होण्यासाठी असणारा नामजपच करावा.

६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक आध्यात्मिक पातळी असणारे आणि आध्यात्मिक त्रास असणारे साधक हा नामजप त्यांना असणार्‍या जपाच्या एकूण वेळेपैकी २० टक्के वेळ करू शकतात.

 

९. क्रमांक १ मधिल प्रयोगाचे उत्तर

प्रयोगाचे उत्तर : ‘आरंभी हा नामजप भावाच्या टप्प्यावरील आहे.’

हा जप केल्यानंतर अनेक साधकांची भावजागृती होऊन निर्विचार स्थितीकडे जाण्यास साहाय्य होत असल्याचे जाणवले आणि साधकांना तशा अनुभूतीही आल्या आहेत.

९ अ. ‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ आणि ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हे
नामजप निर्गुणाकडे घेऊन जाणारे असूनही ते भावाच्या स्तरावरील का ?

साधक निर्गुण स्थितीला जाईपर्यंत त्याच्या मनात भाव असतोच, तसेच मनाला भावाची सवय असतेच. त्याचा लाभ घेऊन हा नामजप भावाच्या स्तरावर केल्यास या नामजपाचे फळ अधिक प्रमाणात मिळते. यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभाग समन्वयक कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेले ‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ आणि ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हे नामजप भावाच्या स्तरावरील आहेत. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

१०. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अनंत अनंत कृतज्ञता !

कुलदेवतेच्या सगुण उपासनेच्या नामजपापासून गुरुकृपायोगानुसार साधनामार्गातील शेवटच्या ‘निर्विचार’ या निर्गुण स्थितीला घेऊन जाणार्‍या नामजपापर्यंत साधकांचा साधनाप्रवास करवून घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अनंत अनंत कृतज्ञता !

‘कुलदेवतेची उपासना केल्यास ती पुढे उपासकाला शिष्यपदापर्यंत नेते; म्हणून परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना गुरुकृपायोगानुसार साधनेच्या आरंभी कुलदेवतेचा नामजप करण्यास सांगितले. साधनेचा तो टप्पा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काळानुसार विविध जप दिले, उदा. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निर्मूलनासाठी सप्तदेवतांचे जप, पंचमहाभूतांचे जप, धर्मसंस्थापनेच्या कार्याला पोषक असलेला भगवान श्रीकृष्णाचा जप इत्यादी आणि ते करण्यास सांगून परात्पर गुरु डॉक्टरांनी काळानुसार आवश्यक त्या तत्त्वाची उपासना साधकांकडून करवून घेतली. गेल्या वर्षभरात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याला आध्यात्मिक बळ मिळण्यासाठी त्यांनी साधकांना ‘श्री विष्णवे नमः ।’, ‘श्री सिद्धीविनायकाय नमः ।’ आणि ‘श्री भवानीदेव्यै नमः ।’, हे नामजप करण्यास सांगितले. यासमवेतच परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘शून्य’, ‘महाशून्य’, ‘निर्गुण’ आणि ‘ॐ’ या निर्गुण स्तरावरील अभिनव जपांद्वारे साधकांना साधनेच्या पुढच्या पुढच्या टप्प्याच्या अनुभूती दिल्या. आता परात्पर गुरु डॉक्टर गुरुकृपायोगानुसार साधनामार्गातील शेवटचा ‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा जप सांगून साधकांचे मनोलय, बुद्धीलय, चित्तलय आणि शेवटी अहंलय या साधनेच्या अंतिम ध्येयाकडे वेगाने मार्गक्रमण करून घेत आहेत. साधनेला कुलदेवतेच्या सगुण उपासनेच्या जपापासून आरंभ करून परात्पर गुरुदेव साधकांना आता निर्गुण स्तरावरील निर्विचार स्थितीला घेऊन जात आहेत.

अशा प्रकारे साधकाच्या साधनेच्या स्थितीनुसार, त्रासानुसार आणि काळानुसार नामजप करण्यास सांगून साधकांना अध्यात्मातील पुढच्या पुढच्या स्थितीला घेऊन जाणारे त्रिकालज्ञानी परात्पर गुरु डॉ. आठवले हे एकमेवाद्वितीय आहेत ! काळाची प्रतिकूलता जितक्या झपाट्याने वाढत आहे, त्याच्या अनंत पटीने गुरुदेव साधकांवर कृपेचा वर्षाव करत आहेत. अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी कलियुगी भूतलावर अवतरलेले श्रीविष्णूचे अवतार सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी सर्व सद्गुरु, संत आणि साधक यांच्या वतीने अनंत अनंत कृतज्ञता !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (१३.५.२०२१)

देवतांचे सर्व नामजप, स्ताेत्र, आरती इ. विनामूल्य ऐकण्यासाठी ‘सनातन चैतन्यवाणी’ हे ॲप ‘गूगल प्ले स्टोअर’च्या पुढील मार्गिकेवरून डाउनलोड करावे. https://www.sanatan.org/Chaitanyavani

3 thoughts on “‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः’ या नामजपामुळे निर्गुण स्थितीत जाण्यास साहाय्य होणार असणे”

  1. Gurucharani bhavpurna pranam. Amha sadhakanchya adhyatmik pragatisathi velo veli kelelya alabhya margdarshan ani gurukrupemulech amhi sadhak sadhya vatchal karat ahot. Amhhala pushkal adhar aplach ahe gurudeva. Natamastak houn koti koti krutadnyata vyakt karte. Sanatanche ‘Sanatan Chaitanyavani’ audio app mhanje amhala dileli sanjeevani aahe.

    Reply

Leave a Comment