साधकांनो, साधनेच्या प्रयत्नांमध्ये मागे मागे राहू नका, नाहीतर प्रगतीत मागे मागे रहाल !

p_sandip_alshi
पू. संदीप आळशी

काही साधक चुका होतील, या भीतीमुळे एखादी सेवा करण्यास किंवा एखाद्या सेवेचे दायित्व घेण्यास कचरतात. काही साधक मला हे जमणार नाही, असा चुकीचा ग्रह मनाशी बाळगतात; त्यामुळे क्षमता असूनही त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार सेवा करणे जमत नाही. काही साधकांमध्ये सेवेच्या अनुषंगाने अभ्यासू वृत्ती अल्प असते किंवा सेवेमध्ये प्राविण्य मिळवण्याची तळमळ अल्प असते. असे साधकही पुढाकार घेऊन सेवा करण्यात मागे मागे रहातात. नोकरी, व्यवसाय आदी व्यावहारिक क्षेत्रांत काम करणारेही त्या त्या क्षेत्रात प्राविण्य मिळवण्यासाठी धडपडत असतात; मग साधकांची सेवेत प्रवीण होण्याची धडपड अल्प का पडते ?

सध्याचा आपत्काळ गतीने पुढे पुढे सरकत आहे. अशा आपत्काळात टिकून रहाता येण्यासाठी साधकांच्या प्रयत्नांमध्येही गतीमानता हवी. जे साधक प्रयत्नांमध्ये मागे मागे रहातात, त्यांच्यात नेतृत्व, धैर्य, आत्मविश्‍वास, विजिगीषू वृत्ती आदी गुणांचा विकासही होत नाही. त्यामुळे असे साधक हळूहळू आध्यात्मिक प्रगतीतही मागे मागे पडतात. साधकांनी याचा अंतर्मुख होऊन विचार करावा.

मनुष्याला श्रद्धेनुरूप फळ प्राप्त होते, असे एक संस्कृत वचन आहे. साधकांनी गुरु किंवा देव यांवर श्रद्धा ठेवल्यास त्यांना सर्व प्रयत्न करायला जमतील.

आध्यात्मिक त्रास असणार्‍या बर्‍याच साधकांना मला जमणारच नाही, असे वाटत असते. अशा साधकांनी आध्यात्मिक उपायांच्या जोडीला उत्तरदायी साधकांशी बोलून जेवढे जमेल, तेवढे तरी करायचा प्रयत्न करावा.

– (पू.) श्री. संदीप आळशी (७.१०.२०१६)