मकरसंक्रांत

मकरसंक्रातीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हिंदु धर्मात संक्रांतीला देव मानले आहे. या दिवशी तीळगुळाचे वाटप करून प्रेमाची देवाण-घेवाण केली जाते. मकरसंक्रांतीचे महत्त्व, या दिवशी करायचे धार्मिक विधी याविषयीचे विवेचन या लेखातून जाणून घेऊया.

आपत्काळातील मकरसंक्रांत कशी साजरी करावी ?

‘कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेले काही मास सण-उत्सव साजरे करण्यास किंवा व्रते आचरण्यात काहीसे निर्बंध होते. कोरोनाची परिस्थिती अद्याप निवळली नसली, तरी ती हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. अशा वेळी सण साजरे करतांना पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.

१. सण साजरे करण्याचे सर्व आचार, (उदा. हळदीकुंकू समारंभ, तिळगूळ देणे, बोरन्हाण आदी) आपल्या ठिकाणची स्थानिक परिस्थिती पाहून कोरोनाविषयी शासन-प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून साजरे करावेत.

२. हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करतांना एकाच वेळी सर्व महिलांना न बोलावता 4-4 च्या गटाला 15-20 मिनिटांच्या अंतराने बोलवावे.

३. तीळगूळ देवाणघेवाण थेट न करता छोट्या पाकिटांमध्ये घालून त्याची देवाणघेवाण करावी.

४. एकमेकांना भेटतांना-बोलतांना मास्कचा वापर करावा.

५. कोणताही सण किंवा उत्सव साजरे करण्याचा उद्देश हा स्वतःमधील ‘सत्त्वगुणाची वृद्धी करणे’ हा असतो. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमुळे प्रथेप्रमाणे सण-उत्सव साजरे करण्यास मर्यादा असल्या, तरी त्या काळात अधिकाधिक वेळ ईश्‍वराचे स्मरण, नामजप, उपासना आदींना देऊन सत्त्वगुण वाढवण्याचा प्रयत्न केला, तरच खर्‍या अर्थाने सण साजरा केल्यासारखे होईल.

१. तिथी

हा सण तिथीवाचक नसून अयन-वाचक आहे. या दिवशी सूर्याचे निरयन मकर राशीत संक्रमण होते. सध्या मकरसंक्रांतीचा दिवस १४ जानेवारी हा आहे. सूर्यभ्रमणामुळे पडणारे अंतर भरून काढण्यासाठी क्वचित प्रसंगी संक्रांतीचा दिवस एक दिवसाने पुढे ढकलला जातो.

 

२. इतिहास

संक्रांतीला देवता मानलेले आहे. संक्रांतीने संकरासुर दैत्याचा वध केला, अशी कथा आहे.

 

३. संक्रांतीविषयी पंचांगात असलेली माहिती

पंचांगात संक्रांतीचे रूप, वय, वस्त्र, जाण्याची दिशा इत्यादी माहिती दिलेली असते. ती कालमाहात्म्यानुसार तिच्यात होणार्‍या पालटाला अनुसरून असते. संक्रांतीदेवी ज्याचा स्वीकार करते, त्याचा नाश होतो.

 

४. महत्त्व

या दिवशी पंचांगाच्या निरयन पद्धतीनुसार सूर्याचे उत्तरायण चालू होते. कर्कसंक्रांतीपासून मकरसंक्रांतीपर्यंतच्या काळाला ‘दक्षिणायन’ म्हणतात. दक्षिणायनात मरण आलेली व्यक्ती उत्तरायणात मरण आलेल्या व्यक्तीपेक्षा दक्षिण लोकात (यमलोकात) जाण्याची शक्यता जास्त असते.

 

अ. साधनेच्या दृष्टीने महत्त्व

या दिवशी पंचांगाच्या निरयन पद्धतीनुसार सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत वातावरण अधिक चैतन्यमय असल्याने साधना करणार्‍याला या चैतन्याचा लाभ होतो.

 

५. सण साजरा करण्याची पद्धत

अ. मकरसंक्रांतीच्या काळात तीर्थस्नान केल्याने महापुण्य मिळणे

‘मकरसंक्रांतीला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पुण्यकाळ असतो. या काळात तीर्थस्नानाला विशेष महत्त्व आहे. गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या नद्यांच्या काठी असलेल्या क्षेत्रावर स्नान करणार्‍यास महापुण्य लाभते.’

 

आ. दान

१. ‘पर्वकाळी दानाचे महत्त्व

दान देणे
दान देणे

मकरसंक्रांत ते रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पर्वकाळ असतो. या पर्वकाळी केलेले दान आणि पुण्यकर्मे विशेष फलद्रूप होतात.

 

चलच्चित्रपट (Video) – मकरसंक्रांतीच्या पर्वकाळी दानाचे महत्त्व

२. दानाच्या वस्तू

‘नवे भांडे, वस्त्र, अन्न, तीळ, तीळपात्र, गूळ, गाय, घोडा, सोने किंवा भूमी यांचे यथाशक्ती दान द्यावे. या दिवशी सुवासिनी दान देतात. काही पदार्थ सुवासिनी कुमारिकांकडून लुटतात आणि त्यांना तीळगूळ देतात.’ सुवासिनी हळदी – कुंकवाचा कार्यक्रम करून जे देतात, त्याला ‘वाण देणे’ असे म्हणतात.

३. वाण देण्याचे महत्त्व

‘वाण देणे’ म्हणजे दुसर्‍या जिवातील देवत्वाला तन, मन आणि धन यांनी शरण जाणे. संक्रांतीचा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणामुळे देवतेची कृपा होऊन जिवाला इच्छित फलप्राप्ती होते.

मकरसंक्रांतीला अध्यात्माला पूरक अशा वस्तूंचे वाण देणे
४. वाण कोणते द्यावे ?

असात्त्विक वाण देण्यामुळे होणारी हानी : प्लास्टिक-वस्तू, स्टीलची भांडी आदी असात्त्विक वाण दिल्यामुळे वाण घेणार्‍या अन् देणार्‍या अशा दोन्ही व्यक्तींमध्ये देवाण-घेवाण संबंध (हिशोब) निर्माण होतो.

सात्त्विक वाण देण्याचे लाभ : सात्त्विक वाण दिल्यामुळे ईश्वराशी अनुसंधान साधले जाऊन दोन्ही व्यक्तींना चैतन्य मिळते. सात्त्विक वाण देणे, हा धर्मप्रसारच असून त्यामुळे ईश्वरीकृपा होते.

सध्या साबण, प्लास्टिकच्या वस्तू यांसारख्या अधार्मिक वस्तूंचे वाण देण्याची चुकीची प्रथा पडली आहे. या वस्तूंपेक्षा सौभाग्याच्या वस्तू, उदबत्ती, उटणे, धार्मिक ग्रंथ, पोथ्या, देवतांची चित्रे, अध्यात्मविषयकध्वनीचित्र-चकत्या इत्यादी अध्यात्माला पूरक अशा वस्तूंचे वाण द्यावे.

 

खालील सूक्ष्म-चित्रे मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रांवर क्लिक करा !

 

 

इ. सुगड

सुगड
सुगड

‘संक्रांतीच्या सणाला ‘सुगड’ लागतात. सुगड म्हणजे छोटे मातीचे मडके. सुगडांना हळदी-कुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळतात. सुगडांमध्ये गाजर, बोरे, उसाची पेरे (कांड्या), शेंगा, कापूस, हरभरे, तीळगूळ, हळदीकुंकू इत्यादी भरतात. रांगोळी घालून पाट मांडून त्यावर पाच सुगड ठेवतात. त्यांचे पूजन करतात. तीन सुगड सवाष्णींना दान (वाण) देतात, एक सुगड तुळशीला आणि एक स्वतः करिता ठेवतात.’

 

ई. बोरन्हाण

मूल जन्माला आल्यानंतर प्रथम येणार्‍या मकर संक्रांतीच्या दिवशी आप्‍तेष्टांच्या मुलांना बोलावून हा समारंभ करतात. त्यासाठी मुलाला झबले शिवतात. त्यावर खडी काढतात किंवा हलव्याचे दाणे बसवतात. मुलाच्या अंगावर हलव्याचे दागिने घालतात.

प्रथम औक्षण करून मुलाच्या मस्तकावर बोरे, उसाचे करवे, भुईमुगाच्या शेंगा व चुरमुरे हे सर्व पदार्थ एकत्र करून ओततात. यालाच बोरन्हाण म्हणतात. मुले खाली पडलेले हे पदार्थ वेचून खातात. मग सुवासिनींना हळदीकुंकू देतात. बोरन्हाण घातल्याने मुलाला पुढच्या उन्हाळयाची बाधा होत नाही व त्याचे आरोग्य चांगले रहाते, असे समजतात. हा संस्कार मुख्यत: महाराष्ट्रात प्रचलित आहे.

 

६. निषेध

अ. संक्रांतीच्या पर्वकाळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष आणि गवत तोडणे आणि लैंगिक भावना उद्दीपीत होणार्‍या कृती करणे टाळावे.

आ. पतंग उडवू नका ! : सध्या राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना मनोरंजनासाठी पतंग उडवणे म्हणजे ‘रोम जळत असतांना नीरो फिडल वाजवत होता’, त्याप्रमाणे आहे. पतंग उडवण्याचा वेळ राष्ट्राच्या विकासासाठी वापरला, तर राष्ट्र लवकर प्रगतीपथावर जाईल आणि साधना अन् धर्मकार्य यांसाठी वापरला, तर स्वतःसह समाजाचेही कल्याण होईल.’

 

७. किंक्रांत

संक्रांतीच्या दुसर्‍या दिवसाला किंक्रांत अथवा करिदिन असे म्हटले जाते. या दिवशी देवीने किंकरासुराला ठार मारले.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

Leave a Comment