ब्रह्माकरमळी येथील ब्रह्मदेवाचे पुरातन मंदिर

श्री ब्रह्मदेवाची मूर्ती

वाळपईपासून ६ किलोमीटर अंतरावर असलेले ब्रह्माकरमळी हे एक छोटेसे गाव. या गावात ब्रह्मदेवाचे एक पुरातन मंदिर आहे. या मंदिरामुळे गावाची कीर्ती सर्वत्र पसरली आहे; कारण भारतात ब्रह्मदेवाची केवळ ५ मंदिरे असून त्यांपैकी एक हे आहे. त्यामुळे या गावात पर्यटकही येतात.

ब्रह्माकरमळी गावाचे मूळ नाव चांदावडे; परंतु पोर्तुगीज आमदानीत हिंदु देवतांचा विध्वंस करण्याचा सपाटा पोर्तुगिजांनी लावला. जुने गोवे परिसरातील करमळीहून ब्रह्मदेवाची मूर्ती भक्तांनी चांदावडे या सुरक्षित ठिकाणी आणली. त्यामुळे चांदावडे या गावाचे नाव ब्रह्माकरमळी असे पडले. ब्रह्मदेवाविषयी बोलतांना जाणती माणसे खूप काही सांगतात. एका आख्यायिकेनुसार फार वर्षांपूर्वी चांदावडे गावात एक ब्राह्मण ब्रह्मदेवाची छोटीशी मूर्ती घेऊन आला होता. त्याला तहान लागली म्हणून त्याने ती मूर्ती पिंपळाच्या झाडाखाली ठेवली आणि पाणी पिण्यासाठी तो तळीवर गेला. पाणी पिऊन आल्यानंतर ब्राह्मणाने पिंपळाखाली ठेवलेली मूर्ती उचलण्याचा प्रयत्न केला; परंतु ती तेथून हलेनाशी झाली. त्यानंतर सर्व गावकर्‍यांनी मिळून त्या जागेवर ब्रह्मदेवाचे मंदिर बांधले.

ब्रह्माकरमळीचा ब्रह्मदेव नवसाला पावतो, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. अनेक भाविक आपले नवस फेडण्यासाठी येथे येत असतात. या देवाची लावणीसुद्धा फार प्रसिद्ध आहे. ब्रह्मदेवाची लावणी शिमगोत्सवाला म्हटली जाते. लावणी म्हणणार्‍याला प्रत्येक घरातून एक नारळ आणि १० रुपये देण्याचा रिवाज आहे.

Leave a Comment