भारताच्या सीमांचे रक्षण करणारी जैसलमेर (राजस्थान) जिल्ह्यातील श्री तनोटमाता

शारदीय नवरात्र : देवीमाहात्म्य, शक्तीपीठ

श्री तनोटमाता मंदिर राजस्थान राज्यातील जैसलमेर जिल्ह्यापासून १३० किलोमीटर अंतरावर थरच्या वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या सीमेवर आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी घडलेल्या अद्भुत प्रसंगांमुळे हे मंदिर प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे भारताच्या सैनिकांसाठी श्री तनोटमाता मंदिर अत्यंत श्रद्धेचे स्थान आहे. श्री तनोटमाता ही हिंगलाज मातेचेच एक रूप मानले जाते. हिंगलाज माता मंदिर सध्या पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये आहे. भाटी राजपूतचा राजा तणुराव याने इसवी सन ८२८ मध्ये तनोटमाता मंदिराची स्थापना करून मूर्तीची स्थापना केली.

मंदिर स्थापनेमागील इतिहास

मंदिरातील एका पुजार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, अनेक वर्षांपूर्वी मामडिया नावाचा एक चारण (या शब्दाचा अर्थ गोपालक किंवा भाट असा आहे.) होता. त्याला मूल नसल्याने संतानप्राप्तीसाठी त्याने हिंगलाज मातेची ७ वेळा चालत यात्रा केली होती. त्यावर देवी प्रसन्न झाली आणि चारणाच्या स्वप्नात येऊन ‘मुलगा हवा कि मुलगी ?’ असे चारणाला विचारले. त्यावर त्याने ‘देवी तुम्हीच माझ्या घरी जन्म घ्या’, अशी विनंती केली. त्यानंतर चारणाच्या घरी ७ मुली आणि १ मुलगा यांनी जन्म घेतला. त्यातील एक आवड माता हिने विक्रम संवत ८०८ मध्ये जन्म घेतला. जिला तनोट माता मानले जाते. जन्मत:च मातेने चमत्कार दाखवण्यास आरंभ केला होता. अन्य ६ मुलीही दैवी शक्ती होत्या. चारणाच्या या ७ पुत्रींनी हुणांच्या आक्रमणापासून माड प्रांताचे रक्षण केले होते. आवड माता अर्थात् तनोट मातेच्या कृपेने माड प्रदेशावर राजपूतांचे राज्य स्थापित झाले. भाटी राजा तणुराव याने माड प्रदेशाला राज्याच्या राजधानीचे शहर बनवले आणि तनोटमातेला सोन्याचे सिंहासन अर्पण केले.

भारत-पाकिस्तान युद्ध आणि तनोट माता मंदिरासंदर्भातील चमत्कार

वर्ष १९६५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धाच्या वेळी मंदिरात अनेक चमत्कारिक घटना घडल्या. युद्धाच्या वेळी राजस्थान परिसरात घुसलेल्या पाकिस्तानच्या सैनिकांना हरवण्यात तनोटमाता मंदिराची भूमिका महत्त्वाची ठरली होती. युद्धाच्या वेळी देवीने भारतीय सैनिकांना साहाय्य केले त्यामुळे पाकिस्तानच्या सैन्याला मागे हटावे लागले.

या संदर्भातील घटना अशी की, १७ ते १९ नोव्हेंबर १९६५ मध्ये पाकिस्तानच्या सैन्याने तीन दिशांनी तनोट येथे तोफांनी मोठे आक्रमण केले. त्या वेळी तनोट क्षेत्राच्या रक्षणासाठी मेजर जयसिंह यांच्या नेतृत्वाखाली १३ ‘ग्रेनेडिअर’ची एक तुकडी आणि सीमा सुरक्षा दलाच्या २ तुकड्या शत्रूशी लढत होत्या. १६ नोव्हेंबर या दिवशी भारतात शिरून १५० किलोमीटर पर्यंतचा परिसर कह्यात घेतला होता. शत्रूसैन्याने तनोटमाता मंदिरावर ३ सहस्र आणि मंदिर परिसरात ४५० बॉम्ब टाकले; मात्र त्यातील एकही बॉम्ब फुटला नाही. पाकिस्तानचे सैनिकही या घटनेचे साक्षीदार होते. पाकिस्तानच्या सैनिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकचे सैनिक विमानातून बॉम्ब टाकतेवेळी खाली असलेल्या मंदिराला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत, तेव्हा त्यांना मंदिर न दिसता तलावाजवळ एक मुलगी बसलेली दिसत असे. मंदिरातील लपलेल्या सैनिकांसाठी तनोटमाता मंदिर एक सुरक्षाकवच बनले होते. यातील काही जिवंत बॉम्ब आजही या मंदिरातील संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत.

युद्धानंतर आता सीमा सुरक्षा दलाने या मंदिराचे दायित्व घेतले आहे, तसेच मंदिरात सैनिकांकडून नियमित पूजा केली जाते. मंदिराजवळ सैन्याचे तळ बनवण्यात आले आहे. वर्ष १९६५ मध्ये झालेल्या युद्धानंतर वर्ष १९७१ मध्ये पंजाब रेजिमेंट आणि सीमा सुरक्षा दलाचे सैनिक यांनी लोंगेवाला येथील पाकिस्तानी सैनिकांचे तळ उद्ध्वस्त केले होते. लोंगेंवाला येथील विजयानंतर मंदिर परिसरात एका विजयस्तंभ उभारण्यात आला. तेथे प्रत्येक वर्षी१६ डिसेंबर या दिवशी उत्सव साजरा केला जातो, तसेच आश्‍विन आणि चैत्र नवरात्रात येथे जत्रा भरते.

भारतभूचे रक्षण करणारी श्री तनोटमाता देवीची नयनमनोहारी मूर्ती ! हे माते, भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होण्यासाठी आम्हाला बुद्धी, भक्ती आणि शक्ती प्रदान कर !
श्री तनोटमाता मंदिर
श्री तनोटमाता मंदिरानिकट असलेला भारत-पाक सीमेजवळील परिसर
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात