घराला आश्रमाप्रमाणे बनवण्याचे केलेले प्रयत्न आणि त्यामुळे जाणवलेले पालट अन् आलेल्या अनुभूती

१. घरातील सामान न आवरल्याने वाईट शक्तींचा त्रास वाढणेे,
मनात नकारात्मक विचार येणे आणि साधना करूनही म्हणावा तसा आनंद न मिळणे

मी सेवानिवृत्त झाल्यानंतर वर्ष २०१२ मध्ये आम्ही भाड्याच्या घरात राहू लागलो. मुंबई (बोईसर) येथून आमचे सर्व सामान बेळगावच्या घरात आणून ठेवले. त्यातील आवश्यक तेवढे सामान काढून घेतले आणि सर्व खोके माळ्यावर तसेच ठेवले. बेळगावला आल्यानंतर आम्हाला सेवेचे दायित्व असल्यामुळे घराकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही. सामानाचे खोके तसेच ठेवल्यामुळे घरात वाईट शक्तींचा त्रास वाढला. सतत नकारात्मक विचार येत होते. आम्हा दोघांचे एकमत होत नव्हते. कुठल्याही कामात यश येत नव्हते. साधना करूनसुद्धा म्हणावा तसा आनंद मिळत नव्हता. स्वच्छता करण्यापूर्वी नामजपच होत नव्हता. अशा प्रकारे ३ वर्षे गेली. नंतर आम्ही घराची स्वच्छता करण्याचे ठरवले.

 

२. आश्रमाप्रमाणे घराची स्वच्छता करणे

अ. शयनकक्ष आणि स्वयंपाकघर आवरणे अन् प्रत्येक खणावर आतील वस्तूंची नावे लिहिणे

satvik_kitchen

३०.८.२०१५ या दिवशी आम्ही कपड्यांचे कपाट व्यवस्थित आवरले. नंतर आम्ही शयनकक्षामधील सामानाचा एकेक खोका उघडला आणि त्यातील सामान जागेवर लावले. एका शयनकक्षाची स्वच्छता केल्यानंतर दुसरा शयनकक्ष आवरला. प्रत्येक खणावर आतील वस्तूंची नावे लिहिली. नंतर स्वयंपाकघराची स्वच्छता केली. डब्यांवर आतील वस्तूंची नावे घातली. डब्यांची व्यवस्थित मांडणी केली.

आ. अनावश्यक सामान काढणे

सामानाचे वर्गीकरण करून कधीतरी लागणारे सामान माळ्यावर ठेवले. प्रत्येक खोक्यावर आतील सामानाची सूची चिकटवली. आवश्यकतेपेक्षा अधिक असलेल्या गाद्या, चादरी, उशा, ब्लँकेट्स, भांडी इत्यादी सर्व नातेवाइकांना वाटले. सामानाचे रिकामे खोके देऊन टाकले.

इ. घराची गोमूत्राने शुद्धी करणे

सामान व्यवस्थित लावल्यामुळे घराच्या प्रत्येक भागातून चांगली स्पंदने येऊ लागली. मी प्रतिदिन ३ वेळा संपूर्ण घरात गोमूत्र शिंपडत होतो. त्यामुळे सामानाच्या माध्यमातून आलेली वाईट शक्ती निघून गेल्याचे जाणवले.

ई. उपायांच्या वेळेत नामजप करणे

दैनिक सनातन प्रभातमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही पू. मेनरायकाका आणि पू. (सौ.) मेनरायकाकू यांच्या नामजप करण्याच्या वेळेत नामजप करणे चालू केले.

 

३. आश्रमाप्रमाणे घराची स्वच्छता केल्यावर जाणवलेले पालट

अ. मन शांत आणि प्रसन्न होणे : घर प्रतिदिन स्वच्छ केल्यामुळे अधिकच स्वच्छ दिसायला लागले. कुठल्याही खोलीत बसले, तरी प्रसन्न वाटत होते. मन शांत होत होते.

आ. घराला आश्रमाचे स्वरूप येऊन आनंद मिळू लागला.

इ. मनातले नकारात्मक विचार दूर झाले.

ई. मनातील साधकांविषयीचे विकल्प दूर होऊन त्यांच्याविषयी प्रेमभाव वाढला.

उ. आमचा नामजप चांगला होऊ लागला.

ऊ. व्यवहारातील आणि साधनेतील अडथळे दूर झाले.

 

४. आलेल्या अनुभूती

अ. नामजप करतांना संतांचे दर्शन होणे

नामजप करत असतांना पू. मेनरायकाका, तसेच अन्य संत यांचे, तर कधी रामनाथी आश्रमाचे दर्शन व्हायचे. नामजपातून आनंद मिळू लागला.

आ. प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र जिवंत झाल्याचे जाणवणे

काही दिवसांपूर्वी घरातील प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र कु. प्रियांका लोटलीकर यांना पाठवले. ते पाहून त्यांनी सांगितले, छायाचित्रात जिवंतपणा आला आहे. हे छायाचित्र पुन्हा पूजेत ठेवू शकता.

आम्ही स्वयंपाकामध्ये खडेमीठ वापरतो. त्यामुळे पोटातील काळी शक्ती अल्प होण्यास साहाय्य होत आहे.

– श्री. महादेव बाबूराव चौगुले, बेळगाव

प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक, दैनिक सनातन प्रभात

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात