स्वैराचार आणि अनैतिकता यांना पूर्णत: निष्प्रभ करण्याचे सामर्थ्य केवळ अध्यात्मात असणे !

save_culture

 

१. विज्ञानाने मानवजातीला बंदुका, तोफा नजराणे दिले;
परंतु नीतीमत्ता न शिकवल्याने मनावर नैतिक संस्कार न होणे

‘मानवजातीला बंदुका, तोफा हे नजराणे विज्ञानाने दिलेले आहेत ना ? विज्ञानामुळे झालेल्या लाभांचे योग्य अवधान ठेवून विचारावेसे वाटते, ‘उपरोक्त नजराणे हे मानवजातीचे कोणत्या प्रकारचे कल्याण करीत आहेत ?’ शालेय विद्यार्थी हातात पिस्तुल घेऊन काही कारण नसतांना आपल्या शालेय बंधुभगिनींचे धडाधड मुडदे पाडत आहेत. वैज्ञानिक शोधांच्या आधारे चोर्‍या, घरफोडी, दरोडे, लूटमार असले प्रकार सर्रास होत आहेत. विज्ञान मानवाला नीतीमत्ता शिकवत नाही, तसेच त्याच्या मनावर नैतिक संस्कार करीत नाही. त्यामुळे वैज्ञानिक शोधांचा दुरुपयोग होत आहे.

 

२. विचार आणि दृष्टीकोन सकारात्मक असल्यास वैज्ञानिक प्रगती आपणही करू शकणे
आणि पाश्‍चात्त्य संस्कृतीमधील चांगल्या गोष्टींचे माफक अनुकरण करण्यास आडकाठी नसणे

अध्यात्म नैतिकता शिकवतो; म्हणून आम्ही ‘विज्ञानाने केली क्रांती, तरी अध्यात्माविना नाही मनःशांती’, असे ठामपणे सांगतो. पाश्‍चात्त्यांच्या वैज्ञानिक प्रगतीने आपले डोळे दिपून जातात. हा एक प्रकारे न्यूनगंड आहे. ते जी वैज्ञानिक प्रगती करू शकतात, ती आपण का करू शकत नाही ? निश्‍चितपणे करू शकतो; मात्र विचार आणि दृष्टीकोन सकारात्मक असणे आवश्यक आहे. पाश्‍चात्त्य संस्कृतीत जे चांगले असेल, त्याचे माफक अनुकरण करायला काहीही आडकाठी नाही; परंतु ते अंधानुकरण नसावे, उदा. बालकांचा किंवा अगदी थोरामोठ्यांचा वाढदिवस साजरा करतांना आपण पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करीत केकवर मेणबत्ती लावून ती विझवतो आणि टाळ्या वाजवतो. ही आपल्या संस्कृतीत बसणारी कृती नाही. निरांजन प्रज्वलित करून त्या बालकांचे किंवा व्यक्तींचे आपल्या परंपरेप्रमाणे औक्षण करा.

 

३. वाढदिवसाला मेणबत्ती विझवून अंधार करणे, हे अपयशाचे गमक असणे
आणि निरांजन प्रज्वलित करणे म्हणजे उज्ज्वल भविष्याचा सकारात्मक संदेश असणे

वाढदिवसाच्या दिवशी मेणबत्ती विझवणे म्हणजे अंधाराला आमंत्रण देणे. अंधार हे अपयशाचे प्रतीक आहे, तर प्रकाश हे विजय, यश, मांगल्य आणि दिव्यता यांचे प्रतीक आहे. मेणबत्ती विझवून आयुष्य एका वर्षाने अल्प झाले, असा नकारात्मक संदेश दिला जातो, तर निरांजन प्रज्वलित करून उज्ज्वल भविष्याचा सकारात्मक संदेश दिला जातो.

 

४. अनैतिकतेमुळे समस्त समाजाचे नैतिक अध:पतन होईल !

अध्यात्माकडे ज्या दिवशी आपण पाठ फिरवू, तो दिवस मानवाच्या जीवनातील काळाकुट्ट दिवस असेल; कारण त्यानंतर अनैतिकतेचे ‘कालकूट’ मानवाच्या बुद्धीला, मनाला विषारी बनवेल आणि समस्त समाजाचे नैतिक अध:पतन होईल. मानव पशुपेक्षाही भयंकर होईल आणि त्याचे पशुतुल्य वर्तन त्याच्या विनाशाचे कारण ठरेल.

आधुनिकतेच्या नावाखाली येणारा स्वैराचार, अनैतिकता यांना
पूर्णत: निष्प्रभ करण्याचे सामर्थ्य अध्यात्मातच आहे, हे लक्षात ठेवा.’

– (संदर्भ : नरेंद्र गाथा, मे २००४)