सात्त्विक वेशभूषा केल्यानंतर साधकाला आलेल्या अनुभूती

 १. कपाळावर कुंकवाचा टिळा लावल्यावर
सेवेची तळमळ वाढून अधिक प्रमाणात आनंद मिळणे

पूर्वी मी कपाळावर टिळा लावत नसे. लहानपणापासून एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे मला जमत नव्हते, उदा. परीक्षेच्या वेळी किंवा ताण निर्माण करणार्‍या प्रसंगांच्या वेळी. साधारण २ वर्षांपूवी मी सेवेसाठी रामनाथी आश्रमात आलो. तेव्हाही एकाग्रतेने सेवा करणे मला जमत नव्हतेे. एके दिवशी एका साधकाने मला कपाळावर कुंकवाचा टिळा लावण्यासंदर्भात सांगितले. त्याप्रमाणे मी टिळा लावू लागलो. काही दिवसांनंतर माझी सेवा करण्याची तळमळ वाढून मला अधिक प्रमाणात आनंद मिळत असल्याचे लक्षात आले. एके दिवशी काही कारणास्तव मी कपाळावर कुंकवाचा टिळा लावला नाही. त्या दिवशी मला निरुत्साह जाणवून माझी सेवेतील एकाग्रताही न्यून झाली होती. यावरून मी नियमित कपाळावर कुंकवाचा टिळा लावत असल्याने आनंदी असायचो, हे माझ्या लक्षात आले. तेव्हापासून मी नियमितपणे कपाळावर कुंकवाचा टिळा लावत आहे.

 

२. शर्ट-पॅन्टऐवजी धोतर आणि सदरा
घालायला आरंभ केल्यावर हलकेपणा अन् आनंद जाणवणे

पूर्वी मी शर्ट आणि पॅन्ट घालत असे. अलीकडे मी सात्त्विक पोशाख, म्हणजे धोतर आणि सदरा घालायला आरंभ केला आहे. त्यामुळे मला हलकेपणा आणि आनंदही जाणवतो. शर्ट-पॅन्ट सारखे आधुनिक कपडे वापरतांना मला जडपणा जाणवत असे; पण आता मला उत्साही वाटते. पॅन्ट (विजार) घातल्यावर मला माझे पाय जड झाल्यासारखे वाटतात. धोतर नेसायला आरंभ केल्यावरही मला पायांत जडपणा जाणवला; मात्र २ ते ३ दिवसांनंतर मला आरामदायी वाटू लागले.

– श्री. भरत प्रभु, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.२.२०१५)

(श्रद्धेने धर्माचरण आणि साधना केल्यास धर्मासंबंधी विविध अनुभव (अनुभूती) येतात, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. धर्म आणि श्रद्धा या गोष्टी वैयक्तिक असल्याने दिलेल्या अनुभूतीसुद्धा वैयक्तिकच आहेत. त्यामुळे त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक)