देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आणि साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेली श्री क्षेत्र तुळजापूर येथील श्री भवानीदेवी !

‘महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेले मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर हे कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची श्री भवानीदेवी ही कुलदेवी होती. श्री भवानीदेवीने दृष्टांताद्वारे आशीर्वादरूपी दिलेल्या तलवारीनेच शिवाजी महाराजांनी मोगलांचा पाडाव करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

संकलक : श्री. अहितोषाचार्य कांबळे, बेंगळूरू

 

१. श्री भवानीदेवीचा पूर्वइतिहास !

श्री भवानीदेवी

कृतयुगात कर्दभ नावाचे तपोनिष्ठ ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी अनुभूती ही रूपसंपन्न असून पतिव्रता होती. तिला पुत्ररत्न प्राप्त झाले; मात्र त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही. कर्दभ ऋषींनी लवकरच इहलोकीची यात्रा संपवल्यामुळे अनुभूतीने सती जाण्याचा निर्णय घेतला; मात्र ‘अल्पवयीन पुत्राला मागे सोडून पतीसह सहगमन करू नये’, असे अन्य ऋषींनी शास्त्राचा आधार घेऊन अनुभूतीला सांगितले. त्यानंतर अनुभूती तिच्या पुत्राला गुरुगृही सोडून मेरू पर्वताजवळ असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली आणि तिथे आश्रम बांधून तिने तपश्‍चर्या चालू केली. तिची तपश्‍चर्या चालू असतांना कुकर नावाचा दैत्य तिच्या अप्रतिम सौंदर्यावर मोहित झाला. त्याच्या मनात पापवासना निर्माण होऊन त्याने तिला स्पर्श केला. त्यामुळे तिची समाधी भंग पावली. दैत्याने काही अनुचित प्रकार करू नये आणि त्याच्या तावडीतून सुटका व्हावी; म्हणून तिने आदिशक्तीचा धावा केला. आदिशक्ती भवानीमातेच्या रूपाने त्वरित धावून आली. तिने दैत्याशी युद्ध केले. दैत्य महिषाचे रूप घेऊन आला, तेव्हा देवीने त्रिशुळाने त्याचे शीर वेगळे केले. भवानीदेवी अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आल्यामुळे तिला ‘त्वरिता’ असे नाव पडले. कालांतराने त्वरिताचे ‘तुरजा’ आणि त्याचे पुढे ‘तुळजा’ असे नाव झाले.

 

२. श्री तुळजाभवानी मंदिराची रचना

श्री भवानीदेवीचे मंदिर

तुळजापूर येथील डोंगराच्या पश्‍चिम उतरणीवर हे श्री तुळजाभवानीचे देवस्थान आहे. मंदिराकडे जाण्यासाठी ९३ पायर्‍या उतराव्या लागतात. श्री भवानीमातेच्या मंदिरात जाण्यासाठी पायर्‍या उतरल्यानंतर महाद्वार लागते. त्यावरील काही शिल्पे हेमाडपंथी असून त्या शिल्पांत नारदमुनींचे दर्शन घडते. पुढे गेल्यावर ‘कल्लोळ’ तीर्थ लागते. देवी येथे आल्यानंतर तिने या तीर्थाची निर्मिती केली, तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदकतीर्थे या तीर्थाच्या ठिकाणी धावून आल्यामुळे त्यांचा एकच कल्लोळ झाला. यास्तव या तीर्थास ‘कल्लोळ तीर्थ’ म्हणतात.

स्नान कल्लोळ तीर्थाठायी । दर्शन घेई देवीचे ॥

घेता चरण तीर्थोदय । होय सार्थक जन्माचे ॥

या तीर्थाच्या समोरच गोमुख तीर्थ लागते. त्यातून अहोरात्र पाण्याचा प्रवाह वाहतो. त्याचप्रमाणे श्री दत्ताचे हस्तप्रक्षालनाचे ठिकाण आहे. पुढे गेल्यावर अमृतकुंड लागते. त्याच्या अलीकडे श्री गणेश मंदिर आहे. येथे सिद्धीविनायक आहे. नंतर निंबाळकर दरवाजा लागतो. दरवाजा ओलांडून आत गेले असता मातेचा कळस दृष्टीस पडतो. हा कळस पंचधातूपासून बनवला आहे. चौघड्याच्या पायर्‍या उतरल्यावर मंदिराचा प्रभार लागतो. देवीच्या मंदिराभोवती प्रशस्त अंगण, ओवर्‍या आणि दगडी तट आहे. मंदिराच्या दर्शनी बाजूला एक होमकुंड आहे आणि त्यावर शिखर बांधले आहे. देवीचे मुख्य मंदिर एका दरीत वसले आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून आतील मंडप सोळखांबी मंडपाच्या तत्त्वावर आधारलेला आहे. पश्‍चिम दिशेला मातेचा गाभारा आहे. इतिहास आणि पुरातत्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते.

३. श्री तुळजाभवानी मंदिराच्या रचनेचे एक अनोखे वैशिष्ट्य !

गाभार्‍याच्या उत्तरेस शयनगृह असून त्यात मातेसाठी एक चांदीचा पलंग ठेवला आहे, तसेच उत्तर दिशेला देवीचे न्हाणीघर आहे. अश्‍विन शुक्ल पक्ष प्रतिपदा ते अष्टमी, पौष शुक्ल पक्ष प्रतिपदा ते अष्टमी आणि भाद्रपद कृष्ण पक्ष अष्टमी ते अमावास्या असे देवीचे तीन शयन दिवस ठरले असून इतर वेळी ती अष्टौप्रहर जागृत असते. (असे इतरत्र आढळत नाही.)

सभामंडप ओलांडून गेल्यावर पूर्वेला श्री भवानी शंकराची वरदमूर्ती, शंकराची स्वयंभू पिंडी, पाठीमागे नंदी, नंदीवर भवानीशंकराचा मुखवटा आणि त्यावर पंचनागाचा उभारलेला फणा आणि सतत तेवत असणारा नंदादीप दृष्टीला पडतो. मंदिराच्या परिसरात श्री लक्ष्मी-नृसिंह, श्री यमाई, श्री खंडोबा, चिंतामणी या देवतांच्या मूर्ती दृष्टीस पडतात.

 

४. श्री भवानीदेवीची मूर्ती

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।

शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥’

गाभार्‍यात पश्‍चिमेकडील बाजूस मधोमध एका उंच सिंहासनावर आई भवानीची मूर्ती आहे. देवीची काळ्या रंगाच्या पाषाणाची उभी मूर्ती ३ फूट उंचीची असून ती प्रभावळीसह आहे. ही मूर्ती इतर शक्तीस्थळांसारखी स्वयंभू नसून पालखी प्रदक्षिणा आणि निद्राकाल यांमध्ये मूळ स्थानावरून हलवली जाते. तिच्या डोक्यावरील मुकुटावर सयोनीलिंग आहे. मुकुटाखालून केसाच्या बटा बाहेर आलेल्या दाखवल्या आहेत. देवीची मूर्ती अष्टभुजाधारी आहे. हातात त्रिशूळ, बाण, चक्र, शंख, धनुष्य, बिचवा, पानपात्र आणि राक्षसाची शेंडी ही शस्त्रे आहेत. पाठीवर भाता लटकवलेला आहे. देवीच्या मुखाच्या उजव्या आणि डाव्या अंगास चंद्र अन् सूयर्र् आहेत. उजवा पाय महिषासुराच्या उरावर ठेवलेला आहे. त्याच्या उजवीकडे देवीचे वाहन सिंह आहे. त्याखाली मार्कंडेय ऋषी दाखवले आहेत. देवीचा डावा पाय भूमीवर असून दोन्ही पायांच्या मधोमध तुटलेले महिषासुराचे मस्तक आहे. डाव्या हातात खाली डोके वर पाय करून तपस्या करणारी तापसी अनुभूती दाखवली आहे. तिच्या अंगावर चक्रकुंडले, केयूर, अंगद, साध्या आणि मोत्याच्या बांगडया, कंठा, माला, मेखला, साखळ्या आणि पदबंध एवढे दागिने दाखवले आहेत. देवीने डाव्या हाताने महिषासुराची शेंडी धरली आहे आणि उजव्या हाताने त्याच्या बरगड्यांत त्रिशूळ खुपसलेला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात