सनातनचे १७ वे समष्टी संत पू. के. उमेश शेणै (वय ६८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

Article also available in :

 

१. पू. के. उमेश शेणै यांचा परिचय

जन्मदिनांक : ज्येष्ठ अमावास्या (२६.६.१९४९)

शिक्षण : एम्.ए., एल.एल.बी (गोल्ड मेडलिस्ट, मैसूर युनिव्हर्सिटी), सी.ए.आय.आय.बी I

साधनेला आरंभ : नोव्हेंबर १९९७

संतपदी विराजमान : २७.४.२०१२

‘पूर्वाश्रमी ते सिंडीकेट अधिकोषात (बँकेत) ‘स्पेशल असिस्टंट’ होते. अधिकोषात ३६ वर्षे सेवा केली. अधिकोषात असतांना ते ‘स्टेट लेव्हलचे युनियन लीडर’ होते. त्यांनी वर्ष २००२ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार पूर्णवेळ साधनेला आरंभ केला. सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनांतर्गत साधना करत ते संतपदी पोचले.

 

२. बालपण

२ अ. लहानपणी गर्भश्रीमंती आणि पराकोटीचे दारिद्य्र, या दोन्ही स्थिती अनुभवायला येणे

मला चार भाऊ आणि दोन बहिणी होत्या. मी माझ्या आई-वडिलांचे तिसरे अपत्य आहे.

माझ्या लहानपणी माझे वडील गर्भश्रीमंत होते. मी ७ वर्षांचा असतांना वडिलांनी अधिकोषाचे ऋण न फेडल्याने त्यांच्या सर्व मालमत्तेचा लिलाव होऊन त्यांना ‘दिवाळखोर’ म्हणून घोषित केले. आम्ही ७ भावंडे आणि आई यांना माहेरी सोडून माझे वडील १५ – १६ वर्षे बेपत्ता होते. आईच्या माहेरी हलाखाची स्थिती आणि मोठे कुटुंब होते. त्यात आम्ही ८ जण त्यांच्या कुटुंबात रहायला गेलो. माझे बालपण अतिशय कष्टात गेले. आम्हाला प्रत्येक दिवशी जेवण मिळण्यासाठी झगडावे लागत असे. आईला दुसर्‍यांच्या घरी काम करून आमचे संगोपन करावे लागले. आजोबांना आमच्यासाठी पुष्कळ ऋण काढावे लागले. मला लहान वयातच गर्भश्रीमंती आणि पराकोटीचे दारिद्य्र भोगावे लागल्याने तेव्हापासूनच हा सर्व प्रारब्धाचा भाग असल्याची मला जाणीव झाली.

 

२. शिक्षण आणि नोकरी

२ अ. बारावीच्या परीक्षेत शाळेत सर्व विषयांत अधिक गुण मिळवलेला विद्यार्थी म्हणून पारितोषिक मिळणे

पडुबिद्री येथे माझ्या शालेय जीवनाला प्रारंभ होऊन वर्ष १९६६ मध्ये मी बारावी परीक्षा (पी.यू.सी.) उत्तीर्ण झालो. बारावी परीक्षा उत्तम श्रेणीत उत्तीर्ण होण्यासह शाळेत सर्व विषयांत अधिक गुण मिळवलेला विद्यार्थी म्हणून मला पारितोषिक मिळाले.

२ आ. अधिकोषात नोकरी मिळणे

वर्ष १९६८ मध्ये ज्या अधिकोषाकडून (सिंडिकेट बँक) आमच्या स्थावर संपत्तीचा लिलाव (चल-अचल संपत्तीचा) झाला होता, तेथील कर्मचार्‍यांना ‘त्यांच्याकडून मोठी चूक झाली असून एका श्रीमंत कुटुंबावर अन्याय झाला आहे’, याचा पश्‍चात्ताप झाला. त्या अधिकोषाच्या व्यवस्थापनाने आम्हा तीन भावांना अधिकोषात नोकरी दिली.

२ इ. शिकण्याची आवड असल्याने विवाह झाल्यावर नोकरी करून ‘एम्.ए’ ची
पदवी मिळवणे आणि त्यानंतर ‘एल्.एल्.बी.’च्या परीक्षेत मैसुरू विद्यापिठाचे सुवर्णपदक मिळणे

मला शिकण्याची पुष्कळ इच्छा असल्याने अधिकोषात नोकरी करत असतांना मी बाहेरून ‘बी.ए.’ पर्यंतचे शिक्षण घेतले. वर्ष १९७८ ते १९८४ या काळात माझा विवाह होऊन मला २ मुले झाल्यानंतर मी ‘एम्.ए.’ आणि ‘एल्.एल्.बी.’पर्यंतचे शिक्षण घेतले. मला ‘एल्.एल्.बी.’च्या परीक्षेत मैसुरू विद्यापिठाचे सुवर्णपदक मिळाले. मी त्या वेळी श्री राघवेंद्र स्वामीजींची उपासना करत असल्याने त्यांच्या कृपेमुळे हे शक्य झाले. मी ‘सी.ए.आय.आय.बी. – १’ ही अधिकोषाची परीक्षाही उत्तीर्ण झालो.

 

३. अधिकोषात नोकरी करणे

३ अ. कुटुंबाचे दायित्व असल्याने अधिकोषातील बढतीचा प्रस्ताव नाकारून एकाच श्रेणीत
३० वर्षे सेवा करणे आणि ‘कुटुंबाचे दायित्व देऊन गुरुदेवांनी देवाण-घेवाण हिशोब संपवला’, हे लक्षात येणे

२७.१.१९६८ या दिवशी मला लहान वयातच सिंडिकेट बँकेत नोकरी मिळाली. वर्ष १९७४ मध्ये मला नोकरीत पहिली बढती मिळाली. माझ्या मोठ्या २ भावांनी पुढची बढती स्वीकारून बाहेरच्या राज्यांत स्थानांतर करून घेतले. त्यामुळे माझ्यावर कुटुंबाचे दायित्व आले. लहान भावंडांचे शिक्षण, त्यांची नोकरी, विवाह, तसेच अन्य सांसारिक भार माझ्यावर पडला. मला माझ्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून बढती स्वीकारण्यासाठी पुष्कळ दबाव होता. आई ‘मी बढती स्वीकारून बाहेर पडलो, तर घराकडे कोण लक्ष देणार ?’, असे म्हणून रडत असे. मी ‘यापुढे बढती स्वीकारणार नाही’, अशी आईपुढे शपथ घेतली. मी त्याच श्रेणीत ३० वर्षे सेवा करून ३० कि.मी.च्या आतील गावांमध्ये स्थलांतर करून घेऊन प्रतिदिन घरी येऊ लागलो. ‘कुटुंबाचे दायित्व देऊन गुरुदेवांनी माझा देवाण-घेवाण हिशोब संपवला’, हे आता माझ्या लक्षात येते.

३ आ. सेवा म्हणून ‘युनियन लीडर’चे कार्य करून
कर्मचार्‍यांना साहाय्य करणे आणि वर्ष २००२ मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेणे

सिंडिकेट बँकेत नोकरी करत असतांना मी ‘बँक युनियन’चा सक्रीय सदस्य झालो. पुढे राज्य स्तरावरील पदांवर (व्हाईस चेअरमन, ज्युनियर सेक्रेटरी) कार्यरत झालो. यात माझा ‘युनियनचे सदस्य असलेल्या कर्मचार्‍यांना साहाय्य करणे’, हा एकच हेतू होता. श्री गुरुदेवांच्या कृपेने मला यात यशही मिळत होते. मी राघवेंद्र स्वामींच्या वृंदावनाला १०८ प्रदक्षिणा घालून मुख्य कचेरीत जात असे. मी सेवा म्हणून ‘युनियन लीडर’चे कार्य करत असे. मी अन्य नेत्यांप्रमाणे गोंधळ घालत नव्हतो. अन्य नेते (लीडर) माझ्याकडे द्वेषाने पहात असत. गुरुदेवांची कृपा आणि कर्मचार्‍यांचा पाठिंबा यांमुळे मी अधिकोषातून निवृत्त होईपर्यंत ‘युनियन लीडर’ होतो. (प्रारंभी माझ्या सनातनच्या साधनेच्या प्रवासात गुरुदेव माझ्या नावाऐवजी ‘ते ‘युनियन लीडर’ कसे आहेत ?’, असे विचारत असत.) वर्ष २००२ मध्ये मी स्वेच्छानिवृत्ती घेतली.

 

४. वैवाहिक जीवन

माझा विवाह ही एक दैवी घटना आहे. वर्ष १९७७ मध्ये माझ्या जुळ्या भावाचे (माझ्यापेक्षा १४ मिनिटांनी मोठ्या भावाचे) लग्न ठरले. त्या वेळी ‘माझे लग्नही त्याच्या लग्नाच्या दिवशीच झाले पाहिजे’, असा त्याने हट्ट धरला. त्या वेळी माझ्या मामांनी त्यांच्या पत्नीच्या चुलत बहिणीविषयी मला सांगितले. ते म्हणाले, ‘‘पोलिओमुळे ती एका पायाने किंचित लंगडते. तू तिला पाहून मग लग्न कर.’’ माझा आधीच ‘कर्मफलन्याय आणि प्रारब्ध’ यांवर अटळ विश्‍वास होता. आमच्या लहानपणीच्या कष्टदायी जीवनात मामांनीच आमचा सांभाळ केला होता. त्यामुळे ‘मी मुलीला बघायला जाणार नाही. तुम्ही सांगितलेल्या मुलीशी मी लग्न करीन’, असे म्हणून मी त्यांना माझा होकार कळवला. ५.५.१९७७ या दिवशी माझ्या जुळ्या भावाचे आणि ६.५.१९७७ या दिवशी माझे लग्न झाले. मला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये असून मोठा मुलगा बेंगळूरू येथे सर्जन आहे. मुलगी ((विद्या) प्रिया प्रभु) एम्.कॉम. (गणित) होऊन ‘लेक्चरर’ झाली. आता ती मंगळूरू सेवाकेंद्रात सेवा करते.

 

५. सनातन संस्थेच्या संपर्कात येण्यापूर्वी केलेली साधना

५ अ. लहानपणापासून देवाची आवड असणे

मला लहानपणापासूनच देवाची पुष्कळ आवड होती. आमच्या घरातील वातावरण त्यासाठी पोषक होते. मला देवापेक्षा संन्यासी आणि गुरु यांच्याप्रती पुष्कळ कुतूहल आणि आस्था होती.

५ आ. श्री राघवेंद्र स्वामींची भक्ती करणे

‘वर्ष १९९८ मध्ये माझी संंस्थेची ओळख झाली. त्या आधी मी ३० वर्षांपासून मंत्रालयातील श्री राघवेंद्रस्वामींची आराधना करत होतो. संत, गुरुवर्य, संन्यासी यांचे मला पूर्वीपासूनच आकर्षण होते. कुठलेही कार्य होण्यासाठी मी श्री राघवेंद्रस्वामींच्या वृंदावनाला १०८ प्रदक्षिणा घालत असे आणि ते कार्य फलद्रूप होत असे. तसेच वरदहळ्ळी येथील प.प. श्रीधरस्वामींच्या आश्रमाला भेट देऊन माझ्या आध्यात्मिक जीवनाविषयी प्रार्थना करत होतो.

पूज्याय राघवेन्द्राय सत्यधर्मरताय च ।
भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे ॥

अर्थ : श्री राघवेंद्र स्वामी पूजनीय आहेत. ते सत्यधर्माचे परिपालन करणारे होते. त्यांच्या भक्तांसाठी ते कल्पवृक्ष आणि कामधेनू होते.

‘श्री राघवेंद्र स्वामींचा सत्यधर्माचे परिपालन करणार्‍यांसाठी मी कल्पवृक्ष आणि कामधेनू होऊन राहीन’, हा बोध मला आदर्श वाटत होता.

माझा प्रारंभापासूनच कर्मफलन्याय आणि प्रारब्ध यांवर पुष्कळ विश्‍वास आहे. ‘देव धर्मपालन करणार्‍याचा हात सोडत नाही’, यावर माझी अचल श्रद्धा होती.

 

६. सनातन संस्थेशी संपर्क

६ अ. ‘सत्संगामुळे जीवनात कसा पालट होतो ?’, या
जिज्ञासेने मित्राने सांगितल्यावर सनातन संस्थेच्या सत्संगात जाणे

मी शनिवार-रविवार आणि सुटीच्या दिवशी भटकणे, घरच्या बागेत काम करणे, असे करत असे. नोव्हेंबर १९९७ मध्ये माझ्या एका मित्राने मला ‘श्री व्यंकटरमण देवस्थानात प्रत्येक शनिवारी सायंकाळी सनातनचा सत्संग होतो’, असे सांगितले. ‘सत्संगामुळे जीवनात कसा पालट होतो ?’, या जिज्ञासेने मी सत्संगाला गेलो. त्या वेळी भटकळहून डॉ. सतीश प्रभु आणि श्री. गणपति कामत हे साधक सत्संग घेण्यासाठी येत असत.

६ आ. सत्संगात सांगितलेले ‘संत दिसती वेगळाले, परि ते स्वरूपी मिळाले ।’, हे वाक्य मनावर बिंबून सत्संगात जाण्याची ओढ लागणे, श्री राघवेंद्र स्वामींच्या मठात जाणे बंद होणे आणि सत्संगाची चातकासारखी वाट पहाणे

एका सत्संगात ‘संत दिसती वेगळाले, परि ते स्वरूपी मिळाले ।’, या वाक्याने मला जागृत केले. त्या दिवसापासून माझे श्री राघवेंद्र स्वामींच्या मठात जाणे बंद झाले. माझ्या सर्व परिचितांना ‘३० वर्षांपासून श्री राघवेंद्र स्वामींची आराधना करणार्‍याला सनातनचा सत्संग झाल्यावर काय झाले ?’, याचे आश्‍चर्य वाटले. पुष्कळ लोक आणि नातेवाईक मला प्रश्‍न विचारत. मी त्यांना एकच उत्तर देत होतो, ‘‘आता तू माझी केलेली आराधना आणि मला घातलेल्या १०८ प्रदक्षिणा पुरे. तुला मी आजीवन मार्गदर्शनासाठी मोक्षगुरूंना सनातनच्या रूपात जोडून दिले आहे’, असे सांगून श्री स्वामींनीच मला इथे पाठवले आहे.’’ नोव्हेंबर १९९७ मध्ये मोक्षगुरु माझ्या जीवनात आले. तेव्हापासून गुरुकृपेमुळे मी मागे वळून पाहिले नाही. तेव्हा मी ‘कधी शनिवार येईल आणि मला सत्संग ऐकायला मिळेल ?’, याची चातकाप्रमाणे वाट पहात असे. आधी अध्यात्माविषयी थोडेसे ऐकलेल्या मला अमृत मिळाल्यासारखे वाटले.

 

७. सेवेला आरंभ

७ अ. कर्नाटकमधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जाहीर सभेच्या वेळी
१ मास सुटी घेऊन प्रसारसेवा करणे आणि या जाहीर सभेने आध्यात्मिक जीवनात मोठा पालट घडणे

मी सत्संगाला जायला लागून २ मास झाले होते. तेव्हा कर्नाटकातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जाहीर सभांना प्रारंभ झाला. सागर येथे एक जाहीर सभा घेण्याचे ठरले. भटकळ येथील साधकांनी (डॉ. सतीश प्रभु यांनी) ‘एक मास प्रचार करावा लागेल. सागर येथे सत्संग प्रारंभ होऊन केवळ २ मास झाले असल्याने माझ्यासह एक मास प्रचारासाठी कोण येऊ शकतील ?’, असे विचारताच मी ‘१ मास सुटी घेतो’, असे त्यांना सांगितले. या जाहीर सभेनेच माझ्या आध्यात्मिक जीवनात मोठा पालट घडवला. आम्ही आध्यात्मिक गुरु श्री राघवेंद्र स्वामी आणि वरदहळ्ळी येथील श्री श्रीधरस्वामी (समर्थ रामदासस्वामींचे शिष्य) यांच्या मठात जाऊन सभेच्या यशासाठी प्रार्थना करून प्रचाराला प्रारंभ केला. त्या वेळी घरोघरी केलेल्या प्रसाराच्या निमित्ताने मला ज्येष्ठ साधकांचा १ मास सतत सत्संग मिळाला. त्यामुळे मी साधनेविषयी आणखी प्रभावित झालो. विशेष म्हणजे कर्नाटकात त्या वेळी झालेल्या ‘१७ जाहीर सभांपैकी सागर येथील सभेला सर्वाधिक उपस्थिती असणे’, ही आमच्यावर झालेली गुरुकृपाच होती.

७ आ. ग्रंथप्रदर्शने लावणे, प्रवचने करणे अन् सत्संग घेणे,
अशा सेवा केल्यानंतर केंद्र आणि जिल्हा या स्तरांवरील सेवांचे दायित्व मिळणे

मी ग्रंथप्रदर्शने लावायला आणि प्रवचने करायला प्रत्येक आठवड्याला जात असे. नंतर मला सागरसह अन्य २ – ३ ठिकाणी सत्संग घेण्यास सांगण्यात आले. नंतर काही मासांतच मला केंद्र आणि जिल्हा या स्तरांवरील दायित्व देण्यात आले. गुरुकृपेमुळे माझ्याकडून सेवा चांगल्या प्रकारे होत होती. मला सेवा आणि साधना यांत आनंद मिळत होता. मी प्रत्येक सप्ताहात घरोघरी सायकलवरून साप्ताहिक सनातन प्रभात देत असे. मी शनिवारी दुपारी अधिकोषातील सेवा संपताच शिवमोग्गा, भद्रावती, शिकारीपूर, शिराळकोप्प, न्यामती या केंद्रांना भेट देऊन रविवारी रात्री उशिरा घरी येत असे. असे मी काही वर्षे केले. सर्वत्र साधकांच्या संख्येत वृद्धी झाली. त्यांच्या सहवासात मला आनंद मिळत होता.

७ इ. सेवानिवृत्त झाल्यानंतर ‘दक्षिण भारत समन्वयका’चे दायित्व मिळणे

वर्ष २००२ मध्ये मी सेवानिवृत्त झाल्यानंतर मला ‘दक्षिण भारत समन्वयका’चे दायित्व देण्यात आले. गुरुदेवांच्या कृपेने मला दीड वर्ष दक्षिण भारतातील विविध राज्यांमध्ये सेवेची संधी लाभली. तेथे माझा अनेक साधकांशी परिचय झाला.

७ ई. मुल्की सेवाकेंद्रात रहायला आल्यावर सेवाकेंद्रातील सेवा बघणे
आणि ‘साधकांच्या सहवासात राहून त्यांच्याशी कसे जुळवून घ्यायचे ?’, हे शिकता येणे

मी सेवेसाठी गावोगावी जात असतांना माझी पत्नी एकटीच घरी होती. मला तिच्याकडे नीट लक्ष देता येत नव्हते. नंतर ज्येष्ठ साधकांनी मला पत्नीसह मुल्की सेवाकेंद्रात रहायला येण्यास सांगितले.

मला सेवाकेंद्राचे आणि अन्य सेवेचे दायित्व देण्यात आले. हे सर्व माझ्यासाठी नवीन होते. सेवाकेंद्रात ४० ते ५० साधक रहात होते. साप्ताहिक सनातन प्रभात आणि सात्त्विक उदबत्ती यांच्या संबंधीच्या सेवा येथे होत असत. गुरुदेवांनीच मला येथे ‘साधकांच्या सहवासात राहून त्यांच्याशी कसे जुळवून घ्यायचे ?’, हे शिकवले.

७ उ. धर्मजागृती सभेच्या सेवेत असतांना प्रार्थना, शरणागती
आणि गुरूंशी सूक्ष्मातून बोलणे यांमुळे सेवेचा ताण न येता ती आनंदाने होणे

एप्रिल २००८ मध्ये मंगळुरू येथे झालेल्या धर्मजागृती सभेत मला समन्वयक म्हणून सेवा दिली. ‘गुरुदेवांनीच सेवेची संधी दिली आहे’, या विचाराने त्यात संपूर्ण सहभागी झालो. मंगळुरूला जाणे आणि २ दिवसांनी एकदा सेवाकेंद्रात येऊन सेवा पहाणे परत मंगळुरूला जाणे, हीच माझी दैनंदिनी झाली. या संदर्भात गुरूंप्रती प्रार्थना आणि शरणागती व्यक्त होत होती. गुरूंशी सूक्ष्मातून खूप बोलत होतो. ‘गुरुदेवा, सेवाकेंद्रात माझ्या खूप सेवा बाकी आहेत, त्या तुम्हीच करवून घ्या.’ त्या वेळी त्यांनी संपूर्ण क्षमता वापरून दोन्ही सेवा आनंदाने करवून घेतल्याची अनुभूती आली.

नंतर गुरुदेवांनी मला त्रास असणार्‍या साधकांसाठी ४ घंटे नामजप करायला सांगितले होते. गुरुदेवांनी दिलेल्या सेवा ताण न घेता आनंदाने करण्याची अनुभूती येत आहे.

७ ऊ. प्रथम भेटीतच प.पू. डॉक्टरांनी प्रगती होत असल्याचे सांगून ईश्‍वर पाठीशी असल्याचे सांगणे

वर्ष २००५ मध्ये रामनाथी येथे माझ्या पत्नीसमवेत माझी प.पू. डॉक्टरांची भेट झाली. त्या वेळी गुरुदेवांनी ‘‘तुमची प्रगती होत आहे. तुम्ही युनियनमध्ये होतात ना ? तुम्ही बाहेर जायला पाहिजे. सेवाकेंद्रात बसून काय करणार ? तुमच्या बोलण्यातून ७० टक्के आणि अस्तित्वाने ३० टक्के कार्य होणार’’, असे सांगितले. माझ्या पत्नीला संबोधून ‘‘तुम्ही उमेशदादांना समष्टी प्रसारासाठी सोडून द्या. त्यांच्या पाठीशी ईश्‍वर आहे. त्यांची काळजी करू नका’’, असे म्हणाले. माझ्या प्रगतीसाठी भेट देऊन आशीर्वाद दिले. त्यानंतर १.२.२००७ या दिवशी अचानकच दुसरी भेट झाली. ती पूर्वनियोजित भेट नव्हती.

७ ए. दुसर्‍या भेटीत प.पू. डॉक्टरांनी प्रगती पाहून आनंद होत असल्याचे सांगून
वैजंयती करमाळ भेट देणे आणि वाईट शक्तींचा त्रास असलेल्या साधकांसाठी नामजप करवून घेणे

प.पू. रघुवीर महाराजांच्या (प.पू. दास महाराजांच्या) आज्ञेप्रमाणे मी वरदहळ्ळीहून भगवान प.प. श्रीधरस्वामींच्या अभिषेकाचे तीर्थ आणि प्रसाद त्यांना द्यायला ते दाखल झालेल्या रुग्णालयात गेलो. ‘प.पू. डॉक्टरांना भेटण्याची संधी मिळावी’, अशी आतून सतत प्रार्थना आणि तीव्र इच्छा व्यक्त होत होती. मी महाराजांना प्रसाद द्यायला रुग्णालयात गेलो असता त्याच वेळी त्यांना प.पू. डॉक्टरांचा दूरध्वनी आला. ते त्यांच्या प्रकृतीविषयी विचारत होते. त्यांचे बोलणे संपण्याअगोदर मी त्यांच्यासाठी आणलेल्या प.प. श्रीधरस्वामीजींच्या प्रसादाविषयी प.पू रघुवीर महाराजांनी प.पू. डॉक्टरांना सांगितले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘रुग्णालयात सूक्ष्म वाईट शक्तींमुळे प्रसाद खराब होतो. त्यामुळे प्रसाद घेऊन उमेश शेणै यांना आश्रमात पाठवून द्या.’’ तेव्हा माझ्या आनंदाला पारावारच नव्हता. ‘अंतर्यामी गुरूंना सगळ्यांच्या मनातील गोष्ट कळते आणि हे सर्व त्यांचे पूर्वनियोजनच होते’, असे कळले. दुपारी २ वाजता माझी प.पू. डॉक्टरांशी भेट झाली. तेव्हा त्यांनी ‘तुमची स्थिती चांगली आहे. अहंही खूप कमी आहे. चुका झाल्या, तरी चिंता करू नका. गुणसंवर्धन होण्याकडे लक्ष द्या. ईश्‍वरामध्ये १०० टक्के गुण आहेत. आपण ते आपल्यात येईपर्यंत प्रयत्न करायला हवेत. तुम्ही आताच ५० टक्क्यांहून पुढे गेला आहात. यापुढे ईश्‍वर तुमचे रक्षण करणार आहे. साधकांना ५० टक्के पातळी गाठणे कठीण असते. आता तुम्ही पुढे जाल. तुमची भावावस्था पाहून मला आनंद वाटतो. आपण तुमचे एक छायाचित्र काढूया. यापुढे आम्हाला भाव असलेल्या साधकांच्या छायाचित्रांची आवश्यकता आहे. तुम्हाला पाहून मला खूप आनंद वाटतो. साधकांनी प्रगती केल्यावर मला आनंद होणारच. तुमच्या प्रगतीसाठी मी तुम्हाला काय भेट देऊ ?’’ असे म्हणत त्यांनी वैजयंती करमाळ दिली.

त्या वेळी त्यांनी सूक्ष्म-परीक्षण करून सांगितले, ‘‘तुमचे ज्ञानेंद्रिय जागृत झाले आहे. यापुढे सूक्ष्म-कर्मेंद्रियही जागृत होईल. तुम्ही साधकांसाठी नामजपादी उपाय करू शकता. तुम्ही आणलेले श्रीधरस्वामीजींचे कुंकू घेऊन उपाय करूया’’, हे सगळे त्यांनीच करवून घेतले, तरी त्याचे यश साधकांना देणार्‍या अवतारी रूपाविषयी कृतज्ञता व्यक्त झाली.

७ ऐ. विजयादशमीच्या दिवशी प.पू. डॉक्टरांनी सोन्याची
(आपट्याची) पाने देऊन आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्याचे सांगणे

९.१०.२००८ या दिवशी, म्हणजे विजयादशमीच्या दिवशी गुरुदेवांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांनी आम्हाला विजयदशमीनिमित्त आशीर्वाद आणि सोन्याची (आपट्याची) पाने देऊन मुल्की सेवाकेंद्रातील साधकांना द्या आणि तुमची प्रगती योग्य रीतीने होत असल्याचे सांगितले. त्या वेळी मला कंप सुटून माझ्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. प.पू. डॉक्टर इतर साधकांसोबत बोलत असतांना त्यांनी ‘माझी आध्यात्मिक पाताळी ६० टक्के झाली आहे’, असे सांगितले. हे सगळे सांगतांना मी तिथेच होतो; पण मी हे काहीच ऐकलेच नाही. मी स्तंभित झालो होतो. इतर साधकांनी माझ्या प्रगतीविषयी सांगितल्यावर मला ते समजले. ‘उद्या तुम्ही साधकासमवेत नामजप करणार आहात. मागच्या वेळी तुमच्याकडून साधकासाठी नामजप करवून घेतले होते. या वेळेचा नामजप अणि मागच्या वेळी केलेले नामजपादी उपाय यांमध्ये काय फरक जाणवतो, याचा अभ्यास करायचा आहे’, असे प.पू. डॉक्टरांनी सांगितले.

७ ओ. आध्यात्मिक पातळी ६० टक्के होणे आणि मंगळूरू सेवाकेंद्रात सनातन प्रभात
आणि कन्नड, तमिळ, मल्याळम् अन् तेलुगू या भाषांतील सनातन पंचांगांच्या विज्ञापन सेवा करणे

गुरुकृपेने माझी आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाली. नंतर अनुकूलतेच्या कारणाने मुल्की सेवाकेंद्र मंगळूरू येथे स्थलांतरित झाले. तिथे मला अन्य सेवांच्या दायित्वासह सनातन प्रभात अन् कन्नड, तमिळ, मल्याळम् आणि तेलुगू या भाषांतील सनातन पंचांगांची विज्ञापन सेवा गुरुकृपेने मिळाली. मुल्की, तसेच मंगळूरू सेवाकेंद्रात वरील सेवा ६ वर्षे केली. मला सेवेत आनंदही मिळत होता.

 

८. पत्नीचे देहावसान

१२.१.२०१४ या दिवशी मंगळूरू सेवाकेंद्रात माझी पत्नी सौ. उषा शेणै हिचे देहावसान झाले. तेव्हा तिने गुरुकृपेने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली होती. त्यानंतर मला देवद आश्रमात सेवा करण्याचे भाग्य प्राप्त झाले.

 

९. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुवभलेली कृपा आणि त्यामुळे आलेल्या अनुभूती

९ अ. ‘अनेक वर्षे घरातील कुटुंबप्रमुख असूनही मायेचा
त्याग करून पूर्णवेळ साधना करणे’, हीच सर्वांत मोठी गुरुकृपा !

‘मी पूर्णतः मायेत गुंतलो असतांना तिचा त्याग करून पूर्णवेळ साधनेत आलो’, हीच माझ्यावर सर्वांत मोठी गुरुकृपा आहे. अनेक वर्षे घरातील कुटुंबप्रमुख असलेल्या मला गुरुदेवांमुळे बाहेर पडणे शक्य झाले. मला याचे आजही आश्‍चर्य वाटते. ‘मी बाहेर कसा पडलो ? माझा जुळा भाऊ माझा प्राणप्रिय ! त्याला सोडून मी साधनेत कसा आलो ?’, हा आजही मला सर्वांत मोठा प्रश्‍न आहे. हा केवळ माझ्यासाठी नव्हे, तर माझे परिचित आणि नातेवाईक यांच्यासाठीही आश्‍चर्याचा विषय आहे. माझ्या जीवनशैलीत पालट झाला. माझा आहार, वेशभूषा आणि आचार-विचार यांत आमूलाग्र पालट झाला. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’ हे तत्त्व दृढपणे मनात राहून माझ्याकडून प्रयत्न होऊ लागले.

९ आ. शरणागत भावात राहून सेवा भावपूर्ण
आणि परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतांना आनंदाची अनुभूती येणे

श्री गुरुदेवांच्या कृपेमुळे कोणतीही सेवा दिली अथवा कितीही सेवा असली, तरी ‘ती परिपूर्ण, भावपूर्ण आणि चुकांविरहित व्हावी’, असे माझे प्रयत्न होत आहेत. ‘सर्व सेवा देणारे, करणारे आणि करवून घेणारे गुरुदेवच आहेत’, अशी अनुभूती येऊन स्वतःचे अस्तित्व नष्ट होत असल्याची मला अनुभूती येते. सेवा आणि साधना यांच्याविषयी त्यांच्या चरणी शरणागत भाव वाढून मला आनंदाची अनुभूती येते.

९ इ. देवद आश्रमात लाभलेले संतांचे मार्गदर्शन आणि सद्गुरु
राजेंद्र शिंदे यांचा सत्संग, यांमुळे स्वभावदोष न्यून होऊन साधनेची दिशा मिळणे

माझ्यातील विसराळूपणा, भावनाशीलता, तारतम्याचा अभाव, तत्परतेचा अभाव, लक्षपूर्वक कृती न करणे, मनाचा अभ्यास नसणे, अनावश्यक विचार करणे, सतर्कतेचा अभाव, कृतीच्या संदर्भात बुद्धीचा उपयोग न करणे इत्यादी स्वभावदोष गुरुकृपेमुळे पुष्कळ न्यून झाले आहेत. देवद आश्रमात लाभलेले संतांचे मार्गदर्शन आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा सत्संग यांमुळे मला साधनेची दिशा मिळत आहे.

९ ई. ‘प्रेमभाव आणि नम्रता यांमुळे सर्व आपले होतात’, ही
गुरुदेवांची शिकवण आचरणात आणल्याने प्रेमभावात गुणात्मक वाढ होणे

सर्वांमध्ये प्रेमभाव असल्याने माझ्या प्रेमभावातही गुणात्मक वाढ झाल्याची जाणीव श्री गुरुदेवांच्या कृपेमुळेच झाली. ‘प्रेमभाव आणि नम्रता यांमुळे सर्व आपले होतात’, हे गुरुदेवच शिकवत आहेत. प्रतिक्रिया, नकारात्मक विचार आणि क्रोध इत्यादी स्वभावदोष गुरुदेवांनीच न्यून केले.

९ उ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले सूक्ष्मातून
साधनेच्या पुढील टप्प्याविषयी मार्गदर्शन करत आहेत’, असे जाणवणे

‘परात्पर गुरु डॉक्टर सूक्ष्मातून मला सर्व सांगत आहेत. ‘साधनेतील एक टप्पा गाठल्यानंतर पुढच्या टप्प्याला कसे जायचे ?’, हे समजत नसलेल्या मला विचार देऊन पुढील साधना सांगत आहेत’, याची मला जाणीव होते. हे सर्व माझ्या क्षमतेच्या पलीकडचे आहे. ‘मी सूक्ष्मातून सर्वत्र आणि सर्वांमध्ये असतो’, अशी अनुभूती गुरुदेव देत आहेत.

‘शरणागत भावात असल्यास सर्वकाही गुरुदेवच करत आहेत’, याची मला जाणीव होते. संत किंवा सद्गुरु राजेंद्रदादा यांनी साधनेच्या प्रवासातील पुढच्या टप्प्याविषयी सांगितल्यावर ‘गुरुदेवच त्यांच्या माध्यमातून मला पुढील टप्प्याचे मार्गदर्शन करत आहेत’, हे माझ्या लक्षात येते. ‘दैनिकात आलेल्या प्रत्येक मार्गदर्शक सूत्राचे पालन करण्याचा प्रयत्न होत असणे’, ही गुरुकृपा नव्हे तर आणखी काय ?

 

१०. पू. उमेश शेणै यांच्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काढलेले गौरवोद्गार !

१० अ. पू. उमेश शेणै यांच्यात साक्षीभाव असणे

सौ. गाडगीळ : ‘उमेशअण्णा, ‘आपल्यात साक्षीभाव आहे’, असे प.पू. डॉक्टरांनी सांगितले होते. आता आपली स्थिती कशी आहे ? तुम्ही तुम्हालाच या संतांमध्ये पहात आहात कि साक्षीभावाने पहात आहात ?

पू. उमेशअण्णा : ‘प.पू. डॉक्टरांनी हे सांगितले; पण मला साक्षीभाव म्हणजे काय, हे ठाऊक नाही. माझे रागावणे अल्प झाले आहे. मी इतरांकडून त्यांचे विचार घेतो; पण त्यांच्यातील प्रतिक्रिया माझ्या आतमध्ये येतच नाहीत. त्यांच्यातील गुण आणि प्रेम माझ्यात येते.’

१० आ. पू. उमेशअण्णा हे ज्ञानमार्गी संत असणे

‘आतापर्यंत झालेले सर्व संत भक्तीमार्गी आहेत; पण उमेशअण्णा ज्ञानमार्गी संत आहेत.’’ प्रत्येक गोष्टीतील स्पंदनांचा ते विचार करतात.’

– डॉ. आठवले

 

११. गुरुदेवांनी दिलेल्या अनुभूती

११ अ. कौटुंबिक गरजांकडे वैयक्तिक लक्ष न देताही काहीही अडथळे न येणे

‘माझ्या पत्नीची प्रकृती ठीक नसतांना तिला घरी एकटीला सोडून सेवेला जातांना, तसेच माझ्या दोन मुलांच्या लग्नाच्या वेळी मी त्याकडे अधिक लक्ष दिले नसतांनाही काही अडथळे आले नाहीत. तसेच घरातील वरिष्ठ कुटुंबियांकडून माझ्या साधनेत अडथळे आले असतांना गुरुदेवांनीच मला बाहेर काढले.’

११ आ. मुलाच्या मेंदूच्या शस्त्रक्रियेच्या वेळी स्वतःच्या अनुपस्थितीत
दुसर्‍यांच्या साहाय्याने काहीच अडथळे न येता ८ घंटे चालणारी शस्त्रक्रिया ३ घंट्यांतच
संपणे आणि रुग्णालयात २० दिवस थांबावे न लागता ८ दिवसांत त्याला बरे वाटल्याने घरी येता येणे

‘दोन वर्षांपूर्वी माझ्या मुलाच्या मेंदूची शस्त्रक्रिया होती. तेव्हा माझ्या अनुपस्थितीत दुसर्‍यांच्या साहाय्याने काहीच अडथळे न येता निर्विघ्नपणे शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली. ही माझ्यावर असलेली गुरूंची कृपाच आहे. त्याला गोव्यातून मुंबईला विमानातून नेले. तेथून हिंदुजा रुग्णालयात नेले. आशियात मेंदूच्या शस्त्रचिकित्सेत सर्वोत्तम म्हणून प्रसिद्ध असलेल्या वैद्यांंनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. ८ घंटे चालणारी ही शस्त्रक्रिया ३ घंट्यांतच संपली. त्यासाठी पैशांची व्यवस्था झाली. ‘शस्त्रक्रिया झाल्यावर रुग्णालयात २० दिवस थांबावे लागते’, असे सांगिंतले होते; परंतु मुलाला ८ दिवसांत बरे वाटून लवकर घरी येता आले. ही माझ्या जीवनात गुरुदेवांनी दिलेली सर्वांत मोठी अनुभूती आहे. तेव्हा मी रुग्णालयात जातांना दुसर्‍या कुणालातरी पहायला जात आहे’, असे वाटत होते.’

११ इ. कृतज्ञता आणि प्रार्थना

सर्व टप्प्यांत साधकांची प्रगती करून घेऊन त्यांना स्थूल आणि सूक्ष्म शिकवणे, त्यासाठी त्यांची प्रशंसा करून आनंद व्यक्त करणार्‍या अवतारी गुरूंना माझे शतकोटी प्रणाम. गुरुदेवा, मी अज्ञानी, असमर्थ, असाहाय्य, अयोग्य व अहंकारी असूनही माझा हात धरून मला साधनेत पुढे घेऊन जा. माझे मन आणि बुद्धी यांवर तुम्हीच बसून माझाकडून सेवा अन् साधना करवून घ्या. माझी आध्यात्मिक प्रगती करवून घ्या. जे काही घडते, ते तुमच्या पूर्वनियोजनेनेच होते. मला तुमचे माध्यम बनवून माझा जन्म सार्थकी करवून घ्या. हे सर्व तुम्हीच विचार देऊन लिहून घेतले. सर्व लिखाण कृतज्ञतापूर्वक तुमच्या चरणी अर्पण करून धन्यता मानतो. तुमच्या चरणी कृतज्ञतापूर्वक साष्टांग नमस्कार.’

 

१२. पू. उमेश शेणै यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन

१२ अ. व्यष्टी साधना

‘इतरांना साहाय्य केल्याने स्वतःकडे असलेली सेवा प्रलंबित न रहाता कुणीतरी साहाय्याला मिळून सेवा वेळेत पूर्ण होते !

१२ आ. समष्टी साधना

१२ आ १. गुरूंच्या समष्टी सेवेशी एकरूप होण्यासाठी त्यांनाच प्रार्थना करणे

येणार्‍या काळात आपल्याला काळाशी एकरूप व्हायचे आहे. गुरूंच्या संकल्पाशी एकरूप व्हायचे आहे. गुरूंच्या समष्टी सेवेशी एकरूप व्हायचे आहे. त्यासाठी प.पू. डॉक्टरांना प्रार्थना आहे की, हे सर्व करण्यासाठी जे गुण यायला हवेत, जे दोष घालवायला हवेत, ते तुम्हीच आमच्याकडून करवून घ्या.’

१२ आ २. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी तन-मन-धन अर्पण करून गुरुकृपेस पात्र व्हा !

‘पुढे येणारा काळ भीषण आहे आणि त्याला सामोरे जाण्यासाठी साधनेला पर्याय नाही’, असे गुरुदेव आपल्याला वेळोवेळी सांगत असतात. आता आपण काळाशी आणि गुरूंच्या संकल्पाशी एकरूप होऊन, श्रीगुरूंनी केलेल्या मार्गदर्शनातील प्रत्येक सूत्र कृतीत आणून गुरुकृपेस पात्र झाले पाहिजे. गुरुदेव साधकांसाठी कामधेनू आणि कल्पवृक्ष आहेत. साधनेसाठी गुरुदेवांच्या चरणी शरणागतभावाने याचना करणे अन् गुरूंच्या संकल्पाप्रमाणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी तन-मन-धन अर्पण करून गुरुकृपेस पात्र होणे, हीच गुरुपौर्णिमेची गुरुदक्षिणा होय !’ – पू. उमेश शेणै, कर्नाटक

१२ आ ३. राष्ट्र आणि धर्म यांसाठी सर्वस्व त्यागण्यास सिद्ध होऊया !

‘ही गुरुपौर्णिमा खूप महत्त्वाची आहे. काळानुसार पुढे येणारे दिवस खूप कठीण असणार आहेत. आपत्काळाचे सर्व संकेत सर्व जणच अनुभवत आहेत; पण यातून बाहेर कसे यायचे, ते फक्त गुरुच सांगू शकतात. बहुतेक संत, गुरु पुढे येणार्‍या आपत्काळाविषयी आपल्याला पूर्वसूचना देतात. आपत्काळात दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन होऊन साधकांची साधना होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत: साधक होण्याकरता प्रयत्न केला पाहिजे. श्रीकृष्णाने गीतेत सांगितल्याप्रमाणे धर्माला ग्लानी आल्यावर तो अवतार घेऊन ‘साधकांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश’ करणार आहे. त्यामुळे साधनेला पर्याय नाही. ‘सर्वांची साधना तीव्र गतीने होऊन पुढे येणारे हिंदु राष्ट्र पहायचे भाग्य आम्हा सर्वांना लाभू दे. राष्ट्र आणि धर्म यांसाठी तन, मन आणि धन, यांबरोबरच सर्वस्व त्यागण्यास सिद्ध होऊया.’ हीच या गुरुपौर्णिमेला गुरुदक्षिणा !’ – पू. उमेश शेणै, कर्नाटक

१२ आ ४. आपत्काळात तीव्रतेने साधना करण्याविषयी पू. उमेश शेणै यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन
१२ आ ४ अ. अन्य काळापेक्षा संक्रमण काळात केलेल्या साधनेचा लाभ ४३ पटींनी अधिक मिळणे

‘आपण सध्या खडतर काळ अनुभवत आहोत. तो दिवसेंदिवस अधिकाधिक खडतर होणार आहे; परंतु गुरूंच्या कृपेमुळे आपल्याला पुढे येणार्‍या त्रासदायक दिवसांची काळजी करण्याचे कारण नाही. प.पू. डॉक्टरांनी आपल्याला ‘काळानुसार साधना’ या माध्यमातून पुढील खडतर दिवसांत येणार्‍या अडचणींना तोंड देण्यासाठी सिद्ध केले आहे. हा संधीकाळ म्हणजेच संक्रमण काळ असल्याने ईश्‍वराने त्याद्वारे आपल्यावर कृपा केली आहे. अन्य काळात केलेल्या साधनेपेक्षा या कालावधीत साधना केल्यास आपल्याला ४३ पट अधिक लाभ होतो. आपण या काळाचा पूर्ण लाभ घेतला पाहिजे. हे सर्व प.पू. डॉक्टरांच्या संकल्पाने घडत आहे. असा काळ कित्येक युगांमध्ये एकदाच येतो.

१२ आ ४ आ. साधनेत येणारे अडथळे जलद आध्यात्मिक उन्नतीसाठीच निर्माण होत असल्याने त्यांना खंबीरपणे तोंड द्या !

ईश्‍वराचा अवतार असलेल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपली साधनासुद्धा तीव्रतेने होते. आपल्यापैकी प्रत्येकाला अडथळ्यांतून जावे लागेल; परंतु आपण त्याकडे अधिक लक्ष द्यायचे नाही. साधनेत येणारे अडथळे आपल्या जलद आध्यात्मिक उन्नतीसाठीच निर्माण होतात. आपत्काळाला तोंड देण्यासाठी आपण तीव्रतेने प्रार्थना करून गुरूंच्या चरणी समर्पित झाले पाहिजे. अडथळ्यांना तोंड देण्यासाठी हीच गोष्ट आपल्याला साहाय्यकारक होईल.

१२ आ ४ इ. साधनेतील अडथळ्यांवर मात करण्यासाठी ‘अष्टांगयोग’ काटेकोरपणे अनुसरणे आवश्यक !

प.पू. डॉक्टरांनी आपल्याला कळकळीने सांगितलेला ‘अष्टांगयोग’ आपण काटेकोरपणे अनुसरला पाहिजे. आपल्याला दिलेल्या सेवा परिपूर्ण करून आपले स्वभावदोष आणि अहं नष्ट करण्याचा अन् भाव विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वतःच्या चुकांमधून शिकण्याचा आणि स्वतःत चांगले गुण विकसित करून त्या चुकांवर मात केली पाहिजे. मोठ्या प्रमाणात फळ देणार्‍या या संधीकाळात स्वतःच्या साधनेला गती देणे आवश्यक आहे.

१२ आ ४ ई. उच्च आध्यात्मिक पातळीला पोचण्यासाठी व्यष्टी आणि समष्टी साधनेचा उत्तम संगम साधण्यासाठी प्रार्थना करणे आवश्यक !

सध्या पुष्कळ साधक ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठत आहेत. ज्या साधकांनी ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे, ते ‘संतपदा’ला पोचत आहेत. साधना करणार्‍या साधकांसाठी हा काळ अगदी योग्य असल्याचे हे निदर्शक आहे. ‘उच्च आध्यात्मिक पातळीला पोचण्यासाठी आणि व्यष्टी अन् समष्टी साधनेचा उत्तम संगम होण्यासाठी आमची तळमळ वाढू दे’, अशी मी श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांच्या चरणकमली प्रार्थना करतो. ही बहुधा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्वोत्तम गुरुदक्षिणा असेल.

१२ आ ४ उ. आपत्काळात असलेल्या संधीकालात साधना केल्याने लाभ होणार असल्याने साधकांनी आपत्काळाविषयी भीती बाळगायला नको !

प.पू. डॉक्टरांनी ग्रंथात आपत्काळ येणार असल्याचे लिहून ठेवले आहे. आपत्काळात संधीकालही असेल. या संधीकालात साधना केल्यास लाभ होईल. त्यामुळे आपत्कालाविषयी साधकांच्या मनात कोणत्याच प्रकारची भीती नको. ‘काळानुसार साधना’ यात प.पू. डॉक्टरांनी आपल्याला टप्प्याटप्प्याने नामजपापासून अष्टांग साधनेपर्यंत आणले. त्यातून येणार्‍या कठीण काळात कसे रहायचे, यासाठी त्यांनी आपल्याला सिद्ध केले आहे. भगवान श्रीकृष्णानेही सांगितले आहे की, मी साधकांचे रक्षण करणार आहे. ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ म्हणजे ‘माझ्या भक्तांचा कधीही नाश होणार नाही.’ तसेच होणार आहे. त्यासाठी प.पू. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला साधक बनायचे आहे आणि पुढे जायचे आहे. त्यामुळे संधीकाल येऊ दे. त्यात दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन होणार आहे आणि ईश्‍वरी राज्य येणार आहे.’

 

१३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प आणि आशीर्वाद
यांमुळेच लिखाण करू शकत असल्याविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता !

मला या अनुभूती आल्याने मी संतपद गाठू शकलो. प्रत्येक संतांचे वैशिष्ट्य सांगतांना गुरुदेव माझ्याविषयी ‘हे लहान-लहान विषय घेऊन त्यावर सविस्तर लिहितात’, असे म्हणाले होते. आज त्यांचा संकल्प आणि आशीर्वाद यांमुळे हे साध्य होत आहे. मी त्यांचा संकल्प आणि आशीर्वाद यांमुळेच लिहू शकत आहे. हे लिखाण श्री गुरुचरणी अर्पण करतो.

॥ गुरुचरणार्पणमस्तु ॥’

– (पू.) के. उमेश शेणै, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.७.२०१८)

 

सनातनचे संत केवळ संत नाहीत, तर गुरुच आहेत !

‘गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. सनातनमध्ये ७० हून अधिक साधक संत झाले आहेत. आपण त्यांना ‘संत’ म्हणत असलो, तरी ते त्यांच्या संपर्कातील साधकांना साधनेसंदर्भात मार्गदर्शन करतात, अगदी देहत्याग होईपर्यंत करतात, म्हणजे त्यांचे कार्य गुरूंप्रमाणेच साधनेत मार्गदर्शन करण्याचे आहे; म्हणून गुरुपौर्णिमेला त्यांची माहिती सर्व साधकांना व्हावी आणि त्यांना संतांकडून काहीतरी शिकायला मिळावे, यासाठी त्यांची माहिती ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित करत आहोत. त्या माहितीत त्यांच्या साधनेतील वाटचालीचीही माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल जवळीक वाटायला साहाय्य होईल.

संतांची वैशिष्ट्ये केवळ वाचू नका, तर ती स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे या लेखमालेचे सार्थक होईल.’ – – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

Leave a Comment