अझरबैजान या मुसलमानबहुल देशात ३०० वर्षांहूनही अधिक प्राचीन दुर्गा मातेचे मंदिर !

Article also available in :

अझरबैजान सरकारकडून मंदिराचे स्मारक
युनेस्कोच्या वतीने ऐतिहासिक वास्तू म्हणून घोषित !

बाकू – अझरबैजान या ९५ टक्के मुसलमानबहुल देशात ३०० वर्षांहूनही अधिक प्राचीन असे दुर्गामातेचे मंदिर आहे. या मंदिरात अखंड ज्योती तेवत असल्यामुळे या मंदिराला टेंपल ऑफ फायर असेही संबोधले जाते. ही ज्योती साक्षात भगवती असल्याची भावना भक्तगणांमध्ये आहे. या ठिकाणी प्रतिवर्षी १५ सहस्रांहून अधिक भाविक दर्शनाला येतात.

या मंदिराची वास्तूकला प्राचीन असून या मंदिरात प्राचीन त्रिशूळ आहे, तसेच मंदिराच्या भितींवरही गुरुमुखी भाषेतील लेख आहेत. शेकडो वर्षांपूवी या मार्गाचा वापर भारतीय व्यापारी करत असत. हे व्यापारी येथे दर्शनासाठी थांबत असत. त्यापैकीच कोणीतरी हे मंदिर बांधले असावे, असे सांगितले जाते. इतिहासानुसार हरियाणातील मानदा गावाचे बुद्धदेव यांनी हे मंदिर उभारले. मंदिरात असलेल्या शिलालेखात उत्तमचंद आणि शोभराज यांनीही या मंदिर उभारणीत योगदान दिले असल्याचा उल्लेख आहे.

इराणमधूनही काही लोक येथे पूजा करण्यासाठी येत असत. येथे कायमस्वरूपी पुजारीही होते; परंतु वर्ष १८६० नंतर येथे कोणीही पुजारी रहाण्यास आलेले नाहीत. अझरबैजान सरकारने वर्ष १९७५ मध्ये या मंदिराचे स्मारक बनवले. त्यानंतर वर्ष १९९८ मध्ये युनेस्कोला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यासाठी त्याचे नामांकन पाठवले. त्यांनतर वर्ष २००७ मध्ये हे मंदिर ऐतिहासिक वास्तू म्हणून घोषित करण्यात आले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात