‘ॐ’चा स्वर ऐकल्याने वाढतो शरीरातील प्राणवायू !

१४ वर्षांच्या मुलीने शास्त्रीय प्रयोगातून लावला शोध

कोलकाता : सलग ३० मिनिटे ‘ॐ’चा स्वर ऐकल्याने शरीरातील प्राणवायू वाढतो आणि कार्बन डायऑक्साईड अल्प होतो, असा शोध नववी इयत्तेत शिकणार्‍या अन्वेशा रॉय चौधरी या १४ वर्षांच्या मुलीने लावला आहे. १७ वृद्ध व्यक्तींवर प्रयोग केल्यानंतर तिला हे निरीक्षण आढळून आले. कोलकाता येथे पश्‍चिम बंगाल राज्य शासनाच्या वतीने भरवण्यात आलेल्या सायन्स काँग्रेसमध्ये तिने तिचा शोध प्रबंध सादर केला होता. त्यासाठी तिला प्रथम पारितोषिक मिळाले.

या प्रयोगामध्ये तिला असेही आढळून आले की,

१. ‘ॐ’चा स्वर ऐकल्याने शरीरातील चेतातंतूंच्या टोकाला सिद्ध होणारे रसायन वाढते.

२. एका विशिष्ट फ्रीक्वेन्सीचा आवाज ऐकल्यानंतर न्यूरोट्रान्समीटर्स आणि सेरोटीन, डोपामाइन इत्यादी संप्रेरकांमध्ये वाढ होते. त्यामुळे रक्तवाहिन्यांचे प्रसरण होऊन शरीरात रक्ताभिसरण चांगले होते आणि थकवा अल्प होतो.

उत्तराखंडमध्ये बागेश्‍वरहून केदारनाथकडे पाणी घेऊन ६८ कि.मी. चा प्रवास करणार्‍या भाविकांच्या उदाहरणातून अन्वेशा हिला या प्रयोगाची प्रेरणा मिळाली. ‘ॐ’सारख्या स्वराचे उच्चारण केल्याने भाविक न थकता प्रतिदिन एवढे अंतर प्रवास करू शकत होते. भाविकांच्या स्वराला जुळणारा ओमचा स्वर असल्याने तिने यावर प्रयोग केला, असे तिने सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात