आपल्या प्रीतीमय वागण्याने प्राणी आणि पक्षी यांनाही आकर्षून घेणारे अन् सुंदर बाललीलांनी सर्वांना आनंद देणारे सनातनचे दुसरे बालक संत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ३ वर्षे) !

सनातनचे दूसरे बालक संत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांची आई सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर यांनी पू. वामन यांच्यातील संतत्व दर्शवणारी वैशिष्ट्यपूर्ण सूत्र पुढे दिली आहेत.

१. नागपूर येथे विमानातून खाली उतरतांना हवाईसुंदरीने
‘बाय’, ‘बाय’ केल्यावर पू. वामन यांनी हसून, दोन्ही हात जोडून ‘नमस्कार’, करणे
अन् हवाईसुंदरीने पू. वामन यांची क्षमा मागून नंतर येणार्‍या प्रवाशांना ‘नमस्कार’ करणे

‘जानेवारी २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात आम्ही पुण्याहून नागपूरला विमानाने गेलो होतो. नागपूर येथे पोचल्यावर विमानातून बाहेर येतांना तेथील हवाईसुंदरी सर्वांना ‘बाय’, ‘बाय’, असे म्हणत होत्या. त्यांनी पू. वामन (वय ३ वर्षे ) आणि कु. श्रिया (पू. वामन यांची मोठी बहीण, वय १० वर्षे आणि आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांनाही ‘बाय’, ‘बाय’ म्हटले. त्या वेळी पू. वामन यांनी हसून आणि दोन्ही हात जोडून त्यांना ‘नमस्कार’, असे म्हटले. त्यावर त्यातील एका हवाईसुंदरीने पू. वामन यांची क्षमा मागितली आणि म्हणाली, ‘‘मीसुद्धा आता ‘नमस्कार’ असेच म्हणते.’’

आम्ही चालत पुढे निघालो. तेव्हा पू. वामन माझ्या कडेवरून मागे वळून हवाईसुंदरीकडे बघत होते. ते म्हणाले, ‘‘ती ताई (हवाईसुंदरी) ‘नमस्कार’, असे म्हणत आहे.’’ असे म्हणून ते स्मितहास्य करू लागले. नंतर विमानातून बाहेर येणार्‍या सर्व प्रवाशांना त्या दोन्ही हवाईसुंदरींनी हात जोडून नमस्कार केला. त्या वेळी मला पुष्कळ आश्चर्य आणि कृतज्ञता वाटली की, पू. वामन इतके लहान असूनही अनोळखी व्यक्तींनी लगेचच त्यांचे अनुकरण केले. त्या वेळी संतांच्या वाणीतील चैतन्य आणि सामर्थ्य यांमुळे होणार्‍या परिणामांची मला जाणीव झाली अन् मी मनोमन परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.

 

२. पू. वामन यांच्या भेटीसाठी आतुरलेले
प्राणी-पक्षी आणि पू. वामन यांची त्यांच्यावर असलेली प्रीती !

२ अ. नागपूरला परिचित व्यक्तीकडे गेल्यावर त्यांच्याकडील कुत्रा पू. वामन
यांच्या जवळ येऊन बसणे आणि पू. वामन यांनी दिलेले चॉकलेट त्या कुत्र्याने पूर्ण खाणे

नागपूर येथे असतांना आम्ही एका ओळखीच्या व्यक्तीच्या घरी गेलो होतो. त्यांच्या घरी एक पाळीव कुत्रा होता. पू. वामन यांना बघून तो कुत्रा त्यांच्या जवळ येऊन बसला. काही वेळाने पू. वामन मला म्हणाले, ‘‘आई नारायणबाबांनी दिलेले चॉकलेट दे ना !’’ (‘नारायणबाबा’ म्हणजे प.पू. दास महाराज) मी त्यांना चॉकलेट दिल्यावर त्यांनी ते चॉकलेट कुत्र्याला दिले आणि कुत्र्यानेही ते पूर्ण चॉकलेट खाल्ले. नंतर मी कुत्र्याविषयी त्यांच्या घरातील व्यक्तींना विचारले असता मला समजले, ‘त्या कुत्र्याला प्रभु श्रीराम आणि श्रीरामाची आरती पुष्कळ आवडते. घरात आरतीच्या वेळी तो कुत्रा आरतीला येतो आणि प्रसादही घेतो. ‘तो कुत्रा सात्त्विक आहे आणि त्यामुळेच पू. वामन यांनी त्याला प्रसादाचे चॉकलेट दिले असावे’, असे मला वाटले.

२ आ. नागपूरला एका वैद्यांच्या घरी गेल्यावर पक्ष्यांच्या
ओरडण्याचा आवाज येणे आणि पक्ष्यांची भाषा कळल्याने वैद्यांनी दोन्ही पक्ष्यांचे पिंजरे
बाहेर आणून पू. वामन यांच्या शेजारी ठेवल्यावर ते शांत होऊन त्यांनी पू. वामन यांच्याकडे एकटक पहाणे

नागपूरला आम्ही एका वैद्यांकडे गेलो होतो. तेव्हा त्यांच्या घरातून पक्ष्यांच्या ओरडण्याचा आवाज आला. तो आवाज थांबत नव्हता; म्हणून त्या वैद्या घरात जाऊन दोन्ही पक्ष्यांना त्यांच्या पिंजर्‍यांसह बाहेर घेऊन आल्या. त्या म्हणाल्या, ‘‘या दोघांना वामन यांना भेटायचे होते; म्हणून ते ओरडत होते.’’ वैद्यांना त्यांच्या पक्ष्यांची भाषा कळते. त्यामुळे त्यांनी ते दोन्ही पिंजरे पू. वामन यांच्या शेजारी ठेवले. तेव्हा ते पक्षी शांत झाले आणि पिंजर्‍यातूनच पू. वामन यांच्याकडे एकटक बघत राहिले. वैद्यांनी पक्ष्यांना विचारले, ‘तुम्हाला या वामनदादांना भेटायचे होते का ? आता छान वाटले ना तुम्हाला ! वामनदादा किती छान आहेत ना !’ त्यावर ते पक्षी अगदी गोड आवाज करून प्रतिसाद देत होते. काही वेळ ते पू. वामन यांच्या दिशेने पाहून मान खाली करत होते. तेव्हा ‘ते पू. वामन यांना नमस्कार करत आहेत’, असे मला आणि त्या वैद्यांना जाणवले. हे सर्व बघतांना पू. वामन अगदी शांत आणि स्थिर बसले होते. यावरून ‘पक्ष्यांनाही संतांच्या अस्तित्वाची जाणीव होते’, हे लक्षात आले.

२ इ. पू. वामन यांच्या भेटीसाठी प्रतिदिन घराच्या आगाशीत किंवा खिडकीत येणारे कावळा, चिमणी आणि बुलबुल !

फोंडा, गोवा येथील आमच्या घराजवळच्या झाडांवर बरेच पक्षी येतात. पू. वामन घराबाहेर येईपर्यंत कावळा, चिमणी किंवा बुलबुल असे अनेक पक्षी प्रतिदिन आमच्या घराच्या आगाशीत किंवा कधी खिडकीत येऊन बसतात. ते अखंड आवाज करत असतात. विशेष म्हणजे त्या वेळी कावळा नेहमीप्रमाणे न ओरडता एक वेगळ्या प्रकारचा आवाज करतो. चिमणी आणि बुलबुल हे पक्षी तर त्यांच्या गोड आवाजाने पू. वामन यांना जणू बोलवत असतात. त्यांचा आवाज ऐकून पू. वामन म्हणतात, ‘हो. आलो आलो’ आणि ते त्या पक्ष्यांना बघायला जातात. तेव्हा पू. वामन यांची वाट पहात असल्याप्रमाणे ते पक्षी त्यांच्याकडे वाकून बघतात आणि नंतर उडून जातात. पू. वामन यांच्या झोपेच्या वेळी जणू अगदी सांगितल्याप्रमाणे एकही पक्षी आवाज करत नाही.

२ ई. घराजवळील झाडांवर वानरे येणे, ती येण्यापूर्वी पू. वामन यांनी ‘वानरे येणार आहेत’,
असे सांगणे आणि त्यांनी वानरांना ‘आता तुमच्या घरी जा’, असे सांगितल्यावर ती निघून जाणे

गोव्यातील आमच्या घराजवळील झाडांवर काही वानरे येतात. बर्‍याचदा ‘वानरे येणार आहेत’, हे पू. वामन आधीच सांगतात अन् खरोखर काही वेळातच पुष्कळ वानरे येतात. पू. वामन शांतपणे त्या वानरांकडे बघतात आणि ‘तुमचे ‘मंमं’ (खाणे) झाले असेल, तर आता तुमच्या घरी जा’, असे त्यांना सांगतात. ‘त्यांनी असे सांगितल्यावर वानर काही वेळातच परत जातात’, असे लक्षात आले.

 

३. पू. वामन यांची सूक्ष्मातून वातावरण जाणण्याची क्षमता

३ अ. कधी कधी बाहेर पुष्कळ ऊन असते. आकाशात कुठेच ढग दिसत नसतात; पण पू. वामन आकाशाकडे बघत म्हणतात, ‘‘आज पुष्कळ जोरात पाऊस येणार आहे.’’ त्या वेळी अकस्मात् काही वेळातच ढग येऊन अंधारून येते आणि जोराचा पाऊस पडतो. असे बर्‍याच वेळा झाले आहे.

३ आ. कधी बाहेर कडक ऊन पडलेले असतांना पू. वामन त्यांच्या बाबांना म्हणतात, ‘‘आता दुचाकी गाडीने बाहेर जाऊ नका. चारचाकी गाडीने जा; कारण धो धो पाऊस पडणार आहे.’’ प्रत्यक्षातही काही वेळात अकस्मात् वातावरणात पालट होऊन पाऊस पडतो.

३ इ. काही वेळा पाऊस पडत असतांना ते म्हणतात, ‘‘सूर्यबाप्पा आले आहेत. आता पुष्कळ उकडणार.’’ काही वेळाने तसेच घडते.

 

४. प्रत्येक गुरुवारी होणार्‍या भाववृद्धी सत्संगाविषयी पू. वामन यांचा भाव !

४ अ. भाववृद्धी सत्संगाची दुपारची वेळ ही झोपेची वेळ असूनही न झोपता नियमित सत्संग ऐकणारे पू. वामन !

पू. वामन प्रत्येक गुरुवारी दुपारी होणारा भाववृद्धी सत्संग नियमित ऐकतात. हा सत्संग श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेतात. खरेतर ही त्यांची झोपण्याची वेळ असते; परंतु केवळ गुरुवारी ते दुपारी झोपत नाहीत. याविषयी त्यांना कुणी सांगितले अथवा शिकवले नाही. एखाद्या गुरुवारी काही कारणाने भाववृद्धी सत्संग नसेल, तर ते स्वतःहून विचारतात, ‘‘आज भावसत्संग का नाही ?’’

४ आ. सत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा आवाज ऐकल्यावर
पू. वामन यांनी आनंदाने संगणकाच्या ‘स्क्रीन’समोर (पडद्यासमोर) जाऊन साष्टांग नमस्कार करणे

भाववृद्धी सत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा आवाज ऐकताच क्षणी ते ‘सद्गुरु मावशींचा आवाज’, असे म्हणून आनंदी होतात आणि लगेचच संगणकाच्या ‘स्क्रीन’समोर (पडद्यासमोर) जाऊन साष्टांग नमस्कार करतात. त्या सांगत असलेल्या प्रत्येक शब्दाकडे त्यांचे लक्ष असते. यावरून ‘संतांनाही साक्षात् श्री महालक्ष्मीस्वरूप असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांचे चैतन्य ग्रहण करण्याची, तसेच त्यांच्या दैवी आवाजातील प्रीती अन् आनंद अनुभवण्याची ओढ असते’, हे लक्षात येते.

४ इ. संगणकावर देवतांचे चित्र किंवा परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र दाखवल्यास पू. वामन
यांनी ‘स्क्रीन’समोर जाऊन तीन वेळा साष्टांग नमस्कार करणे आणि त्या वेळी त्यांना पुष्कळ आनंद होणे

भाववृद्धी सत्संगात जेव्हा देवतांचे चित्र किंवा परात्पर गुरु डॉक्टर आणि अन्य संत यांचे छायाचित्र दाखवले जाते, तेव्हा प्रत्येक वेळी पू. वामन संगणकाच्या ‘स्क्रीन’समोर जाऊन तीन वेळा साष्टांग नमस्कार करतात. ते आम्हालाही वाकून नमस्कार करायला सांगतात. परात्पर गुरुदेवांना आणि श्रीविष्णूला बघतांना त्यांना पुष्कळ आनंद होत असतो. जणू काही ‘ते त्यांना प्रत्यक्ष बघत आहेत’, असे वाटते.

४ ई. पू. वामन यांनी भावसत्संगात लावलेली भावगीते, भजने आदी समरस होऊन ऐकणे

भावसत्संगात जेव्हा भावगीते, भजने किंवा स्तोत्रे लावली जातात, तेव्हा पू. वामन ती पूर्ण एकाग्रतेने ऐकतात. काही वेळेला ते स्वतः म्हणण्याचा प्रयत्न करतात, तर कधी त्यावर आनंदाने डोलतात.

४ उ. भावसत्संग ऐकतांना काही वेळा पू. वामन यांना झोप यायला लागते. तेव्हा ते उभे राहून
हळू आवाजात वेगवेगळे नामजप किंवा श्लोक म्हणतात. त्यामुळे त्यांना झोप येत नाही.

 

५. घरात स्वभावदोष निर्मूलनाच्या अंतर्गत होणार्‍या चुकांच्या
सत्संगात स्वतःच्या चुका सांगून त्यासाठी क्षमा मागणारे पू. वामन !

५ अ. घरी प्रतिदिन रात्री स्वभावदोष निर्मूलनाच्या अंतर्गत चुकांचा सत्संग असणे

आम्ही घरी प्रतिदिन रात्री स्वभावदोष निर्मूलनाच्या अंतर्गत चुकांचा सत्संग घेतो. या सत्संगात आम्ही तिघेही (मी, श्री. अनिरुद्ध (पू. वामन यांचे वडील, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) आणि कु. श्रिया) ‘स्वतःच्या चुका सांगणे, त्यामागील स्वभावदोष किंवा अहंचा पैलू सांगणे, तसेच काय सुधारणा करणार ? योग्य कृती किंवा विचार काय असायला पाहिजे ?’, यांविषयी सांगतो.

५ आ. पू. वामन यांनी सत्संगाचे निरीक्षण करून आपण होऊन स्वतःच्या चुका सांगणे

आरंभीचे २ दिवस पू. वामन यांनी आमच्या या सत्संगाचे निरीक्षण केले आणि तिसर्‍या दिवसापासून ते स्वतःच्या चुका सांगू लागले. ते त्यांचा क्रम आल्यावर आम्हाला विचारून त्यांच्या चुका सांगतात. ते स्वतःहून ‘मी मोठ्याने बोललो, आईचे ऐकले नाही किंवा हट्ट केला’, अशा चुका सांगतात. ‘या सर्व कृती चुकीच्या आहेत’, हे आम्ही कुणीही त्यांना सांगितलेले नसते. त्यांनी निरीक्षणातून स्वतः ते शिकून घेतले आहे.

५ इ. चुका सांगून झाल्यावर पू. वामन यांनी परात्पर गुरु डॉक्टरांची क्षमायाचना करणे

चुका सांगून झाल्यावर ते स्वतःचे कान पकडून परात्पर गुरु डॉक्टरांची क्षमायाचना करतात. क्षमायाचना करतांना ‘मी आता परत असे करणार नाही – नाही – नाही’, असे म्हणतात आणि परात्पर गुरुदेवांना साष्टांग नमस्कार करतात.

पू. वामन यांच्या चैतन्यामुळे आमचा हा चुकांचा सत्संग भावसत्संगासारखाच वाटतो.

 

६. अखंड देवाच्या अनुसंधानात असणारे पू. वामन !

पू. वामन दिवसभर, तसेच खेळत असतांनाही वेगवेगळे नामजप करतात. काही वेळा ते वेगवेगळे श्लोकही म्हणत असतात. पू. वामन बाह्यतः खेळतांना दिसत असले, तरी ‘ते अंतर्मनातून अखंड देवाच्या अनुसंधानात आहेत’, असे लक्षात येते.

६ अ. दिवसभरात बर्‍याच वेळा पू. वामन यांनी ‘ॐ’ चे
दीर्घ उच्चारण करणे आणि त्यामुळे वातावरण शांत होणे

दिवसभरात बर्‍याच वेळा पू. वामन अकस्मात् मांडी घालून बसतात आणि ‘ॐ’ ‘ॐ’ असे म्हणतात. त्यांचे ‘ॐ’ चे उच्चारण पुष्कळ दीर्घ असते. आम्हालाही इतका वेळ तसे म्हणता येत नाही. त्यांनी ओंकाराचे उच्चारण केले की, घरातील वातावरण एकदम शांत आणि स्थिर होते. त्या वेळी माझ्या मनातील सर्व विचार आपोआप थांबतात.

६ आ. वाहनाने बाहेर जातांना पू. वामन यांनी जयघोष आणि श्लोक म्हणणे

आम्ही वाहनाने बाहेर जात असतांना पू. वामन जयघोष आणि श्लोक म्हणण्याची आठवण करून देतात अन् स्वतः म्हणायला आरंभ करतात. जयघोष आणि श्लोक म्हणून पूर्ण होईपर्यंत ते कुणाला काही बोलू देत नाहीत. ते त्यांच्या बाबांना गाडीला प्रार्थना करण्याचीही आठवण करून देतात.

अग्निहोत्रामध्ये भावपूर्ण आहुती देतांना पू. वामन राजंदेकर

६ इ. पू. वामन यांनी अग्निहोत्र करण्याची आठवण करून देणे आणि त्यासाठी साहाय्य करणे

आम्ही प्रतिदिन संध्याकाळी घरी अग्निहोत्र करतो. संध्याकाळ झाली की, पू. वामन आम्हाला अग्निहोत्र करण्याची आठवण करून देतात आणि त्याची सिद्धता करायला साहाय्य करतात. पू. वामन यांना अग्नीचे भय वाटत नाही. अग्नि प्रज्वलित झाल्यावर त्यांना पुष्कळ आनंद होतो. त्या वेळी ते भावपूर्ण प्रार्थना आणि श्लोक म्हणतात. पू. वामन यांना अग्निहोत्राची विभूती विशेष आवडते.

६ ई. पू. वामन यांनी खेळण्यातील साहित्य घेऊन घरी यज्ञ करतांना
रामनाथी आश्रमात होणार्‍या यज्ञांतील सर्व बारकावे लक्षात ठेवून त्या क्रमाने
आणि गांभीर्याने यज्ञ करणे अन् त्यांच्या या कृतीमुळे घरात पुष्कळ चैतन्य निर्माण होणे

पू. वामन खेळण्यातील साहित्य घेऊन यज्ञ करतात, तसेच मंत्र म्हणत ते आहुती देण्याची कृतीही करतात. त्या वेळी ‘ते प्रत्यक्ष यज्ञच करत आहेत’, असे जाणवते. यज्ञ झाल्यानंतर ते आरती करतात आणि शेवटी श्री गुरूंचा श्लोक म्हणतात. हा सर्व क्रम त्यांनी रामनाथी आश्रमात होणार्‍या यज्ञांच्या वेळी बघितला आहे. तो लक्षात ठेवून ते त्याप्रमाणे कृती करतात. (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई आणि सद्गुरु गाडगीळकाका यांनी यज्ञस्थळी बसणे, पुरोहित साधकांनी मंत्र म्हणत आहुती देणे, आरती करणे, नंतर उभे राहून पूर्णाहुती दिली जाणे इत्यादी सर्वच गोष्टी त्यांना क्रमाने ठाऊक आहेत.) यातून ‘प्रत्यक्ष यज्ञांच्या वेळी पू. वामन किती बारकाईने सर्व कृतींचे निरीक्षण करतात’, याची आम्हाला जाणीव झाली. ते खेळतांनासुद्धा सर्व कृती तितक्याच गांभीर्याने करतात, जशा प्रत्यक्ष यज्ञाच्या वेळी केल्या जातात. त्यांच्या अशा खेळण्यामुळे घरातील वातावरणात पुष्कळ चैतन्य निर्माण होते. यातून लक्षात येते की, संतांच्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी कारण असते.

 

७. रामनाथी आश्रम आणि आश्रमाशी निगडित गोष्टी
यांच्या प्रती असलेला पू. वामन यांचा उच्च कोटीचा भाव !

७ अ. दळणवळण बंदीमुळे रामनाथी आश्रमात जाता येत नसतांना पू. वामन यांनी
आश्रमात जाण्यासाठी हट्ट करणे, तेव्हा दुरूनच आश्रम दाखवल्यावर त्यांनी हात जोडून नमस्कार करणे

कोरोनाच्या काळात गोव्यातील दळणवळण बंदी आणि शासन नियम यांमुळे मध्यंतरी आम्ही रामनाथी आश्रमात जाऊ शकत नव्हतो. पू. वामन यांना हे समजावून सांगण्याचा आम्ही पुष्कळ प्रयत्न केला, तरीसुद्धा ते कधी कधी आश्रमात जाण्यासाठी पुष्कळ हट्ट करायचे. त्या वेळी आम्ही त्यांना आश्रमाच्या समोरच्या डोंगरावरील रस्त्यावर घेऊन जायचो. तिथून रामनाथी आश्रम दिसला की, चारचाकी गाडीत बसूनच आम्ही आश्रमाचे दर्शन घ्यायचो. तेव्हा पूर्णवेळ पू. वामन हात जोडून नमस्काराच्या मुद्रेत आश्रमाकडे बघत रहायचे. ते एकही शब्द बोलायचे नाहीत. त्यांचे आश्रमाकडे बघून समाधान झाले की, ते स्वतःच ‘आता आपण जाऊया’, असे म्हणायचे.

सौ. मानसी राजंदेकर

७ आ. आश्रमातील गाडी पाहिल्यावर पू. वामन यांना आनंद होऊन त्यांनी भावपूर्ण नमस्कार करणे

आमच्या सदनिकेच्या जवळ काही साधक रहातात. त्यांच्याकडे ‘आश्रमातील चारचाकी गाडी आली आहे’, हे वाहनाच्या आवाजावरूनच पू. वामन यांना समजते. ते लगेचच ती गाडी बघण्यासाठी आगाशीत जातात आणि ‘ही आपल्या आश्रमाची गाडी आहे’, असे सांगतात. तेव्हा त्यांना पुष्कळ आनंद होतो. ते हात जोडून गाडीला इतका भावपूर्ण नमस्कार करतात की, ते बघून आमचाही भाव जागृत होतो.

७ इ. रामनाथी आश्रमातून किंवा संतांकडून प्रसाद मिळाल्यावर पू. वामन यांनी भावपूर्ण नमस्कार करणे

काही वेळा रामनाथी आश्रमातून किंवा संतांकडून कु. श्रिया (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) आणि पू. वामन यांच्यासाठी प्रसाद येतो. तो प्रसाद बघून पू. वामन यांच्या तोंडवळ्यावरील भाव पालटतात आणि ते डोके टेकून त्या प्रसादाला नमस्कार करतात.

७ ई. खेळण्यातील प्रत्येक गाडीला ‘आश्रमाची गाडी’, असे संबोधणार्‍या पू. वामन यांचा भाव !

७ ई १. गाडीत वेगवेगळे साहित्य भरून ते आश्रमात पाठवण्याचा खेळ खेळणे

पू. वामन त्यांच्या खेळण्यातील प्रत्येक गाडीला ‘आश्रमाची गाडी’, असे म्हणतात. ते गाडीत वेगवेगळे साहित्य, उदा. भाजीपाला, खाऊ, सिमेंट, माती असे साहित्य खोटेखोटे भरून ते आश्रमात पाठवण्याचा खेळ खेळतात.

७ ई २. स्वतःकडील गाड्या ‘परात्पर गुरु डॉक्टर, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या आहेत अन् ‘मी नारायणांच्या गाडीत आहे’, असे आनंदाने सांगणारे पू. वामन !

पू. वामन यांच्याकडे चार लहान चारचाकी गाड्या आहेत. त्यातील ‘मोठी गाडी नारायणांची (परात्पर गुरु डॉक्टरांची), दुसरी गाडी सद्गुरु मावशींची (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंची), तिसरी गाडी सद्गुरु काकूंची (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकूूंची) आणि चौथी गाडी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांची’, असे ते सांगतात. ‘पू. वामन कोणत्या गाडीत आहेत ?’, असे विचारल्यावर ‘नारायणांच्या गाडीत आहेत’, असे म्हणून ते आनंदाने टाळ्या वाजवतात. पू. वामन यांच्या या खेळामुळे आम्हाला परात्पर गुरु डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद मिळतो. पू. वामन यांच्या तोंडवळ्यावरील आनंद बघून असे वाटते की, त्या गाड्यांमधून परात्पर गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू आणि सद्गुरु डॉ. गाडगीळकाका खरोखरंच प्रवास करत आहेत.

 

८. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’
या ग्रंथातील ‘गुरुपरंपरा’ हे पान पहातांना पू. वामन यांनी
सगळ्यांना ‘नारायण’ असे संबोधणे आणि त्या पानाला साष्टांग नमस्कार करणे

पू. वामन यांच्या उशीजवळ ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ ठेवला आहे. ते दिवसभरात कधीही हा ग्रंथ उघडून परात्पर गुरुदेवांची आणि अन्य संतांची छायाचित्रे बघतात. मध्यंतरी ते या ग्रंथातील ‘गुरुपरंपरा’ हे पान बघत होते. त्यांनी प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रावर बोट ठेवून ‘नारायणांचे नारायण’, असे म्हणून नमस्कार केला. नंतर ते प.पू. रामानंद महाराज आणि श्री अनंतानंद साईश यांना बघून ‘हेसुद्धा नारायण’, असे म्हणाले. त्यानंतर श्रीमत्परमहंस चंद्रशेखरानंद यांना बघून म्हणाले, ‘‘हेसुद्धा नारायण आहेत.’’ आम्ही कुणीही काही न सांगता शेवटी ते म्हणाले, ‘‘ही गुरुपरंपरा आहे.’’ त्यांनी त्या पानाला साष्टांग नमस्कार केला. नंतर ते म्हणाले, ‘‘मी यांना बघितले आहे. हे मला ठाऊक आहेत.’’ नंतर कितीतरी वेळ शांत बसून ते त्या छायाचित्रांकडे बघत होते. पू. वामन दिवसभरात काही वेळा अकस्मात् असे कोड्यात बोलल्याप्रमाणे एखादे वाक्य बोलून जातात.

प्रार्थना

‘हे भगवंता, नारायणा ! पू. वामन आणि त्यांची प्रत्येक कृती यांविषयी लिहिण्यासारखे पुष्कळ आहे. परात्पर गुरुदेवा, वरील सर्व सूत्रे मागील काही मासांतील आहेत. परात्पर गुरु डॉक्टर, जसे तुम्हाला समजून घेणे आणि तुमच्याविषयी लिहिणे अशक्य आहे, तसेच पू. वामन यांच्याविषयी लिहितांनाही मला वाटत आहे. हे गुरुदेवा, आपणच हे लिखाण लिहून घेत आहात, नाहीतर माझ्यासारख्या सर्वसामान्य जिवाला हे अशक्यच आहे. ‘तुमची इच्छा आणि आज्ञा म्हणूनच हे लिहिले जात आहे’, याची अनुभूती मला सतत येते. ‘पू. वामन यांच्यासारख्या जिवाचे संगोपन करणे’, हे मोठे दायित्व आहे. तुम्ही दिलेले हे दायित्व तुम्हाला अपेक्षित अशा प्रकारे आमच्याकडून पार पाडले जाऊ दे, ही तुमच्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे.’

– सौ. मानसी राजंदेकर (पू. वामन यांच्या आई, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), फोंडा, गोवा. (१०.८.२०२१)

पू. वामन यांनी आईला टंकलेखन करतांना पाहून ‘हे लिखाण माझ्याविषयीचे आहे आणि नारायणांना पाठवायचे आहे ना ?’, असे विचारणे

‘या धारिकेचे टंकलेखन करतांना पू. वामन यांनी स्वतःच ओळखले की, ही त्यांची धारिका आहे. त्यांनी मला याविषयी विचारले, ‘‘आई, ही माझी धारिका आहे ना, नारायणांना (परात्पर गुरु डॉक्टरांना) पाठवायची आहे ना ? ही वाचून ते ‘गो गो (गोड गोड)’ हसतील ना !’’ प्रत्यक्षात पू. वामन यांना मी करत असलेल्या लिखाणाविषयी काहीच ठाऊक नव्हते आणि त्यांना वाचताही येत नाही, तरी त्यांना हे समजले होते.’

– सौ. मानसी राजंदेकर (पू. वामन यांच्या आई, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), फोंडा, गोवा. (१०.८.२०२१)

‘सनातनचे बालक संत पू. वामन राजंदेकर यांच्यासारखे संतच पुढे येणारे
हिंदु राष्ट्र चालवतील’, या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वाक्याची प्रचीती देणारा एक प्रसंग

१. सौ. मानसी राजंदेकर, फोंडा, गोवा.

१ अ. विमानातून उतरतांना हवाईसुंदरीने पू. वामन यांना हात हलवून ‘बाय बाय’ करणे, यावर पू. वामन यांनी हात जोडून नमस्कार केल्याने आश्चर्य वाटून तिनेही पू. वामन यांना नमस्कार करणे अन् नंतर येणार्‍या प्रवाशांनाही ती हात जोडून नमस्कार करू लागणे

‘२८.२.२०२१ या दिवशी आम्ही ‘पुणे ते नागपूर’ असा विमानप्रवास करत होतो. विमानातून उतरतांना तेथे उपस्थित असलेल्या हवाईसुंदरीने पू. वामन (वय २ वर्षे ४ मास) आणि कु. श्रिया (पू. वामन यांची मोठी बहीण, वय १० वर्षे) यांनाही हात हलवून ‘अच्छा (बाय बाय)’ केले. त्यावर पू. वामन यांनी तिला हात जोडून नमस्कार केला. ते पाहून हवाईसुंदरीला इतके आश्चर्य वाटले की, तिने क्षमा मागून पू. वामन यांना हात जोडून ‘नमस्कार’, असे म्हटले. त्यानंतर आम्ही चालत पुढे निघालो. नंतर आमच्या मागून येणार्‍या प्रवाशांनाही ती हात जोडून नमस्कार करू लागली.’ (मार्च २०२१)

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

२ अ. ‘बालवयापासूनच पू. वामन राजंदेकर यांचे समाजाला घडवण्याचे कार्य चालू आहे’, हे त्यांच्या कृतीतून स्पष्ट होते !

‘समाजोद्धार हे संतांचे कार्य असते. संतांच्या चैतन्यामुळे समाज आपोआप कृतीशील होतो. ‘पू. वामन राजंदेकर यांचे बालवयापासूनच समाजाला घडवण्याचे कार्य कसे चालू आहे’, हेच त्यांच्या या कृतीतून स्पष्ट होते.

पू. वामन यांच्यातील चैतन्यामुळे हवाईसुंदरीलाही नमस्काराची धर्माचरणाची कृती करता आली. या प्रसंगातून ‘असे संतच पुढे येणारे हिंदु राष्ट्र चालवतील’, या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वाक्याची प्रचीती येते.’ (२८.३.२०२१)

पू. वामन नामजप करतांना ध्यान लागले आपुले । चित्त प्रभुचरणी निवाले ।।

 

पू. वामन यांची पारंपरिक पोशाखामधील भावमुद्रा सोवळे – उपरणे रूप गोजिरे । प्रगल्भ भाव मुखावरी विलसे ।।

पू. वामन राजंदेकर यांच्या छायाचित्राकडे बघून काय जाणवते ? ते कळवा !

पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या छायाचित्रांकडे पाहून साधकांना काय जाणवते किंवा ही छायाचित्रे पाहून काही अनुभूती आल्यास त्या पाठवाव्यात. लिखाण शक्यतो टंकलेखन करून पाठवावे.

लिखाण पाठवण्यासाठी संगणकीय पत्ता : [email protected]

टपालासाठीचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, २४/बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. ४०३४०१

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment