रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी, तर कर्नाटक येथील ‘कुक्के सुब्रह्मण्य’ या जागृत सर्पक्षेत्री सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केली सर्पपूजा !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे आणि सनातनच्या साधकांचे सर्पदोष दूर व्हावेत, यासाठी केले संकल्प !

सर्पपूजन करतांना सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि मंत्रपठण करतांना श्री. दामोदर वझेगुरुजी

रामनाथी (गोवा) – परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील सर्व अडथळे दूर व्हावेत, सनातनच्या साधकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर होण्यासह सर्वांचे सर्पदोष दूर व्हावेत, यासाठी भृगु महर्षींच्या आज्ञेनुसार येथील सनातनच्या आश्रमात २६ फेब्रुवारी २०१९ या दिवशी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सर्पपूजा केली. याच दिवशी महर्षींच्या आज्ञेनुसार सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कर्नाटक राज्यातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील ‘कुक्के सुब्रह्मण्य’ या जागृत क्षेत्री सर्पपूजा केली.

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हस्ते संकल्प झाल्यावर श्री गणेशपूजनादी विधी करण्यात आले. या वेळी अनंत, गुळिक, वासुकी, शंखपाल, तक्षक, महापद्म, पद्म आणि कर्कोटक या ८ नागांसाठी ८ कलशांची स्थापना करून पूजन करण्यात आले. सनातनचे साधक पुरोहित श्री. दामोदर वझेगुरुजी यांनी या विधींचे पौराहित्य केले.

 

गुरुदेवांच्या दीर्घायुष्यासाठी केलेल्या संकल्पाने सर्व साधकांना सर्पशांती केल्याचे फळ मिळेल !

‘गुरुदेवांच्या दीर्घायुष्यासाठी केलेल्या संकल्पाने सर्व साधकांसाठी सर्पशांती केल्याचे फळ मिळेल, तसेच साधकांचे सर्पबाधेमुळे होणारे शारीरिक त्रास न्यून होतील’, असे महर्षींनी सांगितले आहे.’

 

कर्नाटकातील ‘कुक्के सुब्रह्मण्य’ क्षेत्राचे माहात्म्य

कुक्के सुब्रह्मण्य येथील आदी सुब्रह्मण्य मंदिर

अनंत, गुळिक, वासुकी, शंखपाल, तक्षक, महापद्म, पद्म आणि कर्कोटक या ८ नागांपैकी वासुकी नागाचे हे क्षेत्र आहे. या क्षेत्राच्या मागे प्रचंड मोठा पर्वत आहे. या पर्वताचे शिखर शेषनागाच्या फण्याप्रमाणे दिसते; म्हणून याला ‘शेषपर्वत’ असे म्हणतात. पुराणात या पर्वताचा ‘कार्तिकस्वामींचे विश्रांतीस्थान’ असा उल्लेख आहे. कार्तिकस्वामींना कर्नाटकमध्ये ‘सुब्रह्मण्य’ या नावाने संबोधले जाते. तारकासुराचा वध केल्यानंतर कार्तिकस्वामी विश्रांतीसाठी या पर्वतावर आले होते. ज्या तलवारीने (खगाने) तारकासुराचा वध केला, ती तलवार कार्तिकस्वामींनी कुक्के सुमब्रह्मण्य येथील ‘कुमारधार’ या नदीच्या पाण्यात स्वच्छ केली होती. तारकासुराचा वध केल्याने कार्तिकस्वामींना ब्रह्महत्येचे पातक लागले. पापाचे क्षालन होण्यासाठी देवांनी त्यांना एक लाख ब्राह्मणांना अन्नदान करण्यास सांगितले. हे अन्नदान करण्यासाठी शेषपर्वतावर पुरेशी जागा नव्हती. त्यामुळे शेषपर्वताखाली वासुकीचे क्षेत्र आहे, तेथे ‘कुक्के’ नावाचे गाव असून कार्तिकस्वामींनी ‘वासुकीला अन्नदान करण्यासाठी ‘कुक्के’ क्षेत्र द्यावे’, असे सांगितले. त्या वेळी हे क्षेत्र देतांना वासुकीने कार्तिकस्वामींना अट घातली, ‘जेव्हा पुढे कधी येथे तुमची पूजा होईल, तेव्हा माझीही पूजा झाली पाहिजे. त्या वेळी कार्तिकस्वामी (सुब्रह्मण्यस्वामी) कुक्के या क्षेत्री येऊन राहिल्याने या क्षेत्राला ‘कुक्के सुब्रह्मण्य’, असे नाव पडले. येथील वासुकीचे जे मूळस्थान आहे, तेथे असलेल्या मंदिरात वारूळ आहे. या वारूळात वासुकीचा वास (वास्तव्य) आहे असे सांगितले जाते. त्याला ‘आदि सुब्रह्मण्य’ असेही म्हणतात. या मंदिराच्या बाजूलाच कार्तिकस्वामींचे मंदिर आहे. त्याला ‘सुब्रह्मण्यक्षेत्र’, असे म्हणतात. या मंदिराच्या गाभार्‍यात सर्वांत वरती मोरावर बसलेल्या कार्तिकस्वामींची मूर्ती आहे. मध्यभागी पाच फणा असलेल्या वासुकीची चांदीची मूर्ती आहे, तर वासुकीच्या मूर्तीच्या खाली शेषनागाची प्रतिमा आहे. सर्पदोष, शारीरिक त्रास आणि चर्मरोग दूर व्हावेत, तसेच संतती प्राप्ती व्हावी, यासाठी या क्षेत्री कालसर्प शांती केली जाते. येथे भाविक मोठ्या संख्येने येतात.

 

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना आलेल्या अनुभूती

१. जेव्हा सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सर्व साधकांच्या वतीने हुंडीत चांदीच्या नागाची एक प्रतिमा आणि नागाची चांदीची ९ अंडी दान केली, त्या वेळी हुंडीतून ‘ॐ’ असा नाद येत असल्याचे त्यांना स्पष्टपणे जाणवले.

२. कुक्के सुब्रह्मण्य मंदिरात सद्गुरु (सौ.) गाडगीळ यांनी प्रवेश करताच मंदिरात श्रीसूक्त पठण चालू झाले.

कुक्के सुब्रह्मण्य मंदिरात जाण्यापूर्वी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना झालेला त्रास

कुक्के सुब्रह्मण्य मंदिरात जाण्याच्या आदल्या दिवशी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना पुष्कळ ग्लानी येत होती, तसेच तळपायालाही प्रचंड उष्णता जाणवत होती.

 

आदि सुब्रह्मण्य मंदिरात सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी केलेले दान

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

सर्पदोष आणि नागदोष दूर व्हावेत, यासाठी कुक्के सुब्रह्मण्य येथील आदी सुब्रह्मण्य मंदिराच्या हुंडीत चांदीच्या नागाची एक प्रतिमा आणि नागाची चांदीची ९ अंडी दान करण्याची प्रथा आहे. त्यानुसार सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी मंदिरात दर्शन घेऊन ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे आणि साधकांचे सर्पदोष दूर व्हावेत’, यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर मंदिराच्या हुंडीत चांदीच्या नागाची एक प्रतिमा आणि नागाची चांदीची ९ अंडी दान केली. यामुळे सनातनच्या कोणत्याही साधकाकडून, त्याच्या कोणत्याही जन्मात सर्पदोष आणि नागदोष झाला असेल, शेती करतांना किंवा भूमी नांगरतांना किंवा भूमीत काम करतांना नकळत नागाची अंडी फुटून दोष निर्माण झाला असेल, तर या दोषाचे परिमार्जन होण्यासाठी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी हे दान केले.

सर्पदोष दूर झाल्याची देवाने दिलेली प्रचीती !

कुक्के सुब्रह्मण्य येथून मंगळूरू येथे येत असतांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सहसाधक प्रवास करत असलेल्या चारचाकीच्या गाडीखालून एक साप गेल्याचा दिसला. देवाने सर्पदोष आणि नागदोष दूर झाल्याची ही एक प्रकारे प्रचीती दिल्याचे साधकांना वाटले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात