शत्रूनाश, भौतिक प्रगती आणि मोक्ष यांची प्राप्ती होण्यासाठी पूरक असलेले कांचीपुरम् (तमिळनाडू) येथील श्री अत्तिवरद पेरूमल स्वामी !

१. सप्त मोक्षपुर्‍यांपैकी एक कांचीपुरम् !

‘कांचीपुरम् ही सप्त मोक्षपुर्‍यांपैकी एक पुरी ! तमिळनाडूतील कांचीपुर हे देवळांचे माहेरघर आहे; कारण शिवशक्ती आणि विष्णु यांच्यासह इतर देवतांची येथे १००८ देवळे आहेत. शिवकांची आणि विष्णुकांची या दोन जुळ्या मोक्षपुर्‍या आहेत. विष्णुकांची येथे श्रीविष्णूचे श्री वरदराज मंदिर हे १०८ दिव्य विष्णुस्थानांपैकी एक आहे. त्याचे नाव ‘श्री वरदराज पेरुमल’ मंदिर आहे. हिंदु धर्मामध्ये या मंदिराचे अत्यंत मानाचे स्थान आहे. या मंदिरातील एक प्राचीन वरदराज श्रीविष्णुची मूर्ती प्रत्येक ४० वर्षांनी भाविकांच्या दर्शनासाठी सरोवरातून बाहेर काढली जाते. तिला ‘श्री अत्तिवरदराज स्वामींची प्राचीन मूर्ती’ म्हणतात. अन्य वेळी या मंदिरात श्री वरदराजस्वामींच्या पाषाणी मूर्तीची पूजा केली जाते.

 

२. श्री अत्तिवरदराज स्वामींची प्राचीन मूर्ती !

श्री अत्तिवरद स्वामींची ही मूर्ती ब्रह्मदेवाने औदुंबराच्या काष्ठापासून बनवून घेतलेल्या ४ मूर्तींपैकी एक सत्ययुगीन मूर्ती आहे. ती ९ फूट उंच आहे. येथील ‘अनंत सरोवर’ नावाच्या पुष्करिणीत ही मूर्ती एका १२ फूट लांबीच्या चांदीच्या पेटीत ठेवलेली असते. प्रत्येक ४० वर्षांनी मूर्ती उत्सवपूर्वक बाहेर काढतात. तिची ४८ दिवस पूजा केली जाते. उत्सवाचे पहिले ३० दिवस ती मूर्ती शयनस्थितीत असते. त्यानंतरचे १८ दिवस अत्तिवरदराज स्वामींचे उभ्या रूपात दर्शन होते. त्या कालावधीत तेथे यात्रा भरते. याला ‘अत्तिवरद उत्सव’ असे म्हणतात. त्या कालावधीत भाविकांना दर्शन घेण्याची संधी मिळते. ४० वर्षांतून एकदा येणारा हा दैवी सोहळा मानवी आयुष्यात दोनदा किंवा फारतर तीनदा अनुभवता येऊ शकतो. यंदा हा उत्सव १ जुलै ते १८ ऑगस्ट या कालावधीत पार पडला. या कालावधीत अत्तिवरद स्वामींचे दर्शन घेण्यासाठी जगभरातून प्रतिदिन २ लक्षांहून अधिक भाविक येत होते. ही मूर्ती वर्ष १९७९ मध्ये शेवटची पाण्याबाहेर काढण्यात आली होती. आता वर्ष २०१९ मधील उत्सव पार पडला आहे. यापुढे वर्ष २०५९ मध्येच ही मूर्ती पुन्हा सरोवरातून बाहेर काढण्यात येईल.

 

३. ब्रह्मदेवाने आरंभलेल्या अश्‍वमेध यज्ञाचे रक्षण करण्यासाठी प्रकटले श्रीविष्णु !

श्री सरस्वतीदेवीने एकदा ब्रह्मास विचारले की, श्री सरस्वती आणि श्री लक्ष्मी यांत कोण शक्तीमान आहे ? यावर देवांनी श्री लक्ष्मीच्या बाजूने कौल दिल्यावर श्री सरस्वती रागावून निघून गेली. त्यानंतर एकदा ब्रह्मदेवाने केलेल्या अश्‍वमेध यज्ञात विघ्न आणण्यासाठी श्री सरस्वती देवीने वेगवती नदीचे रौद्ररूप धारण केले. तेव्हा श्रीविष्णूने प्रकट होऊन तिला थोपवले आणि यज्ञ चालू राहिला. तेव्हा ब्रह्माने विश्‍वकर्माकडून औदुंबर वृक्षाच्या काष्ठापासून चार मूर्ती घडवून घेतल्या. त्यातील एक मूर्ती ‘श्री अत्तिवरदराज पेरूमल’ मूर्ती आहे. तिची कांचीस मुख्य देवता म्हणून स्थापना झाली आणि त्या भागास ‘विष्णू कांची’ हे नाव पडले. संस्कृतमध्ये औदुंबरास ‘अत्ति’, तर तमिळमध्ये ‘अथी’ म्हणतात. ‘ब्रह्मदेवाला वर देणारा राजा’ म्हणून ही ‘अत्तिवरद मूर्ती’ म्हणून प्रसिद्ध आहे. ही मूर्ती येथील प्रमुख मूर्ती होती. ती १६ व्या शतकापर्यंत स्थापित होती आणि भाविकांच्या दर्शनास खुली होती.

 

४. ‘श्री अत्तिवरद मूर्ती’चे माहात्म्य !

औदुंबराच्या काष्ठाची मूर्ती पाण्यात ठेवल्याने तिला एक वेगळी चकाकी, वलय आणि शक्ती प्राप्त होते. त्यामुळे ती शत्रूनाश, भौतिक प्रगती आणि मोक्ष यांची प्राप्ती होण्यासाठी कारक होते. मुळात औदुंबर हा अत्यंत शुभ आणि पवित्र आहे. ते दत्तात्रेयाचे प्रिय निवासस्थान आहे. अशा औदुंबरापासून ब्रह्माने बनवून घेतलेली, विधीपूर्वक स्थापन केलेली आणि सत्ययुगात ब्रह्मा, त्रेतायुगात गजेंद्र, द्वापरयुगात बृहस्पती अन् कलियुगात अनंतशेष यांच्या शुभकमलहस्ते पूजन केली गेलेली ‘श्री अत्तिवरद स्वामींची मूर्ती’ अत्यंत पवित्र आहे. तिचे महत्त्व मोठे आहे. या उत्सवास ‘ब्रह्मोत्सव’ असेही संबोधतात.

 

५. सोळाव्या शतकात शोधूनही न सापडलेली मूर्ती सतराव्या शतकात पुन्हा प्रगटली !

यातील गोलात दाखवलेल्या मंडपाखाली श्रीमूर्ती ठेवण्यात येते.

सोळाव्या शतकात (वर्ष १६६९) ही मूर्ती तेथील दत्तात्रेय परंपरेतील उपासक पुजारी यांच्याकरवी ‘अनंत सरोवरा’त लपवून ठेवली गेली. दुर्दैवाने तिचा ठाव विस्मृतीत गेला. कालांतराने ते पुजारी निधन पावले. नंतर ती मूर्ती शोधण्याचा त्यांच्या वंशजांनीही प्रयत्न केला; पण त्यांना यश आले नाही. त्यामुळे अत्रि ऋषींनी बनवलेली आणि पूजन केलेली मूर्ती देवळात स्थापित केली. ती अगदी औदुंबराच्या मूर्तीसारखीच दिसते. ती आजही तेथे मुख्य दर्शनासाठी आहे. अचानक १७०९ या वर्षी सरोवराची स्वच्छता करतांना एका नागपाशाच्या रूपातील चांदीच्या पेटीत मूळ मूर्ती सापडली. नंतर प्रत्येक ४० वर्षांनी तिची पूजा आरंभ झाली.’

 

६. उत्सव झाल्यानंतर मूर्ती पुन्हा सरोवरातील मूळ स्थानी कशी ठेवतात ?

अनंत सरोवरात ज्या ठिकाणी श्रीमूर्ती असलेली पेटी ठेवण्यात येते, ते स्थान आणि त्याजवळ असलेली अनंतशेषाची मूर्ती

४८ दिवसांचा उत्सव झाल्यानंतर अनंत सरोवरात ती मूर्ती पुन्हा स्थापित केली जाते. त्या वेळी सरोवरातील पाणी बाहेर काढून सरोवर रिकामे केले जाते. पूर्ण परिसर स्वच्छ केला जातो. त्यानंतर श्रीमूर्ती विधीपूर्वक चांदीच्या पेटीत घालून ती सरोवरातील मांडवाच्या खाली असलेल्या स्थानी ठेवली जाते. ४८ व्या दिवशी रात्री १२ वाजता मूर्ती सरोवरात ठेवण्यात येते. प्रत्येक वेळी असे अनुभवास येते की, मूर्ती ठेवल्यानंतर पाऊस येऊन सरोवर पुन्हा नैसर्गिक पाण्याने भरते. यंदाही १८ ऑगस्टच्या रात्री १२ वाजता मूर्ती सरोवरात ठेवली आणि त्यानंतर रात्री १२.३० नंतर सलग २ दिवस चेन्नई परिसरात पाऊस पडला. त्यापूर्वी चेन्नईमध्ये पावसाचे कोणतेही लक्षण नव्हते. प्रशासन सरोवरात पाणी भरण्यासाठी पर्यायी व्यवस्थाही करतेच; मात्र ती व्यवस्था वापरण्याची कधी वेळ येत नाही. प्रत्येक वेळी स्वयं वरुणदेव श्री अत्तिवरदराज स्वामींना भेटण्यासाठी येतातच.

 

७. कृतज्ञता आणि प्रार्थना !

हे सारे अद्भुत आहे. सत्ययुगापासून देवतांनी पूजन केलेल्या श्रीमूर्तीचे दर्शन या घोर कलियुगातही आम्हाला केवळ महर्षि आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याच कृपेने लाभत आहे. ‘श्रीमन्नारायणस्वरूप असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकल्पिलेल्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत आणि मोक्षाची प्राप्ती करून देणार्‍या श्री अत्तिवरदराज स्वामींची कृपादृष्टी सर्व साधकांवर रहावी’, अशी त्याच्या चरणी प्रार्थना आहे.

– श्री. विनायक शानभाग

 

श्री अत्तिवरदराज स्वामींचे पूजन प्रत्येक ४० वर्षांनीच का होते ?

शयनरूपातील श्री अत्तिवरदराज स्वामींची मूर्ती
भाविकांना आशीर्वचन देणारी उभी श्री अत्तिवरदराज स्वामींची मूर्ती

‘श्री अत्तिवरदराज स्वामींची मूर्ती सरोवरात का लपवली गेली आणि तिचे प्रत्येक ४० वर्षांनीच पूजन का केले जाते’, यासंदर्भात पाठभेद आहेत.

१. इस्लामी आक्रमकांकडून मूर्तीची हानी होण्याचा धोका

‘त्या काळी हिंदूंच्या मंदिरांवर इस्लामी आक्रमणांचे सावट होते. त्या आक्रमकांकडून सत्ययुगीन आणि देवतांनी पूजन केलेल्या मूळ मूर्तीची हानी होऊ नये; म्हणून तेथील पुजार्‍यांनी मूळ मूर्ती सरोवरात लपवून दुसरी त्यासारखी दिसणारी उत्सवमूर्ती तेथे स्थापित केली. कालांतराने सरोवरातील मूर्तीचा शोध घेऊनही ती सापडली नाही. ४० वर्षांनी ती मूर्ती पुन्हा सरोवरातच सापडली; म्हणून तिची प्रत्येक ४० वर्षांनी पूजा होते’, असे संदर्भ काही ठिकाणी आढळतात.

२. श्रीविष्णूच्या आज्ञेने ब्रह्मदेव, गजेंद्र, बृहस्पती आणि
अनंत शेष यांच्याकडून अन्यांना पूजनासाठी मिळालेला काळ

काही ठिकाणी यासंदर्भात पौराणिक कथा आढळते. श्री अत्तिवरद स्वामींचे पूजन सत्ययुगात ब्रह्मा, त्रेतायुगात गजेंद्र, द्वापरयुगात बृहस्पती अन् कलियुगात अनंतशेष यांच्या हस्ते करण्यात आले. सत्ययुगात एकदा कांचीपुरम् येथे ब्रह्मदेव यज्ञविधी करत असतांना यज्ञज्वाळांचा स्पर्श त्या काष्ठमूर्तीला झाला. ब्रह्मदेवाने देवाला त्यावरील उपाय विचारले असता देवाने ती मूर्ती अनंतशेषाचा वास असलेल्या सरोवरात ठेवण्यास सांगितले. त्यामुळे ती मूर्ती अद्याप त्या सरोवरातच ठेवलेली आहे. जेव्हा सत्ययुगात ब्रह्मदेव स्वयं श्री अत्तिवरद स्वामींची पूजा करत असत, तेव्हा भगवान श्रीविष्णु म्हणाले, ‘‘हे देवा, तुम्ही स्वतः सातत्याने माझे पूजन करत आहात. तुम्ही अशी पूजनाची संधी इतरांनाही द्यावी.’’

त्यानंतर ब्रह्मदेवाने इतरांना केवळ काही क्षणांसाठी (a few nano seconds) या मूर्तीचे पूजन करण्याची अनुमती दिली. जेव्हा त्रेतायुगात गजेंद्र आणि द्वापरयुगात बृहस्पती हे श्री अत्तिवरद स्वामींच्या मूर्तीचे पूजन करत असत, तेव्हा त्यांनीही केवळ काही मिनिटांसाठी अन्य भक्तांना पूजनाची अनुमती दिली. याच प्रकारे जेव्हा अनंतशेष या मूर्तीचे पूजन करत असे, तेव्हा त्यानेही ४० वर्षांतून एकदा ४८ दिवसांसाठी या मूर्तीचे पूजन करण्याची इतरांना अनुमती दिली. त्यामुळे श्री अत्तिवरद स्वामींची मूर्ती ४० वर्षांतून एकदा सरोवरातून बाहेर काढून तिची ४८ दिवस पूजा केली जाते. उत्सव झाल्यानंतर अनंत सरोवरात असलेल्या एका मंडपाखाली ती मूर्ती चांदीच्या पेटीत घालून ठेवली जाते. पुढील ४० वर्षे अनंतशेष स्वयं तिचे पूजन करतात. येथील अनंत सरोवरात भगवान शेषाचा वास (वास्तव्य) आहे.

शास्त्र सांगते की, सत्यलोक, तपोलोक असे उच्च लोकांच्या तुलतेन अन्य लोकांतील काळाचे परिमाण पालटतेे. सत्यलोकातील एक क्षण म्हणजे भूलोकातील (पृथ्वीवरील) एक वर्ष होय !

– श्री. विनायक शानभाग