हातापायांना तेल कोणत्या दिशेने लावावे ?

Article also available in :

वैद्य मेघराज माधव पराडकर

१. आयुर्वेदानुसार

आयुर्वेदाच्या मूळ संस्कृत ग्रंथांमध्ये हातापायांना ‘तेल वरून खाली (खांदे किंवा मांड्या यांपासून बोटापर्यंत) लावावे कि खालून वर (बोटांपासून खांदे किंवा मांड्या यांपर्यंत) लावावे’, यासंदर्भात कोणताही उल्लेख आढळत नाही. आयुर्वेदात ‘अनुसुखं मर्दयेत्’ म्हणजे ‘ज्या पद्धतीने रुग्णाला बरे वाटेल, त्या पद्धतीने मर्दन करावे’, असे सांगितले आहे.

 

२. व्यवहारात वापरण्यात येणारी पद्धत

व्यवहारामध्ये हातापायांना वरून खाली आणि खालून वर अशा दोन्ही प्रकारे तेल लावण्याची पद्धत आहे. दोन्ही प्रकारांमध्ये रक्ताभिसरणावर विशेष फरक पडत नाही. खालून वर तेल लावल्याने नीलांमधील रक्त हृदयाकडे ढकलले जाते. वरून खाली तेल लावल्याने धमन्यांमधील (रोहिणीमधील) रक्ताला गती मिळून ते पुढे नीलांमधून हृदयाकडे ढकलले जाते.

 

३. शरीरशास्त्रानुसार दोन्ही प्रकारे तेल लावण्यासंदर्भातील विवेचन

३ अ. खालून वर तेल लावणे

१. यामध्ये अंगावरील केसांच्या उलट दिशेने तेल लावले जाते. यामुळे फार थोडे तेल लावतांना घर्षणामुळे एखाद्या केसाचे मूळ दुखावले जाऊन केसतोड (लवीच्या मुळाशी होणारे गळू) होण्याची शक्यता असते; परंतु तेल जास्त लावल्यास घर्षण होत नाही आणि ही शक्यता उणावते.

२. नीला फुगलेल्या असल्यास (व्हॅरिकोज व्हेन्स हा विकार असल्यास) हलक्या हातांनी खालून वर तेल लावल्याने नीलांमध्ये साचलेले रक्त पुढे ढकलण्यास साहाय्य होते. या विकारामध्ये निलांवर दाब देऊ नये.

३. हातापायांमध्ये मांसपेशींचे तंतू वरून खालच्या दिशेने रचलेले असतात. याच्या विरुद्ध दिशेने तेल चोळल्यामुळे मांसपेशींचे तंतू ताणले जातात आणि त्यांना दृढत्व प्राप्त होण्यास साहाय्य होते.

४. एका मतानुसार या दिशेने तेल लावल्याने ते रोमरंध्रांतून (अंगावरील केसांच्या मुळांतून) शरिरात अधिक प्रमाणात शोषले जाते.

३ आ. वरून खाली तेल लावणे

१. यामध्ये अंगावरील केसांच्या दिशेने तेल चोळले गेल्यामुळे केसांच्या मुळांशी ताण पडत नाही.

२. नीला फुगलेल्या असल्यास या दिशेने तेल चोळू नये; कारण यामुळे नीलांवरील दाब वाढून त्यांना अपाय होण्याची शक्यता असते. फुगलेल्या नीलेवर जराही दाब न देता अतिशय हलक्या हातांनी या दिशेने तेल चोळल्यास अपाय होण्याची शक्यता उणावते.

३. शरिरावरील केसांच्या मुळांशी चेतातंतू (मज्जातंतू) असतात. वरून खाली तेल लावल्याने या चेतातंतूंच्या माध्यमातून मांसपेशींना शिथिल होण्यासाठी संवेदना प्राप्त होतात. यामुळे या दिशेने तेल लावल्याने मांसपेशी तात्पुरत्या शिथिल होऊन आरामदायी वाटते.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.७.२०१७)

 

आयुर्वेदानुसार तेल वरून खाली लावणे
आणि मर्दन खालून वर करणे, ही पद्धत योग्य असणे

वैद्य पू. विनय भावे

‘वात, पित्त आणि कफ या प्रकृतींनुसार मर्दनाची दिशा पालटत नाही. हातापायांना तेल लावतांना ते नेहमी वरून खाली लावावे आणि मर्दन खालून वर, म्हणजे हृदयाच्या दिशेने करावे. हृदयाच्या दिशेने मर्दन केल्याने नीलांमधील रक्त हृदयाकडे ढकलले जाते आणि रक्तप्रवाह सुरळित होण्यास साहाय्य होते.’

– वैद्य (पू.) विनय भावे

तज्ञ वैद्यांना विनंती !

‘हातापायांना कोणत्या दिशेने तेल लावल्यावर कोणते लाभ होतात आणि त्यामागील शास्त्र काय’ याविषयी वरील माहितीव्यतिरिक्त अन्य माहिती असल्यास कृपया पुढील पत्त्यावर पाठवावी. या माहितीचा आयुर्वेदाच्या प्रसारासाठी उपयोग होईल.

संपर्क : वैद्य मेघराज माधव पराडकर, २४/ब, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१.

ई-मेल : [email protected]

Leave a Comment