महाकवी कालिदास यांना दिव्य ज्ञान प्रदान करणारी उज्जैन (मध्यप्रदेश) येथील श्री गढकालिकादेवी

शारदीय नवरात्र : देवीमाहात्म्य, शक्तीपीठ दर्शन आणि अध्यात्मशास्त्र

२१ ते २९ सप्टेंबर या कालावधीत शारदीय नवरात्रोत्सव साजरा होत आहे. यानिमित्त शारदीय नवरात्र : देवीमाहात्म्य, शक्तीपीठ दर्शन आणि अध्यात्मशास्त्र हे विशेष सदर आरंभ करत आहोत. नवरात्रीच्या काळात प्रतिदिन भारतातील विविध प्रसिद्ध अन् प्राचीन देवी मंदिरांचा इतिहास, त्यांचे महत्त्व, छायाचित्रे, तसेच नवरात्रोत्सवामागील अध्यात्मशास्त्र इत्यादी माहिती या सदरातून आपण जाणून घेणार आहोत. या माध्यमातून वाचकांची देवीप्रती भक्ती वाढावी, अशी जगज्जननी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना !

सिंधूरलेपित श्री गढकालिकादेवीची तेजस्वी मूर्ती ! देवीचे भावपूर्ण दर्शन घेऊन प्रार्थना करूया.

 

श्री गढकालिका देवीचे मंदिर

उज्जैन, मध्यप्रदेश येथे गढकालिका देवीचे मंदिर हे शक्तिपीठ आहे. या मंदिरातच कवी कालिदास यांना कालिकादेवीचे दर्शन झाले होते. हे देवीच्या ५२ शक्तिपिठांपैकी एक आहे. या ठिकाणी देवीच्या हाताचे कोपर पडले होते. देवीच्या मूर्तीला सिंधूर लेपन केले आहे. देवीच्या मस्तकावर चंद्र असून डावीकडे आणि उजवीकडे महालक्ष्मी आणि महासरस्वती यांच्या मूर्ती आहेत. त्रिपुरा महात्म्यानुसार भारतातील १२ शक्तीपीठांपैकी गढकालिका देवीचे मंदिर सहावे शक्तीपीठ आहे. मंदिराच्या आवारात सिंहाची मूर्ती आहे. त्याचप्रमाणे सभामंडपात अनेक देवी-देवतांची चित्रे आहेत.

लोककथेनुसार शाकुंतलम्, मेघदूत या ग्रंथांचे रचनाकार आणि सम्राट विक्रमादित्य यांच्या सभामंडळातील नवरत्नांपैकी एक प्रमुख रत्न (प्रमुख व्यक्ती) महाकवी कालिदास यांची श्री गढकालिका देवी ही इष्ट देवी (उपासनादेवी) मानली जाते. या ठिकाणी कवी कालिदास यांना दिव्य ज्ञान मिळाले होते. राजा विक्रमादित्य आणि कवी कालिदास या मंदिरात साधनेसाठी येत असत.

सम्राट हर्षवर्धन यांनी सातव्या शतकामध्ये या मंदिराचा जिर्णोद्धार केला होता. दहाव्या शतकातील परमार राज्यकाळात या जीर्णोद्धाराचे अवशेषही सापडले होते. विसव्या शतकातील परंपरागत पुजारी श्री सिद्धनाथ महाराज यांनी सवंत्सर २००१ (वर्ष १९४४) मध्ये मंदिराचा पुन्हा जिर्णोद्धार केला होता. मंदिराच्या ठिकाणी पूर्वी अवंतिका नगरी वसलेली होती. कालांतराने ती नगरी भूमीत दबून गेली. देवीचे मंदिर गडावर असल्याने देवीला गढकालिका असे नाव पडले. नवरात्रीच्या कालावधीत, तसेच इतर दिवशीही येथे तांत्रिक विधी केले जातात. तांत्रिक सिद्धीचे हे प्रमुख स्थान मानले जाते.

संदर्भ : पत्रिका संकेतस्थळ