आदर्श व्यक्तीमत्त्व विकसित करण्याची आवश्यकता

swabhavdosh_prakriya_banner

व्यक्तीच्या जीवनातील कोणत्याही कठीण प्रसंगी मानसिक संतुलन बिघडू न देता त्या प्रसंगाला धैर्याने तोंड देता यावे, तसेच त्याच्याकडून प्रत्येक कृती आदर्श व्हावी, यासाठी व्यक्तीचे मनोबल उत्तम आणि व्यक्तीमत्त्व आदर्श असणे आवश्यक असते. व्यक्तीमधील स्वभावदोष त्या व्यक्तीचे मन दुर्बल करण्यास कारणीभूत ठरतात, तर त्याच्यातील गुण हे आदर्श व्यक्तीमत्त्व विकसित करण्यास साहाय्यभूत ठरतात. म्हणूनच आदर्श व्यक्तीमत्त्व विकसित करण्यासाठी व्यक्तीमत्त्वातील स्वभावदोषांचे निर्मूलन करून गुणांचे संवर्धन करणे आवश्यक ठरते. या लेखमालेत व्यक्तीमध्ये असलेले काही स्वभावदोष आणि त्यांच्या निर्मूलनासाठी करायचे प्रयत्न यांविषयी जाणून घेऊ.

 

१. सुखी जीवन जगण्यात ‘स्वभावदोष’ हा मोठा अडथळा

‘मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः ।’ या वचनानुसार मन हेच मनुष्याच्या बंधनास (जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकण्यास) आणि मोक्षास (जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटून सुख-दुःखाच्या पलीकडे असलेल्या आनंद आणि शांती यांची नित्य अनुभूती मिळण्यासाठी) कारणीभूत असते. व्यक्तीमत्त्वातील स्वभावदोष, हे व्यक्तीच्या दुःखास, तर गुण, हे व्यक्तीला सुख मिळण्यास कारणीभूत असतात. दैनंदिन जीवनातील विविध प्रसंगांत आपल्याकडून होणाऱ्या वर्तनावरून आपल्यातील गुण-दोष लक्षात येतात. स्वभावदोषांमुळे जीवनात पदोपदी संघर्षाची आणि तणावाची परिस्थिती निर्माण होते. असे तणाव निर्माण झाल्यानंतर त्याचे खापर आजूबाजूचे वातावरण, परिस्थिती  आणि अन्य व्यक्तींचे स्वभावदोष यांवर फोडले जाते; पण त्यामागील मूळ कारण असलेले स्वतःमधील स्वभावदोष शोधण्याचा प्रयत्नच केला जात नाही. त्यामुळे स्वभावदोष आहेत तसेच रहातात. परिणामी मनःशांती मिळत नाही; म्हणूनच जीवन सुखी होण्यासाठी स्वभावदोषांचा अडथळा दूर करणे अनिवार्य आहे.

 

२. स्वभावदोष आध्यात्मिक उन्नतीसाठीही बाधक

ईश्वरप्राप्तीसाठीच्या प्रयत्नांमध्ये, म्हणजेच साधनेतही स्वभावदोषांचाच (षड्रिपूंचाच) प्रामुख्याने अडथळा असतो. स्वभावदोषांच्या माध्यमातून षड्रिपूंचे प्रकटीकरण होते. त्यामुळे साधनेने मिळालेली ऊर्जा स्वभावदोषांमुळे होणाऱ्या चुकांमुळे खर्ची पडते. जेवढे स्वभावदोष अधिक तेवढ्या व्यष्टी आणि समष्टी साधनेमध्ये होणाऱ्या चुका जास्त आणि जेवढ्या चुका जास्त तेवढे आपण ईश्वरापासून दूर जातो. ज्याप्रमाणे पाण्यावर शेवाळ्याचा थर जमल्यास सूर्याचे प्रकाशकिरण पाण्याच्या तळापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्याप्रमाणे स्वभावदोषांमुळे ईश्वरी चैतन्य ग्रहण करता न आल्यामुळे साधक ईश्वरीकृपेपासून वंचित रहातो. ईश्वराशी एकरूप होणे, हे कोणत्याही योगमार्गानुसार साधना करणाऱ्या साधकाचे ध्येय असते. जसा तेलाचा एक थेंब त्याच्या अंगभूत गुणधर्मभिन्नतेमुळे पाण्याशी एकरूप होऊ शकत नाही, तसे स्वभावदोषांचे निर्मूलन आणि गुणांचे संवर्धन केल्याशिवाय साधकाला दोषरहित आणि सर्वगुणसंपन्न ईश्वराशी एकरूप होता येत नाही. म्हणूनच साधनेतील षड्रिपूंचा अडथळा दूर करून ईश्वराशी एकरूप होण्यासाठी स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन करणे आवश्यक आहे.

 

३. साधनेला स्वभावदोष-निर्मूलनाच्या
प्रयत्नांची जोड देण्याची अनिवार्यता

साधना करणाऱ्यांचा असा समज असतो की, साधनेने स्वभावदोषांचे (षड्रिपूंचे) निर्मूलन आपोआप होते. तत्त्वतः जरी हे अयोग्य नसले, तरी प्रत्येकाच्याच बाबतीत ही प्रक्रिया सहज घडेल, याची शाश्वती देता येत नाही. साधनेचे ध्येय, ईश्वरप्राप्तीची तळमळ, अंतःकरणात ईश्वराबद्दल निर्माण झालेले केंद्र, प्रत्यक्ष साधना इत्यादी विविध घटकांवर हे अवलंबून असते. साधनेचा उद्देशच षड्रिपूंचे निर्मूलन करणे, म्हणजे ‘सर्व प्रकारच्या क्रिया-प्रतिक्रियांवर नियंत्रण मिळवणे’ हा असला, तरी स्वभावदोष म्हणजे चित्तातील जन्मोजन्मीचे संस्कार असल्यामुळे ते चित्तात इतके खोलवर रुजलेले असतात की, साधनेने त्यांचे लवकर निर्मूलन होणे सहज शक्य नसते. साधनेने आध्यात्मिक उन्नती होऊन मनोलय आणि बुद्धीलय होईपर्यंत, म्हणजेच चित्तावरील संस्कार पुसले जाईपर्यंत मन आणि बुद्धी कार्यरत रहातात. त्यामुळे स्वभावदोषही जागृत रहातात. मनात येणारे नकारात्मक विचार आणि विकल्प यांमुळे साधनेतून आनंदप्राप्ती न झाल्याने साधकही मानसिकदृष्ट्या खचण्याची शक्यता असते. म्हणून ‘साधनेने स्वभावदोष आपोआप नष्ट होतीलच’, असा विचार न करता स्वभावदोष-निर्मूलनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे अपरिहार्य ठरते.

 

४. राष्ट्राची दुःस्थिती दूर करण्यासाठी
सुसंस्कारित समाजमनाची आवश्यकता

व्यक्ती व समाज यांचे स्वास्थ्य परस्परांवर अवलंबून असते. व्यक्तीगत जीवनावर सामाजिक परिस्थितीचा प्रभाव पडत असल्यामुळे व्यक्तीच्या सुखाचा विचार करतांना समाजाच्या, पर्यायाने राष्ट्राच्या सुखाचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. प्रचलित समाजव्यवस्थेमध्ये अनेक दुर्गुणांचा प्रादुर्भाव झाला आहे. याचा अनुभव आपल्याला दैनंदिन जीवनात पदोपदी येतो. भारतातील राज्यकर्ते, जनता, कर्मचारी आणि धार्मिक नेते या चार महत्त्वाच्या मूलभूत समाजघटकांमध्ये स्वभावदोष बळावल्यामुळे केवळ राजकीय क्षेत्रच नव्हे, तर सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आदी सर्वच क्षेत्रे कमीअधिक प्रमाणात मलीन झाली आहेत. समस्त राष्ट्रवासियांना धर्म आणि नीती यांचा पडलेला विसर आणि त्यांची होणारी घोर विटंबना यांमुळेच राष्ट्राला अवकळा आलेली आहे. एकूण समाजव्यवस्था सुस्थित करण्यासाठी स्वतःतील दुर्गुणांचे निर्मूलन आणि गुणांचे संवर्धन करणे, हे समाजातील प्रत्येक घटकाचे आद्य कर्तव्य ठरते. धर्म आणि जीवन यांची सांगड घालून समाजमन सुसंस्कारित करण्यासाठी आणि समाजातील घटकांमध्ये आंतरिक ऐक्य निर्माण करण्यासाठी स्वभावदोष-निर्मूलन, तसेच गुणांचे संवर्धन करणे आवश्यक आहे.

संदर्भ : सनातन निर्मित ग्रंथ – स्वभावदोष (षड्रिपू)-निर्मूलनाचे महत्त्व आणि गुण-संवर्धन प्रक्रिया

स्वतः मधील दोष घालवून, गुण वाढवून, व्यक्तीमत्त्व विकास साधण्यासाठी येथे ‘क्लिक’ करा !