Due to a software update, our website may be briefly unavailable on Saturday, 18th Jan 2020, from 10.00 AM IST to 11.30 PM IST

हाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदूदाबन ( रिफ्लेक्सॉलॉजी )

सनातनच्या ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ या मालिकेतील ग्रंथ !

संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या समस्या आणि विकार यांना तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन संस्था ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. दिनांक ४.३.२०१७ पर्यंत या मालिकेतील १९ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. यातीलच ‘रिफ्लेक्सॉलॉजी (हाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदूदाबन)’ या ग्रंथाचा परिचय या लेखाद्वारे करून देत आहोत.

१. बिंदूदाबन (अ‍ॅक्युप्रेशर) आणि ‘रिफ्लेक्सॉलॉजी’

बिंदूदाबन (अ‍ॅक्युप्रेशर) उपचारपद्धतीमध्ये रोगाचे निदान आणि उपचार करण्यासाठी संपूर्ण शरिरावरील विशिष्ट बिंदूंचा वापर केला जातो. ‘रिफ्लेक्सॉलॉजी’ ही बिंदूदाबन (अ‍ॅक्युप्रेशर) उपचारपद्धतीचीच एक शाखा आहे. यामध्ये केवळ हाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदू दाबून रोगाचे निदान आणि उपचार केले जातात. ‘रिफ्लेक्सॉलॉजी’लाच ‘झोन थेरपी’ असेही म्हणतात.

२. ‘रिफ्लेक्सॉलॉजी’मध्ये वापरण्यात येणारी उपकरणे

२ अ. महत्त्वाची लाकडी उपकरणे

२ अ १.    बिंदूदाबन लेखणी (जिमी) : हे ‘आकृती १’मध्ये दाखवल्याप्रमाणे लेखणीसारखे उपकरण असते. या उपकरणावर गोल चकत्या असलेला आणि ‘पिरॅमिड’च्या आकाराचे काटे असलेला, असे २ भाग असतात. ज्यांना काटेरी भागाचा दाब सहन होत नाही, त्यांनी गोल चकत्यांच्या भागाने दाब द्यावा. एकेका बिंदूवर दाब देण्यासाठी जिमीचे लहान किंवा मोठे टोक वापरावे. हाता-पायांच्या बोटांवर उपचार करण्यासाठी जिमीचा काटेरी भाग वापरावा.

२ अ २. बिंदूदाबनासाठीचे लाटणे (रोलर) : हे ‘आकृती २’मध्ये दाखवल्याप्रमाणे काटेरी, लाटण्यासारखे उपकरण असते. याचा वापर एकाच वेळी अनेक बिंदूंवर दाब देण्यासाठी चांगला होतो. पाय आणि हात यांच्या तळव्यांवर ‘रोलर’ वापरणे सोपे जाते.

२ आ. उपकरणे वापरण्याची पद्धत

हाता-पायांच्या तळव्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी वरील उपकरणांचा वापर पुढीलप्रमाणे करावा.

२ आ १. बोटे : ‘आकृती ३’मध्ये दाखवल्याप्रमाणे बोट आणि उपकरणाचा (जिमी किंवा रोलर यांचा) काटेरी भाग चिमटीत एकत्र धरून एकमेकांवर दाब द्यावा. पायाच्या बोटांसाठीही असेच करावे.

२ आ २. बोटांमधील खाचा : जिमीचा काटेरी भाग बोटांमधील खाचांमध्ये घालून ‘आकृती ४’मध्ये दाखवल्याप्रमाणे दाब द्यावा. पायाच्या बोटांच्या सर्व खाचाही अशाच दाबाव्यात.

२ आ ३. तळव्यावरील विशिष्ट बिंदू : ‘आकृती ५’मध्ये दाखवल्याप्रमाणे जिमीच्या टोकाने तळव्यावरील बिंदू पुनःपुन्हा दाबून सोडावा किंवा जिमी सलग दाबून धरून मागे-पुढे हालवावी.

२ आ ४. तळपायाचा विशिष्ट भाग : बोटे दाबतो त्याप्रमाणेच रोलर किंवा जिमीने दाबावे. तळपायाच्या विशिष्ट भागावर दाब देण्यासाठी रोलरवर एक तळपाय ठेवून शक्य असेल, तेव्हा त्या पावलावर दुसर्‍या पायाने दाब द्यावा. (आकृती ६ पहा.)

२ आ ५. संपूर्ण तळवा : संपूर्ण तळहातावर दाब देण्यासाठी रोलर मुठीत धरून दाबावा. संपूर्ण तळपायावर दाब देण्यासाठी रोलर पायांखाली दाबून पुढे-मागे फिरवावा.

२ इ. लाकडी उपकरणांच्या अभावी वापरण्याची पर्यायी साधने

लाकडी उपकरणांच्या अभावी हाताची बोटे, लेखणी, कंगवा, पट्टी, पापड लाटण्यासाठी वापरले जाणारे खाचा असलेले लाटणे इत्यादींनीही बिंदूदाबन करता येते. नदीतील गोटे, खडी अथवा खडबडीत भूमी यांवर अनवाणी चालण्याने तळपायांच्या बिंदूंवर आपसूकच उपाय होतात.

३.  ‘रिफ्लेक्सॉलॉजी’मधील महत्त्वाचे बिंदू

३ अ. उजव्या तळपायावरील बिंदू (आकृती ७ पहा.)

३ आ. डाव्या तळपायावरील बिंदू (आकृती ८ पहा.)

३ इ. घोट्याच्या बाहेरील (करंगळीकडील) भागावरील बिंदू (आकृती ९ पहा.)

३ ई. घोट्याच्या आतील (अंगठ्याकडील) भागावरील बिंदू (आकृती १० पहा.)

३ उ. उजव्या तळहातावरील बिंदू (आकृती ११ पहा.)

३ ऊ. डाव्या तळहातावरील बिंदू (आकृती १२ पहा.)

४. खांद्यांवरील बिंदू

‘आकृती १३’मध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही खांद्यांवर मध्यभागी हे बिंदू असतात. बिंदू दाबतांना विरुद्ध बाजूच्या हाताच्या बोटांनी दाबावा. नियमितपणे हे बिंदू दाबल्यामुळे आनुवंशिक विकार बरे होतात आणि हे विकार पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होत नाहीत. हा बिंदू योग्य ठिकाणीच दाबावा.

 

५. बिंदूदाबन करण्यापूर्वी लक्षात घेण्याच्या सूचना

५ अ. बिंदूदाबन उपचार कधी आणि किती वेळा करावेत ?

बिंदूदाबन उपचार विकार बरा होईपर्यंत प्रतिदिन नियमितपणे करणे महत्त्वाचे आहे. सर्वसाधारणपणे हे उपचार सकाळ – सायंकाळ किंवा सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी असे दिवसातून २ वेळा करावेत.

५ आ. बिंदूदाबन करतांना दाब कसा आणि किती द्यावा ?

बिंदू सेकंदाला एकदा याप्रमाणे  पुनःपुन्हा दाबून सोडावा. दाब सहन करता येईल एवढ्या प्रमाणात असावा. हळूहळू सहनशक्ती वाढवून थोड्या जास्त प्रमाणात दाब द्यावा.

५ इ. एक बिंदू किती वेळ दाबावा ?

एखादा भाग जास्त दुखत असल्यास त्यावर साधारण २ मिनिटे (१२० वेळा) अन् दुखत नसल्यास १० सेकंद (१० वेळा) यांप्रमाणे दाब द्यावा. काही दिवसांनी प्रकृतीत सुधारणा होऊन दुखणारा भाग अल्प दुखू लागतो. अशा वेळी दाब देण्याचा कालावधी न्यून करावा.

५ ई. उपकरणांनी दाब देतांना कोणती दक्षता घ्यावी ?

बिंदूदाबनाच्या कोणत्याही उपकरणाने दाब देतांना केवळ तळव्यावरच दाब द्यावा. तळव्यांव्यतिरिक्त अन्य भागांवर काटेरी उपकरणांनी दाब देऊ नये. काटेरी भाग टोचल्याने कोमल त्वचेला हानी पोचू शकते.

५ उ. सर्वांनीच, विशेषतः वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्यांनी नामजप करत बिंदूदाबन उपचार करावेत !

६. दैनंदिन जीवनात आढळणार्‍या विकारांची सूची आणि त्या विकारांत दाबायचे बिंदू

विशिष्ट विकारांमध्ये कोणते बिंदू दाबायचे, हे पुढे दिले आहेत. विकारांपुढील बिंदू क्रमांक हे आकृती ७ ते १२ यांमधील आहेत.

६ अ. डोकेदुखी, पडसे(सर्दी), ताप आणि खोकला

४, ५, ९, १०, १६, १६ अ, २८ अ आणि २८ आ.

६ आ. डोळे, कान आणि दात यांचे एकाएकी उत्पन्न झालेले विकार

२, ३, ४, ५, ९ आणि १०.

६ इ. पचनसंस्थेचे विकार (पोटाचे विकार)

६ इ १. भूक न लागणे, आम्लपित्त, बद्धकोष्ठता, मूळव्याध : खांद्यांवरील बिंदू, ४, ५, २०, २३ अ, २८ अ, २८ आ, २९, ३० आणि ३३ ते ३५.

६ इ २. उलटी आणि अतीसार(जुलाब) : ४, ५, २०, २८ अ, २८ आ, २९ आणि ३०.

६ ई. मूत्रवहनसंस्थेचे सर्व विकार (लघवीशी संबंधित सर्व विकार)

४, ५, २० ते २२, २८ अ, २८ आ, २९, ३० आणि ३३ ते ३५

६ उ. हाडे, सांधे आणि स्नायू यांच्याशी संबंधित विकार

खांद्यांवरील बिंदू, २०, २६, २८ अ, २८ आ, २९ ते ३५ अन् ४१

६ ऊ. स्थूलता (लठ्ठपणा), कृशता (हडकुळेपणा)

२०, २५, २८ अ, २८ आ, २९, ३० आणि ३३

(सविस्तर विवेचनासाठी वाचा : सनातनचा ग्रंथ ‘रिफ्लेक्सॉलॉजी (हाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदूदाबन)’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात