‘हिंदु राष्ट्रा’च्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेसाठी उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके आणि युवा साधक !

परात्पर गुरुमाऊलीशी अंतर्मनाने जोडलेली आणि हिंदु राष्ट्र समर्थपणे
चालवू शकणारी ६१ टक्के अथवा त्याहून अधिक पातळी गाठलेली दैवी बालके !

‘वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना होईल’, असे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, तसेच इतर संत यांनी सांगितले आहे. त्या वेळी कलियुगांतर्गत कलियुगातील छोटेसे कलियुग संपून छोट्याशा सत्ययुगाला आरंभ होईल. तेव्हा ‘हिंदु राष्ट्रा’ची, म्हणजेच सनातन धर्म राज्याची स्थापना होईल. सनातन धर्म राज्य म्हणजे विश्‍वकल्याणासाठी सात्त्विक लोकांनी चालवलेले राष्ट्र ! ते रामराज्यासारखे असेल ! असे राज्य चालवायला पात्र व्यक्ती लागतील. ईश्‍वराने सनातनला सामान्यांपेक्षा उच्च आध्यात्मिक पातळी असलेल्या, म्हणजे गेल्या जन्मीची साधना असलेल्या शेकडो बालसाधकांची ओळख करून दिली आहे.

 

१. हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवण्यासाठी साधकच पात्र !

हिंदु राष्ट्र चालवण्यासाठी साधकच पात्र आहेत; कारण सर्वसामान्यांच्या तुलनेत त्यांच्यात सत्त्वगुण वाढलेला असतो. ‘आध्यात्मिकदृष्ट्या लोकांचे कल्याण व्हावे’, यासाठी साधकच प्रयत्न करू शकतात. त्यांच्यात भाव, तळमळ, त्याग, प्रेमभाव इत्यादी गुण असतात. ते निष्काम भावाने स्वतःच्या साधनेसाठी, म्हणजे ईश्‍वरप्राप्तीसाठीच हिंदु राष्ट्र चालवतील !

 

२. ईश्‍वराने उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेल्या
शेकडो बालसाधकांची सनातनला करून दिलेली ओळख !

ईश्‍वराने सनातनला सामान्यांपेक्षा उच्च आध्यात्मिक पातळी असलेल्या, म्हणजे गेल्या जन्मीची साधना असलेल्या शेकडो बालसाधकांची ओळख करून दिली आहे. (सध्या कलियुगात साधना न करणार्‍या सामान्य लोकांची आध्यात्मिक पातळी २० टक्के असते, साधना करून संतपद प्राप्त झाल्यावर व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ७० टक्के होते, तर मोक्षप्राप्ती झालेल्या व्यक्तीची आध्यात्मिक पातळी १०० टक्के असते.) त्यांनी मागील जन्मी केलेल्या योग्य साधनेमुळेच त्यांना उच्च लोकांत स्थान प्राप्त झाले. ही बालसाधकांची पिढीच पुढे हिंदु राष्ट्र चालवील.

 

३. बालसाधकांचे अध्यात्मातील असामान्यत्व !

अल्प वयातच व्यवहारातील विविध क्षेत्रांमध्ये निपुण असलेल्या अनेक मुलांची उदाहरणे आपल्याला ठाऊक आहेत. अल्प वयातच कुणी अभ्यासातील एखाद्या विषयात पारंगत असते, तर कुणी एखाद्या खेळात, तर कुणी एखाद्या कलेमध्ये. व्यवहारातील या असामान्यत्वापेक्षा अध्यात्मातील असामान्यत्व कित्येक पटीने उच्च असते. भारतात आद्यशंकराचार्य, संत ज्ञानेश्‍वर यांच्यासारख्या लहानपणीच संत असलेल्यांची, अनेक चमत्कार करण्याची क्षमता असणार्‍यांची आणि जगाला मार्गदर्शन करणार्‍यांची कितीतरी उदाहरणे देता येतील. त्यामुळे अशांना ‘आध्यात्मिकदृष्ट्या असामान्य बालक’, म्हणजे ‘स्पिरिच्युअल चाईल्ड प्रॉडिजी’, असे म्हणावे लागेल. उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेले बालसाधकही थोड्याफार प्रमाणात ‘आध्यात्मिकदृष्ट्या असामान्य’ आहेत; कारण त्यांनी लहानपणीच अध्यात्मातील ५० ते ६१ टक्के पातळी, तर काहींनी ६१ टक्क्यांहून अधिक पातळी गाठली आहे. यांचे विचार प्रगल्भ आहेत आणि ते सर्वांसाठीच मार्गदर्शक आहेत. हे जीव सात्त्विक असून त्यांना जन्मापासूनच देवाप्रती ओढ आहे; म्हणून ते ‘दैवी बालक’ आहेत. भारतातील समाजाला ‘बाल कीर्तनकार’ ठाऊक आहेत. त्यांच्यापेक्षाही ही बालके श्रेष्ठ आहेत. या बालकांतील अनेक जणांनी आता युवा वयात पदार्पण केले असून त्यांतील काही जण पूर्णवेळ साधना करण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात रहात आहेत. आतापर्यंत उच्च स्वर्ग आणि महर् या लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेल्या ६०० पेक्षाही अधिक बाल आणि युवा वयाच्या साधकांना सनातनने ओळखले आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

 

४. पालकांनो, आपल्या बालकांवर साधनेचा संस्कार करून त्यांना
हिंदु राष्ट्रासाठी (सनातन धर्म राज्यासाठी) आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम करा !

हे सर्व बालसाधक जन्मतःच सात्त्विक आहेत. यापुढे ते भावी हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवण्यासाठी सक्षम व्हावेत, याचे खरे दायित्व आता त्यांच्या पालकांवर आहे. या बाल आणि युवा साधकांच्या आई-वडिलांनी त्यांना त्यांच्या पुढील साधनेसाठी पोषक वातावरण दिले पाहिजे. त्यांच्याकडून साधना करून घेतली पाहिजे. त्यांना धर्माचरण करायला शिकवून त्यांच्यावर संस्कार केले पाहिजेत. ‘योग्य-अयोग्य, तसेच सात्त्विक-असात्त्विक आचरण कोणते ?’, हे त्यांना सांगितले पाहिजे. त्यांना राष्ट्र आणि धर्म यांचा विचार करायला शिकवले पाहिजे. त्यांच्यात समाजातील अन्याय, अत्याचार दूर करण्याचे संस्कार रुजवले पाहिजेत. हे सर्व सुसंस्कार या लहान मुलांची संस्कारांची पाटी कोरी असतांनाच त्यांच्यावर केले पाहिजेत; कारण एकदा का या कलियुगातील मायेतील संस्कार त्यांच्यावर झाले, तर ते पुसणे अवघड होते. त्यामुळे मुले वयाने लहान असतांनाच
त्यांच्यावर योग्य ते संस्कार करा. पालकांनी असे प्रयत्न केले नाहीत, तर देवाने दिलेली ही बालसाधकांची देणगी वाया जाईल, तसेच या बालसाधकांवर अनिष्ट शक्तींची आक्रमणे होऊन त्यांना त्रास होऊ शकतो. हे टाळण्यासाठी दैवी बालकांच्या पालकांनो, आपल्या बालकावर साधनेचा संस्कार करा, त्याला सत्मध्ये ठेवा, त्याच्यासाठी प्रयत्नपूर्वक सत्च्या वातावरणाची निर्मिती करा आणि त्यांना हिंदु राष्ट्रासाठी आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम करा !

संदर्भ : ‘दैनिक सनातन प्रभात’ (१३.७.२०१६)