मुलींवरील वाढत्या अत्याचारात मुलींचे अयोग्य वागणे हाही एक प्रमुख घटक ! – अधिवक्त्या अपर्णा रामतीर्थकर

     गणेशवाडी (जिल्हा कोल्हापूर) – पूर्वीच्या काळी महिला धर्माचरण करत होत्या; मात्र सध्याच्या काळात मुलींचा धर्माचरण न करण्याकडेच कल आहे. आजच्या मुली जीन्स पँट घालणे, केस मोकळे सोडणे, कुंकू न लावणे अशा कृतीच अधिक करत आहेत. त्यामुळे मुलींवरील वाढत्या अत्याचारात मुलींचे अयोग्य वागणे हाही एक प्रमुख घटक आहे, असे मत सोलापूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अधिवक्त्या अपर्णा रामतीर्थकर यांनी व्यक्त केले. शेतकरी मित्र गणेशोत्सव मंडळ, गावभाग यांच्या वतीने गणेशवाडी येथील वाचनालयात घेण्यात आलेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या. याचा लाभ २५० हून अधिक तरुणी आणि महिला यांनी घेतला. या वेळी अधिवक्त्या अपर्णा रामतीर्थकर यांनी धर्माचरण न केल्याने होणारे तोटे सांगून धर्माचरण केल्याने लाभ कसा होतो, हे उदाहरणासहित स्पष्ट केले. मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेंद्र मल्लाप्पा हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीनिर्मिती लव्ह जिहाद ही ध्वनीचित्र चकती दाखवण्यात आली. तसेच सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने आणि वस्तू यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

धर्माचरण केल्यास हिंदू मुली लव्ह
जिहादला बळी पडणार नाहीत ! – सौ. वैशाली राजहंस

     या वेळी बोलतांना सनातन संस्थेच्या सौ. वैशाली राजहंस म्हणाल्या, हिंदु धर्मात सांगण्यात आलेल्या प्रत्येक कृतीमागे शास्त्र आहे. या शास्त्राचे पालन करणे म्हणजेच धर्माचरण होय ! त्यामुळे हिंदु मुलींनी धर्माचरण केल्यास त्या लव्ह जिहादला बळी पडणार नाहीत. या वेळी सौ. राजहंस यांनी कुंकू लावण्यामागील शास्त्र, बांगड्या घालण्यामागील शास्त्र, सात्विक केशरचना, सात्विक वेशभूषा यांमागील शास्त्र, वाढदिवस कसा साजरा करावा, यांसह अन्य धर्माचरणाच्या कृतींविषयी उपस्थितांना माहिती दिली.

क्षणचित्र
१. अधिवक्त्या अपर्णा रामतीर्थकर यांनी त्यांच्या व्याख्यानात कुंकू लावण्याचे महत्त्व सांगून सनातनचे कुंकू, तसेच सनातनचा लव्ह जिहाद या ग्रंथाविषयी माहिती सांगून तो घेण्यास उद्युक्त केले.