ईश्वरप्राप्तीसाठी त्यागाचे महत्त्व !

Article also available in :

 

१. त्यागाचे प्रकार आणि त्यांचे ईश्वरप्राप्तीच्या संदर्भात महत्त्व

 

२. विविध विषयांच्या आसक्तीमुळे व्यक्तीच्या जीवनावर होणारा परिणाम

व्यक्ती शरिराद्वारे विविध सुखे उपभोगते, उदा. आवडीचे पदार्थ खाणे-पिणे, मनोरंजन, फिरणे, संभोग इत्यादी. शरिराद्वारे घडणार्‍या कृती पुनःपुन्हा केल्याने आणि त्यांतून मिळणारे सुख पुनःपुन्हा भोगल्याने व्यक्तीच्या अंतर्मनावर याचा दृढ संस्कार होतो अन् तिच्या मनात या सर्व विषयांची आसक्ती निर्माण होते. ही आसक्ती दिवसेंदिवस वाढत जाते. कालांतराने व्यक्तीला शरिराच्या मर्यादा लक्षात येऊ लागतात, तसेच तिला काही रोग होतात; पण तरीही तिची सुख अनुभवण्याची आसक्ती अल्प होत नाही. अशा परिस्थितीत पूर्वीइतके सुख न मिळल्याने ती व्यक्ती दुःखी होते.

श्री. राम होनप

 

३. त्यागाचे प्रकार आणि त्याग केल्याने होणारे लाभ

३ अ. तनाच्या त्यागामुळे होणारे लाभ

३ अ १. विविध विषयांतील आसक्ती न्यून होऊन जीवन आनंदी होणे : साधकाने गुरूंची किंवा अध्यात्मप्रसाराची सेवा केल्यास त्याचा विविध विषयांद्वारे सुख मिळवण्याचा संस्कार हळूहळू न्यून होतो. त्याचे लक्ष गुरु आणि गुरूंची सेवा यांवर केंद्रित होते. त्यानंतर त्याला सेवेचा ध्यास लागतो. सेवेद्वारे साधकाला ईश्वरी शक्ती आणि कृपा प्राप्त होत असते. त्यामुळे त्याला ईश्वरी आनंदाची अनुभूती येते. हा आनंद सतत मिळाल्यामुळे साधकाच्या मनातील विविध विषयांची आसक्ती न्यून होते.

३ अ २. वृत्ती त्यागी बनणे : शरिराने सतत गुरूंची सेवा केल्याने साधकाच्या मनातील भोग भोगण्याची इच्छा न्यून होऊन त्याची वृत्ती त्यागी होते. त्यामुळे तो विविध विषयांतून मिळणारे सुख आणि दुःख यांच्या पलीकडील आनंदी विश्व अनुभवू लागतो.

३ अ ३. शरिरातील रज-तम न्यून होणे : साधकात ‘प्रारब्ध, अनिष्ट शक्तींचा त्रास आणि बाह्य वातावरण’, यांमुळे रज-तम निर्माण झालेले असते. साधकाला सेवेद्वारे ईश्वरी शक्ती प्राप्त होते. त्यामुळे त्याच्या शरिरातील रज-तमात्मक कण नष्ट होण्याची प्रक्रिया चालू होते.

३ अ ४. आरोग्य लाभणे : साधकाने गुरूंसाठी शरिराचा त्याग केल्याने गुरु सूक्ष्मातून त्याच्या शरिराची काळजी घेतात. काही साधकांना प्रारब्धामुळे होणार्‍या रोगांचा त्रास सहन करावा लागतो. तो त्रास सहन करण्याची शक्ती गुरु साधकाला देतात, तसेच काही साधकांना उत्तम आरोग्य प्राप्त होते.

३ अ ५. देहबुद्धी न्यून होणे : व्यक्तीचे शरीर पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश यां पंचतत्त्वांद्वारे बनले आहे. गुरुसेवेद्वारे साधकातील रज-तम न्यून होते आणि त्याच्या शरिरातील पृथ्वीतत्त्वाची शुद्धी होते. त्यामुळे साधकाची देहबुद्धी न्यून होऊन त्याला हलकेपणा आणि उत्साह जाणवतो.

३ अ ६. अहं न्यून होण्यास साहाय्य होणे : साधक विविध विषयांत न अडकता गुरुसेवेसाठी शरिराचा त्याग करण्यावर लक्ष केंद्रित करतो. यातून साधकाचा स्वतःच्या सुखाचा विचार न्यून होतो. परिणामी त्याचा अहं न्यून होतो.

३ अ ७. गुरुकृपा होणे : सतत गुरुसेवा किंवा अध्यात्मप्रसार यांसाठी सेवारत राहिल्याने साधकावर गुरुकृपा होते. त्याच्यावर गुरूंची कृपादृष्टी नेहमी असते. त्यामुळे साधकाच्या साधनेतील अडचणी हळूहळू न्यून होऊ लागतात.

३ अ ८. शरिराची शुद्धी होणे : शरिराच्या त्यागाने साधकाच्या शरिरात ईश्वरी तत्त्वाची वृद्धी होते. यातून साधकाच्या शरिराची शुद्धी होऊ लागते.

३ अ ९. शरिरात देवत्व निर्माण होणे : शरीर भगवंतासाठी अर्पण करतांना साधकाचा प्रत्येक अवयव भगवंताच्या सेवेत समर्पित होतो. त्यामुळे भगवंत प्रसन्न होतो. भगवंताच्या कृपेमुळे साधकाच्या शरिरात देवत्व निर्माण होते.

३ आ. मनाच्या त्यागामुळे होणारे लाभ

३ आ १. ध्येयाचे स्मरण रहाणे : मन सतत देवाला अर्पण करत राहिल्याने साधकाला ‘मला साधना करून ईश्वरप्राप्ती साध्य करायची आहे’, या ध्येयाचे स्मरण रहाण्यास साहाय्य होते.

३ आ २. विविध विषयांतून अलिप्त होणे : गुरु किंवा देव यांचे सतत स्मरण केल्याने साधकाच्या मनातील इच्छा आणि वासनायुक्त विचार न्यून होतात. त्यामुळे साधकाचे मन विविध विषयांतून अलिप्त होते. परिणामी साधकाचे मन सुख आणि दुःख यांत न अडकता त्याला स्थिर रहाता येते. त्यामुळे त्याच्या प्रारब्धात नव्याने भर पडत नाही.

३ आ ३. प्रारब्धभोग न्यून होणे : चालू आणि मागील जन्मांतील कर्मदोषांमुळे साधकाच्या अंतर्मनात कर्मदोषांची केंद्रे निर्माण झालेली असतात. त्यामुळे साधकाला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास भोगावे लागतात. साधकाने मन सतत भगवंताला अर्पण केल्याने त्याच्या कर्मदोषांची तीव्रता न्यून होते, तसेच त्याला कर्मदोष भोगण्याची शक्ती प्राप्त होते. परिणामी त्याचे असह्य प्रारब्ध सुसह्य होते.

३ आ ४. नवीन कर्मदोषांची निर्मिती न होणे : मन भगवंताच्या नामावर केंद्रित झाल्याने साधकाचे मन सात्त्विक होते. त्यामुळे तो अयोग्य कर्मे करण्यापासून परावृत्त होतो. परिणामी साधकात नवीन कर्मदोषांची निर्मिती होत नाही.

३ आ ५. दुःख सहन करण्याची शक्ती मिळणे : प्रारब्धाची तीव्रता अधिक असल्यास व्यक्ती हतबल होते. देवाचे स्मरण सतत केल्याने तिला देवाचा आधार मिळतो आणि दुःख सहन करण्याची शक्ती मिळते, तसेच सकारात्मक राहून जीवन जगण्याची प्रेरणा मिळते.

३ आ ६. आध्यात्मिक त्रासाचे निवारण होणे : साधकाला साधना करतांना ‘मागील जन्मांतील देवाण-घेवाण हिशोब आणि चालू जन्मातील अनिष्ट शक्तींचा त्रास’, यांना सामोरे जावे लागते. साधकाला शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि कौटुंबिक पीडा सहन करावी लागते. सतत नामजप केल्याने त्याचा आध्यात्मिक त्रास न्यून होऊन कालांतराने त्याचे हे त्रास पूर्णतः दूर होतात; कारण अनिष्ट शक्ती कितीही प्रबळ असल्या, तरी भगवंत सर्वशक्तीमान आहे.

३ आ ७. मनोबल वाढणे : विविध विषयांत व्यक्तीच्या मनाची ऊर्जा पुष्कळ व्यय होते. मन नामात गुंतवले की, मनाच्या ऊर्जेचा व्यय थांबतो. परिणामी साधकाचे मनोबल वाढते.

३ आ ८. मनाची शुद्धी होणे : साधकाने नामजपाच्या समवेत स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन अन् गुणसंवर्धन यांची प्रक्रिया राबवणे महत्त्वाचे आहे. साधकाने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न केल्याने त्याच्यातील रज-तम न्यून होते अन् गुणसंवर्धन केल्याने सत्त्वगुण वाढतो. यातून साधकाच्या मनाची शुद्धी परिणामकारक होते. या प्रक्रियेद्वारे साधकाच्या साधनेचा पाया पक्का होतो. मनाचा अडथळा न्यून झाल्याने साधकाच्या जलद आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. सनातन धर्मात ईश्वरप्राप्तीसाठी चित्तशुद्धीला महत्त्व दिले आहे. स्वतःला पालटण्यावर लक्ष केंद्रित केल्याने साधकाच्या चित्ताच्या शुद्धीची प्रक्रिया घडते.

३ आ ९. भाव निर्माण होऊन देवाचे साहाय्य लाभणे : साधक भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने त्याच्यात हळूहळू ईश्वराविषयीच्या भावाची निर्मिती होते. त्यामुळे त्याला भगवंताचे विचार ग्रहण करता येतात. परिणामी साधकाला ‘प्रसंगानुरूप वागणे, बोलणे आणि संकटातून बाहेर पडणे’, यांचे ज्ञान होऊन त्याचे जीवन सुकर होते.

३ आ १०. मनोलय होणे : देवाचे स्मरण केल्याने, तसेच स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन अन् गुणसंवर्धन यांची प्रक्रिया राबवल्यामुळे साधकाचे मन नष्ट होऊन ते ईश्वराचे मन बनते. त्यामुळे साधकाला ईश्वराचे विचार ग्रहण होऊ लागतात.

३ आ ११. निर्विचार अवस्था प्राप्त होणे : साधकाने देवाला मन सतत अर्पण केल्यावर त्याला कालांतराने निर्विचार अवस्था प्राप्त होते. या स्थितीत मनाद्वारे निर्माण होणार्‍या असंख्य भावना संपतात. तेव्हा त्याला दैवी जीवन प्राप्त होते. या स्थितीत साधकावर चांगल्या आणि वाईट परिस्थितीचा कुठलाच परिणाम होत नाही. तेव्हा साधक कर्मबंधनाच्या पलीकडे गेलेला असतो.

३ आ १२. देवाचे सतत स्मरण करणे किंवा निर्विचार अवस्था यांमुळे साधकाला कुठल्याही प्रसंगात आनंदी रहाता येते, तसेच त्याला स्वतःच्या हृदयात भगवंताचा वास आणि प्रेम अनुभवता येते.

३ इ. धनाचा त्याग केल्याने होणारे लाभ

३ इ १. ईश्वराने साधकाचा सर्व भार घेणे : कलियुगात धनाद्वारेच व्यक्तीला जीवन जगता येते. त्यामुळे ती धनावर पूर्णतः अवलंबून असते. पैशाच्या अभावी व्यक्तीच्या जीवनात असंख्य अडचणी येतात. त्यामुळे हे सर्वांत कठीण प्रारब्ध मानले आहे. अशा परिस्थितीत जेव्हा साधक धनाचा पूर्ण त्याग करून स्वतःचे जीवन गुरूंवर सोपवतो, तेव्हा गुरु स्वतः साधकाचा सर्व भार घेतात अन् त्याची सर्वतोपरी काळजी घेतात.

३ इ २. भोगी वृत्ती न्यून होऊन जीवन समाधानी होणे : व्यक्तीच्या मनात धनामुळे विविध इच्छा आणि वासना निर्माण होतात अन् त्याची वृत्ती भोगी बनते. यांतून तिचा अहं वाढत जातो. त्यामुळे तिचे जीवन असमाधानी आणि अशांत बनते. जेव्हा साधक टप्प्याटप्प्याने धनाचा त्याग करतो, तेव्हा त्याच्यातील भोगी वृत्ती न्यून होते. त्यामुळे त्याचे जीवन समाधानी होऊ लागते.

३ इ ३. जीवनातील अडथळे न्यून होणे : साधक धनाचा त्याग करू लागल्यावर त्याच्यावर गुरूंची कृपादृष्टी रहाते. ‘अशा साधकाला वर्तमानात आणि भविष्यात आर्थिक अडचणी निर्माण होणार नाहीत’, याची काळजी गुरु घेतात. काही साधकांच्या संदर्भात गुरु प्रत्यक्ष किंवा सूक्ष्मातून त्या साधकाच्या अडचणी दूर करतात. काही साधकांना आर्थिक अडचणी आल्या, तरी गुरु त्यांना त्यांतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतात. विविध कठीण प्रसंगांत गुरु पाठीशी असल्याने साधकाला स्थिर रहाता येते.

३ इ ४. काही देवाण-घेवाण हिशोब फिटणे : व्यक्तीचे अनेक जन्म झालेले असतात. त्यांत ‘तिने किती जणांचे पैसे घेतले आहेत ? आणि तिच्याकडे किती जणांचे पैसे येणे शेष आहेत ?’, हे तिला ठाऊक नसते. असे अनेक देवाण-घेवाण हिशोब निर्माण झालेले असतात. त्यामुळे व्यक्तीच्या चालू जन्मात अनेक संकटे येत असतात. हे देवाण-घेवाण हिशोब फेडण्यासाठी साधकाच्या साधनेचा व्यय होत असतो. गुरूंना पैसे अर्पण केल्याने साधकाचे काही देवाण-घेवाण हिशोब फिटण्यास साहाय्य होते.

३ इ ५. लक्ष्मीची कृपा होणे : साधकाने गुरूंची कृपा होण्यासाठी धनाचा, म्हणजे लक्ष्मीचा त्याग केलेला असतो. त्यामुळे अशा साधकावर लक्ष्मीची कृपादृष्टी रहाते.

३ ई. सर्वस्व अर्पण करण्याची सिद्धता असल्यास होणारे लाभ : जीवन जगण्यासाठी प्राण हाच सर्वस्व असतो. जो साधक स्वतःचा कुठलाच विचार न करता गुरु किंवा गुरुकार्य यांसाठी सर्वस्व अर्पण करण्यास नेहमीच सिद्ध असतो, त्याचा त्याग सर्वश्रेष्ठ मानलेला आहे. अशा साधकावर सूक्ष्मातून गुरु आणि ईश्वर यांचे सतत लक्ष असते. अशा साधकाची जलद गतीने आध्यात्मिक प्रगती होते.

 

४. तन-मन-धन यांचा त्याग आणि सर्वस्व अर्पण करण्याची सिद्धता यांद्वारे साधकातील अहंचा लय होऊ लागतो. त्याचे संचित आणि प्रारब्ध संपते. त्याला ईश्वराची प्राप्ती होते आणि त्याच्या जीवनाचे सार्थक होते.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक, वेळ आणि एकूण कालावधी : ७.९.२०२५, सकाळी १०, १५ सेकंद)

Leave a Comment